एक  संस्मरणीय ट्रेक

भ्रमंतीसुनील शेडगे, सातारा 
सोमवार, 14 मार्च 2022

किल्ले भ्रमंती

...हा ट्रेक अनेकार्थी संस्मरणीय ठरला. कुठं नागमोडी घाटदार वळणं, कुठं जंगलातले कच्चे रस्ते, कुठं पाण्यातून प्रवास, तर कुठं जंगलातली पायपीट. आमचा मुक्काम झाला तोदेखील पर्वतसारख्या शांत, रमणीय, नितांतसुंदर ठिकाणी.

खोलवर पसरत गेलेलं निळंशार पाणी, हिरवंकंच जंगल, उंचच उंच कातळ, पाखरांचा किलबिलाट... शिवसागरापलीकडच्या जगाची ही सारी वैशिष्ट्यं. १९६७मध्ये कोयना वीज प्रकल्पाची निर्मिती झाली. त्यानंतर कोयनेचं ‘बॅकवॉटर’ थेट ७० ते ८० किलोमीटर दूर प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन भिडलं. त्यातून शिवसागरापलीकडं एक नवं जग आकारास आलं. पर्यटकांसाठी, निसर्गप्रेमींसाठी हा प्रदेश म्हणजे भटकंतीची पर्वणी. 

दमछाक करायला लावणारे वासोटा, महिमंडणगड, मकरंदगडासारखे किल्ले, गरगरायला लावणाऱ्या चकदेवच्या शिड्या, पर्वत अन् उत्वेश्वराची डोंगराच्या सुळक्यावरची मंदिरं, माणसाच्या प्रबळ इच्छाशक्तीतून साकारलेला रघुवीर घाट, कोयनेचं घनगर्द अभयारण्य ही सारी स्थळं याच परिसरातील. जलविहारासाठी प्रसिद्ध असलेलं बामणोली अन् ‘मिनी काश्मीर’ म्हणून संबोधलं जाणारं तापोळा ही स्थानंही शिवसागराभोवतीच.

खरंतर विलक्षण निसर्गसौंदर्यानं गच्च फुललेल्या शिवसागरापलीकडच्या या मुलखाची सफर कित्येकदा अनुभवली. त्यातून अनेक ट्रेक यशस्वी झाले. अर्थात या परिसराचं वेड, तिथली ओढ कायमच मनाला भुरळ घालत राहिली. त्यामुळंच पावलं पुनःपुन्हा या परिसराकडं वळत राहिली. त्यातून नुकताच पर्वतच्या मल्लिकार्जुन मंदिराचा ट्रेक पूर्ण केला. इतकंच काय, निर्जन, निर्मनुष्य असलेल्या रघुवीर घाटातून कोकणातल्या खेड (जि. रत्नागिरी) इथं आम्ही उतरलो. मग खेड, पोलादपूर तिथून अंबेनळी घाटाची चढण चढत महाबळेश्वर. पुढं केळघरच्या घाटानं पुन्हा साताऱ्यात. हा ट्रेक अनेकार्थी संस्मरणीय ठरला. कुठं नागमोडी घाटदार वळणं, कुठं जंगलातले कच्चे रस्ते, कुठं पाण्यातून प्रवास, तर कुठं जंगलातली पायपीट. आमचा मुक्काम झाला तोदेखील पर्वतसारख्या शांत, रमणीय, नितांतसुंदर ठिकाणी.

मुळात पर्वत हे सातारा जिल्ह्यातल्या सर्वात उंच स्थळांपैकी एक. ते महाबळेश्वर तालुक्यात येतं. सातारा अन् रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरचं हे ठिकाण. समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचार हजार फुटांहून अधिक इथली उंची. इथून सातारा अन् रत्नागिरी जिल्ह्यातल्या निसर्गाचा आसमंत नजरेत उतरतो. मनाला मोहून टाकतो.

पर्वतला पोचण्यासाठी विक्रम साळुंखे या मित्राबरोबर दुचाकीवरून निघालो. सातारा सोडल्यावर वाटेत यवतेश्वर, पेटेश्वर ही मंदिरं लागली. घाटाईची देवराई ओलांडून आम्ही कासच्या प्रसिद्ध पुष्प पठारावर पोचलो. मग सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन कास तलावास वळसा घालून आम्ही बामणोलीत आलो. बामणोली म्हणजे शिवसागराच्या काठावर वसलेलं शेवटचं गाव. इथं बोट क्लब आहे. शेकडो लाँच, स्पीड बोट, स्कूटरबोट, हातानं वल्हविता येणाऱ्या होड्यांचं दर्शन इथं घडतं. हॉटेलं, रेस्टॉरंट, कृषी पर्यटन यासह मुक्कामाची सोयही इथं आहे.

आम्हाला मात्र पाण्यापलीकडं जायचं होतं. मग आमची दुचाकी होडीत चढवली. आनंद कांबळे या तरुणाची ही होडी. हातानं वल्हवत त्यानं आम्हाला पलीकडच्या काठावर पोचवलं. मग तिथून आम्ही दुचाकीनं डांबरी रस्ता धरला. काही अंतर गेल्यावर गाढवली हे कौलारू घरांचं छोटं गाव आलं. तिथून उत्वेश्वराकडं जायला रस्ता लागला. रस्त्याच्या रुंदीकरणाचं, डांबरीकरणाचं काम सुरू होतं. विजापूर भागातले पन्नासेक कामगार कामावर होते. एरवी हा सारा परिसर सुनसान असतो. जंगल ओलांडून एका खिंडीतून पलीकडं गेलं, की उत्वेश्वराचं मंदिर. वर जायला दगडी चिऱ्यांच्या पायऱ्या आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कल्याण- डोंबिवलीचे खासदार असलेले त्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून अलीकडच्या काळात इथं कित्येक सोईसुविधा झाल्या आहेत. पायऱ्यांची कामंही त्यांच्याच माध्यमातून झाली आहेत.

मंदिराच्या सुरुवातीलाच दगडी कमान. सभोवती दगडांची संरक्षक भिंत. उत्वेश्वराचं मंदिर प्राचीन आहे. भाविकांचं ते श्रद्धास्थान आहे. मंदिरात दगडात घडवलेला महाकाय नंदी आहे. इथून कित्येक चौरस किलोमीटर परिघातला प्रदेश दिसतो. मंदिरालगतच एक हायमास्ट पोल बसवण्यात आला आहे. परिसरातल्या कुठल्याही गावांतून, ठिकाणांहून तो दृष्टीस पडतो. इतक्या उंचीवर तो आहे.

उत्वेश्वराहून आम्ही खाली आलो. सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांचं दरे हे गाव आलं. रस्त्यालगतच त्यांचं भव्य, टोलेजंग घर आहे. तिथली कलाकुसर पाहण्यासारखी आहे. भोवती शेततळी आहेत. या लोकांचं अगत्य भावणारं आहे. दरेतून पिंपरी, आकल्पे, निवळी, लामज अशी गावं मागं टाकत वाघावळेत पोचलो. ही सारीच कौलारू घरांची गावं. त्यांची लोकसंख्याही जेमतेम दीड-दोनशेच्या घरात. पशुपालन हे इथलं उदरनिर्वाहाचं साधन. वरी, नाचणीसारखी पिकं इथं घेतली जातात. 

वाघावळे हे त्यातल्या त्यात मोठं गाव. हायस्कूल, प्राथमिक शाळा, दुकान, बँक या सुविधा वाघावळेत आहेत. वाघावळेत पोचलो तेव्हा सांज पुरती कलली होती. तिथं प्रसाद झरेकर नावाच्या तरुणाच्या दुकानालगत दुचाकी लावली. मग पर्वतच्या दिशेनं ‘कदम कदम बढाए जा’ सुरू केलं. अंधार पसरायला सुरुवात झाली होती. त्यामुळं धास्ती होतीच. तरीही मनाचा हिय्या करून प्रवास सुरू होता. पर्वतमध्ये पोचायला रात्रीचे आठ झाले. मोबाईल बॅटरीच्या उजेडानं चांगलीच साथ दिली.

पर्वतमध्ये गोपाळ जंगम यांच्या घरी मुक्काम झाला. शेणानं सारवलेलं अंगण, स्वच्छता, टापटीप, आदरातिथ्य यामुळं थकवा पळाला. तांदळाची भाकरी, वरण, भात, दही, घेवड्याची भाजी हा मेन्यूही लक्षात राहिला. रेंजअभावी मोबाईलनं दुपारपासूनच मान टाकली होती. त्यामुळं गोपाळ जंगम यांच्याशी गप्पा, इतकंच काम आता उरलं होतं. जंगम हे पुजारी. गेली ३५ वर्षं ते मंदिरात सेवा करतायत. त्यांच्याकडून इथला इतिहास, भूगोल समजला.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठलो. ओट्यावरच्या कट्ट्यावर स्नान उरकलं. मग चहा घेऊन जंगम यांच्यासोबत जोम- मल्लिकार्जुन मंदिराची वाट धरली. तिथून आणखी दीड तासाच्या अंतरावर हे मंदिर. अरुंद वाटेनं पाय तुडवत मंदिरात पोचलो. जोम अन् मल्लिकार्जुन ही स्वतंत्र मंदिरं आहेत. बांधकाम हेमाडपंथी आहे. ते सप्तशिवालयापैकी एक म्हणून गणलं जातं. सातारा अन् रत्नागिरी जिल्ह्यातले भाविक इथं येतात. पुण्यामुंबईचे पर्यटकही बहुसंख्येनं परिसरास भेट देतात. मंदिरापर्यंत पोचण्यासाठी कठीण, कष्टप्रद ठरणाऱ्या जंगलवाटा आहेत. ट्रेकर्ससाठी त्या आव्हान ठरतात. त्यामुळं पर्वतचा ट्रेक खडतर मानला जातो.

गोपाळ जंगम वैविध्यपूर्ण माहिती सांगत होते. आम्ही ऐकत होतो. इथून अत्युच्च शिखरं, डोंगरकडे, हिरवागर्द निसर्ग पाहायला मिळत होता. कांदाटी, सिंधी या नद्यांचा उगम याच परिसरातला. या नद्या पुढं कोयनेला जाऊन मिळतात.

बाराच्या ठोक्याला पर्वत सोडलं. पुन्हा एकदा पायपीट. आता उतरणीचा मार्ग. तीव्र उतारामुळं पाय कापत होते. तासाभरानंतर मग वाघावळेत आलो. प्रसादच्या दुकानात थंडगार पाणी घेतलं. मग पुन्हा रघुवीर घाटाची वाट धरली. वाघावळे ते सिंधी हे अठरा किलोमीटरचं अंतर. अर्थात कच्चा रस्ता अन् धुळीचं साम्राज्य. वनविभागाचं क्षेत्र असल्यामुळं डांबरीकरण नव्हतं. रस्त्यावर मोठमोठे दगडगोटे. त्यामुळं गाडी चालवणं जिकिरीचं ठरत होतं. त्यातच उन्हाचा पारा चढलेला होता. अगदीच मंद गतीनं अंतर कापलं जात होतं. नुसत्या प्रवासानंही घामाघूम झालो.

वाटेत जुलै महिन्यातल्या भूस्खलनाच्या खाणाखुणा दिसत होत्या. शेकडो वर्षांपूर्वीची झाडं उन्मळून पडलेली दिसत होती. अवाढव्य दगडही ओढ्यातून वाहत आले होते. याच परिसरातल्या गंगाराम ढेबे नावाच्या शेतकऱ्याची ६५ गुरं त्या पावसात वाहून गेल्याची माहिती सकाळी गोपाळ जंगम यांनी दिली होती. ते आठवलं. केवळ कल्पनेनंही अंगावर शहारा आला.
पुढं वाटेत वलवण हे गाव आलं. रस्त्यालगत मंडप थाटण्यात आला होता. लोकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. पारायण सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होता. गावात सुरू असलेल्या ‘संकल्प शाळे’मुळं वलवणचं नाव सर्वदूर झालं आहे. ही शाळा रस्त्याकडेलाच दिसली. आमची गाडी तिकडं वळली. रविवार असल्यामुळं शाळेला सुट्टी होती. अर्थात शालेय प्रांगणातील चित्रावरून विविधांगी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचं सूचित होत होतं. तिथून बाहेर पडताना काशिनाथ जाधव हे वयोवृद्ध ग्रामस्थ भेटले. शाळेविषयी ते भरभरून बोलले. मुख्याध्यापक डॉ. विजय सावंत अन् त्यांच्या सहकाऱ्यांबाबत त्यांनी गौरवोद्‍गार काढले.

वलवणनंतर सिंधी हे गाव आलं. हे सातारा जिल्ह्यातलं शेवटचं गाव. सिंधीतून एक वाट बहुचर्चित ठरलेल्या चकदेवच्या शिंड्याकडं जाते. दुसरी सरळ जाणारी वाट महिमंडणगड किल्ल्यावर पोचते. हे दोन्ही ट्रेक आम्ही यापूर्वी केले होते. त्यामुळं आम्ही सरळ रघुवीर घाटाकडं निघालो.

रघुवीर घाट म्हणजे सातारा अन् रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा दुवा. मानवी इच्छाशक्तीच्या प्रबळतेचं तो उदाहरण. त्याचं कारणही अगदी तसंच. मैलोन् मैल पसरलेल्या किर्र जंगलातून, अभेद्य दगडी कातळातून रस्ता काढणं हे तसं कमालीचं खडतर काम. मात्र हे शिवधनुष्य यशस्वी पेललं गेलं. या घाटाच्या कामाचा आरंभ १९९०च्या सुमारास झाला. त्यानंतर एका तपानं हे काम पूर्णत्वास पोचलं. पावसाळ्यात रघुवीर घाटातला निसर्ग ओसंडून वाहतो. त्यामुळं घाटाचा परिसर पर्यटकांनी तुडूंब असतो.

या ट्रेकच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या एका अत्युच्च स्थानी पोचण्याचं अन् रघुवीर घाटातून कोकणात उतरण्याचं आमचं स्वप्न साकार झालं होतं.  आमची गाडी आता खेडच्या दिशेनं सुसाट चालली होती.

संबंधित बातम्या