आकाश रात्री काळं का दिसतं? 

डॉ. बाळ फोंडके
गुरुवार, 17 जानेवारी 2019

चिंगीचे प्रश्‍न विक्षिप्त असतात हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती झालं होतं. तरीही काही वेळा सगळेच चक्रावून जात. त्या दिवशी असंच झालं. तिनं प्रथम गाठलं ते बाबांना... 

बाबा कामात होते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला पाहताच त्यांनी विचारलं, ‘काय हवंय तुला चिंगी?’ 
‘उत्तर हवंय. रात्री आकाश काळं का दिसतं?’ 

चिंगीचे प्रश्‍न विक्षिप्त असतात हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती झालं होतं. तरीही काही वेळा सगळेच चक्रावून जात. त्या दिवशी असंच झालं. तिनं प्रथम गाठलं ते बाबांना... 

बाबा कामात होते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला पाहताच त्यांनी विचारलं, ‘काय हवंय तुला चिंगी?’ 
‘उत्तर हवंय. रात्री आकाश काळं का दिसतं?’ 

बाबांना वाटलं आपली ऐकण्यात काही तरी चूक झालीय. त्यांनी तिला परत विचारायला सांगितलं. 
‘रात्रीच्या वेळी आकाश काळं काळं का दिसतं?’ 
‘हा काय प्रश्‍न झाला चिंगी! रात्रीच्या वेळी ते काळंच दिसणार. मला सांग दिवसा आकाशाचा रंग कोणता असतो?’ 
‘निळा?’ 
‘बरोबर. का असतो तो निळा?’ 
‘कारण दिवसा आकाशात सूर्य तळपत असतो. आणि त्याचे किरण...’ 

तिला पुढं बोलूच न देता बाबा म्हणाले, ‘तसा तो रात्री असतो का? सूर्य? नाही ना! झालं तर मग. सूर्य नाही तेव्हा उजेड नाही. फक्त अंधार, मग रंग काळाच असणार की नाही? चला आता पळा. मला खूप काम आहे.’ तिला तोडून टाकत बाबा म्हणाले. 
चिंगीचं काही समाधान झालं नव्हतं. पण आता बाबांना आणखी काही विचारण्यात अर्थ नाही. आपण तसंच चिकाटीनं विचारत राहिलो तर ते चिडतील हे चिंगीला समजत होतं. म्हणून तिनंही तिथून पलायन केलं आणि आपल्या टोळीचा अड्डा गाठला. तिथं तिनं तोच प्रश्‍न परत सर्वांना विचारला. 

‘तुझे बाबा म्हणाले ते पटतंय मला चिंगे. सूर्य नाही, त्याचा प्रकाश नाही तेव्हा आकाश काळंच दिसणार,’ चंदू म्हणाला. 
‘नाही ते पटत. दिवसा सूर्य असला तर मग आकाशाचा रंग पिवळा असायला हवा. सोन्यासारखा.’ 
‘तसा तो नसतो कारण आकाशात धूळ असते. इतर कण असतात. हवेतले वायू असतात. त्यांच्याकडून सूर्यप्रकाशातले इतर रंग शोषले जातात आणि फक्त निळाच तेवढा परत उलटा फेकला जातो. परावर्तित होतो. म्हणून आकाश निळं दिसतं...’ 

‘बरोबर सांगितलंस तू मिंटे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हेच किरण वेगळ्याच कोनातून या कणांवर पडतात. त्यामुळं त्यावेळी तांबडा आणि नारिंगी रंग उलटा फेकला जातो. आकाश लालेलाल दिसतं. पण आकाशातून सूर्य निघून गेला तरी हे धूलिकण तिथं असतातच ना.’ 
‘हो चिंगे पण त्यांच्यावर कुठलेही प्रकाशकिरण नाही ना पडत!’ 
‘का नाही पडणार गोट्या! अरे आकाशात किती तरी तारे आहेत. सूर्य हाही एक ताराच आहे. आपल्या म्हणजे पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून आपल्याला तो मोठा वाटतो. पण तसा तो एक मामुलीच तारा आहे. त्याच्याहून किती तरी मोठे असलेले, जास्ती तेजस्वी असलेले कितीतरी तारे आहेत. ते काय म्हणतात ना अग.., अग..’ 

‘अगं मिंटीला काय विचारतेस? तिला थोडंच माहिती आहे किती आहेत ते!’ 
‘आहे मला माहिती. उगीच रुबाब नको दाखवूस. आकाशात अगणित तारे आहेत.’ 
‘हेच सांगत होते. अग.., अग.. अगणित,’ टाळी वाजवत चिंगी म्हणाली. 
‘बरं, बरं, आहेत गणित करता येणार नाही, मोजता येणार नाहीत इतके. पण मग म्हणणं काय तुझं?’ 

‘हेच, एक सूर्य नसला म्हणून काय झालं. इतके बाकीचे, त्याच्याहूनही वरचढ तारे आहेत. त्या सर्वांचा मिळून किती तरी प्रकाश असायला हवा. त्याचे किरण त्याच कणांवरून नाही का परावर्तित होणार? मग रात्रीच्या वेळीही आकाश निळंच दिसायला हवं. तसं ते दिसत नाही. का?’ 

‘का? का?’ इतरांनीही तिच्या सुरात सूर मिसळत विचारलं. 
‘असे नुसतं काव काव करत नका बसू. चला नानांकडं, त्यांनाच विचारू...’

संबंधित बातम्या