गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या 

डॉ. बाळ फोंडके
गुरुवार, 31 जानेवारी 2019

कुतूहल
 

दारावर काही तरी धाडकन आपटल्याचा आवाज आला म्हणून नानांनी घाईघाईनं दार उघडलं तर चिंगी खाली पडलेली दिसली. तिचे सवंगडी तिला उठवायचा प्रयत्न करत होते. नानांनी तिला उठवून उभं केलं तरी तिचा झोक जातच होता. हाताला धरून त्यांनी तिला सोफ्यावर बसवलं. पाणी प्यायला दिलं. तिनं एकच घोट घेतला आणि ठेवून दिलं. 
काय झालं हे नाना विचारणार तो मिंटीच म्हणाली, ‘बघितलंस! तरी आई तुला सांगत होती...’ 

‘.. काय सांगत होती?’ नानांनी विचारलं. 
‘हेच, अशी गरगर फिरू नकोस. भोवळ येईल,’ मिंटीनं वाक्‍य पूर्ण केलं. 

‘पण हिनं ऐकलंच नाही. चला नानांकडं असं म्हणत गिरक्‍या घेतघेतच ती इथवर आली आणि चक्कर येऊन तुमच्या दारात पडली,’ चंदूनं सांगून टाकलं. 

‘बरोबरच आहे. अशी भिंगरीसारखी फिरत राहिली तर चक्कर येणारच,’ नानांनी आईच्या सांगण्याला दुजोरा दिला. 
‘पण का?’ चिंगी आता सावरली होती. 
‘काय का?’ नाना. ‘अशी गिरकी मारल्यावर चक्कर का येते?’ चिंगीचा प्रश्‍न आला. 
‘गिरकी मारल्यावर चक्कर येत नाही,’ नाना म्हणाले. 
‘नाही?’ सगळ्यांनी कोरसमध्ये विचारलं, ‘पण आता तर चिंगी...’ 
‘..मला पुरतं बोलूच दिलं नाही तुम्ही,’ नाना म्हणाले, ‘गिरकी मारता मारता एकदम थांबलात की चक्कर येते.’ 
‘तरीही का?’ परत एकदा कोरस झाला. 
‘त्याला कारण आहे तुमच्या कानातली पोकळी,’ नाना म्हणाले. 

‘चक्कर फक्त बंड्यालाच यायला हवी. कारण त्याच्या दोन कानांमधल्या जागेत फक्त पोकळीच आहे, असं सर म्हणत असतात नेहमी,’ गोट्यानं तेवढ्यात निशाणा साधला. 

‘ते काही खरं नाही. आपल्या प्रत्येकाच्या कानांच्या आतल्या भागात पोकळी असते. पण त्या पोकळीत काही द्रवपदार्थ असतो. हा आपला तोल सांभाळण्याचं काम करतो. या पोकळीच्या आतल्या भिंतीवर अगदी लहानखुरे केस असतात,’ नाना सांगू लागले. 

‘म्हणजे अंगावर लव असते तसे?’ बंड्याचा प्रश्‍न आला. ‘बरोब्बर. ते केस मज्जातंतूंना जोडलेले असतात. त्या केसांचा त्या द्रवपदार्थाशी सतत संपर्क येतो आणि ते तो संदेश मग त्या मज्जातंतूंकरवी मेंदूकडं पोचवतात. मेंदू त्या संदेशाची फोड करत आपला तोल सांभाळण्यासाठी योग्य तो आदेश देतो,’ नाना म्हणाले. 

‘पण मग गिरकी घेत असतानाही मेंदूनं तेच करायला हवं ना,’ चिंगीचा प्रश्‍न. 
‘करतो ना. कारण आपण जेव्हा भरभर गिरकी घेतो तेव्हा वेगानं आपल्याभोवती फिरत राहतो. त्याचा परिणाम त्या द्रवपदार्थावर होतो. तेही मग गरागरा फिरायला लागतं. त्या केसांना क्षणोक्षणी त्या फिरणाऱ्या द्रवपदार्थाचे झटके बसतात. तो संदेश मेंदूकडं पोचतो आणि मेंदू त्याची दखल घेत गिरकी घेताना तोल सांभाळण्याचं काम करतो. म्हणून तर गिरकी घेत असताना आपल्याला चक्कर येत नाही. आपण पडत नाही,’ नानांनी माहिती दिली. 

‘तसंच थांबल्यावर तो द्रवपदार्थही थांबेल आणि मेंदू मग त्यानुसार तोल सांभाळेल,’ चिंगीचा परत प्रश्‍न आला. 
‘हो पण त्यासाठी काही वेळ लागतो. मला सांगा तुम्ही मोटारमधून वेगानं जात असताना एकदम ब्रेक दाबला गेला तर काय होतं?’ नानांनी विचारलं. 

‘आपला एकदम पुढं झोक जातो. आपण समोरच्या काचेवर आदळतो,’ कोरस उत्तरला. 
‘हो, कारण धावत्या मोटारीत आपणही त्याच वेगानं धावत असतो. ब्रेक लागल्यावर मोटार एकदम थांबते. पण आपण धावतच राहतो. म्हणून आपण पुढच्या दिशेनं फेकले जातो. याला कारण... ’ नाना म्हणाले. 

‘जडत्व. न्यूटनचा पहिला नियम,’ कोरस निनादला. 
‘तसाच आपण एका झटक्‍यात थांबलो तरी तो द्रवपदार्थ गरगर फिरतच राहतो. ते केसही मग मेंदूला आपण फिरतच असल्याचा संदेश पाठवतात. पण शरीरातले स्नायू मात्र मेंदूला आपण एकाच जागी स्थिर असल्याचा संदेश पाठवतात. साहजिकच मेंदूचा गोंधळ उडतो आणि तोल सांभाळण्याच्या कामाला खीळ पडते,’ नाना उत्तरले. 
‘म्हणून चिंगी पडते,’ मिंटी म्हणाली. 
‘पण मग त्या कथक करणाऱ्या नर्तकीही अशाच भिंगरीसारख्या फिरतात, त्यांचा का नाही तोल जात?’ चिंगीनं विचारलंच. 
‘कारण त्या एकदम थांबत नाहीत. त्या पुढंही त्या नृत्य करतच राहतात. त्यामुळं मेंदूला दोन परस्परविरोधी संदेश मिळत नाहीत. शिवाय त्या गिरकीचा सरावही करत असल्यामुळं स्वतःला कसं सावरायचं हे शिकतात. चिंगी आता घरी जाताना सरळच जा. उगीचच कथक करत जाऊ नकोस,’ नाना हसत म्हणाले. 
यावर सगळा चमू हसतहसतच बाहेर पडला.

संबंधित बातम्या