फुगू बाई फुगू 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 25 मार्च 2019

कुतूहल
 

नेहमीच्या कट्ट्यावर चिंगीची गॅंग जमली होती. हास्यविनोद चालला होता. मिंटी तेवढी हिरमुसल्या चेहऱ्यानं बसली होती. तिच्या पुढ्यात मरगळलेल्या, न फुगलेल्या, फुग्यांचा छोटासा ढीग पडला होता. इतरांच्या हातात मात्र मस्त फुगलेले फुगे होते. मिंटीचा चेहरा आता रडवेला व्हायला लागला होता. तिथून बाहेर जाणाऱ्या नानांच्या नजरेतून तो सुटला नाही. न राहवून त्यांनी तिला विचारलं, 

‘काय गं मिंटी, काय झालं? अशी उदास का तू?’ त्यावर ती काही बोलणार तो उतावळेपणानं गोट्याच म्हणाला, 
‘तिला ना नाना, फुगा फुगवताच येत नाहीय. ते पाहा तिच्या पुढ्यात असे किती तरी मरतुकडे फुगे पडलेत. म्हणून तिला सांगितलं, की तिच्या दादाच्या सायकलचा पंप आण आणि त्यानं त्या फुग्यांमध्ये हवा भर.’ 

‘पण नाना, आताच मी घरी पाहिलं. आई पुऱ्या तळत होती. तर त्या कशा टम्म फुगत होत्या. ती काही त्यांच्यात तोंडानं किंवा दादाच्या पंपानं हवा भरत नव्हती. मग त्या का फुगत होत्या? आणि मी एवढी जोरजोरानं तोंड चालवतेय तरी माझा एकही फुगा फुगत नाहीय. मला वाटतं त्या पुऱ्यांप्रमाणं मला आधी हे फुगे लाटायलाच हवेत,’ मिंटी त्राग्यानं म्हणाली. 
‘..तर मग ते फुगणारच नाहीत. पुरीचं फुगणं आणि फुग्यांचं फुगणं यात फरक आहे, मिंटी,’ नानांनी सांगितलं. 

‘काय? काय फरक आहे?’ आता सगळ्यांनीच विचारलं. 
‘आता सुरुवातीपासूनच सगळं सांगायला हवं. मिंटी, तू आईला पुऱ्या करताना बारकाईनं बघायला हवं होतंस. तिनं आधी काय केलं, तर आटा (पीठ) घेतलं,’ नाना म्हणाले. 

‘..त्यात तिनं चमचाभर तेल घातलं. बघितलंय मी...’ मिंटी म्हणाली. 
‘मोहन’ म्हणतात त्याला. नंतर तिनं पाणी घेऊन ते त्या पिठात मिसळायला सुरुवात केली असणार!’ नानांनी विचारलं. 
‘हो ना. पण नाना, ते पाणी त्या आट्यामध्ये शोषलं जात होतं ते कसं?’ मिंटीचे प्रश्‍न संपत नव्हते. 
‘अगं, तहान लागली असणार त्याला..’ चंदू खिदळत म्हणाला. 

मिंटी त्याला रागावून गप्प करणार, तो नानाच म्हणाले, ‘तसंच म्हणेनास. कारण त्या आट्यात ग्लायाडिन आणि ग्लुटेनिन नावाची दोन प्रथिनं असतात. त्याचे रेणू नेहमीच असे तहानलेले असतात. त्यांना पाणी शोषून घ्यायला आवडतं. पण पाणी प्यायल्यामुळं ते फुगतात. पसरतात. त्यांना आणखी पसरायला जागा राहिली नाही की ते एकमेकांना चिकटून बसतात.’ 
‘हा बंडू कसा नेहमी धक्काबुक्की करत मधेच घुसतो आणि कोणाला तरी चिकटून बसतो तसा?’ गोट्यानं विचारलं. 

‘हो, त्यापायी मग त्यांचं एक जाळंच तयार होतं. आट्याची कणीक होते. पण आई ती तशीच ठेवत नाही,’ नानांनी माहिती दिली. 
‘हो नाना, मीही आईला बघितलंय, ती कणीक मळायला घेते,’ चिंगी म्हणाली. 

‘शाब्बास! पण मळण्यापूर्वी ती हाताला थोडं तेल लावते. जोर काढून कणीक मळते. तशी ती मळली नाही ना, तर पुरी फुगणारच नाही,’ नाना म्हणाले. 

‘नाही? कमालच आहे. त्या आट्यातली ती प्रथिनं तर फुगलेलीच आहेत. मग पुरीनं का फुगू नये?’ चिंगीचा स्वाभाविक प्रश्‍न आला. ‘कारण आहे. मळताना ती काय करते तर त्या कणकेवर जोर देते. तो त्या फुगलेल्या आणि एकमेकांना ढकलत चिकटून बसलेल्या ग्लायाडिन आणि ग्लुटेनिनच्या रेणूंवर पडतो. त्यामुळं ते पसरट होतात. खेचले जातात. लांबलचक व्हायला लागतात. त्यांचं रूपांतर ग्लुटेन या प्रथिनात होतं. हे लवचिक असतं,’ नानांनी समजावून सांगितलं. 

‘रबर बॅंडसारखं?’ बंडूनं विचारलं. 
‘एकदम बरोबर. लवचिकपणामुळं त्यांना कसलाही घाट देता येतो,’ नाना पुढं म्हणाले. 
‘पण नाना, ते फुगलेले रेणू तर नाहीसेच झाले. तरीही पुरी फुगते. नवलच आहे!’ चंदू म्हणाला. 
‘नवल नाही चंदू, कोडं आहे,’ चिंगी ठासून म्हणाली. 
‘नाना देतील ना त्या कोड्याचं उत्तर,’ चंदूला खात्री होती. 

‘उत्तर देईन मी. पण बाजारातून आल्यावर. तोपर्यंत तुम्ही डोकं खाजवा आणि बघा येतंय का तुम्हाला त्याचं उत्तर...’ ना मुलांना विचार करायला लावून नाना निघून गेले.

संबंधित बातम्या