नाडी सुटली 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 15 एप्रिल 2019

कुतूहल
 

आत घुसायच्या तयारीत असलेल्या मुलांना दारातच अडवून नानांनी विचारलं, ‘सुटलं का कोडं?’ 
पण मुलांच्या गप्प राहण्यातून आणि हिरमुसलेल्या चेहऱ्यावरून नाना काय ते समजले. 

‘या आत, नाडी सुटली पण कोडं सुटलं नाही, असंच ना? काही हरकत नाही. भल्याभल्या वैज्ञानिकांचीही हीच गत झाली होती. पण अलीकडंच कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या ऑलिव्हर रायली यांनी उत्तम धावपटू असलेल्या त्यांच्या विद्यार्थिनीवरच एक अनोखा प्रयोग केला. तिला आपल्या बुटांची नाडी घट्ट बांधायला लावून ट्रेडमिलवर धावायला सांगितलं.’ 

‘ट्रेड मिल?’ गोट्यानं गोंधळून विचारलं. 
‘अरे ते मशिन नाही का, ज्याची पायाखालची पट्टी सरकत राहते आणि मग तिच्यावर नीट उभं राहता यावं यासाठी तुम्हाला चालत असल्यासारखे पाय उचलत राहावं लागतं. बहुतेक जिममध्ये अशी मशिन्स असतात,’ चिंगीनं त्याला परस्पर उत्तर दिलं. 

‘हो, माझा अविदादा जातो जिममध्ये. तो तर त्या पट्टीवर धावतो,’ चंदूनं आणखी माहिती पुरवली. 
‘बरोबर, तर या ख्रिस्तीन ग्रेगला त्यांनी त्या ट्रेडमिलवर धावायला लावलं आणि तिच्या पायाला ॲक्‍सिलरोमीटर नावाचं यंत्र बांधून टाकलं,’ नाना म्हणाले. 
‘ते कशासाठी?’ आता बंडूला प्रश्‍न पडला. 
‘ती किती वेगानं धावतेय हे मोजण्यासाठी,’ नानांनी माहिती दिली. 

‘हं, हं, म्हणजे मोटारीत ती किती वेगानं धावतेय हे दाखवणारी तबकडी असते, तशीच?’ मिंटीनं भीतभीत विचारलं. 
‘तसंच म्हणेनास. कारण किती वेगानं धावलं तर नाडी सुटते हे पाहता आलं असतं आणि मग ते बघत बसले,’ नाना पुढं म्हणाले. 

‘नुसतेच बघत बसले? काही न करता?’ गोट्याचा प्रश्‍न. 
‘हात्तिच्या हा प्रयोग तर आम्हीही करू शकतो. अविदादाबरोबर जाऊन तो त्या मशिनवर धावताना आम्ही त्याला बघत बसू शकतो,’ चंदू म्हणाला. 

‘हो, तुम्हीही करू शकता. हे वैज्ञानिक नेहमीच तसं म्हटलं तर साधे वाटणारे प्रयोगच करत असतात. पण ते काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे आखणी करून करतात. बारकाईनं निरीक्षण करतात. बघत बसले म्हणजे टिंगलटवाळकी करत, गप्पागोष्टी करत बघत नाही बसले. त्यांनी त्या नाडीचं निरीक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली व्हिडिओ कॅमेरा वापरला. तो एका सेकंदात तब्बल नऊशे चित्रं घेऊ शकत होता,’ नानांनी सविस्तर सांगितलं. 
‘नऊशे?’ मिंटीनं आश्‍चर्यानं विचारलं. 

‘हो. आपण नेहमी वापरतो तो कॅमेरा एका सेकंदात फार फार तर तीसच चित्रं टिपू शकतो. त्यामुळं रायलीला अक्षरशः क्षणाक्षणाला त्या नाडीचं काय होतंय हे पाहता आलं. सुरुवातीला काही काळ काहीच झालं नाही आणि मग ती विस्कटू लागली, तिची गाठ सैल व्हायला लागली आणि शेवटी ती सुटली,’ नाना म्हणाले. 

‘हे तर आम्हालाही माहिती आहे. ती कशी सुटते हेच कोडं होतं ना? म्हणजे मग त्यांनाही ते नाही सुटलं,’ चिंगी म्हणाली. 
‘तसं नाही चिंगे, त्यांनी ते सोडवलं कारण या निरीक्षणांमधून त्या नाडीवर कोणकोणती बलं आपला दाब टाकत असतात याची माहिती त्यांना मिळाली. त्यांना असं दिसलं, की चालताना आपण जेव्हा एक पाऊल उचलून परत खाली ठेवतो तेव्हा ते पाऊल जमिनीवर आपटतो. त्यामुळं गुरुत्वाकर्षणाची ओढ त्या गाठीला जाणवते. धावताना तर पाऊल जास्तच जोरानं आपटलं जातं. किती जोरानं माहिती आहे? आपण उभे राहतो किंवा बसतो त्यावेळी आपल्याला जी गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवते ना, ती एक आहे असं धरलं तर धावताना आपटलेल्या पायामुळं गाठीवर पडणारी गुरुत्वाकर्षणाची ओढ सातपट असते. जबरदस्तच! तिला तोंड देता देता गाठीची दैनाच उडते. त्यात परत त्या नाडीची गाठीबाहेर आलेली सुटी टोकं असतात ना, ती उडता उडता गोलाकार फिरत राहतात. त्या चक्राकार गतीचा भारही गाठीवर पडतो. त्यामुळं गाठीचा पीळ हळूहळू सैल होत जातो... आणि एका क्षणी तो इतका सैल होतो की गाठ उसवते. नाडी सुटते,’ नाना म्हणाले. 

‘पण नाना, चालताना गुरुत्वाकर्षणाची ओढ कमी असते. तरीही गाठ का सुटते?’ मिंटीचं समाधान झालं नव्हतं. 
‘तुझी शंका बरोबर आहे मिंटी. चालताना दोन्ही बलांचा भार कमीच असतो. पण त्यामुळं गाठ सुटायला वेळ लागतो इतकंच. उशिरा का होईना गाठ सुटतेच,’ नाना म्हणाले. 

अकस्मात बंड्याच्या अंगात आलं. ‘शिटी वाजली नाडी सुटली’ असं गात तो बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ तसाच दंगा करत सगळी टोळीदेखील बाहेर पडली...

संबंधित बातम्या