पावसाचा थेंब

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 1 जुलै 2019

कुतूहल
 

पाऊस पडून गेला होता. पण झाडांच्या फांद्यांवरचं, पानांवरचं पाणी अजूनही ओघळत होतं. त्याचे थेंब टपटप खाली पडत होते. लहानसहान झुडुपांच्या पानावरचंही पाणी असंच ओघळत, घरंगळत खाली येत होतं. चौकडी गप्प राहून ते पाहत होती. निसर्गाच्या एका आविष्काराचं मुलं बारकाईनं निरीक्षण करताहेत, हे पाहून नानांना त्यांचं कौतुक वाटलं. मुलं त्यात इतकी गुंगून गेली होती, की नाना तिथं येऊन उभे राहिले आहेत याचंही त्यांना भान नव्हतं. नानांनीही त्यांना सावध केलं नाही. 
चिंगीच्या मनात कसला तरी प्रश्‍न धुमाकूळ घालत असावा. तिच्या चेहऱ्यावर त्या खळबळीचं प्रतिबिंब उमटलं होतं. काही तरी बोलण्यासाठी तिनं मान वर करून पाहिलं तर नाना तिला दिसले. त्याबरोबर घाईघाईनं उठत तिनं त्यांनाच विचारलं,

‘नाना हे चित्रकार असं का करतात?’
नानांना तिच्या प्रश्‍नाचा रोखच कळेना. 
‘कोण काय कसं करतात?’

‘हे पहा ना. या अळवाच्या पानावरचे हे पावसाचे थेंब. ते तिथंच राहत नाहीत. घरंगळून जात आहेत.’
‘अग जाणारच, अळवाच्या, कमळाच्या पानावर पाणी कधी साचून राहतं का?’ मिंटीनं परस्पर तिच्या निरीक्षणाचं स्पष्टीकरण दिलं. 
‘तसं नाही ग. पण या पावसाच्या थेंबांचा आकार पाहिलास का? कसा गोलमटोल आहे. एखाद्या चेंडूसारखा.’
‘तसाच असतो. कारंज्याचे तुषार उडतात. त्याचे थेंबही असेच गोलगोल असतात.’ चंदूनंही तिला दुजोरा दिला.

‘असतात ना! मग चित्रांमध्ये त्यांचा आकार असा उलट्या भवऱ्यासारखा, पेअरच्या फळासारखा का दाखवतात? मुठीत धरलेल्या पैशाच्या थैलीसारखा.’
‘इंग्रजीत त्याला टिअरशेप्ड म्हणतात. परवाच आमचे सर सांगत होते.’

‘म्हणजे डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंसारखा? पण त्यांचाही आकार असाच गोलगोल असणार ना!’
नाना काहीही न बोलता मुलांमधली ही चर्चा ऐकत होते. अशा एखाद्या निसर्गाच्या आविष्काराबद्दल मुलं कुतूहल दाखवताहेत हे पाहून त्यांना आनंदच झाला होता. अशाच चिकित्सक वृत्तीतून पुढं विज्ञान संशोधन करण्याची प्रेरणा मिळत असते. 

‘सांगा ना नाना, खरं काय आहे? कसा असतो पावसाचा थेंब?’ आता सगळ्यांनीच गलका करत विचारलं.
‘ते तो थेंब कुठं आहे आणि कोणत्या स्थितीत आहे यावर अवलंबून असतं.’
‘म्हणजे त्याचा आकार बदलत राहतो असं म्हणायचंय तुम्हाला?’

‘खरं तर हो. वातावरणात उंचावर जेव्हा धुलिकणांवर बाष्प म्हणजे पाण्याची वाफ जमा होते, तेव्हा पाण्याच्या थेंबाचा जन्म होतो. त्यावेळी पाण्याच्या पृष्ठताणामुळं त्याचा आकार तुम्ही म्हणता तसा गोलाकार असतो. पाण्याचे रेणू एकमेकांना चिकटून बसणं पसंत करतात. हायड्रोजन बाँड प्रकारचे बंध त्यांना एकत्र बांधून ठेवतात. पण या थेंबांभवती हवा वाहती असते.’
‘म्हणजे वारा असतो.’

‘बरोबर. त्याच्या दाबामुळं लहान थेंबांचा आकार गोलाकार राहतो. पण थेंब मोठा झाल्यावर तो थोडा बदलतो. कारण त्या थेंबाच्या सर्व बाजूंवरचा वाऱ्याचा दाब सारखाच नसतो. हा थेंब मोठा होत होत जड झाला, तरंगत राहणं अशक्‍य झालं की तो खाली पडायला लागतो. तसं झालं की त्याचा खालचा भाग सपाट व्हायला लागतो पण वरचा भाग गोलाकार राहतो. बनपावासारखा दिसायला लागतो.’

‘तो काय भट्टीत भाजून निघतो असा आकार व्हायला!’ ‘नाही, पण त्याच्या खालच्या बाजूचा हवेचा प्रवाह वरच्या भागावरच्या हवेच्या प्रवाहापेक्षा जास्ती असतो. पृष्ठताण वरच्या भागाला गोलाकार राखण्याला मदत करतो पण खालचा भाग मात्र जास्तीत जास्त सपाट होत जातो.’ ‘पण आपल्याला जमिनीवर बनपाव दिसत नाहीत ते?’

‘कारण तोवर त्यांचा आकार बदलतच राहतो. खाली पडता पडता हे थेंब एकमेकांवर आदळतात. त्या टकरीपायी ते एकमेकांमध्ये मिसळून मोठे मोठे होत जातात. अधिक सपाट व्हायला लागतात. पण त्यांच्यावर सतत आदळणाऱ्या हवेमुळं मग ते फुटतात. एकाचे परत दोन थेंब व्हायला लागतात. ताणल्यावर रबर तुटावा तसे तुटतात. मग हे परत लहान झालेले थेंब गोलाकार धारण करतात. जमिनीवर पोचेपर्यंत ते तसेच गोलमटोल राहतात. जोराचा पाऊस असेल तर थेंबही मोठेमोठे असतात. ते काहीवेळा गोल राहत नाहीत.’

‘थोडक्‍यात काय ते कधीच त्या उलट्या भवऱ्यासारखे दिसत नाहीत. ती केवळ चित्रकारांची कविकल्पनाच आहे.’

‘चित्रकारांची कवी कल्पना! वाह चिंगे, तुझी कल्पनाही अशीच विलक्षण आहे.’ हसत हसत नाना म्हणाले.

संबंधित बातम्या