चंद्रावर वस्ती?

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

कुतूहल
 

‘म्हणजे मग फक्त ती अदृश्‍य बाजू पाहण्यासाठीच चंद्रावर जायचं?’
‘मुळीच नाही, ते फक्त एक कारण सांगितलं मी तुम्हाला.’ नाना म्हणाले, ‘अरे चंद्राविषयीचं आपलं ज्ञान बरंच अधुरं आहे. आता हेच बघ ना आपल्या पहिल्या चंद्रयानानं चंद्रावर पाणी असल्याची विश्‍वासार्ह माहिती मिळवली. तोवर फक्त तसे अंदाज केले जात होते. भक्कम पुरावा नव्हता मिळाला. तो पहिल्या चंद्रयानानं मिळवून दिला.’

‘भले शाब्बास!’ चंदू आपणच ती माहिती मिळवल्याच्या थाटात म्हणाला.

‘हो तुला काय होतंय इथं बसून फुशारक्‍या मारायला!’ त्याला परत जमिनीवर आणत मिंटी म्हणाली, ‘त्यासाठी आपल्या वैज्ञानिकांना केवढी मेहनत करावी लागली माहिती आहे.’

‘अगदी बरोबर बोललीस मिंटे, शिवाय अंतराळसंशोधनासाठी उपयोगात आणायचं हे तंत्रज्ञान कोणी आपल्याला बहाल करत नाही, ते आपलं आपल्यालाच विकसित करावं लागतं. हेच बघाना हे चंद्रयान काय किंवा मंगलयान काय, त्यांना अवकाशात पाठवण्यासाठी जे अग्निबाण वापरले ना, ते शक्तिशाली पीएसएलव्ही प्रकारचे होते. ते आपल्यालाच तयार करावे लागले. त्यासाठी लागणारं अतिशय थंड तापमानात काम करणारं क्रायोजेनिक इंजिन आपल्याला कोणी विकतही दिलं नाही. आपणच मग ते स्वतःच्या ताकदीवर विकसित केलं आणि आता ते वापरून आपलेच काय पण जर्मनी, फ्रान्स, अगदी अमेरिकेचेही काही उपग्रह आपण अंतराळात स्थापित करत आहोत.’

‘त्यांनी आपल्याला मदत केली नाही, मग आपण त्यांना का करायची?’

‘ही मदत नाही. शुद्ध व्यवहार आहे. व्यापार आहे. ते करून आपण आपल्या वैज्ञानिक सामर्थ्याची जाणीव इतरांना करून देत असतो. तर सांगायचा मुद्दा काय, की ही चंद्रावरची स्वारी आखून आपण आपल्या तंत्रज्ञानविषयक ज्ञानात, सामर्थ्यात भरच घालत असतो. तेही एक उद्दिष्ट आहे या प्रकल्पाचं. पुढं मागं आपण आपल्या अंतराळवीरालाही अवकाशात पाठवणार आहोत, त्याचीही तयारी करता येईल. आपल्या धरतीवरच्या खनिजांचा ज्या वेगानं आपण वापर करत आहोत तो पाहता त्यांचा साठाही काही वर्षांत संपेल. त्यामुळं चंद्रावरच्या खनिजांच्या साठ्याची माहितीही मिळवायला हवी.’

‘तिथं पाणी आहे म्हणालात ना? पण पाणी म्हणजे जीवन, आमच्या धड्यात सांगितलंय. तर मग तिथं आपल्याला राहताही येईल का?’

‘पाणी म्हणजे जीवन याचा अर्थ जगण्यासाठी पाणी अत्यावश्‍यक आहे एवढाच होतो. पण इतरही अनेक गोष्टी लागतात. शिवाय पहिल्या चंद्रयानानं चंद्राच्या पृष्ठभागावर एखाद्या पातळ पापुद्य्रासारखाच पाण्याचा थर असल्याचं म्हटलं होतं. त्यापेक्षा जास्ती पाण्याची गरज आहे. शिवाय पृथ्वीवर पाण्याचं कसं एक चक्र आहे. म्हणजे नद्यांमधून वाहतं पाणी असतं. ते समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर त्याची वाफ होऊन ढग तयार होतात. तेच पाऊस आणतात आणि परत द्रवरूप पाणी तयार होतं. काही गोठतं आणि त्यांचा हिमवर्षाव होतो. पर्वतांच्या शिखरावर तो साठून राहतो. पण तोच वितळून परत नद्यांमधून पाणी वाहू लागतं. असं हे चक्र असल्यामुळं त्या पाण्याचं आपल्या जगण्यात महत्त्वाचं स्थान आहे. चंद्रावरचं पाणीही असं चक्राकार अवस्थेत असेल तर त्याचा वापर होईल.’

‘आणि ऑक्‍सिजन, त्याचं काय नाना? तो तर नाही ना तिथं?’ चिंगीनं विचारलं.

‘तिथं मुळी वातावरणच नाही. हवाच नाही. त्यामुळं ऑक्‍सिजन नाही. म्हणूनच तर तिथं जाणाऱ्या अंतराळवीरांना तो खास पोशाख घालून जावं लागतं बरोबर ऑक्‍सिजनचा पुरवठा घेऊन. तिथं वस्ती करायची तर त्याचीही व्यवस्था करावी लागेल. शिवाय तापमान.’

‘त्याचं काय? ते तर सुसह्य असतं ना! त्याशिवाय का ते आर्मस्ट्राँग वगैरे तिथं फिरत होते.’

‘तेही परत त्या खास पोशाखापायी. तिथं हवामान नसल्यामुळं सूर्यकिरण थेट तिथल्या जमिनीपर्यंत पोचतात, भाजून काढतात. तिथल्या दिवसाच्या काळात तापमान एकशे सात अंश सेल्सिअसपर्यंत पोचतं.’

‘आबाबाबा!’ आ वासत गोट्या म्हणाला, ‘आमच्या नागपुरात पंचेचाळीस अंश झालं की काय बोंबाबोंब होते.’

‘आणि रात्रीच्या वेळी शून्याखाली दीडशे अंश.’

‘म्हणजे मेलोच. उत्तर ध्रुवावरही एवढं नसेल तिथल्या रात्रीच्या काळात.’

‘ही माहितीही अलीकडेच मिळाली आहे. चंद्राविषयी आपलं अज्ञानच दांडगं आहे असं म्हणतो मी ते उगाच नाही.’

संबंधित बातम्या