‘प्रयोग करा, प्रयोग..’ 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

कुतूहल
 

चिंगीची टोळी अजून कशी आली नाही, असा विचार करत नाना बसले होते; तोच दरवाजा धाडकन उघडून गॅंग आत घुसली. चंदू आणि बंड्या आघाडीवर होते. चिंगी, मिंटी आणि गोट्या मरगळलेल्या चालीनं आणि पडत्या चेहऱ्यानं पाठून आले. 

‘मग काय म्हणताहेत आमचे उद्याचे वैज्ञानिक?’ नानांनी वातावरण खेळकर करण्याच्या उद्देशानं विचारलं. 

‘आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो...’ चंदू ओरडत म्हणाला. 
‘हे बघ प्रयोगात असं जिंकण्या-हरण्याचा प्रश्नच येत नाही. तुला एवढंच म्हणायचंय, की गरम पाणी लवकर गोठतं असं तुम्हा सगळ्यांच्याच प्रयोगात दिसून आलं, होय ना?’ नानांनी विचारलं. 

‘हो नाना,’ हताश सुरात कबुली देत चिंगी म्हणाली. 
‘तू अशी निराश होण्याचं कारण नाही चिंगी. सगळ्याच प्रयोगांचे निष्कर्ष आपल्या अंदाजानुसार येत नसतात. वैज्ञानिक प्रयोगाचा हा पहिला नियम. दुसऱ्या नियमाचंही तुम्ही पालन केलंत. सगळ्यांनीच स्वतंत्रपणे प्रयोग केल्यामुळं तोच प्रयोग सहा वेळा केला गेला,’ नाना म्हणाले. 

‘सहा नाही नाना, पाचच,’ मिंटी त्यांना दुरुस्त करत म्हणाली. 
‘नाही, सहा. तुम्ही पाच आणि मी सहा. मीही केला तो प्रयोग. दुसरा नियम तो हाच. केवळ दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा नसतो. स्वतः तो अनुभव घ्यायचा असतो. तिसरा नियम तोच प्रयोग फक्त एकदाच करायचा नसतो. एकदा, दोनदा, दहादा करायचा असतो. आता आपण सहा जणांनी केल्यामुळं तोच प्रयोग सहावेळा केला गेला,’ नाना म्हणाले. 

‘आणि सहाही वेळा तेच बघायला मिळालं...’ चंदू म्हणाला. 
‘बरोबर. तसं केल्यानं मिळालेली निरीक्षणं केवळ कावळा बसायला आणि फांदी तुटायला या न्यायानं आलेली नाहीत, ती विश्वासार्ह आहेत हे सिद्ध होतं. त्याची आवश्यकता असते. केवळ अनमानधपक्यानं एका वेळेला मिळालेलं निरीक्षण परत प्रयोग केल्यावर तसंच येत नाही. अशा अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून मिळालेल्या निरीक्षणाचा संदर्भ घेऊनच मग त्यापाठी कोणतं वैज्ञानिक सूत्र आहे याचा विचार करायचा असतो,’ नाना म्हणाले. 

‘पण आता झाली अग्निपरीक्षा. पण त्यामुळं एक कोडंच पडलंय आम्हाला. हे कसं होतं, म्हणजे नेहमी जो नियम लागू होतो त्याच्या विरुद्धच आहे हे सगळं. म्हणजे मग तो नियम चुकीचा आहे असं म्हणायचं का?’ बंडूनं विचारलं. 
‘यातूनही तुम्हाला वैज्ञानिक संशोधनाच्या काही वैशिष्ट्यांची माहिती मिळते. पहिला म्हणजे नियम बरोबर की चुकीचा असा निष्कर्ष घाईगडबडीनं काढायचा नसतो. पाण्याच्या गोठण्याच्या बाबतीत तो नियम पाळला जात नसल्याचं तुम्हाला दिसलं. पण खरोखरच तो नियम चुकीचा असेल तर मग प्रत्येक द्रवपदार्थाच्या बाबतीत असंच होतं हे सिद्ध व्हायला हवं,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे नारळाचं पाणी, जड पाणी, तेल, फळाचा रस, दूध सर्वच द्रवपदार्थ असे वागतात असं दिसलं तरच मग तो नियम चुकीचा आहे असं म्हणता येईल, हो की नाही?’ गोट्यानं विचारलं. 
‘एकदम रास्त बोललास. तर तसं अनुभवाला आल्याचं कोणीही म्हटलेलं नाही. तेव्हा नियम चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही. पाण्याच्या बाबतीत हे का अनुभवाला येतं याचा स्वतंत्र विचार करायला हवा,’ नाना म्हणाले. 

‘तोच करतोय, पण काही सुचतच नाही,’ चिंगी म्हणाली. 
‘नाना, आताच तुम्ही म्हणालात की पाणी सोडल्यास इतर पदार्थांच्या बाबतीत असं अनुभवाला आलेलं नाही. म्हणजे पाण्याच्या बाबतीत असा अनुभव घेतलाय वैज्ञानिकांनी,’ मिंटीनं विचारलं. 

‘हो, म्हणून तर त्याची नोंद झालीय ग्रंथांमध्ये. पाण्याच्या या वागण्याला चांगलं नावही दिलं गेलं आहे,’ नानांनी माहिती दिली. 
‘काय? काय?’ गलका करत सगळ्यांनीच विचारलं. 
‘एम्पेम्बा इफेक्ट,’ नाना म्हणाले. 
‘विचित्र वागण्याचं विचित्र नाव. मस्त आहे,’ गोट्या म्हणाला. 
‘एम्पेम्बा इफेक्ट.. म्हणजे?’ चिंगीनं विचारलं. 

‘एम्पेम्बा हे टांझानियामधल्या तुमच्यासारख्या एका मुलाचं नाव आहे. तोही चौकस होता. त्याला याची पहिल्यांदा जाणीव झाली. म्हणजे त्यानंही तुमच्यासारखे प्रयोग करून त्याची खात्री करून घेतली आणि नंतर शिक्षकांना, वैज्ञानिकांना तो तसं सांगू लागला. त्याचं कारण विचारायला लागला,’ नानांनी माहिती दिली. 

‘भलतंच धाडस केलं त्यानं. आपली नसती बुवा छाती झाली कोणा वैज्ञानिकांना विचारण्याची. आमच्या सरांनाही विचारताना घाबरगुंडी उडाली असती,’ चंदू म्हणाला. 
‘असं धाडस केल्याशिवाय विज्ञानाची गाडी पुढं जात नसते. तुम्हीही ते करायला शिका...’ नाना म्हणाले.

संबंधित बातम्या