घरचं झालं थोडं..! 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कुतूहल
 

चौकस चौकडी आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर बसली होती. चिंगी, मिंटी, बंडू, चंदू, गोट्या, झाडून सारे हजर होते. त्रासलेल्या चेहऱ्यानं सगळे चूपचाप बसले होते. आपापसातही त्यांचं काही बोलणं होत नव्हतं. तिकडून जाणाऱ्या नानांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. एरवी उत्साहानं फसफसणारी ही मंडळी अशी तोंडात मिठाची गुळणी धरल्यासारखी गप्प कशी? मामला गंभीर वाटत होता. नाना वास्तविक कामाला निघाले होते; पण मुलांची सुरकुतलेली तोंडं पाहून त्यांना गप्प बसवेना. 

‘काय मंडळी, आज इतना सन्नाटा क्यूं है भाई?’ नाना गमतीनं म्हणाले. 
पण हूं नाही की चूं नाही. वास्तविक ‘शोले’मधला तो फेमस डायलॉग ऐकून सर्वजण खो खो करत हसायला लागले असते. पण आता तर त्यांच्या कपाळावरच्या आठ्यांमध्ये असलीच तर काही भर पडली असेल. 

आता मात्र नानाही दचकले. पुढं होत त्यांनी मिंटीच्या पाठीवरून हात फिरवत विचारलं. 
‘काय झालंय?’ 

पाठीवर पडलेल्या हातानं मिंटी तंद्रीतून जागी झाली. तिनं वळून पाहिलं. नानांना पाहिल्यावर तिला धीर आला. तिनं मोठ्यानं ओरडत विचारलं, 
‘काय?’ 

नाना आपल्याला काही तरी विचारताहेत हे तिला समजलं होतं. पण त्यांचा प्रश्न तिला नीटसा ऐकू आला नव्हता. तिनंही नाना शेजारीच नसून कुठं तरी दूरवर असल्यासारखं ओरडून विचारल्यामुळं नानांना तिचं म्हणणं ऐकू आलं. 

साहजिकच होतं. पलीकडच्या कॉलनीत कसला तरी समारंभ होता. तिथं लावलेल्या गाण्याचा आवाज कानठळ्या बसवत होता. त्याच्या गोंगाटात नेहमीसारखं संभाषण करणं अशक्यच होतं. नानांनाही त्यापायी घरात बसणं कठीण झालं होतं, म्हणूनच तर ते बाहेर पडले होते. 
त्यांनी सर्वांना उठवलं आणि आपल्याबरोबर चलण्याची खूण करत ते त्यांना जरा दूरवर असलेल्या उद्यानात घेऊन गेले. 

‘घरात बसणंही अशक्य झालंय नाना,’ चिंगी म्हणाली. 
मिंटीनं तिला दुजोरा देत सांगितलं, ‘खिडक्या घट्ट लावून पडदे ओढले तरी तो बाहेरचा गोंगाट कानावर पडत राहतोच. काहीच करावंसं वाटत नाही.’ 

‘यावर काही उपाय नाहीच का नाना?’ बंडूनं विचारलं. 
‘एक उपाय आहे. सिंगापूरच्या नान्यांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधल्या वैज्ञानिकांनी शोधून काढलाय,’ नाना म्हणाले. 

‘काय? काय? लवकर सांगा...’ सर्वांनीच एकदम म्हटलं. 
‘त्यांनी एक उपकरण तयार केलंय. तसं छोटंसंच आहे. आपल्या खिडकीच्या चौकटीतही बसवता येतं,’ नाना माहिती सांगू लागले. 

‘हे तर फारच चांगलं झालं,’ गोट्या म्हणाला. 
‘पण आहे तरी काय ते? आणि करतं काय?’ चंदूला प्रश्‍न पडला. 
‘ते ना.. आवाज करतं. ध्वनिलहरी आसमंतात पसरवतं,’ नानांनी माहिती दिली. 

उत्साहात उठून नानांभोवती कोंडाळं करणारे सगळे हवा गेलेल्या फुग्यासारखे पडलेल्या चेहऱ्यानं परत आपापल्या जागांवर बसले. 
‘.. आणि त्या ध्वनिलहरींच्या ठायी असलेल्या शक्तीनुसार त्या किती दूरवर पसरू शकतात, आपला प्रभाव दाखवू शकतात हे ठरतं,’ नाना म्हणाले. 

‘घ्या, म्हणजे आहे तो गोंगाट पुरेसा नाही म्हणून त्यात या नव्या आवाजाचा भरणा करायचा. कालच बाबांनी एक नवी म्हण ऐकवली ती त्यावेळी तशी कळली नाही, आता कळतोय तिचा अर्थ,’ चिंगी म्हणाली. 

‘कोणती म्हण गं चिंगे?’ मुलांनी विचारलं. 
‘घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं,’ चिंगीनं वैतागानंच सांगितलं. ‘म्हणजे ती रामदास स्वामींची गोष्ट आहे ना तसंच होणार हे. त्यांच्या एका शिष्यानं, सांगितलेलं न ऐकता खीर खाल्ली. तर त्यांनी त्याला ओकारी येईपर्यंत ती खायला लावली,’ कोणीतरी माहिती पुरवली. 

‘हो ना. या एकत्रित आवाजानं कानठळ्या बसून आपण बहिरे झालो की काहीच ऐकू येणार नाही. म्हणजे सुटकाच झाली ना,’ मुलं म्हणाली. 
‘तसं नाही मुलांनो. यापाठी विज्ञानातल्या एका सूत्राचाच अवलंब केलाय. तुम्हीही शिकलायत ते सूत्र, प्रकाशासंबंधात. प्रकाशाचं व्यतिकरण,’ नाना बोलू लागले. 

‘पण त्याचा इथं काय संबंध. इथं तर आवाजाविषयी बोलतोय आपण,’ बंडूनं विचारलं. 

‘तरीही जवळचा संबंध आहे. खरं तर मी सगळंच सांगून टाकलंय. तुम्ही करा विचार आणि संबंध शोधून ठेवा. तोवर मी बाजारात जाऊन येतो,’ सगळ्यांना कोडं टाकून नाना निघून गेले.

संबंधित बातम्या