आग्यामोहोळ 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

कुतूहल
 

कट्ट्यावर सगळी चौकसपंचकडी हजर होती. चिंगी, मिंटी, चंदू, गोट्या, बंड्या झाडून सगळे. पण चिडीचूप. कोणी हुंकारही काढत नव्हता. तिथून जाणाऱ्या नानांना आश्चर्यच वाटलं. सुरुवातीला तिथून ते तसेच पुढं जाणार होते. पण नेहमीसारखा हसण्याखिदळण्याचा, चिडवाचिडवीचा आवाज येत नव्हता. नानांनी थबकून मागं वळून पाहिलं. सगळ्यांचे चेहरे काळजीनं काळवंडले होते. काही तरी बिघडलं होतं खरं. त्यामुळं चौकशी न करताच नानांना तिथून पुढं जाववेना. 

‘अरे दोस्त कंपनी, काय झालंय? असे गप्प गप्प का?’ त्यांनी विचारलं. 
प्रथम कोणीच काही बोलेना. मग हळूच चिंगी म्हणाली, ‘या मिंटीचे मामा..’ 
‘काय झालंय त्यांना?’ नानांनी काळजीनं विचारलं. 
‘माहिती नाही..’ चिंगी म्हणाली. 
‘माहिती नाही म्हणजे?’ नानांनी विचारलं. 

‘म्हणजे त्यांची खबरबातच मिळत नाहीय. ते तिकडे ऑस्ट्रेलियात असतात. मेलबर्न की असंच कुठंसे...’ गोट्या म्हणाला. 

‘मग फोन करायचा,’ नाना म्हणाले. 
‘प्रयत्न करतेच आहे ती, तिची सगळी फॅमिली. लागतच नाहीय. तिकडे ते वणवे पेटलेत ना..’ बंडू म्हणाला. 

‘हो नाना. पेपरमध्येही मोठी बातमी आहे,’ चंदू म्हणाला. ‘झालंच तर टीव्हीवरही दाखवत होते. मेलबर्न शहरावर सगळं धूर आणि धुकं...’ 
‘..धुरकं म्हणतात त्याला. स्मॉग किंवा स्मोक हेझ,’ नाना म्हणाले. 

‘तेच ते..’ गोट्याही आता बोलायला लागला. ‘लोकांना श्वासोच्छवासही करणं कठीण झालंय असं सांगत होते. सगळेजण तोंडावर मुखवटा घालूनच होते.’ 
‘हो, नाकातोंडात आणि मुख्य म्हणजे तिथून फुप्फुसांमध्ये धुराचे कण जाऊ नयेत म्हणून अशी काळजी घेणं आवश्यक असतं,’ नानांनी सांगितलं. 

‘म्हणूनच काळजी वाटतेय मिंटीच्या घरच्या सगळ्यांना. शिवाय ते राहतात तिथंही ही आग पसरण्याचा धोका आहे की काय हेही कळायला मार्ग नाही,’ चिंगी म्हणाली. 
‘पण नाना, तो ऑस्ट्रेलिया देश खूपच श्रीमंत आहे, सुधारलेला आहे म्हणतात तर तिथं या अशा आगी मुळात लागतातच कशा?’ मिंटीनं विचारलं. 

‘मिंटी, ऑस्ट्रेलियाचा आणि वणव्यांचा घरोबा फार जुना आहे. दरवर्षी तिथं असे वणवे लागतात,’ नाना म्हणाले. 
‘दरवर्षी?’ मुलांनी विचारलं. 

‘हो. दरवर्षी. आपल्याकडं कसा दर वर्षी पाऊस येतो. पावसाळ्याचा ऋतू असतो. तसा तिथं वणव्यांचा ऋतूच असतो,’ नानांनी माहिती दिली. 
‘पण नाना, पावसाळा ही निसर्गाची करामत आहे. हे वणवेही काय निसर्गच लावतो?’ मिंटीनं विचारलं. 

‘हो आणि नाही. म्हणजे बरेचसे वणवे नैसर्गिकच असतात. त्याचं काय आहे, की ऑस्ट्रेलिया जगातला सर्वांत कोरडा खंड आहे. तिथं पाऊसमान कमीच आहे. तरीही सगळीकडं झाडाझुडुपांचं साम्राज्य आहे. गवत आणि अशीच छोटी छोटी झुडुपं सगळीकडं पसरलेली आहेत. त्यांच्या मधेच काही युकॅलिप्टससारख्या गम जातीच्या वृक्षांनीही बस्तान बसवलेलं आहे. ते जमिनीखालच्या उरल्यासुरल्या पाण्यावर ताव मारतात. गवत आणि झुडुपं जास्तीच कोरडी पडतात. जमीन अफाट आणि वस्ती मात्र तुरळक. तीही किनाऱ्या किनाऱ्याला धरून. मधला विस्तृत प्रदेश या वनराजीनंच भरलेला. पण पाऊस फारसा नाही म्हणून पाणीही नाही. त्यामुळं आणि कोरड्या हवामानामुळं ही सगळी हिरवाई वाळून जाते. त्यावर या मोठ्या झाडांची सुकलेली पानं गळून पडतात. काही काटक्याही पडतात. सगळा पालापाचोळा जमा होतो,’ नानांनी माहिती दिली. 
‘आणि ते सगळं कोरडं. म्हणजे सरपणच तयार होतं म्हणाना..’ बंड्या म्हणाला. 

‘बरोबर बोललास बंड्या. त्याच्यावर ठिणगी पडली की मग त्यांनी पेट घ्यायला कितीसा वेळ लागेल.. आणि एक पेटला की शेजारचाही पेट घेतो. त्यात वाराही त्यांना मदत करतो. आग पुढंपुढं सरकत जाते. विस्तृत प्रदेशावर कब्जा करते. हाच वणवा..’ नाना म्हणाले. 
‘पण ठिणगी तरी का पडते? येतेच कुठून ती?’ चंदूला प्रश्‍न पडला. 

‘अरे मधून मधून वादळं होतात. विजा चमकतात. त्या कोसळल्या की मग ते सरपण जळायला लागतं. झालंच तर जोरदार वारे वाहतात. त्यापायी मग जवळजवळच्या झाडांची खोडं एकमेकांवर घासायला लागतात. त्या घर्षणापायीही ठिणगी उडते. आग पसरायला मग वेळ लागत नाही. दरवर्षीचा हा गोंधळ आहे. आणि एकदा का वणवा पेटला की मग त्याला आवर घालणं कठीण होऊन बसतं,’ नाना म्हणाले. 
‘पण हा जर दरवर्षींचाच प्रकार आहे, तर मग यंदाच एवढी चर्चा का होतेय?’ गोट्याला प्रश्‍न पडला. 

‘कारण यंदा कहरच झाला आहे. वणव्यांनी भीषण रूप धारण केलंय. तब्बल एक कोटी हेक्टर क्षेत्राची राखरांगोळी झालीय,’ नानांनी पुन्हा माहिती दिली. 
तो आकडा ऐकून सगळ्यांची वासलेली तोंडं तशीच उघडी राहिली. ती संधी साधून नाना तिथून सटकले.

संबंधित बातम्या