फरक पडलाच कसा 

डॉ. बाळ फोंडके 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

कुतूहल

‘.. तरी पण हा असा फरक पडलाच का?’ गोट्या तावातावात म्हणाला. 

‘असं काय करतोस गोट्या? आपल्या पृथ्वीवर नाही का कुठं सखल भाग आहे, कुठं पर्वतराजी आहे, कुठं सुपीक जमीन आहे तर कुठं वाळवंट आहे. असा फरक पडलाच ना पृथ्वीचा जन्म झाल्यानंतर..’ चिंगीनं उत्तर दिलं. 

‘हो, पण पृथ्वीच्या फक्त पूर्व भागातच पर्वत आणि पश्चिम भागात फक्त सपाट जमीन असं तर झालेलं नाही ना; दोन्हीकडं सारखीच स्थिती आहे. चंद्राचं तसं नाही. एका भागापेक्षा दुसरा साफ वेगळा आहे. असा फरक पडलाच कसा हेच विचारतोय मी..’ 

गोट्याचा प्रश्न रास्तच होता. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग सगळेच नानांकडं पाहायला लागले. त्याबरोबर हसत नाना म्हणाले, 

‘याचं नेमकं उत्तर अजून तरी कोणीच देऊ शकलेलं नाही. पण काही अंदाज आहेत. काही कल्पना आहेत. त्यातली एक तशी शक्यतेच्या जवळ जाणारी आहे. त्यासाठी त्यांनी चंद्राच्या जन्मापासूनच सुरुवात केलीय. पृथ्वीवर एक भलीमोठी..’ 

‘... मंगळाच्या आकाराची..’ चंदू मधेच म्हणाला. 

‘हो चंदू, मंगळाच्या आकाराची उल्का आदळली आणि त्यानं पृथ्वीचा एक टवका उडवला. असा मोठा आघात होतो त्यावेळी प्रचंड ऊर्जा खर्च होते. साहजिकच जिथं टवका उडाला तिथली पृथ्वी चांगलीच तापली असणार. तिचं तापमान खूपच वाढलं असणार. काही अंदाजांनुसार ते जवळजवळ २५०० अंश सेल्सियसपर्यंत पोचलं होतं. साहजिकच तेवढा भाग परत तापलेल्या गोळ्यासारखा झाला असणार,’ नाना माहिती सांगत होते.. 

‘पण नाना, मग जो टवका उडाला, म्हणजे ज्याचाच पुढं चंद्र झाला तोही असाच तापलेला असणार. त्याचं तापमानही असंच वाढलेलं असणार,’ बंडूनं विचारलं. 

‘एकदम बरोबर. पण उडालेला टवका एकदम काही आज जिथं आहे तितका दूरवर फेकला गेला नाही. तो तसा पृथ्वीच्या जवळच राहिला. साधारण २०००० किलोमीटर अंतरावर,’ नाना म्हणाले. 

‘मग जवळ कसा? वीस हजार किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या परिघाच्या अर्धं अंतर,’ आता मिंटीला प्रश्‍न पडला. 

‘हो पण आज चंद्राचं जेवढं अंतर आहे त्या मानानं जवळच म्हणायला हवं ना!’ चिंगीनं परस्परच प्रतिप्रश्‍न केला. 

‘.. आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम आठवतोय ना?’ नानांनी विचारलं. 

‘हं, म्हणजे अंतराचा गुरुत्वाकर्षणाच्या ओढीवर काय परिणाम होतो हेच विचारताय तुम्ही. जसजसं अंतर वाढत जातं तसतसा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव घटत जातो,’ गोट्या उत्तरला. 

‘म्हणजेच जेव्हा चंद्र जवळ होता तेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणाचा एकमेकांवर होणारा परिणाम अधिक तीव्र असणार. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणापायी जसा पृथ्वीवर भरती ओहोटीचा खेळ होतो तसाच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापायी चंद्रावरही झाला असणार,’ नाना म्हणाले. 

‘पण चंद्रावर समुद्र कुठं होता भरती ओहोटी यायला?’ बंडूनं विचारलं. 

‘समुद्र नव्हता खरा, पण प्रचंड उष्णतेपायी वितळलेला शिलारस म्हणजेच लाव्हा होता. तो द्रवरूप होता. त्याच्यात भरती ओहोटी येत होती.. आणि त्यापायी जिथं तो अधिक घन झाला होता त्याच्याशी घर्षण होत होतं. त्यामुळं चंद्राच्या भ्रमणाच्या वेगातही बदल होत होते,’ नाना म्हणाले. 

‘जसे चंद्राच्या असण्यामुळं पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या गिरकीच्या वेगात झाले..’ मिंटी म्हणाली. 

‘तसेच.. आणि त्या फरकापायी तो दूरदूर जात चालला. आज जिथं आहे तिथं जाऊन पोचला. असं होत असताना चंद्राच्या दोन भागांचं पृथ्वीपासूनचं अंतर सारखंच राहिलं नाही. जो जवळ होता त्यापेक्षा जो दूर होता त्याचं अंतर जास्त राहिलं. साहजिकच गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव दोन्हीकडे सारखा राहिला नाही. तसंच त्यांच्या उष्णतेमध्येही फरक पडला. पलीकडचा भाग तुलनेनं लवकर थंड होत गेला. तिथला थर अधिक जाड होत गेला,’ नाना म्हणाले. 

‘पण आपल्या बाजूच्या थराला घनरूप यायला वेळ लागला. तिथला थर तुलनेनं पातळ झाला. तेवढी जाडी त्याला मिळाली नाही,’ गोट्या म्हणाला. 

‘मग पृथ्वीवरही असा फरक का पडला नाही?’ चंदूनं विचारलं. 

‘दोन कारणं. पहिलं..’ नाना म्हणाले. 

‘..मी सांगतो, मी सांगतो. कारण चंद्रापेक्षा पृथ्वी कितीतरी पट मोठी आहे,’ गोट्या उत्तरला. 

‘बरोबर गोट्या. हे एक आणि दुसरे म्हणजे..’ नाना म्हणाले. 

‘..आता मी सांगते. कारण पृथ्वी चंद्रासारखी एकच चेहरा दाखवत प्रदक्षिणा घालत नाही. तिची गिरकीची पद्धत चंद्रापेक्षा वेगळी आहे,’ चिंगीनं उत्तर दिलं. 

‘म्हणजे तुम्हीच शोधून काढलीत की उत्तरं. भले शाबास..’ नानांनी शाबासकी दिली.

संबंधित बातम्या