केव्हा संपणार कंटाळा? 

डॉ. बाळ फोंडके 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

कुतूहल

दुपारचे तीन वाजले तशी चौकसचौकडी आपापले लॅपटॉप उघडून बसली. लॉकडाउनमुळं सगळे घरातच अडकून पडले होते. नेहमीप्रमाणं कट्ट्यावर जमणं बंदच पडलं होतं. पण त्यांची उमेद हरवू नये म्हणून नानांनीच दररोज ही ऑनलाइन वेब मीटिंग घ्यायची योजना आखली होती. तिथं मात्र नेहमीप्रमाणं मोकळ्या गप्पा होत असल्यामुळं मंडळी उत्साहानं सामील होत. तीन वाजण्याची वाटच पाहत असत. 

नानांनी नेहमीप्रमाणं, ‘.. मग बच्चेलोग, आज काय स्पेशल?’ असं विचारण्यापूर्वीच चिंगी वैतागून म्हणाली, 

‘नाना. हे असं अजून किती दिवस चालायचं? घरात बसूनबसून कंटाळा आलाय..’ 

‘हो ना!’ तिला दुजोरा देत चंदूही म्हणाला, ‘सारखी चिडचिड होतेय.’ 

‘तर काय! आईबाबाही सारखे चिडत असतात माझ्यावर.. आणि एकमेकांवरही,’ आता मिंटीनंही आपलं गाऱ्हाणं ऐकवलं. 

‘खरंय हे. पण त्याला इलाज नाही. माणूस एकटा आणि तेही एकाच ठिकाणी नाही राहू शकत फार काळ. त्याला बाहेर फिरायला, भटकायला आवडतं..’ नाना म्हणाले. 

‘तुम्हीच सांगत होतात ना नाना, की एके काळी, फार पूर्वी, माणूस भटक्याच होता. कंदमुळं शोधण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी सतत भटकत होता..’ गोट्यानं विचारलं. 

‘... एकाच ठिकाणी वस्ती करून राहत नव्हता,’ बंडूनं त्याचं म्हणणं पूर्ण केलं. 

‘पण ते फार फार पूर्वी. काही हजार वर्षांपूर्वी, गोट्या. त्याचं आता काय?’ मिंटीनं विचारलं. 

‘अगं मिंटे, त्याची काही तरी आठवण राहिलीच असेल ना अजून,’ गोट्या उखडला. 

‘हो वानरापासून उत्क्रांती होताना शेपूट गेलं, पण माकडहाडाच्या रुपात त्याची खूण राहिलीच आहे की. हो की नाही नाना?’ बंडूनं विचारलं. 

‘बरोबर आहे तुझं बंड्या. भटकी जीवनशैली सोडून आता बराच काळ लोटलाय हे खरं. तरीही कळप करून राहण्याची प्राण्यांची वृत्ती अजूनही माणसात राहिलीच आहे. तो समाजात राहतो. एकटा नाही राहात. म्हणून तर एकांतवासाची शिक्षा अतिशय कठीण ठरते. तुरुंगातल्या कैद्यानं फारच गडबड केली तर त्याला एकांतवासाचीच शिक्षा देतात,’ नाना म्हणाले. 

‘- तीच तर आम्हीही आता भोगतो आहोत, नाना. तिच्यापासून कधी सुटका होणार?’ चिंगी जाम वैतागली होती. 

‘तू अधीर झालीयस चिंगे हे मी समजू शकतो. खरं तर आपण सगळेच आतुरतेनं हा लॉकडाउन संपायची वाट पाहतो आहोत. पण एक ध्यानात घ्या. उद्या लॉकडाऊन उठला म्हणून परत सगळं अगदी पूर्वीसारखं होईल असं नाही. आपल्या जीवनशैलीत गेल्या चार पाच महिन्यांत जे बदल झालेत ना त्यातले काही दीर्घ काळ टिकण्याचीच शक्यता आहे. काही तर कदाचित कायमस्वरूपी राहतील,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे आम्ही परत कट्ट्यावर एकत्र जमू शकणार नाही?’ रडवेल्या सुरात चंदूनं विचारलं. 

‘तसं नाही. तुम्ही परत कट्ट्यावर तुमचं टोळकं जमवू शकाल. पण तेव्हाही तोंड आणि नाक मास्कनं झाकून राहावं लागेल. एकमेकांना मिठी नाही मारता येणार कदाचित. तसं थोडं फार अंतर राखावंच लागेल. इतरही काही काळजी घ्यावी लागेल,’ नाना म्हणाले. 

‘ठीक आहे, घेऊ आम्ही तेवढी काळजी. पण तेही उद्यापरवा तर नाही ना होणार!’ मिंटीनं विचारलं. 

‘नाही. त्यासाठी निदान लस तयार होईपर्यंत तरी वाट पाहावीच लागेल,’ नाना म्हणाले. 

‘बरी आठवण केलीत नाना,’ अधीर होत गोट्या म्हणाला. ‘- विचारायचंच होतं तुम्हाला. ही लस नेमकं काय करते? कोरोना झाला तर बरा करते? आणि तिची एवढी गरजच आहे तर का मिळत नाही ती बाजारात अजून?’ 

‘अरे वेड्या लस काही अशी रेडीमेड नसते. म्हणजे ज्या जुन्या रोगांविरुद्ध तयार झालेल्या आहेत त्या मिळतात आजही बाजारात. कॉलरा, टायफॉईड, पोलिओ यांच्याविरुद्धच्या लसी आजही ताबडतोब मिळतात. मूल जन्माला आल्यावर तर पहिल्या वर्षभरात त्याला अनेक लसी दिल्या जातात त्या सहज मिळतात,’ नाना म्हणाले. 

‘मग कोरोनाचीच लस का नाही मिळत?’ मुलांना प्रश्न पडला. 

‘त्याचं कारण हा रोग नवा आहे. यापूर्वी कधी तो कोणालाही झाला नव्हता. नव्यानं उपटलाय. म्हणून तर त्याला कारणीभूत असलेल्या रोगजंतूला ‘नॉव्हेल व्हायरस’ म्हणतात. त्याची नीट ओळख पटवून घेऊन लस तयार करायला वेळ लागतो. झालंच तर प्रयोगशाळेत ती तयार झाल्यानंतर तिच्या चाचण्या घ्याव्या लागतात. ती सुरक्षित आहे हे बघावं लागतं. नाहीतर भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती व्हायची. झालंच तर ती खरोखरीच आपल्याला हवा तसा परिणाम देते याचीही खातरजमा करून घ्यावी लागते. त्याला वेळ लागतोच. आता अर्धा डझनभर निरनिराळ्या लसींच्या चाचण्या होताहेत. आपण बनवलेल्याही दोन लसींच्या चाचण्या होताहेत. त्यांचीच वाट पाहूया,’ नाना म्हणाले.

संबंधित बातम्या