रात्रंदिन आम्हा.. 

डॉ. बाळ फोंडके 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

कुतूहल

‘नाना, काल तुम्ही म्हणाला होतात की हा सध्याचा कोरोना विषाणू हा नवा रोगजंतू आहे. म्हणजे मग काही जुने रोगजंतूही आहेत की काय?’ बंड्यानं विचारलं. 

‘घ्या.. म्हणजे सगळं रामायण ऐकल्यावर हा विचारतोय रामाची सीता कोण? गेल्या वर्षी तुलाच झाला होता ना रे टायफाईड?’ मिंटीनं परस्पर त्याला उत्तर दिलं. 

‘.. आणि दरवर्षी आषाढीच्या वारीला जाणाऱ्यांना कॉलऱ्याची काळजी घेण्याचा इशारा दिला जातो ते विसरलास!’ चंदूनंही आठवण करून दिली. 

‘सर्दी, खोकला ताप तर आहेच..’ मिंटीनं भर घातली. 

‘अरे, आपल्या अवती भवती आपल्या आरोग्याला घातक असणारे इतके रोगजंतू पसरलेले आहेत की एका वैज्ञानिकानं म्हटल्याप्रमाणं माणूस या रोगजंतूंच्या महासागरातच पोहत असतो.. आणि आपलं त्यांच्याबरोबर सतत युद्ध चालू असतं. तुकोबांनी म्हटलंय, ना ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ ते अगदी तंतोतंत खरं आहे,’ नाना म्हणाले. 

‘म्हणजे तुकोबांना रोगजंतूंची माहिती होती?’ बंड्यानं परत शंका काढली. 

‘नाही. त्यांचा रोख एकंदरीत आपल्या मनःशांतीकडं होता. पण त्यांचा अभंग आपल्या शरीरस्वास्थ्यालाही लागू पडतो. हे रोगजंतू हवेत, जमिनीवर, पाण्यात, जमिनीच्या खाली, एवढंच काय आपल्या अंगावरही सतत वावरत असतात,’ नानांनी उत्तर दिलं. 

‘म्हणजे आपण नुसता श्वासोच्छवास केला की हे घुसलेच आपल्या शरीरात..’ मिंटी म्हणाली. 

‘बरोबर बोललीस मिंटे.. पाण्यातले रोगजंतू जगण्याला आवश्यक असलेलं पाणी पिताना घुसखोरी करतात. जमिनीवरचे तर आपल्या हातापायांवर सहजगत्या चढून बसतात आणि तिथून शरीरात प्रवेश करू पाहतात. अंगावर वावरणाऱ्या रोगजंतूंना तर काय मोकळं रानच मिळण्याची शक्यता असते,’ नाना म्हणाले. 

‘मग नाना आपल्याला जखम झालेली असली तर त्या फटीतून हे अंगावरचे रोगजंतू सहजपणे आत घुसत असतील..’ गोट्यानं विचारलं. 

‘तर काय गोट्या. म्हणून तर जखम झाल्याबरोबर ती निर्जंतूक करणं गरजेचं असतं.. आणि मलमपट्टी केली की ती वाट बंद करता येते,’ नाना उत्तरले. 

‘बापरे! साधं खरचटलं तरी काळजी घ्यायला हवी. आमचे पीटीचे सर नेहमी फर्स्टएडची पेटी बरोबर ठेवायला सांगतात ते यासाठीच असणार. ट्रिपवर जातानाही ते सर्वांत पहिल्यांदा तीच बॅगेत घेतात,’ चंदू म्हणाला. 

‘हे रोगजंतूही निरनिराळ्या जातकुळींचे असू शकतात. काही जीवाणू असतात. बॅक्टेरिया. पोषक पदार्थ मिळाल्यास ते स्वतःची स्वतंत्र वाढ करू शकतात, जगू शकतात,’ नानांनी माहिती दिली. 

‘पण नाना हे पोषक पदार्थ त्यांना मिळतात कुठून?’ चिंगीनं विचारलं. 

‘अगं, आपणच पुरवतो..’ चंदू म्हणाला. 

‘आपण? छ्या! आपण कशाला ही नसती बिलामत ओढवून घेऊ!’ मिंटीनं शक्यता झटकली. 

‘नाही मिंटे, बरोबर सांगतोय चंदू. शिळं झालेलं, नासलेलं अन्न, न धुता, न साफ करता कच्चीच खाल्लेली काकडी, मुळा, गाजर किंवा न सोललेली फळं यांच्यासारखे पदार्थ म्हणजे तर या जीवाणूंना मेजवानीच. आतड्यांमध्ये साचून राहिलेला मल. स्वच्छ न केलेला मूत्रमार्ग. त्यांच्यावर ताव मारत ते सहज आपली वाढ करू शकतात. आपण असा निष्काळजीपणा करतो म्हणून तर त्यांचं फावतं,’ नानांनी सविस्तर माहिती दिली. 

‘नाना, तुम्ही तर म्हणालात की रोगजंतू वेगवेगळ्या जातकुळीचे असतात. पण आता तर तुम्ही फक्त त्या जीवाणूंबद्दलच सांगितलंय,’ बंडू म्हणाला. 

‘बरी आठवण केलीस. इतर काही विषाणू म्हणजे व्हायरस असतात. ते बांडगुळांसारखे असतात. ते स्वतंत्रपणे आपली वाढ करू शकत नाहीत. त्यांना कोणीतरी यजमान लागतो. तो सापडला की त्याच्या बोकांडी बसत ते आपले हातपाय पसरायला लागतात. त्या यजमानाच्या स्वतःच्या वाढीसाठी असलेल्या यंत्रणेचा ताबा घेत स्वतःचीच वाढ करतात. त्यांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढली की ते त्या यजमान पेशीला मारून बाहेर पडतात. इतर यजमानांवर हल्ला चढवायला मोकळे होतात,’ नाना म्हणाले. 

‘हे म्हणजे त्या अरबाच्या तंबूत शिरलेल्या उंटासारखेच म्हणायला हवेत,’ गोट्या म्हणाला.  

‘नाही गोट्या. त्या उंटानं अरबाचा तंबूच तेवढा बळकावला. पण विषाणू त्या अरबाला नुसते लुबाडतच नाहीत. त्याला मारूनच टाकतात. हो की नाही नाना?’ चिंगी म्हणाली. 

‘रास्त बोललीस चिंगे. हा सध्या छळणारा कोरोना विषाणूही तसाच आहे. म्हणून तर ते जास्त धोकादायक ठरतात. अरे नुसतीच चोरी करणारा किंवा दरोडा घालणार गुन्हेगार असला तर त्याचा बंदोबस्त करणं सोपं असतं. पण विषाणू म्हणजे घरात शिरून तिथल्या निरपराध रहिवाशांना ओलीस धरणाऱ्या दहशतवाद्यांसारखा असतो. म्हणून तर त्याला वेसण घालणं कठीण होतं,’ नाना म्हणाले.

संबंधित बातम्या