इतरही काही भाऊबंद 

डॉ. बाळ फोंडके 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कुतूहल

काही तरी कारणानं नेटवर्कचं कनेक्शन तुटलं होतं. प्रत्येकजण आपापल्या लॅपटॉपसमोरच बसून होता. पण इतर कोणीही त्याला दिसत नव्हतं. मग त्यांच्याशी बोलण्याची तर बातच नको. 

कंटाळून गोट्या उठून जाणार तोच परत कनेक्शन जुळून आलं... 

‘नाना, तुम्ही तर म्हणाला होतात की रोगजंतू अनेक प्रकारचे असतात. पण जीवाणू आणि विषाणू असे दोनच प्रकार सांगितलेत तुम्ही..’ गोट्या घाईघाईत म्हणाला. 

‘अरे सांगणारच होतो तर हे कनेक्शन तुटलं. मला वाटलं त्यातही व्हायरस शिरला की काय?’ नाना म्हणाले. 

‘हो नाना, तेच विचारणार होते मी. म्हणजे हा कोरोना आपल्या कॉम्प्युटरनाही बाद करून टाकणार की काय?’ मिंटीनं विचारलं. 

‘नाही, नाही, मिंटे. हा करोना किंवा तसेच इतर विषाणू केवळ सजीवांनाच बाधा आणतात. कॉम्प्युटरच्या कामात बिघाड आणणारा कोणता तरी प्रोग्रॅमच असतो. तोही विषाणूसारखा कॉम्प्युटरच्या पोटात शिरून त्याला काम करू देत नाही. शिवाय एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्याला, त्याच्याकडून तिसऱ्याला असा त्याचा झपाट्यानं संसर्ग होतो म्हणून त्याला व्हायरस म्हणतात. पण असतो तो एक सॉफ्टवेअरचाच भाग. त्याच्यापायी आपल्याला रोग होत नाही की आपल्याला रोग आणणारा व्हायरस कॉम्प्युटरला काही करू शकत नाही,’ नानांनी माहिती दिली. 

‘ते बरं झालं!’ सुस्कारा सोडत चंदू म्हणाला. ‘हा करोना जर कॉम्प्युटरलाही बिघडवून टाकता तर आफतच होती. मग आपल्या या गप्पा कशा व्हायच्या? आणि शाळा तरी कशी भरायची!’ 

‘चंद्या नेहमीप्रमाणं तू विषय कुठं तरी भरकटवतोस?नाना इतर रोगजंतूंबद्दल सांगत होते. ते राहिलंच,’ चिंगी फणकारली. 

‘नाही चिंगे, मी त्याकडं येतच होतो. काही रोगजंतू बुरशीच्या जातकुळीतले असतात. तेही बांडगुळासारखीच आपली वाढ करतात. सहसा ते आपल्या बाह्यांगावर, कातडीवर आपलं बस्तान बसवतात खास करून जिथली त्वचा ओलसर राहते, वरचेवर साफ केली जात नाही अशी ठिकाणं त्यांच्या पसंतीची असतात,’ नाना म्हणाले. 

‘पण बुरशी तर बाथरूमच्या फरशीवर उगवते ना? किंवा पावसाळ्यात शेवाळासारखी जमिनीवर?’ गोट्यानं विचारलं. 

‘खरं आहे गोट्या तुझं. तीही बुरशीच. बाथरूमच्या भिंती किंवा पावसाळ्यातली जमीन ओलसर असते ना. म्हणून त्या बुरशींचं फावतं. आपल्या शरीरावर तळ ठोकणाऱ्या बुरशी वेगळ्या असल्या तरी त्यांची जातकुळी एकच,’ नाना उत्तरले. 

‘नाना, माझ्या एका मित्राच्या पायावर एकदा एक भोक पडल्यासारखं झालं होतं. तिथं त्यानं एक काडी लावली होती आणि त्या भोकातून बाहेर पडणारा कसलातरी धागा तो गुंडाळत जायचा,’ बंडूनं सांगितलं. 

‘नारू असणार तो. तोही रोगजंतूंचा आणखी एक प्रकार. कृमी जातीतला. पोटातून पडणारे जंत हेही त्याच प्रकारचे. आणखीही एक वर्ग आहे. फारशा विकसित न झालेल्या प्रोटोझोआ या सूक्ष्मजीवांचा. मलेरिया किंवा डेंग्यू यासारख्या रोगांना हेच कारणीभूत असतात,’ नाना म्हणाले. 

‘पण ते तर डास चावल्यानं होतात ना?’ बंडूनं विचारलं. 

‘खरंय तुझं बंड्या. पण डास केवळ रोग पसरवायला कारणीभूत होतात, रोगबाधेला नाही. मलेरियाला कारणीभूत असणारे प्लास्मोडियम डासांमध्येही आपली वसाहत स्थापन करतात.. आणि हे डास आपल्याला चावतात त्यावेळी हळूच आपल्या शरीरात शिरतात. प्लेग या रोगाची बाधा करणाऱ्या पिसवा उंदरांमध्येही वास्तव्य करतात. लेप्टोस्पायरॉसिसचे रोगजंतूही उंदरांमध्ये वास्तव्य करतात आणि त्यांच्या लघवीद्वारे बाहेर सोडले जातात. आपल्याला जखम झाली असली तर त्यातून हे आपल्या शरीरात शिरतात. पुराच्या पाण्यात सापडलेल्या उंदरांची लघवी तिथं सांडलेली असते. त्या पाण्यातून उघड्या पायानं चालताना यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते,’ नानांनी सांगितलं. 

‘पण डास जर मलेरिया आणत नसतील तर त्यांचा बंदोबस्त केल्यानं मलेरियापासून आपली सुटका कशी होते?’ बंड्याला पुन्हा प्रश्‍न पडला. 

‘मी सांगते, बंड्या. अरे हे जे मलेरियाची लागण करणारे रोगजंतू आहेत ना ते डासांमध्ये कशाला वस्ती करतात? कालच सर सांगत होते, की त्याच्या वाढीतला एक टप्पा डासांच्या शरीरातच पूर्ण होतो. आता डासच जर नाहीसे केले तर मग त्या रोगजंतूंची वाढ नीट होणारच नाही. शिवाय डास आपल्याला न चावल्यामुळं ते रोगजंतू आपल्या शरीरातही शिरू शकणार नाहीत. मग मलेरिया होईलच कसा? काय!’ चिंगी म्हणाली. 

यावर बंड्या काही बोलणार तो परत नेटवर्क कनेक्शन तुटलं. बराच वेळ वाट पाहूनही ते परत जुळलं नाही. वैतागानं मग सगळ्यांनीच त्या दिवशीचा गप्पांचा कार्यक्रम आटोपता घेतला.

संबंधित बातम्या