युद्धसराव 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

कुतूहल  

नाना बैठकीला हजेरी लावताहेत न लावताहेत तोच मिंटीनं त्यांना विचारलं,

‘आपल्या शरीराची संरक्षणव्यवस्था जर इतकी मजबूत आहे तर मग लस कशाला हवी? ती लवकर मिळावी म्हणून इतका आटापिटा का केला जातोय?'

‘चांगलं विचारलंस. मला एक सांग, आपला देश, कोणताही देश, भलंमोठं आणि अत्याधुनिक सामग्रीनं सुसज्ज असं संरक्षण दल सांभाळतो ते काय त्याचं सतत कोणा ना कोणाबरोबर युद्ध चालू असतं म्हणून?'

‘छे, छे, नाना. कोणताच देश असा सतत युद्धात गुंतलेला नसतो. तशी वेळ येऊ नये याचीच व्यवस्था केली जाते.'

‘बरोबर आहे गोट्या. बहुतेक वेळ शांततेतच घालवला जातो. पण त्या काळात जर संरक्षण दल नुसतंच खा, प्या मजा करा, झोपा काढा असं करत राहिलं, तर जेव्हा प्रत्यक्ष युद्धाला सामोरं जायची वेळ येईल तेव्हा ते तयार नसेल.'

बच्चे कंपू यावर काहीच बोलू शकला नाही. नुसतंच एकमेकांकडे पाहत राहिला.

‘देश काही सतत युद्धात गुंतलेला नसतो. तरीही संरक्षण दलाला मात्र नेहमीच सज्ज राहावं लागतं. त्यासाठी मग लुटुपुटुच्या लढाया खेळत युद्धसराव केला जातो. अंगदेशाची संरक्षण व्यवस्थाही याला अपवाद नाही. त्यात त्या व्यवस्थेची स्मरणशक्ती दांडगी असल्यामुळं तिचाच फायदा उठवत हा सराव करून घेण्यासाठी लशीकरणाचं तंत्र विकसित करण्यात आलं आहे.'

‘म्हणजे लस या शरीराच्या संरक्षण दलाला सज्ज राहायला मदत करते तर!'

‘तर काय! लस म्हणजे रोगजंतूचं लुटुपुटुचं आक्रमणच. म्हणजे अंगदेशाच्या जवानांची रोगजंतूच्या ओळखपत्राशी गाठ तर पडावी पण त्यापायी रोगबाधा होणार नाही अशी तजवीज करायची. त्यामुळं होतं काय की त्या रोगजंतूविरुद्ध रामबाण ठरणाऱ्या क्षेपणास्त्रांची जुजबी निर्मिती होते. पण त्या ओळखपत्राची आठवण मात्र पक्की रुजून बसते. जेव्हा तो रोगजंतू खरोखरच आक्रमण करतो, त्यावेळी ही सारी यंत्रणा तातडीनं कामाला लागते, युद्धपातळीवर उत्पादन होऊ लागतं, क्षेपणास्त्रांची मोठीच फौज विलंब न लावता तयार होते आणि रोगजंतूला पाय ठेवण्याचीही सवड न देता पिटाळून लावते.'

‘वाsह! काय मस्त आयडिया आहे!'

‘पण गोट्या ही आयडियाची कल्पना कोणाच्या सुपीक मेंदूतून निघाली असेल?'

‘तुझ्या मेंदूतून अशी कल्पना येणं शक्‍यच नाही, चंद्या.' इतका वेळ गप्प बसलेल्या चिंगीनं आता तोंड उघडलं.

‘बरं, बरं, तुला तरी माहिती आहे का कोणी हा शोध लावला ते?' चंद्यानं पलटवार केला.

‘आहेच मुळी. जेन्नरनं देवीच्या रोगाविरुद्ध अशी लस तयार केली होती.'

‘शाबास चिंगे. एडवर्ड जेन्नर या इंग्रज डॉक्‍टरला कर्मधर्मसंयोगानं या लसीकरणाची गुरुकिल्ली सापडली. त्यावेळी कर्दनकाळ असणाऱ्या देवीच्या रोगाची लागण आपल्याला होणं शक्‍यच नाही कारण आपल्याला गाईच्या देवीची मामुलीशी लागण झालेली आहे, असं त्यावेळच्या तरुण गवळणी बोलताना जेन्नरनं ऐकलं. त्याचीच कास धरत मग त्यानं गाईच्या सडांवरच्या देवीच्या फोडांमधून द्रवपदार्थ काढला आणि एका मुलाला टोचला. त्यानंतर काही दिवसांनी त्यानं माणसाच्या देवीच्या फोडांमधला द्रव टोचला पण त्या मुलाला काहीही झालं नाही. तो निरोगीच राहिला. तेव्हापासून ही लसीकरणाची विद्या वापरली जाऊ लागली. ती आपली करामत कशी दाखवते हे मात्र त्यानंतर जेव्हा अंगदेशाच्या संरक्षण व्यवस्थेतली स्मरणशक्तीची ओळख पटली तेव्हाच ध्यानात आलं.'

‘नाना, माझी आजी सांगत होती की पूर्वी जन्म झाल्याबरोबर मुलाला देवीची लस टोचत असत. पण मला नाही टोचलेली. असं का?'

‘कारण बंड्या तुझ्या अंगात देवी संचारणंच शक्‍य नाही.'

‘मिंटे तू तू--'

बंड्याचा अंगात आता खवळलेली देवी संचारते की काय अशी शंका आल्यावरून नानाच म्हणाले, ‘कारण आता आपण संपूर्ण जगातून देवी रोगाला पार पिटाळून लावलंय. त्या रोगाला कारणीभूत असणारा रोगजंतू आता धरतीवर कुठंच अस्तित्वात नाही. त्यामुळं ती लस टोचण्याची गरजच नाही. तरीही अनपेक्षितपणे तो रोग उपटलाच तर असावी म्हणून त्या लशीचा साठा करून ठेवलेला आहे.'

‘म्हणजे आता करोनाविरुध्दची लस तयार झाली की त्यालाही असंच तडीपार करता येईल. चला त्याचीच वाट पाहूया.' बैठकीचं सूप वाजवत चिंगी म्हणाली.  

संबंधित बातम्या