डोकॅलिटी

डॉ. बाळ फोंडके
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

कुतूहल

चौकडी आपापल्या जागी बसते न बसते तोच गोट्यानं नानांवर सरबत्ती केली. 

‘नाना, तुम्ही नेहमीच असं करता. अर्ध्यावरच सोडून निघून जाता. गेल्या वेळी तुम्ही म्हणाला होतात की कोरोनाची लस कोणत्या प्रकारची आहे ते नंतर सांगतो. तर आता पहिल्यांदा ते सांगा.’

‘सांगतो, सांगतो.’ इतरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता पाहून हसत हसत नाना म्हणाले, ‘खरं तर कोरोनाची एकच लस, नाही. किमान पाच सहा लशींच्या चाचण्या होत आहेत. त्यापैकी प्रत्येक वेगवेगळी प्रक्रिया वापरून तयार केली गेलीय. त्यामुळं प्रत्येक कोणत्या प्रकारची आहे असं सांगायला गेलो तर तुमचा गोंधळच उडेल. त्या ऐवजी त्यांनी कोणकोणत्या युक्त्या अवलंबल्या आहेत तेच सांगणं सोईस्कर ठरेल.’

‘पण त्या तरी सांगा.’

‘मिंटे अशी उतावळी नको होऊस. यापैकी संपूर्ण भारतीय बनावटीची जी आहे तिच्याबद्दल पहिल्यांदा सांगतो. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेनं हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीबरोबर सहकार्य करत ही तयार केली आहे. त्यासाठी या इन्स्टिट्यूटनं करोना विषाणूला निष्क्रिय करण्याचं तंत्र विकसित केलं.’

‘निष्क्रिय म्हणजे?’

‘म्हणजे असे विषाणू शरीरात गेल्यावर वाढू शकत नाहीत. पण त्यांचा रचनाबंध मात्र शाबूत असतो. त्यामुळं ते रोगबाधा करू शकत नाहीत. पण त्यांच्या ओळखपत्राला मात्र धक्का पोचलेला नसल्यामुळं शरिराचं संरक्षणदल त्यांची ओळख पटवून ती आपल्या दप्तरी साठवून ठेवू शकतं. त्या विषाणूच्या विरोधातल्या क्षेपणास्त्रांचं, म्हणजेच अॅन्टिबॉडीचं उत्पादन करू शकतं. मुख्य म्हणजे त्या ओळखपत्राची आठवण ठेवल्यामुळं जेव्हा खरोखरीचा जिवंत विषाणू हल्ला करतो तेव्हा तातडीनं मोठ्या प्रमाणात अॅन्टिबॉडीचं उत्पादन करून त्या विषाणूला पिटाळून लावू शकतं.’ 

‘म्हणजे नाना लस ही फक्त लुटुपुटूची लढाई असते.’

‘तेच तर सांगत होते नाना गेल्या वेळेला. तुझं लक्ष कुठं होतं चंद्या?’

‘तो लुटुपुटूचं लक्ष देत होता चिंगे. त्यामुळंच आता त्याला पूर्ण लक्ष देता येतंय.’

‘गोट्या, परत ऐकलं म्हणून बिघडत नाही. उलट अभ्यास पक्का होतो. तर या लसीमुळं आपलं संरक्षणदल येणाऱ्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पूर्ण तयारीनं सज्ज राहतं. हीच तर लसीची खासियत आहे. इतर काही जणांनी थोडा वेगळा विचार केलाय. त्यांचं म्हणणं असं की लसीचं उद्दिष्ट संरक्षणदलाला विषाणूच्या आधारकार्डाची ओळख करून देणं हेच आहे. मग त्यासाठी संपूर्ण विषाणूलाच शरीरात घुसवण्याचं काय कारण आहे?’

‘असं कसं नाना? ते आधारकार्ड विषाणूच्या माथ्यावरच असतं ना. मग तोच शरीरात गेल्याशिवाय ते कार्ड वाचायला कसं मिळणार?’

‘मलाही तोच प्रश्न पडलाय मिंटे. माणूस जेव्हा कोणत्याही देशात प्रवेश करतो त्यावेळीच त्याचा पासपोर्ट तपासला जातो. नुसताच पासपोर्ट कुठं पाठवतो आपण!’

‘का नाही! कधी कधी बॅंकेत आपली ओळख पटवण्यासाठी आपण नुसतीच आपल्या पासपोर्टची किंवा आधारकार्डाची झेरॉक्स कॉपी नाही का पाठवत!’

‘हो नाना, आठवलं.’ बंड्या म्हणाला, ‘सध्या या लॉकडाऊनमुळं आपण घराबाहेर पडू शकत नाही. पण बॅंकेतले किंवा अशीच सरकारी ऑफिसातली कामं करावी लागतातच. परवाच माझ्या वडिलांनी इन्कम टॅक्स ऑफिसला आपल्या आधारकार्डाची आणि पॅन कार्डची कॉपी फोनवरून पाठवली.’

‘मग तसंच संपूर्ण विषाणू पाठवण्याऐवजी आपण फक्त त्याचं आधारकार्ड असलेल्या प्रथिनाच्या कॉपी शरीरात टोचल्या म्हणजे झालं. त्यासाठी मग त्या प्रथिनाचं उत्पादन करण्याचा आराखडा ज्या जनुकात आहे तेवढंच वेगळं करून कोणत्या तरी निरुपद्रवी जीवाणूत शिरकावून दिलं की तो जीवाणू त्याचं उत्पादन करतो. आपल्यापैकी मधुमेहाच्या रुग्णांना लागणार्‍या इन्शुलिनचं उत्पादन असंच करतात तसंच मग या प्रथिनाच्या कॉपी तयार करायच्या आणि त्यांचाच लस म्हणून वापर करायचा. अशीही लस तयार होते आहे. पण अजून ती प्रायोगिक अवस्थेतच आहे.’

‘सही आहे नाना. डोकॅलिटी केलीय त्यांनी.’

‘बघ, बघ चंद्या. तू शीक काहीतरी. पण तू तुझ्या डोक्याचा वापर केलास तर ना!’

आपण चंदूपासून दूर आपल्याच घरी आहोत हे ध्यानात घेऊन मिंटीनं त्याला चिडवण्याची संधी सोडली नाही. 

संबंधित बातम्या