त्यांच्या नाना परी
कुतूहल
सारी चौकडी आपापल्या घरी लॅपटॉप उघडून बसली होती. शाळाही आजकाल अशीच भरत असल्यामुळं त्याची सवयच झाली होती सगळ्यांना. नानांचीच वाट पाहत होती बच्चे कंपनी. तेवढ्यात चिंगीला कसली तरी आठवण झाली.
‘मिंटे, गेल्या वेळी तू चंदूला चिडवायला गेलीस. मग तुमच्या भांडणात वेळ संपली आणि नानांचं सांगणं अपुरंच राहिलं.’
‘तर काय! तुमचा होतो खेळ पण आमचा वाया जातो वेळ.’ तिला दुजोरा देत गोट्या म्हणाला.
‘आज नाही आम्ही तसं करणार.’ मिंटी आणि चंदू एकसाथ म्हणाले. तोवर नानाही आलेच.
‘तर मग गेल्या वेळी काय सांगत होतो ते राहिलंच.’ मुलांनी काही विचारायच्या आत नानांनीच सुरुवात केली. ‘आपण तयार करत असलेल्या देशी लसीबद्दल मी बोललोच. पण इतरही काही लसींच्या चाचण्या आता शेवटच्या टप्प्यात पोचल्या आहेत.’
‘पण त्या वेगळ्या आहेत असं म्हणत होतात तुम्ही.’
‘बरोबर आहे बंड्या. मला सांग लस कशासाठी द्यायची?’
‘लुटुपुटूची लढाई खेळण्यासाठी.’
‘तुला खेळण्याशिवाय दुसरं काही सुचतंय!’
‘मग तू सांग मिंटे.’
‘कोरोनाच्या आधारकार्डाची ओळख शरीराच्या संरक्षण यंत्रणेला करून देण्यासाठी. तसं झालं की मग ती कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज होईल.’
‘बरोबर आहे. त्यासाठी मग काही जणांनी असा विचार केला की कोरोनाचं ते आधारकार्ड असलेलं स्पाईक प्रथिन शरीरातच तयार करता आलं तर! त्यासाठी मग त्यांनी कोरोनाचं जनुक बाहेर काढून दुसर्या एका निरुपद्रवी विषाणूच्या अंगात घातलं. तो विषाणूच मग टोचायचा. म्हणजे शरीरात शिरून तो त्याच्या स्वतःसाठी लागणार्या प्रथिनांबरोबर कोरोनाच्या प्रथिनांचंही उत्पादन करेल. ’
‘सर्वच प्रथिनांचं?’
‘हो सगळ्याच. त्यात त्या आधारकार्डाचाही समावेश असेलच. पण इतरही प्रथिनं असल्यामुळं शरीराच्या संरक्षण यंत्रणेला आपली कामगिरी अधिक दमदार पद्धतीनं करता येईल.’
‘पण नाना मला यात धोका आहे असं वाटतंय.’
‘का चंदू? तुला तसं का वाटतंय?’
‘हा जो दुसरा कोणता तरी विषाणू आहे तो---’
‘--- तो आपल्या कुरियरसारखा असणार. केवळ कोरोनाची जनुकं शरीरात पोचवणारा. होना नाना?’
‘बरोबर ओळखलंस. व्हेक्टर म्हणतात त्याला. ’
‘केवळ वाहक असला तरी तोही एक
विषाणूच आहे ना. त्यानंच शरीराला वेठीला धरून आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली तर!’
‘तसं होणार नाही, चंदू. कारण एक म्हणजे तो निरुपद्रवी असेल. त्याची खात्री करून घेतलेली असेल. सगळेच विषाणू काही राक्षसी वृत्तीचे नसतात. त्यामुळं तो कोरोनाची बाधा तर करणार नाहीच पण स्वतःचाही प्रताप गाजवणार नाही. तरीही तो पुरेशा प्रमाणात त्या आधारकार्डाचं उत्पादन करून संरक्षण दलाला चांगलीच चालना देईल.’
‘पण मी म्हणते एवढा सगळा खटाटोप करण्याऐवजी नुसतं ते आधारकार्डच टोचलं तर!’
‘छान! तसाही विचार काही जणांनी केलाय चिंगे. त्यामुळं कोणत्याही विषाणूची बाधा होण्याची शक्यता मुळातच खोडून काढली जाईल.’
‘पण हे आधारकार्डाचं उत्पादन करायचं कसं?’
‘तुझा प्रश्न तसा योग्यच आहे गोट्या. पण ते प्रयोगशाळेत करता येतं. त्यासाठी कोरोनाची जनुकं ज्या दुसर्या विषाणूत घालायची त्या विषाणूची वाढ प्रयोगशाळेत करून त्याच्याकडून त्या आधारकार्डाचं उत्पादन करून घ्यायचं. ते शुद्ध करून मग त्याचाच वापर लस म्हणून करायचा. आज बाजारात जे इन्शुलिन मिळतं त्याचं उत्पादन अशाच प्रकारे करता येतं.’
‘म्हणजे मग त्यापासून कसलाच धोका राहणार नाही. मग तीच लस का नाही तयार करत!’
‘अगदीच धोका नाही असं नाही. कारण ते प्रथिन प्रयोगशाळेच्या कारखान्यात तयार करताना कितपत शुद्ध केलंय हे काटेकोरपणे बघावं लागेल. काही भेसळ राहिलीच तर ती त्रासदायक ठरू शकते. पण ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ आहे. आणि आपल्याला तर लस शक्य तितकी लवकर हवीय. म्हणून मग इतर मार्ग वापरले जाताहेत.’
‘लवकर येऊ दे बाई ती लस! म्हणजे मग आपल्याला पूर्वीप्रमाणे कट्ट्यावर भेटता येईल.’
त्या अपेक्षेत सगळ्यांनी मग हुरै करत बैठक आटोपती घेतली.