रोमान्स.. रोमॅंटिक... वगैरे.... 

गौरी कानिटकर
गुरुवार, 26 एप्रिल 2018

लग्नविषयक

एक काळ असा होता, की शकुंतला गोगटे, कुसुम अभ्यंकर, योगिनी जोगळेकर अशांच्या कादंबऱ्यांवर आख्खी कॉलेज पिढी जगत होती. सगळ्या तरुण मुला/मुलींच्या रोमान्सच्या कल्पना त्यातून जन्म घेत असत. स्वप्नांच्या दुनियेत रमण्यासाठी या आणि अशाच कादंबऱ्यांचा आधार घेतला जात असे. त्या वेळची सगळी वर्णने ठराविक असत. 

‘एक सफाईदार वळण घेत बंगल्याच्या पोर्चमध्ये त्याने गाडी उभी केली...’ 
किंवा 
‘तिने तिच्या मनगटावरच्या छोट्याशा रिस्ट वॉचमध्ये पाहिलं आणि लांब सडक वेणी पुढं घेत त्याच्या उशिरा येण्याबद्दल मनात कृतक कोपानं नापसंती दर्शवली...’ 

वगैरे वगैरे 
अशा प्रकारची वर्णनं त्यावेळची कॉलेज पिढी चवीचवीनं वाचत असे. कुणीतरी पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येईल आणि मला मागणी घालेल, अशा स्वप्नांच्या दुनियेची भुरळ अनेक मुलींना तेव्हा पडलेली असे. 

त्यावेळची हिंदी सिनेसृष्टीदेखील त्याला अपवाद नव्हती. १९७३ मध्ये आलेला ‘बॉबी’ असो, १९७८ ‘घर’ असो किंवा अठरा-वीस वर्षांनंतर आलेला १९९५ चा ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ असो.. हळुवार प्रेम ही संकल्पना पूर्वापार आहे. पॉप्युलर आहे. अनेकांची आवडती संकल्पना आहे. हिंदी सिनेमातली अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. नुसती कथा-कादंबऱ्या किंवा सिनेमाच नाही, तर  आपल्या आसपासचे लोकही यात भर घालत असतात. 

कधी कधी विचार करताना माझ्या लहानपणाची एक गोष्ट मला सातत्यानं आठवते. माझ्या ओळखीच्या घरातली एक मुलगी होती, जी दिसायला अतिशय सुरेख होती. मोठ्या थोरल्या कुटुंबातील ती पहिलं अपत्य होती. साहजिकच ती सगळ्यांची लाडकी होती. शेजारी पाजारी किंवा कुणीही ओळखीचे येत असत, ते सहजपणानं म्हणत, ‘काय छान आहे दिसायला... एकदम गोड आहे.. हिच्या लग्नाची तुम्हाला काळजीच नको. कुणीही वाटेवरचा चोर तिला पळवून नेईल..’ 

जसजशी ती मोठी होऊ लागली तेव्हाही हाच डायलॉग असे. तिच्या आईला पण नक्कीच हीच खात्री मनातून वाटली असणार आणि अर्थात तिलाही मनातून हेच वाटले असेल. मग तिच्या स्वतःविषयीच्या अपेक्षाही भरपूर वाढल्या असणार. 

मला नेहमीच ‘वाटेवरचा चोर’ या शब्दाची गंमत वाटते. कुणीही वाटेवरचा चोर का पळवून नेईल? आणि सुंदर दिसण्याची इतिकर्तव्यता फक्त ‘लग्न’ लवकर जमण्यात असावी? 

मुलांचं शिक्षण फक्त शाळेतच होतं असं नाही. आसपासच्या वातावरणातून मुलं बरंच शिकत असतात. आपल्या वागण्यातून, बोलण्यातून नकळतपणे काही गोष्टी आपण पेरीत असतो. अनुकरणातूनही अनेक गोष्टी मुलं ग्रहण करत असतात. आसपासच्या लोकांच्या बोलण्याचा परिणाम तर होतच असतो. 

अशा प्रकारच्या स्वप्नवत गोष्टींमधून स्वतःबद्दलची प्रतिमा तयार होत असते. त्यामुळं मुलं अनेकदा वास्तवापासून दूर जात असतात. आजही या कल्पनांमध्ये फार फरक पडला आहे असं वाटत नाही. कदाचित रोमान्सच्या कल्पना थोड्या निराळ्या असतील. पण भावना तीच आहे. 

आज ज्यावेळी मी अनेक मुला-मुलींशी बोलत असते, त्यावेळी मला याबद्दल फार कुतूहल वाटते. आता रोमान्सच्या कल्पना कशा असतील? त्याबद्दल त्यांना नेमकं काय वाटत असेल? 

अनुयाला मी विचारलं, त्यावर ती म्हणाली, ‘माझ्या बेटर हाफच्या आयुष्यात मलाच प्राधान्य असलं पाहिजे, असं मला नेहमीच वाटतं. शिवाय सरप्राईज गिफ्ट काहीतरी त्यानं मला द्यायला हवं असं वाटतं. कधीतरी स्वतः मूव्ही प्लॅन केला पाहिजे किंवा एखादी सरप्राईज ट्रीप वीकेंडला प्लॅन केली पाहिजे...’ 

बदललेल्या काळाबरोबर मजेची व्याख्या बदलली आहे. एकत्र मजा करायच्या गोष्टी बदलल्या आहेत. पण फक्त वस्तू बदलल्या आहेत. पूर्वी गजरा असे, आता सरप्राईज गिफ्ट आहे. शृंगाराच्या कल्पना बदलल्या, पण भावना तीच आहे. 

पूर्वी दोघांनी मिळून एकत्र करायच्या गोष्टींवर मोठ्यांचा अंकुश असे, आज तो काहीसा शिथिल झाला आहे. किंबहुना काही ठिकाणी तर तो नाहीसाच झाला आहे. 

परवाच मयूर आला होता, पेढे द्यायला. त्याचं लग्न ठरलं होतं. खूप खुशीत होता. मी त्याला सहज विचारलं, की तुला सगळ्यात जास्त काय आवडलं तिच्यात? 

मयूर म्हणाला, ‘एक गंमत सांगू का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला ‘लाजता’ येतं. मुलीचे सगळे हावभाव मुलीसारखेच असावेत असं वाटत मला. सगळंच्या सगळं मुलांसारखंच कशाला करायला पाहिजे? पोशाख वगैरे करतात, धडाडीनं काम करतात, हे सगळं ठीक आहे. त्यात त्यांचं कर्तृत्व आहेच. तसं त्यांनी करायलाही हवं, पण कधी कधी मुलीसारखंही वागायला हवं.. आणि हेच तिचं feminine असणं मला सगळ्यात जास्त आवडलं.’ 

 माझ्या बायकोनं असं असं असलं पाहिजे इथपासून ते असं असं वागलंच पाहिजे, बोललंच पाहिजे या अपेक्षा गेलेल्या नाहीत. तसंच माझ्या नवऱ्यानं माझी काळजी घेतलीच पाहिजे, अमुक एका पद्धतीनं वागलंच पाहिजे असे विचार आहेतच. यातल्या अपेक्षांमध्ये असलेला जो अट्टाहासाचा ‘च’ आहे, त्यानं अनेकदा फसगत होण्याची शक्‍यता असते. लवचिक अपेक्षांकडून आग्रही मागण्यांपर्यंत आपण कधी पोचतो ते आपल्याला कळतही नाही. ज्या ठिकाणी हा अट्टाहासाचा ‘च’ दिसतो, तिथं नाती घट्ट होण्याच्या गोष्टीला सुरुंग लागलेला आढळतो. 

रोमान्सच्या कल्पनांबद्दलदेखील लग्नापूर्वी बोललं जायला पाहिजे. त्या जुळल्या पाहिजेत. अनेकदा त्या जुळत नाहीत. तशाही त्या स्त्री आणि पुरुषांच्या भिन्न भिन्न असतात. पण माझ्या अपेक्षा नेमक्‍या काय आहेत हे स्वतःला समजणं आणि दुसऱ्याला त्या समजावून सांगता येणं हे आवश्‍यक आहे. याचा विचार करताना मोठ्या पटलावर करणं आवश्‍यक आहे. नुसतंच वीकएंड ट्रीप प्लॅन करणं किंवा तत्सम गोष्टी करणं या तुलनेनं खरं तर कमी महत्त्वाच्या आहेत. पण सर्वांत जास्त महत्त्व त्यालाच दिलं जातं. 

पूर्वीसारखाच अगदी आजसुद्धा हिंदी सिनेमांचा या रोमॅंटिक कल्पनांवर जबरदस्त पगडा आहे. आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात देखील ‘सुहाग रात’ या गोष्टीचं महत्त्व अजिबात कमी झालेलं नाही. त्याचं उत्सवी स्वरूप तर दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अनेक मुला/मुलींशी बोलत असताना; विशेष करून मुलींशी बोलत असताना ‘सुहाग रात’ ही संकल्पना खूप आवडत असल्याचं जाणवतं. पहिली रात्र अमुक अमुक पद्धतीच्या रोमॅंटिक पद्धतीनं साजरी व्हायला हवी, यावर त्यांचा कटाक्ष असतो. मग त्यासाठी रूम सजविण्याच्या कंपनीला काँट्रॅक्‍ट देणं, ही तर आता नित्याचीच गोष्ट होऊ पाहते आहे. थोडक्‍यात, एका बाजूला स्वप्नांच्या दुनियेतलं हळुवार प्रेम ते सेलिब्रेशन हा प्रवास अगदी सहजपणं होताना दिसतो. लग्न ठरल्यानंतर मी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे का, त्याची नेमकी तयारी मला काय करायला पाहिजे याचा विचार अभावानंच दिसतो. तर त्यापेक्षा माझं लग्न कसं व्हायला पाहिजे, लोकांना ते कसं झालेलं आवडेल, मी त्यात कशी/कसा दिसलो पाहिजे, या गोष्टींना जास्त महत्त्व आलेले दिसतं. 

नुकतीच घडलेली एक घटना अशी - एक मुलगा आणि एक मुलगी यांनी आपापसांत लग्न ठरवलं. थोडक्‍यात, लव्हमॅरेज. दोघं वेगवेगळ्या समाजातले होते. पण तुम्ही एकमेकांना पसंत आहात नं, मग आमची काही हरकत नाही, असं म्हणून पालकांनीही संमती दिली. यथावकाश साखरपुडा पार पडला. त्यावेळी तिला ‘डायमंड’चीच अंगठी हवी होती. पण त्याच्या आईनं मात्र सोन्याची अंगठी केली होती. तिचं म्हणणं, ‘ज्या ज्या वेळी मला कुणी मैत्रिणी/मित्र, नातेवाईक विचारतील की बघू अंगठी; त्यावेळी मला ती सोन्याची अंगठी  दाखवायची खूप लाज वाटते. माझ्या सगळ्या मैत्रिणींना डायमंड रिंग मिळाली होती. मला कळायला लागल्यापासून माझं एक स्वप्न होतं, की साखरपुड्याला मला डायमंड रिंगच असली पाहिजे.’ 

इथं कोण चूक, कोण बरोबर हा प्रश्‍न नाही. आपण कुठलीही गोष्ट लोकांसाठी करतोय की आपल्या स्वतःसाठी, या विचाराची कमतरता आहे. तिच्या मते, ‘माझं ऐकणं हीदेखील रोमॅंटिक नात्याची सुरवात आहे.’ तिचं ते स्वप्न असेल तर तिनं ते वेळीच सांगायलाही हवं. 

पण हे सांगत असताना तिनं लोकांसमोर अंगठी दाखवायची लाज वाटते, असं सांगितल्यानं प्रश्‍नाचा गुंता वाढत गेला. हे गुंते वेळीच सोडवले गेले नाहीत तर नातं पुढं जात नाही. 

छोट्या छोट्या गोष्टींत शृंगाराच्या कल्पना अडकलेल्या असतात, त्या समजणं हे तितकंच आवश्‍यक असतं.. आणि स्वतःची वैचारिक बैठक रुंदावणंही गरजेचंच असतं.. तुम्हाला काय वाटतं?

संबंधित बातम्या