बिटवीन द लाइन्स... 

गौरी कानिटकर
गुरुवार, 7 जून 2018

लग्नविषयक
 

मागच्या लेखात आपण  संवादाबद्दल - सुसंवादाबद्दल बोलत होतो. त्याबद्दलच अजून या लेखात जाणून घेऊया... 

संवादासाठी - अगदी साधासुधा शब्द म्हणजे बोलणे; पण फक्त गोड बोलणं, स्तुती करणारं बोलणं म्हणजे संवाद नव्हे. तसं पाहिलं तर संवादाची पहिली पायरी ऐकण्यापासून सुरू होते. कित्येकदा आपल्यापैकी अनेकांना नीट ऐकता येत नाही; किंबहुना आपल्याला लहानपणापासून जसे बोलायला शिकवले आहे, तसे कुणी ऐकायला शिकवल्याचे ‘ऐकिवात’ नाही. असे म्हणतात की मैत्रीचा राजमार्ग कानातून जातो. ज्याला चांगलं - नेमकं- समजून घेऊन ऐकता येतं तो उत्तम मित्र बनू शकतो. 

काही वर्षांपूर्वी एक सुंदर गोष्ट वाचनात आली होती... 

एक छोटा मुलगा - असेल सहा-सात वर्षांचा! बाहेर अंगणात खेळत असतो. तेवढ्यात त्याला एक खार दिसते. तो धावत धावत घरात येतो. त्याचे बाबा टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघत असतात. तो बरोबर टीव्ही आणि त्याचे बाबा यांच्या मधे उभा राहतो आणि म्हणतो, ‘बाबा बाबा मी आत्ता एक खार पाहिली..’ मॅच रंगात आलेली असते. बाबा वैतागून म्हणतात, ‘अरे अरे मधे नको उभा राहूस... गेला बघ माझा बॉल..’ 

तो हिरमुसतो. स्वयंपाकघरात आईकडे जातो. ‘आई आई मी ना आत्ता एक खार पाहिली..’ आई हळूच गुडघ्यावर बसते आणि म्हणते, ‘होऽऽऽ, कुठे होती खार? झाडावरून उतरत होती की चढत होती?’ तो खुशीनं म्हणतो, ‘अगं ती झाडावरून उतरत होती आणि तिनं तिची शेपटी इतकी छान फुलवली होती...’ असं म्हणून तो परत खेळायला निघून जातो. 

परत जेव्हा त्याला त्याच्या शाळेतल्या गमतीजमती सांगायच्या असतील तेव्हा तो नक्कीच आईकडे जाईल नं? 

बाबांच्या विश्‍वात खारीला आता महत्त्व उरलं नव्हतं, पण त्या छोट्या मुलाने कदाचित रामायणातली गोष्ट आज नव्याने ऐकली असेल आणि त्याला त्या संदर्भात ती खार आज दिसली असेल. या प्रसंगात बाबांनी ऐकले नव्हते, असे मुळीच नव्हते; पण नुसते कानावर पडणे आणि ऐकून त्याला योग्य तो प्रतिसाद देणे यातूनच नाते फुलत जाते. 

कोणतेही नाते फुलवण्यासाठी संवादकौशल्य आवश्‍यकच आहे. संवाद फक्त बोलून होतो असे नाही. तर आपली देहबोलीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. Eye contact च्या मुळे मनाचा तळ शोधणे एखाद्याला शक्‍य होऊ शकते. 

मानसी.. लग्नाच्या वयात असलेली मुलगी. नुकतीच एका मुलाला - अनयला भेटून घरी आली होती. आली ती थेट तिच्या खोलीत जाऊन बसली. पंधरा मिनिटे झाली, अर्धा तास झाला तरी बाहेर येईना. शेवटी तिची आई तिच्याशी बोलायला गेली. कारण आजच्या या स्थळाबद्दल मानसीच्या आईला खूप उत्सुकता होती. अनयचा फोटो पाहताक्षणीच मानसीला आवडला होता. शिक्षण, वय, उंची, पगार आणि एकूण कुटुंबाची माहिती या सगळ्याच बाबतीत स्थळ अनुरूप असेच होते. 

‘अगं काय झालं? कसा आहे मुलगा?’ आईनं विचारलं. 

‘ठीक आहे. पण डोळ्याला डोळा देऊन काही तो बोलत नव्हता. मला अशी माणसे नाही आवडत. अशा माणसांमध्ये आत्मविश्‍वासाचा अभाव असतो असे वाटते मला.’ मानसी म्हणाली. 

‘तू म्हणालीस का त्याला तसं?’ आईनं विचारलं. 

‘काहीही काय आई? असं कसं म्हणणार? सारखा इकडे तिकडे बघून बोलत होता. त्याच्या लेखी मला काही किंमतच नाही असे वाटत होते. अपमानित झाल्यासारखे वाटले. Eye contact ठेवून बोलत नव्हता तो. अशा मुलाला कसे काय हो म्हणणार? मला नाही जमणार. नकार कळवून टाक त्यांना...’ मानसीचे उत्तर. 

‘झालं.. म्हणजे हेही स्थळ गेलं हातचं. काहीतरी खुसपट काढतेसच तू...’ आई. 

आईच्या या वाक्‍यावर मानसी एकदम भडकलीच.. ‘मी सांगतेय काय आणि तू त्याचा अर्थ लावतेस काय?’ 

इतकंच बोलून मानसी रागारागाने घराबाहेर पडली. 

संवादामागचा संवाद ऐकणे हेदेखील एक कौशल्याचे काम आहे. 

संवादामध्ये दोन भाग येतात. एक स्वतःचा स्वतःशी असलेला संवाद आणि आपण दुसऱ्याशी केलेला संवाद. कित्येकदा आपण स्वतःशी केलेल्या संवादाचा आपल्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. वरच्या उदाहरणामध्ये.. आणि अनयच्या उदाहरणामध्ये Eye contact ठेवून बोलता येत नाही, हा खरे तर अनयचा प्रश्‍न आहे, पण मानसी जेव्हा स्वतःच्या मनाशी ज्यावेळी म्हणते, की अपमानित झाल्यासारखे वाटतेय.. त्यावेळी निराळे प्रश्‍न सुरू होतात. कोणत्याही प्रसंगाला ‘मी’, ‘मला’ हे शब्द जोडले की प्रश्‍न गंभीर होत जातात. त्यापेक्षा त्याला डोळ्याला डोळा भिडवून बोलता येत नाही त्यामुळे हे लग्न नाही करायचे, असे म्हणून हा विषय संपवता येऊ शकतो. पण कदाचित मानसी मनामध्ये हे म्हणत असावी, की कितीतरी दिवसांनी मनासारखे स्थळ मिळाले होते. खूप मोठ्या अपेक्षा ठेवून मी गेले होते भेटायला; पण आता पुनःश्‍च हरी ओम! परत स्थळे शोधायला सुरवात... वैताग आहे राव! ‘काय ही हल्लीची मुले? नीट बोलण्याचा सेन्सदेखील नाही..’ इथे मानसी नकळत Judgemental झाली आहे. अशा प्रकारच्या स्वतःशी बोलण्याचा त्रास मानसीला होऊ शकतो. त्यात नेमकं तिला जाणून न घेता तिच्या आईने तिच्यावरच आरोप केले आहेत, की तुला प्रत्येक स्थळात खुसपटच दिसते. इथे तिच्या संतापाचा पारा अधिकाधिक चढत जातो आणि ‘मला कुणी समजूनच घेत नाही,’ ही भावना प्रबळ होत जाते. 

यासाठी आपण अजून एक उदाहरण पाहू. 

‘सूरज, मी तुला खूप मिस करतेय. तू परत एकदा विचार करशील का? आपला साखरपुडा होऊन चार महिने झाले. पहिले दोन महिने तर आपण छानच होतो एकमेकांशी. पण गेल्या वीस दिवसात आपण भेटलोच नाही.. कळतेय का तुला?’ 

‘अगं तेच तेच काय बोलतेस? परवासुद्धा फोन करून तू मला हेच सांगितलेस... सुप्रियाला पण मी सांगितले, की बघ ना अनघा वेड्यासारखी मला तेच तेच परत परत सांगतेय. मी तिला म्हटलेसुद्धा की तिचे हार्मोन्स बोलतायत...’ 

‘काय???? तू आपला फोन झालेला तिला सांगितलास?? आणि मी तुला मिस करतेय असे म्हटले त्याचा अर्थ तू असा लावलास?? समजतेय का तुला तू काय बोलतोयस?’ अनघाने रागाने फोन आपटला आणि संताप, चिंता, उद्वेग, निराशा अशा विविध नकारात्मक भावनांनी तिला घेरले. या माणसाशी मला लग्न करायचेय???? तिला काहीच सुचत नव्हते. 

दोन ओळींच्या मधला सायलेंट - निःशब्द संवाद बिटवीन द लाइन्स किंवा शब्देवीण संवादु! हा ओळखणे - ऐकणे हीसुद्धा एक कलाच आहे असे मला वाटते. बोलणारा बोलतो एका अर्थाने आणि दुसरा त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या विचारसरणीनुसार, त्याच्या मानसिकतेनुसार अर्थ लावत असतो आणि समोरच्याला उत्तर देत असतो. अशा प्रकारच्या बोलण्यामधून आपण समोरच्याला दुखावत असतो हे त्याच्या गावीही नसते. 

समोरच्या माणसाचा अपमान न करता मला जे वाटतेय ते ठामपणे सांगता येणे, हेही महत्त्वाचे असते. यालाच Assertiveness म्हणतात. पण अनेकदा आपण Submissive असतो, म्हणजे मला ‘नाही’ म्हणता येत नाही. माझ्या मनाच्या विरुद्ध मी काही गोष्टी कबूल करून बसते... आणि त्याचा त्रास स्वतःला करून घेत असते. कधी कधी आपण Agressive म्हणजे आक्रमक असतो. समोरच्याचा कोणताच विचार न करता बोलत सुटतो. आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये हे तिन्ही प्रकारचे संवाद आलटून पालटून येत असतात. जास्तीत जास्त वेळा Aseertive असणे हे साधायचे असेल, तर स्वतःकडे लक्षपूर्वक पाहायला शिकावे लागेल. आपण ज्या दिवशी याची सुरवात करू तो सुदिन! नाही का?

फोटो फीचर

संबंधित बातम्या