बदलणाऱ्या भूमिका... अशाही! 

गौरी कानिटकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

लग्नविषयक
 

गेल्या वेळच्या लेखात आपण बघितलं, की आपला सिनेमा मस्त व्हायला हवा असेल तर लग्नामुळं आपल्या आयुष्यातल्या भूमिका जशा बदलत जातात त्यानुसार आपलं वागणं, बोलणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपला दृष्टिकोन यातही बदल व्हायला हवा. मुला-मुलींच्या आयुष्यात लग्न झालं, की एकदम नवरा, बायको, सून, जावई, वहिनी, नणंद, मामी, काका, काकू अशी कितीतरी नाती एकदम उदयाला येतात. त्याबद्दल करायच्या मानसिक तयारीबद्दल आपण गेल्या वेळी चर्चा केली. पण मुला-मुलींबरोबर अजून दोन व्यक्ती नव्या भूमिकेत जातात ज्याची तयारी करणंदेखील आवश्‍यक आहे. त्या व्यक्ती म्हणजे दोघांचे आई-वडील. ‘सासू-सासरे’ होताना काय बरं नेमकं घडतं हा आजचा आपला विषय आहे. ‘सासू-सासरे’ या भूमिकेत शिरण्याची तयारी ही आपल्यासाठी जावई-सून शोधायच्याही आधीपासूनच सुरू करावी लागते. 

‘आताआतापर्यंत आई एकदम छान होती. आता अचानक ती चमत्कारिक वागू लागलीय..’ भेटायला आलेली नेहा सांगत होती. मला हसू आलं. तिचं हे वाक्‍य मी असंख्य मुलींच्या आणि मुलांच्याही तोंडून ऐकलं आहे. आपल्या मुला-मुलींचं लग्नाचं वय जवळ आलं, की मुला-मुलींचे पालक एकदम गडबडून जातात. त्यात आपल्या मुलांना लग्नाची काही चिंता नाही, कसली घाई नाही या गोष्टीकडं बघून तर पालकांची चिंता चांगलीच वाढते. साहजिकच घरातला सगळा संवाद लग्न या गोष्टीभोवती फिरू लागला, की हळूहळू संवाद कमी आणि वाद वाढू लागतो. सासू-सासरे होण्याच्या तयारीची सुरुवातच ही अशी चांगलीच ‘वाद’ळी होऊ लागते. हे सगळं टाळता येणं शक्‍य आहे. सासू-सासरे होतानाचे दोन टप्पे आहेत. एक म्हणजे सून/जावई शोध घेईपर्यंतचा एक टप्पा आणि त्यानंतरचा दुसरा टप्पा. 

अनेकदा आम्हाला असं जाणवतं, की आपल्या मुला/मुलींसाठी जोडीदाराचा शोध घेताना पालक आपल्या डोक्‍यातल्या जावई/सुनेचा शोध घेतात. जेव्हा प्रत्यक्ष शोध सुरू होतो तेव्हा आपल्या डोक्‍यात काहीएक पक्‍क्‍या कल्पना असतात. त्यामागं आपण जावई/सून म्हणून काय केलं, आपल्या ओळखीतले इतर जावई/सून, आपल्या परिचयातल्या मंडळींचे अनुभव अशा अनेक गोष्टींच्या आधारे आपल्या डोक्‍यात आपल्या भविष्यातल्या जावई/सुनेची प्रतिमा तयार केली जाते. बरं, हे करताना मुला-मुलींच्या अपेक्षा विचारांत घेतल्या जातात; नाही असं नाही. पण त्यातल्या ‘कुठल्या अपेक्षेला किती महत्त्व द्यायचं’, ‘थोडं वेगळं असलं तर बिघडलं कुठं’ असं आपलं ठरतं ते आपल्या, म्हणजे पालकांच्या मनातल्या प्रतिमेच्या आधारे. हे टाळायला हवं. नाही तर होतं काय, की पालक खूप प्रोफाइल्स काढून आपल्या पाल्याच्या पुढ्यात ठेवतात आणि ती मंडळी ‘छ्या! हा काय...?’ किंवा ‘ही क्‍लिक नाही होते’ असं काहीतरी म्हणून सपशेल नकार देतात. वास्तविक मुला/मुलींच्या आपल्या जोडीदाराकडून नेमक्‍या अपेक्षा काय आहेत याबद्दल मुलं आणि पालकवर्ग यांच्यात एकवाक्‍यता निर्माण व्हायला हवी. अनेकदा जुजबी किंवा वरवरच्या बाबतीत एकवाक्‍यता होते पण अधिक गंभीर आणि सखोल बाबींवर चर्चाच होत नाही. यातही अंतिम शब्द हा मुला-मुलींचा असायला हवा. 

कधीकधी पालक माझ्याशी बोलताना आपल्या मुला/मुलींच्या हुशारीची, कर्तृत्वाची तरफदारी करतात, एका बाजूला हेही म्हणतात की आजकालची मुलं कशी एकदम स्वतःच्या पायावर उभी आणि स्वतंत्र आहेत. पण पुढच्याच क्षणी जोडीदार निवडीच्या बाबतीत मात्र पालकांवाचून त्यांचं पानही हलणार नाही असा आविर्भाव असतो. हे जरा गमतीदार आहे. आपली मुलं-मुली मोठी झाली, की मगच आपण त्यांचं लग्न करायचं ठरवत असल्यानं, ती मोठी झाली आहेत, प्रौढ आहेत आणि आपल्या आयुष्याचा निर्णय घ्यायला समर्थ आहेत यावर आणि आपल्या संस्कारांवर विश्‍वास ठेवायला काय हरकत आहे? हा विश्‍वास हीच सासू-सासरे होतानाची पहिली पायरी आहे. 

मला आपल्या पारंपरिक आश्रम-व्यवस्थेची संकल्पना फार आवडते. शिकण्याचा कालखंड- ब्रह्मचर्याश्रम, त्यानंतर लग्न आणि घर चालवणं हा कालावधी म्हणजे गृहस्थाश्रम होय. ज्यावेळी आपली मुलं मोठी होऊ लागतात, जबाबदाऱ्या घ्यायला तयार होऊ लागतात तेव्हा हळूहळू दैनंदिन चिंता सोडण्याची वेळ येते आणि समाजापासून अगदी तुटून राहायचं नाही, पण काहीसं अलिप्त व्हायचं तो वानप्रस्थाश्रम होय. मग पुढं पूर्णपणे अलिप्त होऊन सर्वस्वाचा त्याग म्हणजे संन्यासाश्रम होय. यातल्या गृहस्थाश्रामातून वानप्रस्थाश्रमात जाण्याच्या कल्पनेत आपल्या विषयाशी संबंधित खूप महत्त्वाचा आशय आहे. आजच्या काळात प्रत्यक्ष कोणी वनात जाऊन राहणार नाही. पण यातला गाभा असा आहे, की आता निर्णयाची सूत्रं स्वतःकडं ठेवू नयेत. आधुनिक काळात मुला-मुलींच्या लग्नाच्या बाबतीत निर्णयाची सूत्रं किंवा ड्रायव्हिंग सीट मुला-मुलीकडं देणं इष्ट! आपण शेजारी बसून पुढं येणाऱ्या धोकादायक वळणांची कल्पना जरूर द्यावी. पण अगदी सगळ्यांना दिसणाऱ्या रस्त्यातल्या खड्ड्यांचीही सतत माहिती देत राहिलो तर किती वैताग येईल, नाही का? आपण गाडी चालवताना शेजारच्या माणसानं सतत सूचना दिल्या तर आपल्याला आवडत नाही, तसंच हे आहे. मुला-मुलींना ड्रायव्हिंग सीटवर बसवून आता निवांत मागच्या सीटवर बसायला हरकत नाही. अत्यंत प्रेमाच्या आणि आपुलकीच्या भावनेनंच पालक आपल्या मुला-मुलींच्या लग्नात पुढाकार घेत असतात हे काय कोणाला नामंजूर नाही. पण तरीही, पालकवर्गानं या बाबतीत मुला-मुलींना ड्रायव्हिंग सीटवर बसवून तर बघा. तुमच्या चिंता, ब्लड प्रेशर कमी होईलच. पण जोडीदार निवडीच्या प्रवासात मुलं-मुली आपणहोऊन, त्यांना आवश्‍यक वाटेल तिथं, तुमच्याकडं मदत मागतील. सगळी प्रक्रियाच ताणरहित आणि सुटसुटीत होऊन जाईल एवढं नक्की. 

सासू-सासरे होतानाचा गाभा हाच आहे - ड्रायव्हिंग सीटवरून आता मागच्या सीटवर सरकूया! दोन-तीन उदाहरणं देते. आजही लग्नानंतर मुलीच मुलाकडं राहायला जाण्याची प्रथा आहे. समतेच्या कितीही गोष्टी झाल्या तरी घरजावई होणं फारसं स्वीकारलं जात नाही. घरी येणाऱ्या सुनेनं आपल्या घरातल्या पद्धतींशी जुळवून घ्यावं ही झाली पारंपरिक अपेक्षा. आजच्या काळात या अपेक्षेतून खटकेच अधिक उडतील. नव्यानं घरात येणाऱ्या व्यक्तीला सामावून घेणं, त्या व्यक्तीच्याही थोडं कलानं घेणं आणि तिच्या अस्तित्वामुळं होणाऱ्या बदलांनाही स्वीकारणं यात शहाणपण आहे. 
लग्नापूर्वी समुपदेशनासाठी येऊन गेलेली प्रेरणा लग्नानंतर मला एकदा भेटायला आली होती. 

‘कसं आहे घरी? सासू सासरे कसे आहेत?’ या माझ्या प्रश्‍नावर ती अतिशय आनंदी होत म्हणाली, ‘इतकं सहज सामावून घेतलं आहे त्यांनी मला, त्या घरात कधी परकं वाटलंच नाही.’ हे ऐकून छान वाटलं. मी तिला म्हणाले एखादं उदाहरण सांगतेस? ती म्हणाली, ‘ज्या दिवशी मी लग्न होऊन त्या घरात गेले. त्या दिवशी माझ्यासाठी घरात घालायच्या छानशा स्लीपर्स माझ्या सासऱ्यांनी आमच्या बेडरूममध्ये आणून ठेवलेल्या होत्या. गोष्ट साधीशीच होती. पण एका क्षणात मला वाटलं माझ्या कम्फर्टची काळजी इथं घेतली जाते आहे.’ हे उदाहरण खूप आवडलं. इंग्रजीत ज्याला ‘एम्पथी’ म्हणतात त्या भावनेचा इथं समावेश दिसतो. दुसऱ्याच्या जागी जाऊन, विचार करून त्यानुसार व्यक्त होणं हा भाग समानुभूतीमध्ये म्हणजेच एम्पथीमध्ये अपेक्षित असतो. नव्यानं घरी येणारी सून आपला ‘कम्फर्ट झोन’ सोडून येणार आहे याची जाणीव ठेवून नवीन घरी ‘कम्फर्ट झोन’ निर्माण करण्यासाठी मदत करणं हा झाला समानुभूतीनं वागण्याचा भाग; नवीन नाती निर्माण करताना आणि जुनी जपतानाही आवश्‍यक असा! नव्यानं कुटुंबात येणाऱ्या व्यक्तीला सामावून घेण्याची ही जबाबदारी निभावणं हा उत्तम सासूसासरे होतानाचा महत्त्वाचा टप्पा आहे. हेच मोठ्या वादांसाठीची युद्धभूमी ठरणाऱ्या स्वयंपाकघरातदेखील लक्षात ठेवायला हवं. व्यक्ती तितक्‍या प्रकृती या न्यायानं खाण्यापिण्याच्या सतराशे साठ पद्धती आणि प्रकार अस्तित्वात आहेत. त्यामुळं कुटुंबात नव्यानं आलेल्या व्यक्तीला त्याहीबाबतीत दडपण येईल असं न वागण्याची जबाबदारी सासू-सासरे यांची आहे. 

आत्तापर्यंत हे झालं सगळं मुलाच्या पालकांनी काय करावं याबद्दल! मुलीचे पालकही सासू-सासरे होणार असतात. त्यांच्यासाठी आणि प्रत्यक्ष लग्न झाल्यावर जोडप्याबरोबर न राहणाऱ्या मुलाच्या पालकांसाठी लक्षात ठेवायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर सांगितला तोच - आपल्या मुला-मुलींना ड्रायव्हिंग सीटवर बसू द्या. लग्नानंतर आपल्या पाल्यांच्या संसारात पालकांचा दूर राहूनही असणारा, नको इतका हस्तक्षेप हा आज कित्येक घटस्फोटांचं कारण बनला आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आपल्या मुलाला/मुलीला काहीही कमी पडू न देण्याच्या पालकांच्या प्रयत्नांत लग्नानंतरही नियमित आर्थिक मदत देण्याच्या सवयींमुळं नवरा-बायकोंत वाद वाढले आहेत. पालक म्हणून आपण प्रेमापोटी करू बघतो एक आणि घडतं दुसरंच. मुलंमुली लग्नानंतर सुरुवातीला धडपडतील कदाचित, अडखळतील. पण त्याच गोष्टी त्यांना एकमेकांच्या जवळ आणतात. एकमेकांच्या साथीनं उभं राहायला शिकवतात. आपल्या पालकांची पिढी आज अतिशय अभिमानानं सांगते, की आमच्या संसारातला चमचा चमचा आम्ही जमवलाय एकत्र कष्ट करत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सुरक्षा याबरोबर जगण्यासाठी आणखी एक गोष्ट आवश्‍यक असते - सन्मान. स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःच्या चुकांमधून सुधारणं, एकत्र काहीतरी उभं करणं यामुळं व्यक्तीचा आत्मसन्मान तर वाढतोच, पण त्याबरोबर एकमेकांबद्दलचा आदर वाढून नातं घट्ट होतं. सासू-सासरे यांच्या हस्तक्षेपामुळं या गोष्टीसाठीचा अवकाश नवविवाहित जोडप्यांना मिळतच नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत. हे टाळता येईल. सासूसासरे होताना, वेलीला आधार द्यायच्या काठीच्या भूमिकेत जाण्याऐवजी गरजेनुसार नुसतं अधूनमधून खत देण्याची भूमिका निभावली तर आपल्या मुलांच्या संसाराचा संपन्न डेरेदार वटवृक्ष होऊ शकतो. 
एकदा एका कार्यक्रमात मी हे सगळं म्हणणं मांडल्यावर एक पालक म्हणाले, ‘अहो तुम्ही म्हणजे अगदी पूर्ण निवृत्तीच घ्या म्हणताय. आमच्या मुलांना अगदी वाऱ्यावर सोडून द्यायचं की काय?’ आजच्या पालकांच्या पिढीतल्या बहुतांश दांपत्यांना एक किंवा दोन मुलं. त्यांच्या जन्मानंतर सगळं आयुष्य त्यांच्याभोवती गुंफलेलं. साहजिकच या मुला-मुलींबाबत अनेकदा एक प्रकारे ‘पझेसिव्ह’ वाटणं दिसून येतं. हे टाळायला हवं. आपली मुलंमुली आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत. महत्त्वाचा भाग आहेत, पण ‘एक’ भाग आहेत, ‘एकमेव’ नाहीत. निवृत्तीच घ्या असं मी म्हणते आहे ते मुलांच्या संगोपनातून! बाकी गोष्टींतून नव्हे. उलट जशा सासूसासरे या नव्या भूमिका मिळतात, तशा व्याही-विहीण अशाही नवीन भूमिका मिळतात की! नव्यानं जुळणारी ही नातीदेखील अधिक फुलवता येतील, समृद्ध करता येतील. अगदी मैत्रीपर्यंत नेता येतील. आजची शहरी मध्यमवर्गीय लग्न झालेल्या मुलामुलींच्या पालकांची पिढी तब्येतीनं तंदुरुस्त आहे, तुलनेनं सुखवस्तू आहे. वय साथ देईल तोवर नोकरी-व्यवसाय चालूच असेल. त्या सोबत वेगवेगळे छंद जोपासावेत, पर्यटन करावं, मित्र-मंडळींसोबत अगदी धमाल करावी. आपल्या आयुष्याचा फोकस पॉइंट असा आपल्या मुलांकडून पुन्हा थोडा स्वतःकडं हलवावा. बदलणाऱ्या या भूमिका समजून घेतल्या तर सासू-सासरे म्हणून तुमचं आयुष्य तर समृद्ध होईलच; पण तुमच्या मुला-मुलींच्या संसारालादेखील याचा फायदा होईल. आधुनिक काळातला वानप्रस्थाश्रम हा असा आहे. जमेल आपल्याला?!

संबंधित बातम्या