घटस्फोट.. उंबरठ्यावर 

गौरी कानिटकर
शनिवार, 8 डिसेंबर 2018

लग्नविषयक
 

कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था समाजाचे प्रमुख घटक असतात. कुटुंबसंस्था ही भारतीय संस्कृतीचा गाभा मानली जाते. पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसते. काही वर्षांपूर्वी, कधी तरी, कुठेतरी, कुणाकडे घटस्फोटाची बातमी ऐकायला आली तरी वाईट वाटत असे. पण आता मात्र ही घटस्फोटाची लाट कधी आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचली हे कळलेच नाही. साधारण २००० पासून नवदांपत्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे असे एका समाजशास्त्रीय सर्वेक्षणातून दिसून आले आहे. 

संस्कार आणि संस्कृती यामुळे आपल्या देशात इतक्‍या टोकाला घटस्फोटाचे प्रमाण वाढणार नाही असे समाजसुधारकांचे मत आहे. परंतु मुंबई, दिल्ली, कोलकता, पुणे अशा शहरी आणि निमशहरी भागातही ज्या वेगात नवदांपत्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे, त्याकडे गांभीर्याने बघणे क्रमप्राप्त आहे. गेल्या पंधरा - वीस वर्षांमध्ये विवाहसंस्थेमध्ये विलक्षण गतीने बदल घडले आहेत. ही गती गेल्या दोन पाचशे वर्षांमध्येदेखील नव्हती. अचानक घडलेल्या या बदलांना सामोरे जाणे, ते बदल स्वीकारणे हे तसे पाहता खूप सोपे  नाहीच. विशेष करून मुलींमध्ये ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने बदल घडले आहेत ते मुलांना स्वीकारणे खूप जड जात आहे. आज खरोखरी घटस्फोट हा आपल्या सगळ्यांच्या घराघरांत येऊन पोचला आहे. घटस्फोट होण्यासाठी व्यसन, फसवणूक, लैंगिकतेचे प्रश्‍न,  यासारखी कारणे जशी आहेत तशीच अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून न पटल्यामुळेही घटस्फोट होत आहेत.  घटस्फोटाची कारणे विविध आहेत. लग्नानंतरच्या पहिल्या एक - दोन वर्षांत घटस्फोट होण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्याच्या काळात करिअरला अधिक महत्त्व देणारी ही पिढी आहे. विश्‍वास आणि प्रामाणिकपणा हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. जर नात्यात विश्‍वासच उरला नसेल तर ते नाते टिकू शकत नाही. अप्रामाणिकपणा हे घटस्फोटांचे सर्वांत ‘कॉमन’ कारण आहे. स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्य हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे एखाद्याची पत्नी जर तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावती असेल, तिचा ऑफिसमधला हुद्दा जर त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाचा असेल तर त्याला ते स्वीकारणे जड जाते. 

शहरी जीवनातील धावपळ, जीवघेणी स्पर्धा, पैशाचा हव्यास आणि विवाहबाह्यसंबंधांचा मोह, एकमेकांच्या भावना समजून न घेणे,  एकमेकांसाठी वेळ देता न येणे, घरातली कामे किंवा स्वयंपाक करता न येणे यातूनही हे प्रश्‍न उद्‌भवले आहेत. अजून एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे आईवडिलांचे नको इतके लक्ष आपल्या मुलांच्या संसारात असते. त्याचा परिणाम लग्न मोडण्यामध्ये होत जातो. जणू काही आपल्या मुलांचे संसार हे त्या आईवडिलांच्या संसाराचे एक्‍स्टेंशन असते. आपल्या मुलांच्या संसारातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना रस असतो. त्यांच्या दिवसाचे रुटीन कसे असते, ते दोघेजण कुठे जातात, बाहेर जेवतात की घरीच करून खातात आणि जर घरी केले तर ते कोण करते, मूल होण्याच्या संदर्भात त्यांनी नियोजन कसे केले आहे.. अशा प्रत्येक बाबीत हस्तक्षेप करणे त्यांना त्यांचे कर्तव्यच वाटत असते. 

सुधीर आणि रम्या दोघेही लग्नानंतर हैदराबादला शिफ्ट झाले. त्यांनी तिथे भाड्याने एक घरही घेतले. त्यांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने झाले होते. दोघांचे रुटीनही छान सुरू झाले होते. रम्याची आई मात्र दिवसातून दोन - तीन वेळेला रम्याला फोन करत असे. घरी आल्यानंतर तिचा रोजचा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ आईशी फोनवर बोलण्यात जात असे. रम्याची आई दिवसभरातली प्रत्येक गोष्ट रम्याला विचारत असे. 

आपल्या दोघांमधली प्रत्येक गोष्ट तिच्या आईपर्यंत जावी हे सुधीरला अजिबात आवडत नसे. हळूहळू सुधीरची आणि रम्याची भांडणे व्हायला सुरुवात झाली. सुधीरचे म्हणणे असे, की तुझी आई प्रत्येक गोष्ट काय विचारते? आणि तू तरी तिला सगळे का सांगतेस? काय जे तुझे फोन करून घ्यायचे ते सगळे तू घरी येण्यापूर्वी करत जा. घरी आल्यानंतर दोघांचे फोन बंद ठेवत जाऊया. रम्याला ते पटत असेही आणि नसेही. आईला कसे सांगावे ते तिला कळत नसे. तिला फोन करू नको असे सांगितले तर ती दुखावेल अशी भीती तिला वाटत असे. शिवाय इतकी वर्षे ती तिच्या आईशी सगळ्या गोष्टी शेअर करत असे. त्यामुळे तिलाही अनेक गोष्टी तिच्याशी बोलाव्याशा वाटत असत. अशातच एक दिवस अचानक सुधीरची आई त्यांच्या घरी येऊन दाखल झाली. सुधीरला म्हणाली, ‘अरे तुमचे नवीन घर आहे आणि तुमच्या नोकऱ्या... तुम्हाला कुठे वेळ असणार? त्यामुळे तुम्हाला जमणार नाही. म्हटले जरा तुमचे घर लावून द्यावे.’ 

आता मात्र सुधीरला काय बोलावे कळेचना. शिवाय रम्या वैतागली ते वेगळेच. ‘आपल्याला येणार नाही का घर लावता? त्यांनी कशाला यायला पाहिजे? आणि माझे घर मला माझ्या मताप्रमाणे लावायचे आहे..’ सुधीरची आणि रम्याची चांगलीच खडाजंगी जुंपली. 

असे एक ना दोन.. अनेक प्रसंग. आईवडिलांच्या हस्तक्षेपामुळे (त्यापेक्षा योग्य शब्द आहे ‘आईवडिलांच्या ढवळाढवळीमुळे’) अनेक घटस्फोट होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. तशीही ही नवीन पिढी, म्हणजेच ही मुलांची पिढी व्यक्तिकेंद्री आहे. स्वतःचा अवकाश... स्वतःची स्पेस जपणारी आहे. पण एका बाजूला असणारा आईवडिलांचा हस्तक्षेप त्यांना हाताळता येत नाही. 

अनेकदा पती-पत्नीमधील भांडणाचे कारण सुरुवातीला अगदी क्षुल्लक असते, पण शब्दाने शब्द वाढत जाऊन मने कटू होतात आणि दोघांमधले अंतर वाढत जाते. कधी कधी लग्नाच्या पूर्वी जोडीदाराच्या आवडणाऱ्या गोष्टी लग्नानंतर आवडेनाशा होतात. रत्नाकर मतकरींचे एक नाटक या संदर्भात मला आठवते आहे. त्याचे नाव ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’ हे होते. या नाटकातला श्रीकार आणि नेहा हे एक जोडपे. यांचा प्रेमविवाह झालेला असतो. श्रीकार हा एक चित्रकार असतो आणि तो फारसा महत्त्वाकांक्षी नसतो. शांत स्वभावाचा असतो. लग्नापूर्वी त्याचा हाच स्वभाव तिला आकर्षित करतो. पण लग्नानंतर मात्र स्वतःची चित्रे खपविण्यासाठी, प्रदर्शन भरवण्यासाठी त्याने खटपट केली पाहिजे असे तिला वाटते. त्याचा लग्नापूर्वीचा तिला आवडणारा शांत स्वभाव आता तिला खुपायला लागतो आणि अखेरीस ती घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज करते. 

पती-पत्नी नात्यात बेबनाव निर्माण होण्यासाठी अशी अनेक कारणे कारणीभूत आहेत. या सगळ्याचा विचार करण्याची गरज आज कधी नव्हे ती प्रकर्षाने जाणवू लागली आहे. लग्न होणे आणि ते टिकवणे यात जीवनाची इतिकर्तव्यता मानण्याची प्रवृत्तीही कमी झालेली दिसते. संसार आणि सहजीवन याचा आजच्या काळातला अर्थ काय आहे, याचा विचार करण्याची आवश्‍यकता आहे. नात्याची जोपासना करणे ही आताच्या काळात शिकून घेण्याची गोष्ट आहे. संवादाचा अभाव आणि एकमेकांना समजून घेण्यात आलेले अपयश याचा मोठा वाटा यामध्ये आहे. एकमेकांशी जुळवून घेत असताना एकमेकांना अवधी द्यायला हवा. परस्परांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करायला हवे. एकमेकांचा आदर करायला हवा. एकमेकांना आवर्जून वेळ द्यायला हवा. नात्यातली पारदर्शकता ही खूप महत्त्वाची ठरते. स्वातंत्र्य आणि समानता यासाठी संसारातून विभक्त होणे हा उपाय नाही. संसार, सहजीवन आणि आजचे पती-पत्नी नाते समजावून घेतले तर स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान याची जपणूक दोघांनाही करता येणे अजिबात अवघड नाही. त्यामुळे आज काहीसा डळमळीत वाटणारा कुटुंबसंस्थेचा पायाही भक्कम करता येऊ शकतो. तुम्हाला काय वाटते?

फोटो फीचर

संबंधित बातम्या