...व्हावे सुरेल गाणे! 

प्रभाकर बोकील
गुरुवार, 5 एप्रिल 2018

ललित
 

‘माई’ आज पंचाहत्तरीच्या घरांत आहेत. ‘माई’ हे संबोधनपर प्रौढ नाव त्यांना जन्मापासूनच मिळालेलं! या नावाचीदेखील एक कथाच आहे. त्यांच्या आधीची मुलं जगत नसत. वडील गावातल्या शाळेत शिक्षक अन पूर्ण विठ्ठलभक्त त्यामुळे माळकरी. म्हणून त्यांनी मूल जगण्यासाठी विठ्ठलाजवळ साकडे घालताना सांगितलं होतं, मूल जगलं तर त्याचं नाव ‘विठ्ठल’ ठेवीन. गेलेल्या तीन मुलांनंतर चवथं मूल जगलं... मुलगी झाली. पण बाळंतपणात मुलीची आईच गेली. देवाचं दान स्वीकारताना, दानाची किंमत चुकवावी लागली. त्यातून सावरणं कठीण होतं. वडिलांना आता आईविना मुलगी सांभाळायची होती. सुरवातीला त्यांची आई असल्यामुळे तेवढा आधार होता. पण देवाघरचा हा ‘उफराटा न्याय’ स्वीकारताना त्यांनी विठ्ठलाशी असहाय्यपणे एकतर्फी वाद घातला. अधनंमधनं घडणारी आषाढ-कार्तिक वारी आता बंद झाली. आयुष्याची खडतर वारी सुरू झाली! मात्र त्यांनी विठ्ठलाला दिलेला शब्द पाळला. जन्मत:च आई गेल्यामुळे मुलीचं बारसे होण्याचा प्रसंगच आला नाही. म्हणून नाव ठरेपर्यंत ती सगळ्यांची ‘रखुमाई’ झाली! अन त्या नावाचं नित्याचं संक्षिप्त रूप झालं माई! शाळेत प्रवेश घेताना मात्र त्यांनी तिचं नाव ठेवलं ‘रुक्‍मिणी’. पण ते फक्त कागदोपत्रीच राहिलं. बालपणापासून ती सगळ्यांचीच माई झाली!

माई शाळेत असल्यापासून छान सुरात गायची. पन्नाशीच्या दशकाच्या आसपासचा तो काळ अविस्मरणीय भावगीतांचा होता. तेव्हाची माणिक वर्मा-मालती पांडेची अन्‌ लता-आशाची भावगीत थेट मनात उतरायची. त्यांत माईला गाणं म्हणायला सांगायला इतरांना कुठलंही निमित्त पुरायचं. अन तीदेखील आढेवेढे न घेता मनापासून अन सुरेल गायची. लग्नकार्यातून तर तिला गाण्याची हमखास फर्माईश व्हायची. मग माणिक वर्मांचं ’जा मुली शकुंतला सासरी’, लताचं ‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘तू आलीस आपल्या घरी’, सारखी गाणी व्हायची. माईदेखील तन्मयतेनं म्हणायची. त्या गाण्यांचा अर्थ तसा सोपा असल्यामुळे कळायचा. त्या काळी मुलीच्या जातीला शाळकरी वयापासूनच ‘सासरी जाण्याचं सत्य’ बिंबवले जायचं. शिक्षण-बिक्षण दुय्यमच असायचं. त्यातून लग्न ठरताना मनं जुळण्यापेक्षा ‘पत्रिका जुळण्याला’ महत्त्व अधिक होता. ‘एकदा संसारात पडलं की, जुळतात मनं...’ इतकं सगळा सोपा अन सोईस्कर मामला होता. त्यामुळे त्याकाळी संसार ‘रेटणारी’ जोडपी अधिक असतात.. अन्‌ असे संसार ‘यशस्वी’ मानले जात. मग ‘सवतीलागी मानून बहिणी, राही सदा हसरी... जा मुली शकुंतला सासरी’, असं गाण्यात इतरांसाठी म्हणताना, हा उपदेश प्रत्यक्षात प्रसंग आला तर कसा निभवायचा, याचा विचार लग्नापूर्वी माईच्या मनात यायचं कारण नव्हतं. आईविना असली तरी, अन तिची कधी उणीव भासत असली तरी, वडिलांनी मुलीला सावत्रपणा नको म्हणून दुसऱ्या लग्नाचा विचार कधीच केला नाही. आईची कसर भरून काढणाऱ्या वडिलांच्या प्रेमळ सावलीत तिचं आयुष्य निश्‍चिंत चाललं होतं! 

माई मेट्रिक झाल्यावर,निदान पदवीपर्यंत शिक्षण व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. पण दूर शहरात जावं लागत असल्यामुळे अन्‌ जास्त शिक्षण हा लग्न ठरण्यात अडथळा होतो, या त्या काळच्या समजुतीनुसार तिचं शिक्षण संपलं. तिच्या वडिलांना आता तिच्यासाठी ‘वर संशोधना‘शिवाय पर्याय नव्हता. खडतर पत्रिकेचे खाचखळगे पार करत लग्न ठरता ठरता माईनं बाविशी ओलांडली. पत्रिका ‘जुळून’ लग्न ठरलं... अन्‌ तीनेक महिन्यांत झालं. प्रथेनुसार वरात निघाली. तेव्हा बॅंडवर तिचं आवडतं गाणं वाजत होतं ... ‘बघू नकोस मागे मागे, लाडके ग, बघ पुढे, नकोस विसरू परी आईला... जा.. जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा’. यातली ‘आई’ तिनं कधी पहिलीच नव्हती. एरवी इतरांसाठी हे गाणं म्हणणं वेगळं... पण आता ती गाणी तिच्या मनापर्यंत पोहोचत नव्हती. वडिलांचा निरोप घेताना माई उन्मळून गेली. तिला सावरताना वडिलांनी पत्नीवियोगानंतर गेले इतकी वर्ष आवरून धरलेले अश्रू पुन्हा आतल्या आत जिरवले. डोळे कोरडेठक्क ठेवत म्हणाले, ‘आई लाभली, वडील नव्हते... तुला तर आईच नव्हती. आता सासू हीच तुझी आई. मात्र इच्छा झाली की बापाला भेटायला ये, पोरी. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडेच आहेत!’ असं काही बोलून जाताना भविष्य कुणाला माहीत असतं? 

घरच्या सासुरवासाला अन्‌ नवऱ्याच्या लग्नाआधी असलेल्या प्रकरणाला कंटाळून लग्नानंतर दोनेक वर्षात माई तान्ह्या बाळासह कायमची माहेरी आली. नवऱ्याने लग्न आईच्या समाधानासाठी केलेलं, अन्‌ नंतर प्रेमप्रकरण चालूच राहिलं! बेगुमानपणे, निर्लज्जपणे. बाळ होऊन ती आई झाली हे निसर्गनियमानुसार घडलं एवढंच! मुलगी झाली त्यावरून सासूचे सतत सोसावे लागणारे टोमणे, हा एक प्रकार अन नंतरही नवऱ्याचं बाहेरचं चालूच राहिलेलं प्रकरण तिला सहनच झालं नाही. ‘सवतीलागी मानून बहिणी, राही सदा हसरी... जा मुली शकुंतला सासरी’ या शब्दांचा अर्थ आता किती निरर्थक आहे, याची जाणीव झाली. ‘माहेर कायमचं सुटण्याचा काळ आता गेला... मी माझ्या आयुष्याचा असा विचका होऊ देणार नाही’ माईच्या मनानं ठामपणे परिस्थिती स्वीकारली. हे अघटित सहन न होऊन, पूर्वी मूल जगण्यासाठी विठ्ठलासमोर पदर पसरणाऱ्या वडिलांनी, जावयाकडे जाऊन पुन्हा मुलीच्या आयुष्यासाठी भीक मागितली. माईच्या जन्मावेळी देवाघरचा उफराटा न्याय स्वीकारताना त्यांनी किंमत चुकवली होती. इथं स्वतःचा अभिमान विकला. तरी परिणाम शून्य!  

घरी येऊन ‘विठ्ठलाशी’ उघडपणे भांडून त्रागा केला. नातीला कुशीत घेऊन ढसाढसा रडले. आजवरच्या साचलेल्या अश्रूंना वाट करून दिली. आधी वडील नसल्याचं दुःख, नंतर पत्नीचं मुलीला जन्म देऊन संसारातनं उठून निघून जाणं. अन्‌ आता त्या मुलीचं तान्ह्या मुलीसह माहेरी कायमचं परत येणं. लवकरच माईच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला!

आता समोर होते फक्त प्रश्न आणि प्रश्नच! अन माईला फक्त तिच्या मुलीची ‘उत्तराची’ सोबत. मुलगी  झाल्यामुळे तर बापाला आता दोघींची किंमत नव्हती. त्यानं पाठवलेल्या घटस्फोटाच्या पेपर्सवर तिनं सही केली. मुलीचा ताबा अडचणीचा असल्यामुळे त्याला तसाही तो नकोच होता. खरं तर मुलगीच नको होती. त्यानंतर तिचं गुणगुणणं देखील संपलं. अशी सगळी गाणी तिच्या मनापर्यंत पोचेनात तर ती गाणार कशी? समोर कठोर वर्तमान अन भेसूर भविष्य. जगात उभं तर रहायचंय. शिक्षण जेमतेम. कशी अन कुठे मिळणार नोकरी? सुरवातीला तो प्रश्न तिच्या ’लग्नाने’ सोडवला. कुटुंब-नियोजन हा त्या काळचा नवा सरकारी विषय. नियोजनाचा प्रसार करण्यासाठी स्त्रियांची गरज तर लागणारच. मात्र ‘विवाहित’ असणं ही नोकरीसाठी पूर्वअट. ती अट तेवढी पूर्ण झाल्यामुळे तिला हंगामी का होईना नोकरी मिळाली! ‘नवऱ्याने टाकलेली’ म्हणून लोकांच्या सहन कराव्या लागणाऱ्या खवचट चौकशा, अन रासवट नजरा... या सगळ्याला खंबीरपणे तोंड देत तिची नोकरी सातत्यानं चालूच राहिली. त्यांतच स्वतः अभ्यास करून बाहेरून द्विपदवीधर झाली! त्यानंतर एकाच शाळेत मराठी-हिंदीची शिक्षिका ते मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. त्यामुळे बापाविना मुलीला उत्तराला पदव्युत्तर शिक्षण देता आलं. शिवाय उत्तरा लहानपणापासून सुरेल गायची म्हणून तिचं संगीत-शिक्षण देखील खंड न पडता सुरू ठेवलं. मात्र तिच्या लग्नाचा विषय निघाला की उत्तरा कायम म्हणायची... ‘नको हा विषय, आई. मी लग्नच करणार नाही! मी सासरी गेले तर तुझं कसं होईल? लग्नाची कसलीच गॅरंटी नसते, हे तुला मी काय सांगणार, आई? त्यावर आई तिची समजूत घालायची. ‘अगं, पुढच्या श्वासाचीदेखील गॅरंटी नसणाऱ्या या आपल्या आयुष्यात, गॅरंटी कशाची मागतेस, माणसांची? 

आपल्या हातांत सगळ्याच गोष्टी नसतात, उत्तरा. पण निर्णय हे आपल्यालाच घ्यावे लागतात. आपण फक्त कर्म करायचं असतं अन प्रश्नांची उत्तरं कर्त्यावर सोडून द्यायची असतात. अन काय गं, तू माझ्यासाठी अविवाहित राहणार, अन मी नसेन तेव्हा तुझं तरी कसं होणार? विचार केलास कधी? अगं ही रिले-रेस अशीच चालू राहणार,पोरी.  अन क्षणभर थांबून आई पुढे म्हणाली, ‘अन् मला जोडीदार नको होता असं नव्हतंच गं कधी... आपल्या वयाचा, सुखदु:खात साथ देणारा जोडीदार हवाच! मनापासून आवडला मात्र पाहिजे. जबरदस्ती नको. भरकटलेल्या अपमानास्पद संसाराची नको अन संसार थाटून त्यांत पूर्ण स्वातंत्र्याची जबरदस्तीची अपेक्षा देखील नको. मनं जुळली की, हल्ली म्हणतात तशी ‘स्पेस’ची देखील मग गरज नसते. ‘स्पेस’ देण्यापेक्षा संसारात एकमेकांना सामावून घेता आलं पाहिजे... बस्स!  

अन उत्तराने मनासारखा जोडीदार स्वतःच निवडला!
मात्र आईनं लग्नाला आनंदानं पटकन होकार दिल्यावर तिची अवस्था कठीण झाली. आपण आता सासरी, दूर दुसऱ्या शहरांत जाणार, मग एकट्या आईचं काय? तो प्रश्न देखील माईनं सोडवला. तिच्या आधीच्या नोकरीमुळे गावोगाव वाढत जाणाऱ्या वृद्धाश्रमात तिची ये जा असायची. सुशिक्षित होत जाणाऱ्या समाजाच्या या ‘गरजेचं’ तिला आश्‍चर्य वाटायचं. खरोखर निराधार असणाऱ्या वृद्धांची गोष्ट वेगळी, पण इतरांचं काय? हल्ली प्रत्येकालाच आपापली ‘स्पेस’ हवी. अडगळ नको! तिनं अशाच एका वृद्धाश्रमात उर्वरित आयुष्य नोकरी, नव्हे, सेवा करत घालविण्याचं नक्की केलं होतं. तसं तिनं उत्तराला सांगितल्यावर उत्तरानेच आईला कुशीत घेतलं. आईविना आईची लेक तिची आई झाली. अन दोघींचे डोळे वाहू लागले! 

उत्तराच्या लग्नात जावयाच्या पंगतीत उत्तराच्याच संगीत क्‍लासमधल्या एका मैत्रिणीनं अतिशय सुरेल गाणं गायलं... 
‘‘ओटीत घातली मुलगी विहीणबाई, 
सांभाळ करावा हीच विनवणी पायी, 
लाडकी लेक ही माझी पहिली वाहिली, 
भाग्येत तियेच्या सून अपुली झाली,’’ 
तुम्हीच यापुढे तिजसी माझ्या ठायी, सांभाळ करावा हीच विनवणी पायीं... ते शब्द अन तो स्वर मात्र आता माईच्या मनापर्यंत पोहोचला. अन तिला अश्रू आवरेना... या अशा गाण्यातील अर्थच आपण इतकी वर्षं हरवून बसल्याच तिला जाणवलं. ‘माहेर-सासर’ ही वस्तुस्थिती असेपर्यंत अशी गाणी नेहमीच कालानुरूप लिहिली जाणार... दोष गाण्यांचा वा शब्दांचा कधी नसतोच... परिस्थिती नेहमीच बदलत असते, म्हणून संदर्भ बदलत असतात, हे खरं! गाणं गाणारी ती मुलगी पोलिओमुळे एका पायाने अधू होती. ती कधी लग्नाच्या मांडवातून जाईल का? माईला प्रश्न पडला. उत्तरं नसणारे असे असंख्य प्रश्नच प्रश्न! 

‘आनंदाश्रमात’ वर्धापन दिनानिमित्त त्या दिवशी साऱ्या वृद्धांसाठी माईंनी,  होय! तिकडे आता त्या सर्वांच्या आदरणीय माईच होत्या, अंध गायकांचा वाद्यवृंद बोलावले होता. सगळी तरुण मुलं-मुली अतिशय छानच गायले. पण सगळ्यांत शेवटी एका विशीतल्या मुलानं वसंतराव देशपांडे याचं एक अविस्मरणीय गाणं अतिशय भावुकतेनं म्हटलं... 

दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे. जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने. 
बोलांत बोबडीच्या, संगीत जागविले, लय, सूर, ताल लेणे, सहजीच लेवविले, 
एकेक सूर यावा, न्हाऊन अमृताने, अवघ्याच जीवनाचे... व्हावे सुरेल गाणे!
गाणं संपल्यावरदेखील काही क्षण शांतता होती. गाण्यातल्या सुरांचा भावनिक ओलावा साऱ्या वृद्ध श्रोत्यांना जुन्या जिवाभावाच्या आठवणीत गहिवरून घेऊन जाणारा होता. नंतर हळूहळू टाळ्या वाजत राहिल्या...

त्या शब्द-सुरांनी वडिलांच्या आठवणीत हरवून हलक्‍याशा टाळ्या वाजवतांना, माईंच्या नकळत डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. किती साधी अपेक्षा, पण किती अवघड असतं हे. अवघ्याच जीवनाचे, व्हावे सुरेल गाणे!

संबंधित बातम्या