धूसर होत जाणारं गाव

अरुण तीनगोटे
सोमवार, 27 मे 2019

ललित
 

हे  गाव शहरापासून फारसं लांब नाही, पण हे गाव शहरापासून प्रचंड दूर आहे. शहरातल्या अनेक गोष्टी तुला इथं भेटतील, पण शहरी माणूस तुला इथं शोधूनही सापडणार नाही. इथल्या माणसांमध्ये अजूनही पुरेपूर गावपण वस्तीला आहे. चिंचेची ही जुनाट झाडं नव्या पालवीसह आणि पुरातन खोडासह उभी आहेत. ही कुण्यातरी सुफी फकिराची कबर, तुझ्यासारखीच एकटी आणि एकाकी आहे. फक्त कबरीच्या डोक्‍यावर बाभळीची सावली आहे आणि तुझ्या डोक्‍यावर न संपणार ऊन.

हे दुर्लक्षित केल्यासारखं एक छोटसं रेल्वे स्टेशन आहे. इथं दिवसात दोनदा थोडीशी गर्दी दिसेल. सकाळी शहरात जाणारी महाविद्यालयातील मुलंमुली आणि कामानिमित्त शहरात जाणारी माणसं. मग संध्याकाळी त्यांचं दमूनभागून पुन्हा याचं स्टेशनवर थकवा पाठीवर घेऊन येणं तू बघू शकशील. पण तरीही हे स्टेशन अनेक न फुलू शकलेल्या प्रेमकथांचं साक्षीदार आहे. देता न आलेले अनेक निरोप इथं निरोपाच्या प्रतीक्षेत आहेत.

स्टेशनसमोरचा पिंपळ तुला तुझ्यापेक्षाही अधिक एकटा भासेल. सुफी संताच्या या मजारीवरची ही हिरवी चादर आणि पलीकडच्या पिंपळाची हिरवी पानं या दोघांमध्येही उदासी आहे... आणि जे आहे त्यात आनंद मानणाऱ्या तुझ्या मनातही अनेक दु:ख वस्तीला आहेत. न थांबता, धडधडत निघून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेचे हॉर्न पार गावात ऐकू येतात. स्टेशनवर न थांबता निघून जाणारी शिष्ट रेल्वे आणि फलटावरून दिसणारं किल्ल्याचं वरचं टोक तुझ्या आवडीच्या या दोनच गोष्टी कदाचित आता इथं उरल्या आहेत. पण तू स्वत:मध्ये कितीसा उरला आहेस, हा खरा प्रश्न आहे.

गावात तुला दिवसातून दोन-तीन वेळेस तरी रेल्वे धडधडत निघून गेल्याचा आवाज येईल, तेव्हा जुनाट चावडीच्या जीर्ण भिंतीतून थोडी माती ढासळेल. लाल्या मांगाच्या कबरीजवळच्या कवठाच्या फांद्या 
हलतील. ओढ्यातला हापशाचा लोखंडी दांडा बराच वेळ थरथरत राहील. सराईच्या मिनारवरची पाखरं पुन्हा खुल्या आभाळात झेपावतील.

रेल्वे रूळाखालचा हा भुयारी पूल ओलांडताना बालपणीचे घाबरलेले दिवस तुला आठवतील आणि कदाचित तुझी नजर ओढ्यातल्या जांभळीच्या झाडाचा शोध घेईल. तू शोध घेत असलेल्या अनेक गोष्टी आता अस्तित्वात नाहीत. तुझं आवडतं जांभळाच झाड हे त्याचं प्रतीक आहे... आणि ही फक्त तुझ्या बालपणीच्या आठवणीत हरवून जाण्याची गोष्ट नाही, तर ही तुझा भूतकाळ हिरावून घेण्याची गोष्ट आहे.

तू चौकातून उतरत सरळ चालायला लागशील, तेव्हाच्या टळटळीत दुपारी चौकात फारशी वर्दळ नसेल. हे तापलेले डांबरी रस्ते, उन्हाच्या झळा, दोन मिनिटं श्रद्धांजली वाहण्यासाठी उभ्या राहिलेल्या माणसांसारखी स्तब्ध झाडं, गोडाऊन समोर एका रांगेत आज्ञाधारक मुलांसारख्या उभ्या असलेल्या ट्रका, मनातून आणि शरीरातून ओलाचिंब होत जाणारा तू.

तू नेहमी अनामिक ओढीनं गावाकडं जातोस आणि प्रेमभंग झालेल्या हळव्या मुलासारखा शहराकडं परतून येतोस. जुनं गाव तुला सापडत नाही आणि नवा तू गावाला ओळखीचा भासत नाहीस. तुझा भूतकाळ आता इथं नाही आणि तुझ्या वर्तमानालाही श्वास घेण्यापुरती जागा इथं लाभेल असं वाटत नाही. तुझी मूळ तुला सापडत नाहीत आणि नव्या ठिकाणी तुला रूजता येत नाही.

या रस्त्यावरून जाताना स्वत:चं बालपण आठवून बघ. उन्हाळ्यातले रणरणते दिवस, बापाचं बोट धरून रेल्वेरूळ ओलांडणारा तू, बापाच्या पायातल गावरान वहाण, डोक्‍यावरचे विरळ होत जाणारे केस, मंगोलियन वंशाच्या लोकांसारखे मोठाले कान, अरुंद नशीब लाभलेलं बापाच रुंद कपाळ, बसकं नाक, कोरलेल्या पातळ मिशांची धार आणि वेदनेचा काठ लाभलेले करुणामय डोळे. बापाच्या डोळ्यात नेमकं काय आहे, हे तुला कधीच कळल नाही.

 आपल्या लेकरांना रेल्वे बघायला मिळावी म्हणून मामाच्या गावाला रेल्वेनं घेऊन जाणारा बाप तुला आठवल. तुझ्या वाचनाचा सराव वाढावा म्हणून वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचायला लावणारा बाप, तुला आवडतात म्हणून दर रविवारी मासं घेऊन येणारा बाप, आतल्या दु:खाचा गंध लागू न देणारा कुपीबंद काळजाचा बाप, छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा मनमुराद आनंद लुटणारा बाप. बापात आणि तुझ्यात काहीतरी अधुरं राहून गेलं. ते आता सांधता येणार नाही. हे दु:खाचं सुटलेलं गाठोड आहे. हे आता बांधता येणार नाही.

बोट धरून चालायला शिकवणारा बाप अचानक आपलं बोट सोडून दूर प्रवासाला निघून जातो, तेव्हा आपण कोणत्या दिशेनं जायचं असतं? ऐकता ऐकता अचानक बापाचा आवाज कायमचा हरवून जातो, तेव्हा आपण कुणाला हाक मारायची असते. बापाच्या दणकट, चिवट आणि राकट हातांच्या आधाराशिवाय आपलं आयुष्य अचानक अंधातरी होऊन जातं, तेव्हा कोणत्या आभाळाकडं कसली फिर्याद मागायची असते...?

कितीतरी गोष्टी बापाला बोलायच्या राहून गेल्या आहेत, हे टळटळीत दुपारी तुला प्रकर्षानं जाणवेल. तुझा घसा कोरडा पडेल, तापलेल्या उन्हामुळं आणि भरून आलेल्या मनामुळं. पण तू थांबू नकोस. रेल्वे गेट ओलांडून सरळ चालत रहा. रिकामी रानं दिसतील, थोडीफार जाणारी-येणारी माणसं, भकास होत जाणारी शेतं, सिमेंट पाइपचा कारखाना, कामगारांच्या झोपड्या, अनेक वर्षांपासून बंद असणारा हापसा, ओढ्यावरचा छोटासा पूल, चावडीची वापरात नसणारी जीर्ण पुरातन भिंत, लाल्या मांगाचं छोटसं स्मारक ओलांडत तू गावाच्या जवळ पोचशील.

या टळटळीत दुपारी शिवनेरी धाब्यावर फक्त तुरळक कर्मचारी, एखाददोन गिऱ्हाईक आणि खूप सारं ऊन आहे. लोखंडी पत्रे तापून तापून माणसाला घामानं ओलचिंब करून टाकत आहेत. नाही म्हणायला बाबूंच्या एका रांगेत लावलेल्या झाडांजवळ थोडासा गारवा आहे. तिथं एक कुत्रा थोडीशी माती उकरून जरासा पेंगुळला आहे. या भल्या थोरं उन्हात अगडबंब अंगाचा आडदांड माणूस दारू पीत बसला आहे. त्याच्या डोळ्यात दारू आहे आणि शरीरात झिंगलेपणा आहे. ‘मुझको दफना कर वो जो जब वापस जायेंगे’ हे भयाण प्रेमभंगाच गाणं भारदार आवाजात वाजत आहे. 

पण तू गावात पोचला, तरीही गावाचं आणि तुझं अंतर कमी होणार नाही. गावातल्या वेड्या बाभळींना कदाचित तू शहाणा वाटशील आणि गावातल्या शहाण्या लोकांना तू बावळा दिसशील. निजामाच्या काळातली सराई अजूनही भकासपणा घेऊन उभी आहे. जिथं समृद्धी नांदत होती, तिथं गरीब नांदताना तू पाहशील. चार बाजूचे चार मिनार किती एकेकटे वाटतात. त्यांच्या वाळलेल्या गवतात जुनी हिरवी स्मरणं भेटतात. तू सराईवरून टेकडीवरचं हनुमानाचं मंदिर पाहू शकशील. पलीकडं नदीत उतरत जाणारी पांढरीफट वाट. तरटाची फुलं तोडणार तुझं बालपण तिथंच कुठंतरी अजूनही हुंदडत आहे.

या सगळ्या भकासपणातही फुललेल्या पळसाचं हसू भर उन्हात चमकत राहील. पण तुझं मन नदीकाठच्या विहिरीत किंवा आठवणीत बुडू देऊ नकोस. पुन्हा काठावर येणं कठीण आहे. जुनं विसरून जाणं कठीण आहे. जुनं आठवत राहणंही कठीण आहे. एकंदरीतच कठीण आहे! 

संबंधित बातम्या