सुलग सुलग जाये मन 

निती मेहेंदळे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

ललित
 

तिचं मनसोक्त स्वत:त चिंब भिजणं तसं खूप जुनंच. पण ते केविलवाणं नाही. उलट तिच्या सरींमध्ये कैक अद्‌भूत लपेटे आहेत आणि ते तिच्या मोहात आपणहून आपल्याला स्वेच्छेनं गुंतवणारे आहेत. तिला आपलं करत जाणारे, तिचेच होऊन जाणारे नि मिरवणारे. अजूनही तिला लख्ख सगळंच आठवतं. सरींमधून शिरताना नकळत पडदे सारत ती खूप मागं एकएक दालन उघडत जाते. हेही तिचं सवयीचंच. रंगून जाणं एखाद्या मायावी मयसभेत. 

मुंबई! मुंबापुरी... आमची मुंबई म्हणताना एक तरी तिचा अतूट बंध आपल्याशी जुळलेला असावा लागतोच. तसा हा बंध. ती आणि तिचा लाडका पाऊस. तिला अधिक मोहक बनवणारा. तिच्या प्रेमात पडायला लावणारा. प्रियकर आणि प्रेयसीचं नातं या दोघांच्या साक्षीनं दृढ होत गेलं. पिढ्यान्‌ पिढ्या... वर्षानुवर्षं... 

तिच्या भिजल्या रूपावर घायाळ होणारे तिचेच होऊन जात. जातात अजूनही. त्याचं थेट कोसळणं असतं तेही जुनंच. तिच्या दमट खाऱ्या किनारी त्याचं असं अविरत कोसळणं आपल्या बहरदार दणकट सरींमध्ये तिला लपेटून घेणं, तिच्या मोहात पाडतंच. उगाच नाही अख्खी चित्रसृष्टी तिच्या आजूबाजूलाच तळ ठोकून वसली. तिच्या पावसाच्या सहवासातली किती दृश्‍यं तरळून जातात अशीच. 

कधी असतात दृश्‍यात चित्रनगरीतले दोन उनाड प्रेमी. मुंबईमध्ये कोणत्याशा कचेऱ्यांमध्ये नोकऱ्या करायला आलेले. अर्थद्रव्याची अजब गणितं मांडू पाहणारे. पण जमाखर्चात आपोआपच गुरफटले जाणारे. भावना व व्यवहार यातली व्यस्त आणि अस्ताव्यस्त होत जाणारी समीकरणं समजायचीत अजून त्यांना. म्हणून उनाड... आणि उनाड म्हणायचं कारण मोजूनमापून ठरवून काहीच न करणारे. कशाच्याही आड न राहता मनमुराद व्यक्त होणारे उनाड दोघं. त्यांना ओली स्वप्न दाखवायला सोबत खूप काही असायचं तिच्याकडं. तिचा समुद्र. किंचित आत वळण घेणारा शुभ्र चकाकत्या वाळूनं नटलेला किनारा. नाचताना रंगून जात नर्तिकेनं कमरेत थोडा डौलदार बाक आणावा तसा. तिचा वरळी सीफेस. कितीही कठोर हृदयाला हलवून, खिळवून टाकणारा. तिच्या वारंवार येणाऱ्या प्रेमाच्या भरतीच्या लाटा खडकांवर सारख्या येऊन आदळणाऱ्या. त्या खडकाला आणि किनाऱ्यावरच्या कठोर हृदयांना आपसूक वितळवत जाणाऱ्या. असा सीफेसचा पाऊस वेगळा, तिच्या श्रीमंत टेकड्यांवरचा निराळा. तिच्या अहोरात्र माणूसवाहत्या लाइफलाइन ट्रेनमधून जाणवणारा पाऊस तर खूपच वेगळा. अगदी नव्या बांधत्या इमारतीत अधूनमधून इथं तिथं गळणारा पाऊसही तिचा स्पेशलच. खिशात नुकता जन्मलेला, कोरा अजून गळती न लागलेला पगार खुळखुळत असताना अख्खी मुंबई आपली हे तिच्या पावसानं चिंब भिजवल्यावर झिंग येऊनच म्हणायचं. 

अनेक अशी स्वप्नं पोटाशी घेऊन जगणारी आपली म्हणत म्हणवत अव्याहत वाहत राहणारी मुंबई आवडते ती हे ओलं रूप पाहिल्यावरच. कुठूनसे आणून टाकलेले एकसारख्या आकारांचे दगडी ओंडके सीफेसचं आकर्षण झालेत. मुंबईच्या टीचभर असण्याच्या भीषण भौगोलिक कथेशी कायम जे जुळवून घेत राहिलं, तेच तिचं होऊन राहिलं. त्यांच्या नुकत्याच होऊ घातलेल्या संसाराच्या स्वप्नांत न मिळणारा एकांत त्यांनी या दगडी ओंडक्‍यांमागं शोधला. हातात सॅंडल्स धरून एका हातात पर्स आणि अमोलचा हात धरून तोल सावरू पाहणारी टीना भेटली एकदा ती इथंच. नंतर कधी मुन्नाभाई संजय व्याकूळ होऊन मित्राची माफी मागताना दिसला इथं असाच या सीफेसच्या साक्षीनं. कधी नूतन, कधी वहिदा, कधी मीनाकुमारी दिसल्या तिच्या वाळूत नाजूक नाचताना. माथ्यावर रंगीत रिबिनींची फुलं बांधून सायकलवर मुलींचे तांडे ‘आयी हंसीनोंकी टोलियॉं’ म्हणत नूतनसकट खिदळत झर्रकन निघून जात. कधी ‘शीशा ये दिल इतना न उछालो’ म्हणत मीनाकुमारी आणि तिची साडीतली अदब बघायला गर्दी होत असे या वाळूत. ‘झूम ले युँह मन मेरे’ म्हणत दोन पायांवर सहज उड्या मारत वाळूवर नाचत वहिदा हसतहसत मन जिंकून जायची. कधी कुणी तर कधी कुणी. मुंबई आणि तिचं किनाऱ्याचं ओलं सौंदर्य असं कोणालाही भुरळ पाडणारं... दशकानुदशकं... अजूनही... 

एक दोन सरी झाल्या, की पावसाची फुलं अजूनही दिसतात. कोपऱ्या कोपऱ्यात टोपल्यांमध्ये. विकायला नटून सजून बसलेली. जुडीचा सोनटक्का, घमघमत राहणारा मोगरा, मदनबाणचे गजरे, केवड्याचं पान, पळसाच्या पानातला सोनचाफा अन्‌ काय काय. हे मुंबईचं रसरसतं सौंदर्य पावसाच्या स्पर्शानं उजळून निघालेलं... ताजं... 

नुकताच पाऊस असा कधी बरसून गेलेला. त्यानंतरचा ओला गारवा काही जखमा उघडणारा. जाणिवा जाग्या करणारा. पण स्वच्छ सुरुवात होण्याची हमी देणारा. एखादा हळवा चष्मा धूसर करणारा... 
कहाँ तक मन को अंधेरे छलेंगे... 
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे... 

कधी तुटपुंजा उरणारा पगार खिशात पण स्वप्नं मोठी असायची नायकाच्या उशाला आणि नायकाच्या खिशावर नायिकेचं ते गाढ विश्वास टाकणं. हे सगळं आपलंसं होऊन जातं केवळ त्या ७० च्या दशकातल्या तुरळक गर्दीच्या सीफेसवर, त्या युगुलाच्या मनमुराद भिजण्यामुळं. ‘रिमझिम गिरे सावन...’ म्हणत त्यांचं गर्दीतही हातात हात घट्ट पकडून चिंब चालत राहणं. रस्ते ओलांडणं. आझाद मैदानात साठलेलं पाणी उडवत खिदळणं. किनाऱ्यावर तिचं धक्‍क्‍यावरून चालणं. त्याच्या आधारानं. गर्दीतही फक्त एकमेकांत गुंतत राहणं. सगळं आवडत राहिलं आपल्याला ते पावसानं धुंद करणाऱ्या मुंबईचं रूप बघूनच. दोन फोल्डच्या छत्रीतला तो साजूक कोसळता शृंगार ‘जाने पीके चली क्‍या पवन’ म्हणत त्यांचं तिच्या काठाकाठानं अनुकरण करत राहिला. तिच्या प्रेमात पडायचं कारण होत राहिला. 

नोकरी करून दमूनभागून घरी येणारी एखादी उर्मिला हमखास दिसायची. संसाराची स्वप्नं डोळ्यात आणि गळक्‍या पागोळ्यातून ओंजळीत धरू पाहणारी. ‘गीला गीला पानी, पानी सुरीला पानी’ म्हणत त्याच्या टिपटिपीत सूर जुळवून व्यक्त होऊ पाहणारी अबोल तरुणी... 

आज तिचे किनारे अधिक आकर्षक झालेत आणि चुकार हिंडणाऱ्या शेंगदाणेवाल्याच्या जागी चौपाट्यांवर ठेल्यांचं साम्राज्य झालंय. आता जिकडंतिकडं तीन फोल्डच्या सोप्या सुलभ रंगीबेरंगी छत्र्या दिसतात. लहान होऊन लहानात लहान पर्समध्ये विसावणाऱ्या आणि मनंही मग कप्पे करून वागणारी झालेली. लहानच पर्स पण बरेच कप्पे हवेत, केव्हाही घट्ट बंद उघड करता येणारे, वाटेल तेव्हा नि तसे. अशीच एक पर्स उभी बस स्टॉपपाशी. ताटकळणारी, बसची वाट बघत. मुंबईच्या उरफाट्या पावसाचे सपकारे वाचवणारी एक तीन फोल्ड छत्री तिच्याही हातात. चालता चालता वाऱ्यानं तिची दिशा बदलून उलटी केलेली. तिच्या न जमणाऱ्या खटपटीला मनात हसून पण मदतीला एक ताकदी मनगट पुढं आलेलं. पुस्तक बंद करून कशीबशी त्यानं तिला दुरुस्त करून दिलेली छत्री आता बसच्या रांगेत घुसू पाहणारी. यशस्वी छत्री विजयी मुद्रेनं खिडकीबाहेर पाहते, तर मनगट चढू न शकलेलं आणि त्याचं पुस्तक तिच्या हातात. ‘लाइफ इन मेट्रो’ मधला हा सुबक प्रसंग मुंबई आणि तिच्याशी लगटून येणारा पाऊस यांच्याशिवाय कसा साकार झाला असता! 

तिच्या इंपाला, मर्सिडीज नाक्‍यानाक्‍यांवर करकचून ब्रेक मारत आवळत थांबलेल्या; कधी सिग्नल म्हणून, कधी ओल्या गंधमोही मोगऱ्यासाठी, तर कधी रोज टवटवीत करून आणलेल्या गुलाबांसाठी.. ते मोगऱ्यागुलाबांचे खरबरीत अगतिक हात अलगद देवघेवीच्या निमित्तानं आत शिरणारं ऑटोमॅटिक उघडणाऱ्या काचांमध्ये किंचित रेंगाळणारं थंड हवेच्या आणि खुळखुळत्या नादाच्या आकर्षणानं.. त्यातून रिमझिम बरसता सावन असा सोबत शिरतो बाहेरचं खरं वास्तव क्षणभर गाडीतल्या धनिकांना दाखवत.. मग भरभर काचा वर सरकू लागतात मायावी थंडगार हव्याहव्याशा भासमान स्वप्ननगरीच्या दिशेनं. गुलाबाचे हात अकारण हलत राहतात निरोपासारखे गर्दीत हरवत जाणारे.. बंद काचांमागचंही मुंबईचं ते मोहक रूप भिजवू शकतं अगदी आतल्या स्वच्छ कोरड्या परीटघडीलाही... 

एखाद्या उंच कचेरीच्या इमारतीखाली पथारी टाकून बसलेला एखादा पुस्तकांचा अक्षरश्रीमंत विक्रेता अधूनमधून इथं दिसतो. छत्री घेऊन उन्हातान्हात चोखंदळ वाचकांची वाट पाहात असतो. मग अचानक येणारा वळीव आणि वाचक दोघंही तारांबळ उडवतात मग त्याची. हे एक तिचं असं अजून एक खास पावसाळी दृश्‍य... मनात कोरलेलं... 

तिच्या चंदेरी क्वीन्स नेकलेसच्या आकर्षणात ओल्या किनाऱ्याची वादळी धुंवाधार भर पडत गेली ती कायमचीच आणि वर्षाकाठी तिचा वाढदिवसच साजरा होत गेला. वाढ होत होत तट्ट फुगत गेलेली सुंदर मुंबई दिसत राहिली, तिच्या मिठी मारून बसलेल्या दिशा हरवत गेलेल्या नदीपात्रासारखी. आताशा सर्वधर्म बोली जातींचं दळणवळण तिच्या अंगाखांद्यावर लीलया खेळू लागलेलं होतं. ६०-७० च्या दशकातला पडद्यावरचा नेत्रसुसह्य मानवी वावर आता गर्दी होऊन नकोसा वाटू लागला. तासाचा खेळ म्हणूनही असह्य होत जाणारं रंगीत भीषण वास्तव आक्रमक स्लमडॉग होऊन अंगावर येऊ लागलं. 

आर्थिक राजधानीचं न मागितलेलं बक्षीस इवल्याशा तिच्या हातांत मावेनासं झालं. नाइलाजानं ती विस्तारत गेली वाट फुटेल तशी.. अनोळखी मनांवर आणि पाण्यांवर पूल बांधत.. देशाच्या आश्वासक शहराचा किताब मिरवणाऱ्या मंत्रालयातून थेट तिच्या टेकड्यांवर विसावले आणि अनावर लोंढा तिला मात्र लोटत राहिला स्वत:पासून दूर, त्या गर्दीपाशी...कुलाब्याची दांडी आता दिसेनाशी झालेली. अवाढव्य इमारतींमागं मोठ्या झालेल्या तिच्या पसाऱ्यामागं कुठेतरी.. तिच्या जाणिवा बोथट होत गेल्या. हळूहळू तिच्या भर घालून बुजवलेल्या नद्या आणि खाड्यांसारख्या. पण तिचा पाऊस विसरला नाही त्याचं वेळापत्रक. न राहवून एकेदिवशी ढग फुटून रडला आणि मग अलगद कोसळली तीही त्यात मिसळून...पत्त्याच्या कोसळत्या बंगल्यासारखी... आपल्यापुरती वाढत गेलेली उच्चवर्गीय माणसं काही तासांत अतिसामान्य होताना दिसली. आलिशान मोटारीतून सुरक्षित आवडणारा मनलुभावन सावन आता न उघडणाऱ्या काचांमधून रौद्र भासू लागला. काही चालते पाय उघड्या मॅनहोलमधून भूमिगत झाले ते कायमचेच. मुंबईची तुंबई असं काहीबाही कानी येऊ लागलं. पण काही माणुसकी शाबूत असलेले निधर्मी हात मदतीला धावले आणि त्यांचे बांध तयार झाले, बुडणाऱ्या मुंबईला तारून न्यायला. ती पुन्हा सावरू लागली. 

पावसाच्या घट्ट साथीनं मुंबईनं तिच्या स्वाभाविक नदीनाल्यांवरच्या अतिक्रमणाला २६ जुलैच्या काळरात्री रौद्रस्वरूप दाखवून चांगलाच धडा शिकवला. त्यातही चंदेरी दुनियेत प्रेमकथा रंगवल्या गेल्या. दूरध्वनी आणि वीजव्यवस्था पूर्णत: बंद पडूनही दोन प्रेमी कमरेभर पाण्यात एकमेकांना शोधत येतात ‘तुम मिले’ म्हणत. इतकं या मुंबईकर पावसाचं आकर्षण.. चुकवता न येणारं... 

एक अशीच धुंद पावसाळी रात्र... आवडत्या सहवासात भिजणारी टॅक्‍सीतली.. तिचं कळत्या वयापासून शारीरिक, मानसिक घाव सोसलेलं मन सावरू पाहणारे स्वप्नील डोळे आणि त्याचं तिच्या असण्याच्या बेहोषीत धुंद गाणं... ‘तुम जो मिल गये हो, तो ये लगता है...’ आणि ‘के जहॉं मिल गया...’ म्हणताना त्याचं तिरपी मान उडवणं आणि ते पाहून तिचं मनातून ओलं होत राहणं. हे केवळ मुंबईच्या पावसातच होऊ शकतं, यावर आपण पैज हरायला तयार आहे. 

आणखी एका दृश्‍यात असाच एक तरुण डोळ्यांत वादळ घेऊन आणि हृदयाशी जाळ घेऊन शोधत फिरताना आजही दिसतो, की ‘इस शहर में हर शक्‍स परेशान सा क्‍यों है...’ एक विभक्त होऊ घातलेलं तरुण जोडपं. कथा जुनीच. दोघांच्या आयुष्यात कोणी येऊन गेलेलं आणि असे एक दिवस दोघं एकाकी वेळी तिच्या किनाऱ्याशी ओल्या पुळणीत भेटताहेत, असंही एक दृश्‍य. त्यांच्या आठवणींच्या चुकांच्या उलटसुलट लाटा येतायत, उसळतायत. हळूच आदळतायत एकमेकांवर. मग थोडासा फ्लॅशबॅक आणि क्‍लॅश... थकून दोघं विसावतात थोड्या सुक्‍या वाळूत आणि तिची शुभ्र ओढणी उगाच वाळूवर फडफडते. तो म्हणून जातो त्याच्याही नकळत, ‘शायद बारीश आनेवाली है..’. एक दीर्घ उसासा, मग लांब पॉज आणि वाक्‍य क्‍लायमॅक्‍स जाहीर करत.. ‘क्‍या हम नयी शुरुआत करे?’ असं बोलायला प्रवृत्त करणारा हा माहौल मुंबईचाच. नवी ‘दृष्टी’ देऊन जाणारा.. 

हे शहर जितकं देतं त्याच्या कैक पटीनं आपल्याकडून घेतं, असं काय काय ऐकवतात एकेक फिल्मी संवाद.. पण तिचे न विचारता, न जुमानता तोडलेले लचके, केलेले बॉम्ब हल्ले, बंद केलेले तिच्या नैसर्गिक झऱ्यांचे स्रोत...हे कोण नि का करतं हे तिनं कुठल्या कोर्टात विचारायचं? 

तिच्या नकळत विस्तारत गेलेलं, बाहेरून येऊन तिच्या नसानसांत स्थायिक झालेलं अंडरवर्ल्ड डॉन्सचं विश्व हे जितकं विदारक, तितकंच विघातक. कोसळत्या पावसाच्या आधारानं कित्येक निरोप बिनबोभाट पोचलेले, किती पेट्या खोके सरकलेले इथून तिथं. जाणिवांच्या पलीकडचं तरीही ते सत्य. असत्याचा आणि विनाशाचा हात धरून चालू पाहणारं दुर्दैवी जग आठवण करून देतं तिच्या गल्लीबोळांत, चाळींत हिंडताना. नैतिकतेआड चाललेली हिडीस अनैतिकता पावसाच्या ओरड्यात कणखर होत राहिली. हे तिच्यावर एकमार्गी नको असताना प्रस्थापित होत राहिलेलं सप्तपाताळी साम्राज्य. त्या मंद खिन्न रिपरिपी आणि अथक वाहणाऱ्या सगळ्या रात्री फक्त तिच्यासाठीच! सगळं गुप्त, गूढ आणि अगम्य... 

वाढत्या लोंढ्यांसोबत काही पट्ट्यांत वाढत्या झोपड्या नि घरं... सगळ्यांना घेऊन तितकीच जोमात एकरूप होऊन अजूनही तितकीच ठाम बरसणारी ती.. म्हणूनच इतर कोणत्याही शहरांहून वेगळी दिसणारी, तिच्या अविभाज्य पावसासकट... अजूनही तिच्या मनात तोच रेंगाळत आहे ७० चा पाऊस, तुरळक गर्दीचा! तिच्या चंदेरी पडद्यावर आणि त्यावर सुलगणारी, सुलगवणारी मनं. वाऱ्यात उघड्या पडणाऱ्या छत्र्या आणि त्या डोक्‍यावर सांभाळण्यातला नाजूक अट्टाहास. हातात हात गुंफून मनमुक्त भिजणं. अंतर्बाह्य ते खरं खरं हसणं... कोणतेही पडदे न बाळगता.. ही तिची खरी माणसांमध्ये पेरलेली गुंतवणूक.. तिच्या पावसाच्या साथीनं... 

मुंबई आणि पावसाचं नातं एकापाठोपाठ येणारं, संलग्न, उत्कट. हिंदी-मराठी सिनेमा त्यांना जमेल तसं टिपत राहिला. त्याच्या सोयीनं आणि सवडीनं. कधी पॉजची जागा भरायला. पण तो 70mm स्क्रीनबाहेर खूप खरा आणि अफाट व्यापक होता, आहे. 

कधी बाणगंगेच्या टोकाशी रामेश्वराजवळ उभं असताना, कधी मंगळवारी सिद्धीविनायकाच्या प्रसिद्ध रांगेत ताटकळताना, तर कधी मुंबादेवीच्या पावलांशी घुटमळताना. त्याच पार्श्वभूमीवर वाजत असणं अगदी सवयीचं झालेलं.. ते बसच्या रांगेत उभं किंवा प्लॅटफॉर्मवर तासनतास वाट पाहणं. गाड्या बंद पडणं. ते ठराविक लो लेव्हल रोड्‌स पाण्यानं ओथंबलेले. रिक्षा आणि टॅक्‍सींचा तुटवडा आणि अशावेळी चार सीट्ससाठी एकत्र येत जाणारी मुंबई. रुळांत साचलेलं पाणी आणि डोळ्यांत तगमगता उशीर घेऊन वावरणारा एकेक मुंबईकर तिच्याशी असा आपोआपच जोडला गेला... 

कधी तर तो कोसळत राहतो नळ फुटल्यासारखा आणि मागं आश्वासक रेल्वे आगमनाच्या अनाउंसमेंट्‌स सुरूच राहतात. त्या बंद पडलेल्या लाइफलाइन मधली अनोळखी रात्र आठवते. पावसात सांभाळून घेणारी मुंबई पाहत कृतज्ञता वाहत होती डोळ्यांच्या किनारीनं आणि आता मनात वाजत होतं एकच गाणं.. ‘ये है बॉम्बे मेरी जान!’ आणि मनाने पडदा उघडला होता मोठ्ठ्या कृष्णधवल स्क्रीनचा. जॉनी वॉकर आणि कुमकुम. टांगा आणि पुन्हा तो रस्ता. शेजारी ऐसपैस वॉक-वे. तुरळक रहदारी आणि सोबतीचा अनौपचारिक समुद्र. प्रत्येक मुंबईकराचं नितांत जवळचं राष्ट्रगीत... ‘ऐ दिल है मुश्‍कील जीना यहॉं...’

संबंधित बातम्या