प्रेम न लाभे

विजय तरवडे
सोमवार, 27 एप्रिल 2020

ललित
पाळीव प्राणी सर्वच वयातल्या माणसांना आनंद देतात, एकाकीपणावर मात करायला मदत करतात. एकटी पडलेली, विशेषतः म्हातारी माणसं अनेकदा मांजर पाळताना दिसतात. त्यांच्याशी एकतर्फी बोलतात. मांजर त्यांच्याशी मानवी भाषेत बोलू शकत नाही. त्यांचा आपसातला खरा संवाद असतो स्पर्शाच्या माध्यमातून.

पाळीव प्राणी पाळण्यातली एक गैरसोय मला जाणवली आहे. आधुनिक विज्ञानानं माणसाची आयुर्मर्यादा वाढवली तितकी प्राण्यांची वाढवलेली नाही. एखादा प्राणी पाळावा असं माझ्या मनात आलं, तेव्हा कुत्रा पाळायला अवघड म्हणून बाद झाला आणि मांजर पाळायचं ठरलं. आपण तिच्या प्रेमात पडणार आणि ती आठ-दहा वर्षांनी आपल्या डोळ्यांदेखत... हे ठाऊक होतं. पण कुठंसं वाचलेलं (तेव्हा इंटरनेट वापरण्याची माहिती नव्हती), की पाळलेली मांजर स्वतःचा मृत्यू जवळ आल्याची जाणीव झाली की घर सोडून जाते. मालकांसमोर ती प्राण सोडत नाही. तर मग मांजरीचं पिल्लू घरी आणलं. त्याचे लाड सुरू झाले. बोक्यानं त्याच्यावर हल्ला करू नये म्हणून त्याच्या गळ्यात बांगडी घातली गेली. त्या दरम्यान मुंबईला गेलो होतो, शिरीष पै यांनी सुचवलं की मांजरीला एकदा पिल्लं झाली, की लगेच संततीनियमनाची शस्त्रक्रिया करून घ्या. म्हणजे मग तिच्या शरीरातून बोक्याला आकर्षित करणारा गंध येणं बंद होतं. तिला पिल्लं झाली नाहीत तर तिचा बांधा सुडौल राहतो आणि तिचं आयुष्य वाढतं. आमची मांजरी - चिंगी – चौदा वर्षं जगली. दोन वर्षांपूर्वी एक अपघात होऊन तिचा मागचा पाय तुटला आणि जखम चिघळली. त्यातच ती गेली. बहुधा अपंग झाल्यामुळं मरताना ती घर सोडून गेली नसावी. आम्ही काही दिवस शोकात काढले आणि ठरवलं की आता घरात प्राणी नको. त्यांच्यात जीव अडकून राहायला नको. 

गेल्या वर्षी एका जीवघेण्या अपघातातून कसाबसा जीव वाचल्यावर पाचसहा महिने दिवसातला बराच काळ बाल्कनीत बसून असायचो. बाल्कनीसमोर काटकोनात एका खिडकीच्या वरचा घुमट आहे. तिथं अनेकदा कबुतरं आणि कावळे बसतात. एका सकाळी न्याहारी करताना सहज उकडलेल्या अंड्याचा तुकडा तिकडं भिरकावला. तो एका कावळ्यानं उचलला. मजा वाटली.  
बघता बघता व्यसन केव्हा जडलं ते समजलं नाही. रोज सकाळी न्याहारीच्या वेळी पाचसहा कावळे घुमटावर जमू लागले. काही गळाले. मात्र त्यातली एक जोडी – बहुधा नर आणि मादी – धिटाईनं बाल्कनीच्या कठड्यावर येऊ लागली. कावळ्यांना सुकी मासळी आवडते असं ऐकलं आणि मग त्यांच्यासाठी दरमहा ती आणू लागलो. दोघे मोजून एकेक तुकडा खात आणि पाणी पिऊन जात. 
अचानक लॉकडाऊन सुरू झाल्यावर मासे संपले. दोनतीन दिवस कावळ्यांनी जोरजोरात कावकाव करून उच्छाद मांडला. आपल्याला हे चावतील की काय अशी भीती वाटली. पण ते चावले नाहीत. निमूटपणे आमच्याबरोबर पावाचे किंवा फुलक्यांचे तुकडे खाऊ लागले. त्यांच्यासाठी वाटीत पाणी ठेवायचो. पाव असेल तेव्हा ते पावाचा तुकडा वाटीत बुडवून ठेवीत आणि हळूहळू खात. 
गेल्या आठवड्यातली गोष्ट. दोघे आले. पण त्यातला नर चोच वासून धापा टाकल्यासारखा आवाज करीत होता. फक्त पाणी प्यायला आणि काही न खाता उडून गेला. मादीनं पाव खाल्ला आणि पाणी पिऊन निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती एकटीच आली... आणि नंतर दोघं यायचे बंद झाले. 
ज्यांना आपल्याशी बोलता येत नाही त्यांच्यावर आपण प्रेम करतो. काही वेळा तेही आपल्यावर प्रेम करतात आणि नियतीनं नाइलाज केला की दिगंतरा निघून जातात. प्रेम न लाभे...    

संबंधित बातम्या