१ कुत्रा, २ दगड, साडेतीन शहाणे..!

विनीत देशपांडे
सोमवार, 17 जून 2019

ललित
 

आज बरीचशी कामे सुरळीतपणे झाल्यामुळे जरा आनंदातच घरी निघालो. चारचाकी वाहनाचा एक फायदा असतो, की बाहेर पाऊस वारा असला तरी तुम्ही कोरडे राहू शकता. पण त्याचबरोबर अवघड भाग म्हणजे, गर्दीतून जाताना वाट काढून दुचाकीप्रमाणे घुसून जाता येत नाही. सध्याच्या स्थितीत पुण्यातील विधी महाविद्यालयाचा रस्ता हा एक दिव्य परीक्षा बघत असतो. दोन्हीही बाजूला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना ‘इंच इंच लढवू’ किंवा ‘बंपर टू बंपर’ असली विशेषणे परिधान करून मार्गक्रमण करायचे असते. रस्ता सोडून वाहतुकीच्या उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाक्‍या किंवा तीन चाकी गाड्या आपला अंत पाहत असतात.

त्यातच आज आधीच्या रस्त्यावर एका गाडीने जमेल तेवढे हळू जाऊन आणि माझ्या रस्त्यात सतत अडथळा करून मला जरा तापवले होते. पण तरीसुद्धा नेटाने त्याला मागे टाकले आणि माझा पुढचा प्रवास सुरळीत करायचा प्रयत्न केला. भांडारकर रस्त्याला आल्यावर एक बीएमडब्ल्यू दिशादर्शक न दाखवता पूर्ण डाव्या बाजूकडून वळून उजव्या बाजूला सरकली, तेव्हाही माझी परत सटकली होती. पण तो पुढे बीएमसीसी रस्त्यावर लागला आणि माझा मार्ग वेगळा झाला. बालभारतीचा चढ चढून वर आलो. माझा नेहमीचा डावा दिशादर्शक दिला आणि पुढे येऊ लागलो. इथेही पुढे एक रिक्षा आणि एक गाडी होती. डाव्या बाजूला थोडी जागा दिसल्यावर मी गाडी तिकडे घ्यायचा प्रयत्न केला आणि माझ्या काळजाचा थरकाप उडाला. डाव्या लेनच्या मधल्या मार्किंगवर दोन मोठे दगड रस्त्यामध्ये पडलेले होते. मी कशीतरी गाडी वळवून पुढे आलो. मला आता मागून येणाऱ्या दुचाकी स्वारांची काळजी वाटायला लागली. सुदैवाने त्यांनी व्यवस्थित गाडी काढली व ते पुढे गेले. मला रस्त्यात गाडी थांबवणे शक्‍य नव्हते, मागे मरणाची घाई असलेले भोंगे वाजवतच होते.

डोक्‍यात एकच विचार होता, की त्या दगडांमुळे काहीतरी वेडेवाकडे घडू शकते. साधारणपणे बंद पडलेल्या वाहनाभोवती सूचनावजा दगड किंवा झाडाच्या फांद्या लावतात तसा हा प्रकार वाटला. पण दगडांचा आकार जरा अवाढव्यच होता. एवढे मोठे धोंडे कोण अतिशहाणे रस्त्यात ठेवून गेले होते काय माहीत.

आधीच्या वाहतूक मुरांब्यातून तापून आलेले सर्वच वाहनचालक येथे रस्ता मोठा आणि थोडा रिकामा दिसल्यावर वेग घेतात आणि जर एखाद्याला ते दगड दिसले नाहीत, तर कपाळमोक्ष नक्कीच! त्या वेगात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. खरेतर तेथे आजूबाजूला बस थांब्यावर वगैरे अनेक लोक होते आणि हजारो गाड्याही सतत धावत होत्या. कित्येक जणांनी ते दगड पाहिले होते आणि त्याचा धोका स्वतःपुरता टाळून कडेनी निघून गेले होते. पण, एकही नागरिक दुसऱ्याचा विचार करून होऊ शकणाऱ्या अपघाताला टाळू पाहत नव्हता. माझे काम झाले, मी सुटलो, आता माझ्या मागे काही का होईना, असाच विचार करून पुढे निघून जात होते. उचलेल कोणीतरी अशी सोईस्कर मनोधारणा करून मी त्या गावचाच नाही असे निघून जात होते.

मी माझ्या रस्त्याला वळलो खरा, पण माझ्या डोक्‍यातून ते दोन दगड जात नव्हते. भर रस्त्यात... मध्यभागी... बरे, लहानसहान नव्हते... तर एखाद्या चारचाकीला उडवायला किंवा दुचाकीस्वाराला यमसदनी धाडायला लावण्याइतके मोठे होते. किंबहुना, फुटपाथच्या उंचीपेक्षा मोठेच होते. आंधळ्यालापण दिसतील असेच म्हणाना!

नेमकी मला गाडी लावायला लगेच जागा मिळाली नाही आणि मी जवळजवळ घरीच पोचलो. मग सरळ गाडी घरीच लावली. सामान घरात टाकले, घराला परत कुलूप लावले आणि बूटसुद्धा न काढता तसाच परत उलटा फिरलो. या सगळ्या प्रकारात जवळ जवळ दहा मिनिटे गेली असणार. देवाचा धावा केला, की तेवढ्या वेळात कोणीतरी ते दगड उचलून बाजूला काढावेत. कुठलाही अपघात होऊ देऊ नये. मला स्वतःला अपघात, रक्त, दुखापतीचा फोबिया आहे. त्यामुळे असे काहीही होऊ नये, असा विचार करतच मी परत सेनापती बापट रस्त्यावर पोचलो.

सुदैवाने कोणताही गैरप्रकार घडला नव्हता. पण दुःखाची बाब म्हणजे या जाणत्या पुण्यातल्या एकाही जाणत्या माणसाला ते दगड हलवायची बुद्धी झालेली नव्हती. माझ्याच काळजात चर्र झाले. परत माझ्यासमोर दोन दुचाकीस्वार दगड टाळून पुढे गेले. एका ट्रकला ते दगड न दिसल्यामुळे त्याने दगडांवरून गाडी घातली आणि तोही दणक्‍यात उडाला. पण कसातरी सावरला. पण तोपर्यंत बाजूचे दोन दुचाकीस्वार घाबरले होते. अजून एक कार त्या स्कूटरवाल्यांना वाचवायचे प्रयत्न करून पुढे निघाल्या. पण, त्यापैकी कुणीही थांबले नाही. तशाच अवस्थेत गाडीतून जोरात शिव्या हासडून ट्रकवालाही न थांबता निघून गेला. आता अजून एक दगड रस्त्यात सरकला.

आता मात्र मी पुढे झालो. ट्रॅफिक पोलिसाप्रमाणे हातवारे करत गाड्यांना थांबवत दगडापर्यंत पोचलो. एकट्या माणसाला उचलायला थोडे त्रासदायक होते, त्यामुळे दोन दगड दोन खेपांमध्ये नेणे भाग होते. पहिला दगड उचलून मी बाजूला घेतला. आजूबाजूचे लोक अजूनही बघतच होते, कोणीही मदतीला आले नाही. जणू काही दुसरा दगड उचलायची माझीच जबाबदारी होती. पहिला दगड फुटपाथच्या कडेला ठेवून मी परत फिरलो. मी हाताने वाहने थांबवत परत रस्त्यात जात होतो, तेवढ्यात अजून एक रिक्षावाला आला आणि त्यालाही त्या दगडाचा धोका लक्षात आल्याने त्याने दगडापाशीच गाडी उभी करून तो दगड उचलू लागला. मीसुद्धा दगड उचलून बाजूला घेतोय, हे त्याला माहिती नव्हते. त्याच्या रिक्षाला वळसा घालून जाईपर्यंत त्याने तो दगड उचलून रिक्षात घेतला. मी त्याला विचारले, ‘का घेतलाय? तुम्हाला पाहिजे का?’ ‘छे हो, रस्त्यात अडथळा होत होता, कोणाला तरी वरती पोचवेल म्हणून उचलला.’ मी देवाचे आभार मानले, आपल्यासारखाच विचार करणारा कोणीतरी अजून आहे. मन परत एकदम उचंबळून आले. मी त्याच्या हातातून दगड घेतला म्हटले, ‘मी टाकतो बाजूला’ आणि तोही दगड रस्त्यातून बाजूला टाकला. रिक्षात बसलेले तरुण आणि तरुणी मोठ्या अचंब्याने माझ्याकडे बघत होते. पण आता अपघाताची भीती नव्हती. रस्ता निर्वेध झालेला होता. समोरच्या बस थांब्यावरची माणसे त्याच निर्विकारपणे बघत होती. कदाचित माझ्या आधी दहा-पंधरा मिनिटे किंवा अर्धा ताससुद्धा ते समोरचे भयानक दगड बघत बसले असतील. भीषण पद्धतीने त्या दगडांना चुकवत जाणारी वाहने बघत असतील. पण एकही योद्धा पुढे आला नाही आणि दगड बाजूला सरकवले नाहीत. माझ्या आधी आणि नंतर कदाचित हजारो वाहने तिथून पुढे गेली असतील. अनेकांनी कसरत करत ते दगड टाळून पुढे जाण्याचे कौशल्य दाखवलेही असेल.

असे सगळे विचार करून आपण खूप काही कमावले आहे, अशा आनंदात छाती फुगवून मी परत निघालो. शेजारच्या देवळात जाऊन देवाला माझा पराक्रम सांगितला आणि परत घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा फिरायचा रस्ता थोडी वाकडी वाट केली, की परत तिथूनच जात होता. माझ्या समाजसेवेवर खूष होऊन मी परत आनंदाने त्या रस्त्यावरून चालत निघालो.

मन अतिशय प्रसन्न होते. फिरायलाही उत्साही वाटत होते. उगीचच जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांपेक्षा मी थोडी जास्तच छाती फुगवून चालत होतो. अर्थात कोणाचेही माझ्याकडे फारसे लक्ष नव्हते. पण, मी मात्र माझा माझाच हवेत चालत होतो आणि पुढचे दृश्‍य पाहून माझी मती गुंग झाली. एक माझ्यापेक्षा जास्त वयस्कर माणूस एका कापडात काही जड गोष्ट घालून रस्त्यावर ओढत चालला होता. ती जड गोष्ट कापडातून बाहेर येऊ नये म्हणून तो ते कापड ओढतानासुद्धा अनेक विचित्र हालचाली करत कापडातली वस्तू लपवत चालला होता. कापडसुद्धा असेच रस्त्यावरील जाहिरातीचे कापड फाडून केलेले दिसत होते. मला त्या माणसाच्या हालचाली काहीशा विचित्र वाटल्या. तो ते लोढणे ओढत घेऊन चालला होता. थोडे पुढे आल्यावर त्याच्या हातातले कापड सरकले. आतले सर्वांना दृष्टीस पडले. ते एका कुत्र्याचे कलेवर होते. काहीतरी अपघाताने ते दगावले होते आणि सर्व जखमांनी भरलेले होते. हळूहळू आधी घडलेला प्रकार माझ्या ध्यानात आला. काल मी जे दगड उचललेले होते, त्याचा खुलासाही झाला. मी काल त्या ठिकाणी पोचेपर्यंतच्या घटना... त्या जागी कोण्या एका वाहनाने त्या कुत्र्याला उडविलेले होते आणि ते मेलेले कुत्रे तिथेच पडलेले होते. ते बघून कोण्या एका शहाण्या व्यक्तीने त्या कुत्र्याच्या दोन बाजूला दोन मोठे दगड ठेवले, जेणेकरून अजून कोणीही त्या कुत्र्याच्या अंगावरून वाहने घालू नये. कोणीतरी दुसऱ्या शहाण्याने ते कुत्रे पाहिले आणि त्याला ओढून कडेला फेकून दिले. पण दगड मात्र रस्त्यात तसेच ठेवले. मी त्यातला तिसरा शहाणा, की ते दगड काढले आणि रस्ता निर्वेध केला. पण मी स्वतःच्या कामावर एवढा खूष होतो, की ते कडेला पडलेले कुत्रे मला दिसलेच नाही आणि मी सर्व दुनियेला अक्कलशून्य ठरवून स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण तो सकाळचा गृहस्थ, की ज्याने कसलीही लाज न बाळगता हे सत्कृत्य केलेले होते आणि त्या विचित्र अवस्थेत पडलेल्या शवाची विल्हेवाट लावत होता. नाहीतर कदाचित ते अजूनही कित्येक तास तसेच पडून राहिले असते आणि महापालिकेची माणसे आल्यावर उचलले गेले असते. त्याचा वास पसरला असता. उपसर्ग झाला असता. खरंच बाप माणूस...! शेवटचा अर्धा शहाणा...!!

आता हा काय प्रकार आहे? तो अर्धा शहाणा का? त्याचे कारण कचरा पेटीजवळ हिंडणारे कावळेच सांगतील. कचरापेटीच्या आत काय आहे ते लांबून समजत नव्हते, पण असंख्य घोंघावणारे कावळे आणि त्यांचा कलकलाट, जवळजवळ दुपारपर्यंत सुरू होता. महापालिकेची गाडी येऊन गेल्यावरच तो थांबला. त्या अर्ध्या शहाण्या मनुष्य प्राण्यामुळे त्या दिवशीची कावळ्यांची पूर्ण मेजवानी झाली.     

संबंधित बातम्या