द मून अँड सिक्सपेन्स 

विजय तरवडे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

दर्जेदार पाठ्यपुस्तक, मन लावून शिकवणारे शिक्षक आणि चांगले ग्रंथपाल वाचनसंस्कृती समृद्ध करू शकतात. क्वचित एखाद्या चांगल्या लेखकाला जन्म देऊ शकतात. 

जेम्स बॅरीच्या ‘व्हॉट एव्हरी वुमन नोज’ या नाटकावर अनंत काणेकरांनी लिहिलेला लेख वाचून ते नाटक अकरावीनंतरच्या सुटीत वाचले होते. (टीव्हीवर अनेक महिने सुरू असलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेची संकल्पना सुरुवातीला याच नाटकासारखी वाटली. पण पुढे... असो.) कॉलेजात गेल्यावर जेम्स बॅरीचे ‘द ॲडमिरल क्रायटन’ हे सुंदर नाटक होते. पण त्या वर्षी इंग्रजीच्या प्राध्यापिकाबाई इतक्या रटाळ शैलीत शिकवीत, की आम्ही ते वर्ष आणि त्या नाटकाचा अभ्यास कसाबसा सहन केला. नंतर मात्र ऑर्थर मिलरचे ‘ऑल माय सन्स’ हे नाटक आणि विल्यम सॉमरसेट मॉमची ‘द मून अँड सिक्सपेन्स’ ही कादंबरी आली. प्रा. झिया करीमनी दोन्ही कलाकृती अतिशय मन लावून शिकवल्या. शिकवताना कधी कधी करीम मॅडम कादंबरीतला-नाटकातला एखादा अंश शांतपणे वाचून दाखवीत. त्यांच्या वाचनाची आणि उच्चारणाची शैली नाटकी नव्हती. परिणामकारक होती. आताचे तंत्रज्ञान तेव्हा उपलब्ध आणि स्वस्त असते, तर आम्ही त्यांना विनंती करून अख्खी कादंबरी वाचून घेतली असती आणि ते ऑडिओ बुक जपले असते. 

पॉल गॉगिनच्या चरित्रातील काही घटनांभोवती कथानक गुंफून मॉमने ‘द मून अँड सिक्सपेन्स’ ही कादंबरी सिद्ध केली आहे. खटकेबाज संवाद, अतिशय बांधेसूद आणि कुरकुरीत रचना यामुळे वर्षभर तिचा अभ्यास करताना अजिबात कंटाळा आला नाही. या कादंबरीमुळे मी आणि अनेकजण त्या काळात मॉमच्या प्रेमात पडलो होतो. कॉलेज संपून नोकरी लागल्यावर ब्रिटिश लायब्ररीचे सदस्य होऊन पहिल्या दिवशी मॉमची पुस्तके मागितली. लायब्ररीत वर्तक नावाचे देखणे ग्रंथपाल होते. मॉमचे नाव ऐकून गालात हसले आणि त्यांनी मॉमची पुस्तके सुचवली. 

लायब्ररीत येण्यापूर्वी वर्तक अनेकदा ‘कॅफे गुडलक’मध्ये चहापान आणि धूम्रपान करताना दिसत. त्या वेळी ते मराठीत बोलत. लायब्ररीत गेल्यावर इंग्रजीतच. कधी कधी सकाळी ब्रिटिश ग्रंथालयातले वर्तक भेटत. त्यांच्याबरोबर चहा घेण्याचा आनंद निराळा. कारण प्रत्येक वेळी ते बिल देत! वर्तक स्मोकर होते. सिगारेट ओढताना धुराच्या पडद्याआड त्यांचा गोरा देखणा चेहरा गूढ दिसायचा. मी तेव्हा ब्रिटिश ग्रंथालयातून सतत मॉमची पुस्तके न्यायचो. ते मला सांगायचे, फरगेट मॉम... आणि ऑस्कर वाईल्डच्या अनेक कथा रंगवून सांगायचे. त्यांचा आवाज इतका हळू होता आणि उच्चार साहेबी, की पुढे झुकून कान टवकारून अति हळुवारपणे चित्त एकत्र आणोनिया ऐकावे लागे. त्यांनी बराच ऑस्कर वाईल्ड आम्हाला सुनावला. पुढे खूप वर्षांनी एका दैनिकासाठी वाईल्डचे काही अनुवाद केले, तेव्हा वर्तकांची आनंदमयी आठवण हटकून आलेली आहे. 

‘द मून अँड सिक्सपेन्स’ कादंबरीचे कथानक सांगणार नाही. पण त्यातली काही खटकेबाज वाक्ये देतो. 

 • अप्रासंगिक वर्तन हा विनोदाचा आत्मा आहे. 
 • माझ्यातला एक दोष म्हणजे एखाद्या व्यक्तीमुळे मला हसू येत असेल, तर त्या व्यक्तीचा मी तिरस्कार करू शकत नाही. 
 • प्रेमात पडलेल्या स्त्रिया सतत आत्महत्या करू बघतात, पण त्यात यशस्वी होणार नाही याचीही काळजी घेतात. 
 • आपण सगळेजण जगात एकेकटेच असतो. आपापल्या मनोऱ्यात कोंडलेले, आणि इतरांशी खाणाखुणा करून संवाद साधणारे, खाणाखुणांना सार्वत्रिक मूल्य नसते. 
 • केविलवाणेपणाने आपण इतरांना आपल्या अंतरीच्या गोष्टी सांगायचा प्रयास करतो, पण त्यांच्यापर्यंत त्या पोचत नाहीत. अंततः आपण एकाकी जगत राहतो. एकमेकांच्या शेजारी असतो, पण बरोबर नसतो. आपण त्यांना ओळखत नाही आणि तेही आपल्याला! जणू आपण एखाद्या अशा देशात राहतोय की जिथली भाषा आपल्याला समजत नाही. 
 • सौंदर्य हा शब्द लोक फार ढिसाळपणे वापरतात. पोषाख, कुत्रा, व्याख्यान अशा क्षुद्र गोष्टींना सुंदर म्हणतात. त्यामुळे त्या शब्दाचे वजन हरपते. खरे सौंदर्य त्यांच्या समोर येते तेव्हा ते ओळखू शकत नाहीत. सौंदर्य म्हणजे रस्त्यावरून चालताना कोणाही निष्काळजी व्यक्तीला सापडावा असा शोभेचा दगड नव्हे. जगाच्या विस्कळित पसाऱ्यामधून कलाकार सुसूत्र सौंदर्याची निर्मिती करतो. हे करताना त्याच्या आत्म्याला प्रचंड क्लेश होत असतात. मात्र हे सौंदर्य प्रत्येकासाठी नसते. ते दिसण्यासाठी तुम्हालाही कलाकाराप्रमाणे कष्ट घ्यावे लागतात. सौंदर्य हे त्याने तुमच्यासाठी गायलेले गाणे असते आणि ते तुमच्या अंतःकरणाला ऐकू येण्यासाठी तुमच्यापाशी जाण, संवेदनशीलता आणि कल्पनाशक्ती असावी लागते.  
 • क्रौर्याची पराकाष्ठा म्हणजे जिचे तुमच्यावर प्रेम नाही तिच्या प्रेमात पडणे. तुमच्यासाठी तिच्या मनात दया नसते, सोशिकता नसते, फक्त एक तर्कशून्य चिडचिड असते.  
 • साध्यासुध्या, निष्पाप लोकांचे प्रेम मिळवावे. त्यांचे अज्ञान आपल्या जाणतेपणाहून चांगले असते. मन शांत करूयात. त्यांच्याप्रमाणे आपल्या विश्वाच्या कोपऱ्यात नम्रपणे, नेमस्तपणे जगूया. हेच आयुष्याचे शहाणपण होय. 
 • तिला तीनच गोष्टी प्रिय होत्या - विनोद, वाईनचा पेला आणि देखणा पुरुष. 
 • दुःख माणसाला उदात्त करते हे धादांत खोटे आहे. सुख कधी कधी हे करू शकते. दुःखामुळे मात्र माणसे क्षुद्र आणि खुनशी होतात. 
 • आयुष्य फार छोटे असते - प्रेम आणि कला या दोन्हीचा पाठपुरावा करण्याइतके दीर्घ नसते. 
 •  न्यायनिवाडा करण्यापेक्षा ...... जाणून घेण्यात लेखकाला रस असतो. 
 •  ज्यांना आपले त्यांच्याविषयीचे मत मान्य असते त्यांच्यावर असलेला प्रभाव आपण नकळतपणे जपतो. जे आपल्याला जुमानत नाहीत त्यांचा तिरस्कार करतो. 
 •  रात्र इतकी सुंदर होती, की मनाला शरीराचे बंधन जाणवले नाही. 
 •  माणूस त्याच्या कलाकृतीतून उघडा पडतो. सार्वजनिक जीवनात वावरताना चारचौघांना आवडेल असा चेहरा तो धारण करतो. त्याने नकळत केलेल्या कृतीतून, विभ्रमातून तुम्ही त्याला खऱ्या अर्थाने ओळखू शकता. काही माणसे मुखवटे इतक्या बेमालूमपणे धारण करतात, की मुखवटे व त्यांच्यात अद्वैत निर्माण होते. पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात किंवा चित्रात ती माणसे उघडी पडतात.  
 • निरीक्षक-वाचक चतुर असेल, तर कोणीही स्वतःचे मीपण लपवणारे लेखन करूच शकत नाही. 
 • डांबरी रस्त्यावर रोज जलसिंचन करून तिथे लिलीची फुले उगवण्याची अपेक्षा फक्त संत किंवा कवी बाळगू  शकतात. 
 • कला हे भावनांचे प्रकटीकरण आहे आणि भावनांची भाषा सर्वांना समजते. 
 • ती माझ्यासाठी वाटेल ते करायला राजी होती –  मला एकटे सोडण्याची माझी इच्छा वगळता. 
 • जसे परिणामांपासून कारणांना सुटका मिळणे अशक्यप्राय, तद्वत तिच्यापासून सुटका मिळणे त्याच्यासाठी अशक्यप्राय होते. 
 • मी भूतकाळाचा विचार करीत नाही. मजसाठी चिरंतन-शाश्वत वर्तमानकाळ हाच महत्त्वाचा आहे. 
 • दंतकथा म्हणजे नायकांचा अमरत्वाकडे नेणारा पासपोर्ट. 

  या एका कलाकृतीमुळे वाचलेली आणि आवडलेली मॉमची पुस्तके म्हणजे ‘ऑफ ह्युमन बॉंडेज’ ही आत्मचरित्रपर कादंबरी, ‘द नॅरो कॉर्नर’ (कादंबरी), सर्व कथासंग्रह आणि ‘द समिंग अप.’ 

टीप : मॉमवर त्याच्या पुतण्याने लिहिलेल्या एका पुस्तकात उल्लेख आहे, की सॉमरसेट या नावाने हाक मारलेले त्याला रुचत नसे. विल्यम मॉम असे संबोधन प्रचलित नाही. म्हणून प्रत्येक वेळी मी त्याचा उल्लेख पूर्ण नावाने किंवा नुसता मॉम असा केला आहे.

संबंधित बातम्या