अनंत काणेकर आणि गणूकाका 

विजय तरवडे
सोमवार, 27 जानेवारी 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन.

अनेक लेखक सदरलेखन करताना त्या सदरापुरते एखादे काल्पनिक पात्र निर्माण करतात. सदरातील निवेदक त्या पात्राशी संभाषण करताना दाखवतात, जेणेकरून एखाद्या मुद्द्याच्या दोन बाजू दाखवता याव्यात. विजय तेंडुलकरांच्या ‘रामप्रहर’मध्ये निवेदकाशी हुज्जत घालणारे उजव्या विचारांचे लिमये होते. अरुण टिकेकरांच्या एका सदरात लेले होते. चिं. वि. जोशी यांच्या अनेक कथांमध्ये किचकट प्रश्न दंडुक्याने सोडवणारे गुंड्याभाऊ भेटतात. 

या सर्वांहून जुने आणि कदाचित आद्य पात्र म्हणजे काणेकरांचे गणूकाका. शाळेत असताना आम्हाला काणेकरांचा धडा नव्हता. ते ठाऊक झाले ‘रविवार सकाळ’मधल्या एका सदरामुळे. दर रविवारी ‘टिपलेला उत्कृष्ट उतारा’ या सदरात वाचकांनी पाठवलेला एक उतारा प्रकाशित होई. त्यात अनंत काणेकरांचा एक उतारा आला होता. माणूस मर्त्य असला तरी वंशसातत्यामुळे त्याचा अंश पुढे चालू राहतो. आजचा माणूस हा कालच्या आणि उद्या-परवाच्या भविष्यातल्या सर्व माणसांच्या साखळीला जोडणारा दुवा आहे. त्या अर्थाने प्रत्येक माणूस अमरच आहे. मानवता अमर आहे... असा काहीसा त्याचा आशय होता. 

तो उतारा वाचून काणेकरांविषयी कुतूहल निर्माण झाले. उन्हाळ्याच्या सुटीत पुणे नगर वाचन मंदिरातून त्यांचे ‘विजेची वेल’ हे पुस्तक आणून वाचले. त्यांचा ‘पंखा’ झालो. पण पुढे त्यांची इतर पुस्तके – कथा, कविता थोडीशी चाळून बाजूला ठेवली गेली. 

‘विजेची वेल’ हे पुस्तक या वर्षी नव्याने वाचले आणि मजा आली. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५६ ची दिसते. याचा अर्थ हे लेखन ४० किंवा ५० च्या दशकात झाले असणार. मात्र संपूर्ण पुस्तकातली भाषा अतिशय साधी आणि ओघवती आहे. तिला अलंकारांचा, बोजड संस्कृतप्रचुर शब्दांचा सोस नाही. सोपी इतकी, की अगदी आज सोशल मीडियावर जितक्या सोप्या भाषेत लिहिले जात असेल तितकी सोपी (मात्र व्याकरणशुद्ध) भाषा आहे. एखादा तरुण वाचकदेखील न कंटाळता एका बैठकीत हे चोवीस लेख वाचू शकेल. ज्येष्ठ नागरिक (आधी वाचलेले नसल्यास) नोस्टाल्जिक न होता वाचू शकेल. ज्याला वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकात सदरलेखन करायचे आहे त्यानेही काणेकरांचे निदान हे पुस्तक अवश्य वाचावे. 

‘दुरून आकाश साजरे’ किंवा ‘आकाशातले तारे आणि मी’ या लेखात लेखकाला वाटणारी उंचीची भीती आणि दोन अनुभव आहेत. विमानात बसल्यावर वरून खाली बघताना पृथ्वीपासून तुटल्याची भावना-भीती आणि जहाजातून प्रवास करताना रात्री एकटाच डेकवर पहुडल्यावर आकाशातले तारे बघून वाटलेली भीती आपल्याला जाणवेल इतकी प्रभावीपणे वर्णिली आहे. एका लेखात शिक्षकांच्या काढलेल्या खोड्या आहेत. पुस्तकातला एकच लेख खऱ्या अर्थाने जुन्या काळात नेतो. तो म्हणजे त्या वेळच्या काही जाहिरातींचे उल्लेख असलेला. एका औषधाच्या जाहिरातीतील भाषा मजेदार आहे – ‘आतड्यातील श्लेष्मल त्वचेला इजा न करता कोठ्यातील पित्तरसाची उठावणी करा!’ कोल्ड क्रीमच्या जाहिरातीत शेक्सपिअरच्या नाटकातील रोमियोने ज्युलिएटला उद्देशून केलेला स्तुतिपर संवाद जसाच्या तसा वापरून शेवटी म्हटले आहे की – ‘पण तू अमुक कंपनीची कोल्ड क्रीम वापरशील तर अधिक सुंदर दिसशील.’ 

‘विजेची वेल’मध्ये साध्या गप्पा मारताना किंवा सामाजिक प्रश्नांवर चर्चा करताना गणूकाका ठायीठायी भेटतात. काणेकर छोट्या मुलाच्या भूमिकेत असताना भेटतात, काणेकर मोठे झाल्यावर भेटतात. गणूकाका ‘जैसे थे’ वादी आहेत, श्रद्धाळू आहेत, भाबडे आहेत. काणेकर छोट्या मुलाच्या भूमिकेत असताना त्यांना विचारतात, आपण बोलताना पणबीण, बाप-बीप असं बोलतो. हे बीण, बीप कुठून आले? त्यावर गणूकाका उत्तरतात, विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली होती. त्या सृष्टीतले शब्द इथे राहून गेलेत. गणूकाका जुन्या मतांचे आहेत, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीशिक्षण त्यांना मान्य नाही. स्त्रियांनी घराच्या बाहेरच पडू नये, त्यांना पादत्राणे विकत घ्यायची गरज नाही. बसमध्ये प्रवास करताना सुदृढ स्त्री उभी असेल तर तिला मुद्दाम उठून आपली सीट द्यायची गरज नाही, वगैरे मते ठामपणे मांडतात. काणेकर चिडत नाहीत. हसतात. सौम्य प्रतिवाद करतात आणि आपण वाचक काणेकरांशी एकरूप झालेलो असल्याने आपणही हसतो आणि सोडून देतो! 

या गणूकाकांसारखीच मते बाळगणारे अंतू बर्वा, हरितात्या पुलंच्या लेखनात भेटतात. पण पुलंची शैलीच निराळी. विजय तेंडुलकरांच्या ‘रामप्रहर’मध्ये मात्र हुबेहूब गणूकाका आठवावेत असे लिमये भेटतात. लिमयेदेखील जुन्या विचारांचे. नवे विचार त्यांना मानवत नाहीत. विविध तत्कालीन सामाजिक प्रश्नावर लिमये आणि निवेदकाचे सौम्य खटके उडतात, वाद होतात, पण संवाद तुटत नाही. ‘रामप्रहर’ सदराचा समारोप करताना तेंडुलकरांनी शेवटचा संपूर्ण लेख लिमयांना बहाल केला आहे. त्यात ते लिमयांना समजावतात, की उद्यापासून तुम्ही अस्तित्वातच नसाल. उद्यापासून हे सदर बंद होणार आहे. लिमयांना हे काही समजत नाही. ते भावुक होतात. तेंडुलकरांचा निवेदकदेखील चक्क भावुक होतो. शेवटच्या परिच्छेदात तो म्हणतो, ‘सगळे कल्पनेत घडले. आता ते संपणार. तुम्ही संपणार. वहिनीही तुमच्याबरोबर संपणार. मलाही दुःख होते. पण त्याला काय इलाज? व्यक्तिरेखांचे माणसांसारखे असते. त्यांचे भवितव्य त्यांच्या हाती नसते. त्या लेखक नावाच्या नियतीहातची कळसूत्री बाहुली असतात आणि लेखक नियतीनावाच्या लेखकाहातची कळसूत्री बाहुली असतो. लेखकदेखील संपतोच आणि क्रमिक पुस्तकातले धडे आणि एखादा खड्डे पडलेला आडरस्ता होऊन मागे उरतो. मी उठलो. लिमयांकडे पाहण्याचा मला धीर झाला नाही. तसाच बाहेर पडलो. उद्यापासून लिमये असणार नाहीत. लॉंग लिव्ह लिमये.’ 

संपूर्ण सदरातला हा एक लेख अतिशय हृद्य आणि मुळातून वाचण्यासारखा आहे. 

‘लॉंग लिव्ह लिमये’च्या चालीवर गणूकाका, अंतू बर्वा, हरितात्या आणि पुढे प्रकटणाऱ्या व्यक्तिरेखांना हीच शुभेच्छा द्यावीशी वाटते. या व्यक्तिरेखा स्वयंभू नाहीत. प्रचलित मतांपेक्षा वेगळी, आधुनिक, पुढे जाणारी मते मांडू बघणाऱ्या लेखकांना मनोमन वाटत असते, की विरोधी गटात एखादा पोक्त गणूकाका, अंतू बर्वा, हरितात्या असावा, समवयीन लिमये असावा. आपण त्याच्याशी वाद घालावेत. थोडे जिंकावे, थोडे हरावे. पण त्याच्याशी असलेले प्रेमाचे नाते, संवाद तुटू देऊ नये.

संबंधित बातम्या