मॉमच्या २ कादंबऱ्या 

विजय तरवडे
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

मॉमच्या ‘द मून अँड सिक्स पेन्स’च्या अभ्यासानंतर निव्वळ आनंदासाठी त्याचे चारही कथासंग्रह आणि काही कादंबऱ्या वाचल्या. लेखकाची भाषा साधी, गेय आणि प्रवाही असावी असा मॉमने नवलेखकांना सल्ला दिला असला, तरी आज शंभर वर्षांनी वाचताना त्याचे लेखन संथ आणि जड वाटते. 

हाती निवांतपण असेल आणि खुसखुशीत वाचनाचा आनंद हवा असेल तर मॉमच्या कथांचे चारपैकी तीन खंड आवर्जून वाचावेत. काही कथा - लघुकादंबऱ्या म्हणता येतील अशा आकाराच्या आहेत. पण कंटाळा येत नाही. चौथ्या खंडातील अशेंडन नावाच्या नायकाभोवती गुंफलेल्या साहसकथा मी सुचवणार नाही. 

‘ऑफ ह्युमन बॉन्डेज’ ही मॉमची आत्मचरित्रसदृश बांधेसूद कादंबरी. कोणाचेच आयुष्य एका सुसूत्र कथानकासारखे गोळीबंद नसते. स्वतःबद्दल लिहिताना लेखक एक काल्पनिक फ्रेम घेतात. आयुष्यातले सुंदर क्षण फ्रेममध्ये आणि उरलेले फ्रेमबाहेर टाकून आत्मचरित्र सिद्ध करतात. कधी कधी फ्रेममध्ये ठेवण्यासाठी काही काल्पनिक सुंदर क्षण निर्माणदेखील करतात. कादंबरीचा अनाथ नायक फिलीप ‘क्लबफूट’ नावाच्या रोगाने हैराण आहे. त्याचे चुलते चर्चमध्ये व्हिकार आहेत. त्यांच्या संस्कारातून तो रात्री देवाची प्रार्थना करतो. त्याच्या बालमनाला वाटते, की प्रार्थनेमुळे डोंगर हलवता येतात तर माझे पायदेखील बरे होतील. पण तसे होत नाही. या प्रसंगानंतर तो नास्तिक होत जातो. मेडिकल कॉलेजमध्ये एका डिसेक्शनच्या प्रसंगी त्याला ‘नॉर्मल’ ही जगातली दुर्मिळ चीज असल्याचा साक्षात्कार होतो. कॉलेजजवळच्या कॅंटीनमधील वेट्रेस मिल्ड्रेड त्याच्या प्रेमाला नकार देते. डॉक्टरकीचा नाद सोडून तो फ्रान्समध्ये चित्रकला शिकायला जातो आणि अयशस्वी होतो. बोअर युद्धात भाग घेतो. शेवटी एका वरिष्ठ डॉक्टरच्या हाताखाली नोकरी करताना त्याच्या मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्न करतो आणि त्याला साक्षात्कार होतो की माणसाने जन्माला येणे, शिकणे, अर्थार्जनाला लागणे, लग्न, संसार, मुलेबाळे आणि शेवटी शांतपणे मरणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता! 

ही कादंबरी तत्कालीन प्रथेनुसार अगडबंब होती. समीक्षकांनी तिची ‘सामान्य’ म्हणून संभावना केली. पण उत्तरकाळात ती अभिजात म्हणून गणली गेली! वाचकांना कंटाळा येऊ नये म्हणून मॉमने स्वतःच तिची संक्षिप्त आवृत्ती सिद्ध केली. कादंबरीवर चार वेळा चित्रपट निघाले आणि यशस्वी झाले. 

कादंबरीतली दोन अवतरणे लेखकाच्या स्वभावावर भाष्य करतात. प्रतिभा नसलेल्या माणसाला कलेची आराधना करावी लागणे यासारखी क्रूर गोष्ट नाही. पैसा हे माणसाचे सहावे इंद्रिय आहे आणि पैशाशिवाय इतर पाच इंद्रियांना सुखोपभोग अशक्य आहे. 

‘द नॅरो कॉर्नर’ ही आणखी एक यशस्वी कादंबरी. डॉक्टरीचा परवाना गमावलेला ब्रिटिश नेत्रतज्ज्ञ सॉन्डर्स एका डच बेटावर व्यवसाय करतो. धनाढ्य चिनी मित्राच्या बेटावर जाऊन त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्यावर परतीच्या प्रवासात घडलेले नाट्यमय प्रसंग हा कादंबरीचा गाभा. कथानकात अनेक कलाटण्या आहेत. कादंबरीत दोन रोचक उपकथानके आहेत. परतीच्या प्रवासात एका बेटावर त्यांना दोन गोरी कुटुंबे भेटतात. त्यातल्या एरिक आणि लुईसेचे लग्न ठरले आहे. दुर्दैवाने लुईसेला फ्रेडची भुरळ पडते. फ्रेड आणि लुईसेला एरिक एकांतात एकत्र बघतो आणि आत्महत्या करतो. कॅप्टन निकल्स आणि फ्रेड बेट सोडून जातात. डॉक्टर दुसऱ्या बोटीची वाट बघत असताना त्यांना लुईसे भेटते आणि खुलासा करते - एरिक आणि ती लहानपणापासून एकत्र वाढलेले. एरिकला तिच्या आईचा लळा. आई मरताना म्हणालेली की मोठेपणी तू लुईसेशी लग्न कर. तो उत्तरलेला, की मोठेपणी ती हुबेहूब तुझ्यासारखी दिसली तरच मी लग्न करीन वगैरे. पण लुईसे आईसारखी दिसत असली तरी स्वभाव निराळा असतो. आईच्या वचनापोटी आणि बेटावर दुसरा पर्याय नसल्याने ती अनिच्छेने लग्नाला राजी झालेली असते. एरिक माझ्यावर प्रेम करीत नव्हता, तो माझ्यात माझ्या आईला बघत होता आणि मी माझी आई नव्हते, अशा आशयाचे उद्‌्‌गार ती काढते. 

या दोन्ही कादंबऱ्यांची संपूर्ण कथानके मुद्दाम सांगितलेली नाहीत. आंतरजालावर ती उपलब्ध आहेत. नवोदित वाचकाला इंग्रजी कथा-कादंबऱ्यांचे वाचन करायचे असेल तर विकिपीडियावर पुस्तकांचे सारांश वाचून आपल्याला आवडेलसे पुस्तक निवडता येते. 

* * * 

शेक्सपिअरचे जुने कठीण इंग्रजी वाचनाच्या आड येऊ नये म्हणून दोन अद्‌्‌भुत सोयी आहेत. चार्ल्स लँब आणि मेरी लँब यांनी शेक्सपिअरच्या वीसेक नाटकांची कथानके सोप्या इंग्रजीत लिहिली आहेत. शेक्सपिअरचे मूळ नाटक वाचायला घेताना शब्दकोश घेऊन बसायची गरज नाही. आंतरजालावर ‘नो फिअर शेक्सपिअर’ नावाचे संस्थळ आहे. इथे समग्र शेक्सपिअर वेगळ्या आकारात उपलब्ध आहे. संगणकाच्या पडद्यावर दोन उभे रकाने दिसतात. डाव्या रकान्यात मूळ संहिता आणि उजव्या रकान्यातल्या त्याच ओळीत मूळ ओळीचे सोप्या इंग्रजीत रूपांतर दिसते. तस्मात, शेक्सपिअर वाचताना त्याच्या मूळ इंग्रजीचादेखील आनंद मिळतो आणि अवघड शब्दांचे कुंपण त्या आनंदाच्या आड येत नाही!

पूर्वी रम्यकथा प्रकाशन या संस्थेने ह. ना. आपट्यांच्या कादंबऱ्यांच्या संक्षिप्त आवृत्त्या प्रकाशित केल्या होत्या. पण आज त्या बाजारात उपलब्ध नाहीत. एक संस्थळ बनवून तेथे जुन्या कलाकृतींचे सारांश उपलब्ध केले तर तरुण वाचक जुन्या कलाकृतींकडे जोमाने वळतील.

संबंधित बातम्या