अमृतवेल-न सुटलेल्या निरगाठी 

विजय तरवडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

वि. स. खांडेकरांची ‘दोन ढग’ ही रूपककथा पाठ्यपुस्तकात वाचली होती. ‘अमृतवेल’ कादंबरी पहिल्यांदा नकळत्या वयात - आठवीत असताना - वाचली होती. या एका कादंबरीसाठी खांडेकर तत्कालीन कथाकारांपेक्षा काकणभर अधिक आवडत राहिले आहेत. कारण इतर कथा-कादंबरीकारांच्या नायक-नायिकेच्या नात्यात पडलेली सुरगाठ शेवटच्या प्रकरणात लीलया सुटून शेवट गोड होतो. खांडेकरांच्या या कादंबरीत नायक-नायिका-इतर पात्रांच्या नात्यातली निरगाठ सुटायला कठीणच आहे. ‘ययाति’मध्ये कच एखाद्या बॉलिवूडपटातल्या सहनायकाप्रमाणे येऊन सर्व गुंते सोडवतो. पण ‘अमृतवेल’मध्ये तसे होत नाही. ती आजदेखील आजची कादंबरी आहे. त्यातील नायक, नायिका, इतर पात्रे अटळ शोकांताकडे फरफटत जातात. 

नंदा प्रगल्भ आणि कणखर आहे. ती दुःखांचे आघात सहन करूनही अचल राहते. तिची समंजस प्रेमळ प्रतिमा वाचकाला जवळची, हवीहवीशी वाटते. ज्याच्याशी लग्न ठरलेले आहे तो शेखर अपघातात निधन पावल्यानंतर ती दुःख विसरण्यासाठी स्वतःला संस्कृत-आंग्ल कलाकृतींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करते. जिवलग मैत्रिणीने कॉलेजात असताना गायलेल्या लता मंगेशकरांच्या ‘ओ सजना, बरखा बहार आयी’ गाण्याचे सूर तिला हळवे करतात आणि दिलासादेखील देतात. दादांना नंदाच्या खोलीत हॅम्लेटची प्रत, सावित्रीचे आख्यान आणि रोजनिशीत एलिझाबेथ ब्राउनिंगची प्रेमकविता आढळते. 

ही १९६७ मधली कादंबरी अतिशय धीट आहे. काळाची चौकट ओलांडून पुढे पाऊल टाकू बघते. नंदाचे प्राध्यापक दासबाबू तिला समजावतात, की सावित्री आणि हॅम्लेटची आई या दोघी खऱ्या आहेत. एका चर्चेच्या ओघात म्हणतात, “वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती. पण तिला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हा तिची अमृतवेल होते.” ‘ययाति’कार किंवा ‘सुखाचा शोध’कार खांडेकर असे अनेकदा त्यांच्या पात्रांच्या तोंडून बोलतात! 

नवऱ्याशी बिनसलेल्या वसुंधरेला सोबत म्हणून नंदा तिच्याकडे राहायला जाते. तिची मुलगी मधुरा आजारी आहे. पती देवदत्त मद्यपी, शिकारी आणि कविमनाचा आहे. अतिशय मनस्वी आहे. स्वतःच्या दिवंगत आईबद्दल नको ते समजल्यामुळे हॅम्लेटप्रमाणेच आई या संकल्पनेपासूनच पूर्ण दुरावला आहे. नंदा दोघांतला पूल व्हायचा प्रयत्न करताना नकळत गुरफटत जाते. गुंता अधिक वाढतो. पहिल्या भेटीत देवदत्त तिला नंदाताई संबोधतो. पण त्यांचे सूर मित्र-मैत्रिणींप्रमाणे जुळत जातात. देवदत्तला हॅम्लेटची कथा, हेमिंग्वेची मनस्वी वृत्ती आणि बेधडक आत्महत्या, विवेकानंद यांच्याविषयी अपार आकर्षण आहे. पण मित्र म्हणून जवळ यायला दोघांना वाव नाही. दोघांमध्ये मैत्री व्यक्त करण्याचे अगदी मोजके क्षण येऊन जातात. दोघे जवळ येऊ लागतात तेव्हा वसुंधरेच्या मनात भलते संशय येऊ लागतात. ज्या काळात मराठी साहित्यात समवयस्क तरुण-तरुणीत प्रियकर-प्रेयसी किंवा मानलेले भाऊ-बहीण असलीच नाती जास्त करून रंगवली जात, त्या काळात खांडेकरांनी ही मैत्री कुठेही अतिशयोक्ती न करता रंगवली आहे. 

कादंबरीत अनेकदा दादा आणि नंदा, देवदत्त आणि नंदा एकमेकांशी समोरासमोर न बोलता पत्र रूपाने संवाद साधतात. एका प्रसंगी देवदत्तने लिहिलेले एक स्वैर चिंतन नंदा वाचते. उत्तररामचरित वाचून देवदत्त म्हणतोय, ‘सीता रावणाच्या कैदेत असताना यज्ञाच्या वेळी वशिष्ठ ऋषी सीतेची सुवर्ण मूर्ती करून घेतात. ती पाहून रामाला काय वाटलं असेल?’ 

एका चिंतनात ‘वसू माझ्या जीवनात येण्याआधी नंदा का आली नाही?’ असे देवदत्तने लिहिलेले वाक्य नंदाच्या वाचनात येते. नंदासाठी तो मद्यपान सोडतो. पण पुन्हा सुरू करतो तेव्हा नंदाची माफी मागतो. देवदत्त आणि नंदाची मैत्री, सलगी वसुंधराला सहन होत नाही. ती नंदाची हकालपट्टी करते. रागाच्या भरात वसुंधरा देवदत्तने पाळलेल्या हरणीला विष पाजून ठार करते. तो सूड घेण्यासाठी तिच्या अंगावर धावून जातो. बाकीचे लोक तिला वाचवतात. पण नंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करते. रुग्णालयात दाखल होते. भेटायला आलेल्या नंदाला हाकलून लावते. 

देवदत्तचा निरोप घेताना तो तिला विचारतो, ‘तुझं माझ्यावर प्रेम आहे?’ ती होकार देताना पुढे म्हणते, ‘स्त्री-पुरुषांच्या शुद्ध मैत्रीची कल्पना ज्यांना करता येत नाही अशा समाजाच्या समाधानासाठी मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून जाऊ? ते शक्य नाही.’ पण पुढे नंदा लगेच म्हणते, ‘मी माझ्या वाटेने पुढे जाईन. कुणाच्या प्रेमात पडले तर त्याच्याशी लग्न करीन... मुलगी झाली तर तिचं नाव मधुरा ठेवीन. एखाद्या भाऊबिजेला तुम्हाला आग्रहानं बोलावीन. आणि तुमच्यापाशी अशा ओवाळणीचा हट्ट धरीन...’  

रात्री देवदत्त अज्ञात स्थळी निघून जातो. सकाळी नंदा त्याचे निरोपाचे पत्र घेऊन घरी परतायला निघते. वसुंधरा, देवदत्त, मधुरा... कोणाचेच गुंते सुटलेले नाहीत. सगळ्या निरगाठी तशाच आहेत. 
* * *
खांडेकरांनी नंदाला पंख दिले आणि ऐन भरारी घेताना असे अडवले. शुद्ध प्रेमाची आणि मैत्रीची भावना बोलून दाखवतानाच ती देवदत्तला घाईघाईने भाऊबिजेचे आमंत्रण देऊन ठेवते. त्या काळाची ती गरज असू शकते. पण तरी अमृतवेल ही माझ्या अतिशय आवडत्या कादंबऱ्यांपैकी एक आहे. नंदामध्ये गौरी देशपांडे आणि आशा बगे यांच्या नायिकांच्या गडद छटा जाणवतात, म्हणून असेल कदाचित.  

संबंधित बातम्या