काव्यगत न्याय!

डॉ. सदानंद मोरे
गुरुवार, 22 मार्च 2018

महाराष्ट्राची लोकयात्रा  

महाराष्ट्राच्या भावी स्थितिगतीला आकार देणारे दशक म्हणूनच १९२१ - १९३० या कालखंडाकडे पाहावे लागते. या दशकात सामाजिक, धार्मिक, राजकीय, वर्गीय, जाती अशा सर्व प्रकारचे अंतर्विरोध उफाळून आले. त्यात भर पडली ती दशकाच्या अखेरीस आलेल्या आर्थिक मंदीच्या सावटाची! राजकीय क्षेत्रापुरते बोलायचे झाल्यास हा काळ महात्मा गांधींच्या नेतृत्वाच्या स्थापनेचा व जडणघडणीचा ठरतो. गांधींना शह देऊ शकेल असे नेतृत्व काँग्रेस पक्षात नव्हतेच. मुस्लिम लीगमध्ये जिना आणि अली बंधूंचे वर्चस्व असले, तरी त्यांच्यात गांधींना आव्हान देण्याचे सामर्थ्य नव्हते. त्यासाठी जीनांना शेवटी-शेवटी धर्माचे कार्ड वापरावे लागले. हिंदू महासभा अद्याप राजकीय पक्ष झाली नव्हती. सभेचे लोक काँग्रेसमधील एक दबावगट म्हणून वावरून काँग्रेस मुसलमानांना विवक्षित मर्यादेबाहेर जाऊन अधिक सवलती देणार नाही, याची खबरदारी घेत होता.

पूर्वी काँग्रेसच्या अंतर्गत जहाल आणि मवाळ म्हणजेच टिळकपक्षीय आणि गोखलेपक्षीय या भेदाला आता काही अर्थ उरला नव्हता. जहाल आपला जहालपणा जणू हरवून बसले असून अहिंसक मार्गाने आंदोलन करणारे गांधीच जहाल भासू लागले होते. मवाळ किंवा नेमस्त स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत होते (जसे रॅं. र. पु. परांजपे) पण त्यांचा प्रभाव फारसा उरला नव्हताच. ब्राह्मणेतर चळवळीचे मराठे, मराठेतर व अस्पृश्‍य असे तिरपागडे झाले होते आणि मुख्य म्हणजे कम्युनिस्टांचा उदय झाला होता. अर्थात या पक्षाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यास सरकारची तयारी नव्हती आणि कम्युनिस्टांचा तरी निवडणुकांवर कोठे विश्‍वास होता?

माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांमुळे महायुद्धोत्तर काळात राजकारणात रंग भरू लागले असले तरी त्याचबरोबर सामाजिक ध्रुवीकरण होऊ लागले हेही खरेच. विठ्ठल रामजी शिंद्यांसारखा एखादा अपवाद सोडला, तर वर्गीय म्हणता येईल असे राजकारण करायला कोणी तयार नव्हते. काँग्रेसला तर वर्गसमन्वयाचेच राजकारण करायचे होते. इतर मंडळी जातींचे अधिष्ठान अधिक बळकट बनवीत होती.

माँटेग्यू-चेम्सफर्डप्रणित राजकीय सुधारणांच्यामुळे एकीकडे जातिभेदांना राजकीय आयाम प्राप्त होण्यास हातभार लागला. पण त्यांचीच आनुषंगिक निष्पत्ती म्हणजे पत्रकारितेचा विकास झाला. जोतिराव फुले यांच्या काळात शूद्रातिशूद्रांची बाजू मांडणारे वृत्तपत्रच नव्हते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेतून फुले आणि सत्यशोधक समाज यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र काढण्याच्या कृष्णराव भालेकरांच्या कल्पनेला स्वतः फुले यांनीच मोडता घातला. (अर्थात तरीही कृष्णरावांनी स्वबळावर ‘दीनबंधू’ काढला व त्यातून चिपळूणकरांचा प्रतिवाद केला, हा भाग वेगळा. एरवी सत्यशोधकांची बाजू मांडण्याचे काम ‘ज्ञानोदय’सारखी ख्रिस्ती पत्रे करीत असत.) त्यामुळे भालेकरांना ब्राह्मणेतर पत्रकारितेचे जनक म्हणायला हरकत नाही.

ब्राह्मणेतर चळवळीच्या अंतर्गत वावरणाऱ्यांमध्ये बहुसंख्याकांचा गट म्हणजे मराठ्यांचा! विशेष म्हणजे इ.स. १९१०-११ च्या सुमारास मराठ्यांचे म्हणता येईल असे वृत्तपत्रच नव्हते व त्यामुळे ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांनी मराठ्यांवर उपहासगर्भ टीकाही केली होती.

चळवळीची ही बाजू लंगडी असल्याचे लक्षात आल्यावर स्वतः शाहू छत्रपतींनी ब्राह्मणेतर पत्रांना उत्तेजन द्यायचे ठरवले. तेथे ‘तरुण मराठा’ हे पत्र निघाले. तथापि त्याला पात्र असा संपादकच मिळेना. तेव्हा मुंबईहून ज. र. आजगावकर या (गौडसारस्वत) ब्राह्मण लेखकाला आयात करावे लागले. (हेच आजगावकर पुढे संतचरित्रकार म्हणून गाजले व त्यांना ‘महाराष्ट्र भाषाभूषण’ अशी उपाधीही प्राप्त झाली) आजगावकरांनी आपले - म्हणजे ब्राह्मणांवर टीका करण्याचे काम आपल्याकडून चोख पार पाडले असेच म्हणावे लागेल. पण तेवढ्याने संबंधितांचे समाधान होईना, आजगावकरांनी राजीनामा दिला.

दरम्यानच्या काळात छत्रपतींचे लक्ष दिनकर शंकर जवळकर या उदयोन्मुख तरुणाकडे गेले. ‘तरुण मराठा’ची धुरा दिनकररावांकडे सोपवण्यात आली. त्यांनी हे काम अपेक्षेपेक्षा अधिक करून दाखवले; इतके, की त्यांच्याच जहाल भाषेमुळे खुद्द महाराजच अडचणीत येतात की काय असे वाटू लागले. परिणामतः जवळकरांना संस्थानची हद्द सोडून बाहेर जावे लागले. यथावकाश त्यांचे पुण्यात आगमन झाले.

पुणे तेव्हा टिळक पक्षियांचा बालेकिल्ला होता. टिळकांचे नेतृत्व भारतीय पातळीवर गेले होते व त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाऊ लागली होती. या पुण्यात ब्राह्मणेतर चळवळीचा शिरकाव व्हावा अशी महाराजांची इच्छा होतीच. माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांमुळे ती फलद्रूप झाली. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्यातील शिवकालीन ऐतिहासिक घराण्यातील बाबूराव आणि केशवराव हे बंधू ब्राह्मणेतर चळवळीत प्रवेश करते झाले. लवकरच त्यांचे ‘जेधे मॅन्शन’ हे निवासस्थान पुण्यातीलच काय, परंतु महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचा बालेकिल्ला बनले. एकीकडे टिळकांचा गायकवाड वाडा व दुसरीकडे जेधे मॅन्शन अशी दुरंगी लढत पाहायला मिळाली. तिकडे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची भारत सेवक समाजाची वास्तूही उभी राहिली. परंतु तेथे वावरणाऱ्या मंडळींचे एकूणच राजकारण नेमस्त असल्यामुळे जहाल टिळकपक्षियांना आव्हान देण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. जेथे मॅन्शनमधील ब्राह्मणेतर मात्र तोडीस तोड ठरले.

आधुनिक काळात कोणत्याही चळवळीला पत्रकारितेचे पाठबळ लागतेच. पुण्यातील ब्राह्मणेतर चळवळीला वा. रा. कोठारी यांचे ‘जागरूक’ आणि नंतर केशवराव ठाकरे यांचे ‘प्रबोधन’ ही पत्रे पुढे आली. श्रीपतराव शिंदे यांनी करवीर नगरीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची नोकरी सोडून ‘विजयी मराठा’ हे पत्र सुरू केले.

शाहू महाराजांच्या दरबारातील अण्णासाहेब लठ्ठे यांचे वा. रा. कोठारी यांच्याशी विशेष सख्य होते. दोघेही जैन समाजातील असून जैन मंडळी ब्राह्मणेतर चळवळीत सामील झाली होती. लठ्ठे व कोठारी यांनी ‘डेक्कन रयत सोसायटी’ची स्थापना करून ‘डेक्कन रयत’ हे इंग्रजी पत्रही चालवले. वालचंद रामचंद कोठारी नवपदवीधर तरुण असून त्यांनी गीतारहस्यावर टीका करीत खुद्द टिळकांनाच आव्हान दिले. त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

समग्र ब्राह्मणेतर पत्रकारितेची चर्चा करण्याचे हे स्थळ नाही पण तरीही या संदर्भात बडोद्याचे ‘जागृती’कार भगवंतराव पाळेकर आणि बेळगावचे ‘राष्ट्रवीर’कर्ते श्‍यामराव देसाई यांचा उल्लेख करायला हवा.

जवळकर हे या सर्व पत्रकारांमध्ये उठून दिसणारे ते त्यांच्या अतिजहाल भाषेमुळे. तसेच ते कृतिशीलही होते. शिवाय आयुष्यातील स्थित्यंतरे देशातील बदलत्या राजकारणाची प्रतिबिंब दाखवणारी आहेत, हा मुद्दा वेगळाच.

कोल्हापूर सोडून पुण्यात आल्यावर जवळकर काही काळ टिळकपक्षातील ब्राह्मणेतर नेते नारायणराव गुंजाळ यांच्या गटात वावरले, पण तेथे स्थिरावले मात्र नाहीत. केशवराव जेथे यांची गाठ पडल्यावर जेधे मॅन्शनमधील शिलेदारांत त्यांची गणना होऊ लागली. केशवरावांबरोबर त्याची एवढी गट्टी झाली, की ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे जेधे - जवळकर हा द्वंद्व समास असे समीकरणच महाराष्ट्रात रूढ झाले.

टिळकांच्या निधनानंतर टिळकपक्षात त्यांच्या तोडीचा कोणी प्रभावी नेता न राहिल्यामुळे जेधे - जवळकरांना व एकूण ब्राह्मणेतर चळवळीला पुण्यात प्रस्थापित होणे अवघड गेले नाही. पण या प्रक्रियेची सुरवात टिळकांच्या हयातीतच झाली होती. समस्त पुणेकरांच्या वतीने टिळकांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मानपत्र द्यावे, अशी कल्पना टिळकपक्षियांनी पुढे आणली. ही गोष्ट टिळकांचे कट्टर विरोधक असलेल्या प्राचार्य रॅं. र. पु. परांजपे आणि त्यांचे फर्गसन कॉलेजमधील नेमस्त सहकारी यांना मानवणारी नव्हतीच. दुसरे असे, की याच दरम्यान वा. रा. कोठारी यांनी पुढाकार घेऊन नेमस्त आणि ब्राह्मणेतर या आवळ्या भोपळ्यांची मोट बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे एव्हाना टिळक आणि ॲनी बेझंट यांच्या थिऑसॉफी पंथाचे अनुयायीही या आघाडीत येऊ पाहात होते. या मंडळींनी टिळकांच्या जुन्नर, सोलापूर येथील परिषदा व सभा उधळून लावायचे प्रयत्न केले होते.

या टिळकविरोधकांनी टिळकांची मानपत्रसभा उधळून लावायचा निर्णय घेतला व तसे जाहीरही केले. साहजिकच टिळकपक्षियांनाही योग्य ती दक्षता घेणे भाग पडले.

नेमस्तांनी असा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्ष सभेला मात्र यायचे त्यांनी टाळले. या अंतर्गत राजकारणाची व डावपेचांची कल्पना नसल्यामुळे कवी हृदयाचा संवेदनशील तरुण प्राध्यापक माधव पटवर्धन (ऊर्फ माधव ज्युलियन) सभेस उपस्थित राहिले. मानपत्राच्या वाचनानंतर त्याला कोणाचा विरोध आहे का? अशी जाहीर विचारणा व्यासपीठावरून झाल्यावर विरोध दर्शविणारा एकच हात वर झाला तो माधवरावांचा होता.

या मानपत्र प्रकरणातील आणखी एक उपकथानक सांगणे आवश्‍यक आहे. विठ्ठल रामजी शिंदे हे टिळकांच्या स्वराज्यविषयक राजकीय भूमिकेत सक्रिय पाठिंबा देत होते. त्यासाठी त्यांनी सभा-परिषदाही आयोजित केल्या होत्या. त्यामुळे ब्राह्मणेतर मंडळी त्यांच्यावर रुष्ट होती. मानपत्र देणारी मंडळी शिंद्यांकडे जाऊन त्यांना विनंती करू लागली तेव्हा शिंद्यांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. त्यांनी टिळकांच्या सामाजिक सुधारणांच्या संदर्भातील उदासीनतेवर, उपेक्षेवर बोट ठेवले. या एकांगीपणामुळे टिळक राष्ट्राचे पुढारी नाहीत अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.

वस्तुतः शिंद्यांनी मानपत्रावर सही न करणे हा एक काव्यगत न्याय (पोएटिक जस्टिस) होता असे म्हणता येईल. यापूर्वी शिंद्यांची मुंबई येथे अस्पृश्‍यता निवारण परिषद आयोजित केली होती. शिंद्यांच्या निमंत्रणावरून टिळक या परिषदेला गेले. त्यांनी तेथे अस्पृश्‍यतेच्या दुष्ट रुढीवर टीकाही केली. खुद्द देवाला अस्पृश्‍यता मान्य असेल तर मी त्याला देव मानणार नाही अशा आशयाचे उद्‌गारही त्यांनी काढले. या उद्‌गारांवर सभागृहाचे छप्पर उडून जावे इतका टाळ्यांचा कडकडाट झाला.

टिळकांच्या या भाषणामुळे शिंद्यांना आपण कृतकृत्य झालो असेच वाटले असणार. पण ही कहाणी येथे थांबत नाही. आपण अस्पृश्‍यता पाळणार नाही, तिच्याविरुद्ध कार्य करू अशा अर्थाचे प्रतिज्ञापत्र शिंद्यांनी तयार केले होते. त्यावर उपस्थितांच्या सह्या घेत घेत शिंदे टिळकांकडे आले. खरे तर टिळकांची त्यावर सही करायची इच्छा होती पण त्यांचे अनुयायी आडवे आहे व त्यांनी टिळकांना सही करण्यापासून परावृत्त केले.

सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे टिळकांच्या भाषणाचे वृत्त ‘केसरी’मध्ये छापले गेले नाही. त्यावर विचारणा झाली असता टिळकांनी दिलेले उत्तर खास ‘टिळकी’ शैलीचे होते. ‘मिस्टर टिळक वेगळे आणि केसरीचे एडिटर टिळक वेगळे’ अशा थाटाचे हे उत्तर होते.

वस्तुतः टिळकांनी यात काही वेगळे सांगितले असे म्हणता येत नाही. ‘केसरी’ निघाला तेव्हापासून ‘केसरी’च्या व्यवस्थापनाचे म्हणून एक धोरण होते. या धोरणाशी विसंगत असे काही ‘केसरी’त छापायचे नाही असा प्रघात तेव्हापासूनचाच होता. त्यामुळे ‘केसरी’चे संपादक असलेल्या गोपाळराव आगरकरांचा लेखही ‘केसरी’मध्ये छापून आला नाही. याच धोरणानुसार टिळकांचे अस्पृश्‍यता निवारण परिषदेतील भाषणही ‘केसरी’त प्रसिद्ध झाले नाही. ते काहीही असो. या प्रकाराने व्यथित झालेल्या शिंद्यांनी टिळकांच्याच मानपत्रावर सही न करणे हे स्वाभाविकच होते. त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले. हाच काव्यगत न्याय.

शिंद्यांसारखा मोहरा ब्राह्मणेतरांकडे येत असेल, तर ते जेधे मॅन्शनला हवेच होते.

दरम्यान जवळकरांच्या लेखणीला अधिक धार चढत होती... 

संबंधित बातम्या