‘क्रांतीचे रणशिंग’ फुंकणार?

डॉ. सदानंद मोरे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

लोभमोहादि स्वाभाविक मानवी अवगुणांमुळे जवळकरांच्या आयुष्यात विचलनाचे किंवा स्खलनाचेही प्रसंग आले असतील. परंतु, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने विचार केला तर जवळकर शोकात्म नायक ठरतात. डॉ. आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्यांत केलेल्या जलसत्याग्रहाला जवळकरांचा नुसताच शाब्दिक पाठिंबा नव्हता, तर त्या चळवळीत भाग घ्यायला जवळकर केशवराव जेध्यांसह महाडकडे निघाले होते. रस्त्यावर त्यांची मोटारगाडी पंक्‍चर झाल्यामुळे त्यांना तेथे वेळेवर पोचता आले नाही, हा भाग वेगळा. ही कसर त्यांनी बाबासाहेबांच्याच नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेशाच्या सत्याग्रहात भाग घेऊन भरून काढली. त्यानंतर महात्मा गांधींच्या कायदेभंग चळवळीत प्रत्यक्ष भाग घेऊन त्यांनी तुरुंगवासाची शिक्षाही भोगली.

पण याचा अर्थ त्यांनी गांधीवादाचा पूर्णतः स्वीकार केला होता असे म्हणता येत नाही. जवळकर हे एक पूर्णपणे स्वतंत्र वृत्ती असलेले व्यक्तित्व होते. गांधींच्या चळवळीत सामील होताना त्यांना कार्ल मार्क्‍स खुणावत होता. आणि ही खुणवाखुणवी शक्‍य व्हायचे कारण म्हणजे जवळकरांची मूळ वैचारिक बैठक जोतीरावांच्या विचारांची होती. आणि ती शाहू छत्रपतींच्या सहवासातून अधिक बळकट झाली होती. जवळकरांना विलायतेच्या वाऱ्या घडवणाऱ्यांनी आधी मुंबईच्या कम्युनिस्टप्रणित कामगार चळवळीत जातीय मुद्द्यावरून फूट पाडण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला होता. त्यांना इंग्लंडात पाठवण्यामागचा उद्देशसुद्धा त्यांनी तेथील साम्राज्यवादी सत्ताधाऱ्यांच्या गळी भारतातील राजकारणामधील जातीय तत्त्वाच्या आधारे काँग्रेसच्या मागण्यांना कशा वाटाण्याच्या अक्षता लावता येतील - हे उतरविण्याचा होता.

तथापि स्वतंत्र बाण्याच्या जवळकरांचे डोळे इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय वातावरणाच्या अनुभवामुळे खाड्‌कन उघडले. त्यांना आणखी चूक उमगली आणि ते भारतात परतल्यावर गांधींच्या चळवळीत सामील होऊन मार्क्‍सच्या म्हणजेच कम्युनिस्ट विचारांचा पाठपुरावा करू लागले.

महात्मा गांधी नावाच्या व्यक्तीवर - म्हणजे तिच्या नेतृत्वावर जवळकरांचा प्रचंड विश्‍वास होता. त्यांच्या या श्रद्धेच्या आड मार्क्‍सवाद कधीच आला नाही. पण तरीही त्यांना हिंदुस्थानातील शेतकरीवर्गाची चिंता आहेच. ब्रिटिशांचे राज्य संपुष्टात आल्यानंतर ‘ज्या सुधारणा - किंवा स्वराज्य - हिंदुस्थानात अमलात यावयाच्या आहेत, त्या लोकशाहीच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांना गाफील ठेवून त्यांचे प्रतिनिधी म्हणून भांडवलशाहीच्या ताब्यात गेल्या तर त्यापासून देशात खरी लोकशाही स्थापन होण्याऐवजी काही विशिष्ट हितसंबंधांच्या एका टोळीची ती सत्ता होईल. अर्थात अशा प्रसंगी शेतकरी हाच जर बहुजनसमाज आहे, किंवा हिंदुस्थानच जर शेतकऱ्यांचा आहे, तर त्यावर शेतकऱ्यांचे स्वराज्य स्थापन व्हायला हवे.’ अर्थात ही गोष्ट आपोआप घडून येणारी नाही.’’ याकरिता चालू संक्रमण काळात शेतकरी समाज अगदी स्वतंत्रपणे संघटित झाला पाहिजे.’ ‘शेतकरी समाजाने आतापासूनच जात, धर्म, पंथ असल्या लटक्‍या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या उपयोगी पडणाऱ्या कल्पना बाजूला सारून सर्व शेतकरी आर्थिक योजनेत संघटित करून पूर्ण स्वराज्याला खरी लोकशाही बनविण्याची तयारी केली पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षावर शेतकऱ्यांनी अवलंबून राहता कामा नये. स्वतःच्या आत्मबळावर अवलंबून असले पाहिजे.’’

जवळकर शेतकऱ्यांच्या राजकीय अस्तित्वाची गोष्ट बोलतात. ‘‘त्यांत शेतकऱ्यांचे म्हणजे शेतकऱ्यांचेच, त्यामध्ये काँग्रेसचे म्हणजे शेतकऱ्यांचेच किंवा ब्राह्मणेतरांचे म्हणजे शेतकऱ्यांचेच असला अर्धवटपणा असता कामा नये. ब्राह्मणेतर आपल्यांतील सावकार आणि भांडवलवाल्यांना ते केवळ ‘ब्राह्मणेतर’ म्हणून शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर बसविण्याचे पातक करीत आहेत. तेवढे दुष्ट सावकार व त्यांचे बगलबच्चे वगळले तर सबंध ब्राह्मणेतर चळवळ शेतकऱ्यांची आहे.’’

यावरून असे लक्षात येईल, की जवळकर या प्रश्‍नाकडे जातीय दृष्टीने बघण्याऐवजी शुद्ध वर्गीय दृष्टीने बघत आहेत. विठ्ठल रामजी शिंदे यांनी दहा-बारा वर्षांपूर्वी लावलेली ज्योत अजून पूर्णपणे विझलेली नाही. दरम्यानच्या काळात शिंद्यांनीच काँग्रेस आणि गांधी यांच्याविषयीची आस्था अबाधित ठेवून शेतकऱ्यांच्या स्वतंत्र परिषदा आयोजित केल्या होत्या. जातीजातींचा परस्परअविश्‍वास त्यांना ठाऊक असल्यामुळे त्यांनी अस्पृश्‍य शेतकऱ्यांची स्वतंत्र परिषदही भरवली होती. जी गोष्ट समजायला भारतामधील कम्युनिस्टांना चीनमधील माओच्या क्रांतीची वाट पाहायला लागली; तिचा उच्चार जवळकरांनी त्याआधीच करून ठेवला होता, हे लक्षात घेतले म्हणजे जवळकरांचे मोठेपण समजून येईल. त्यांना ब्राह्मणेतर चळवळ नावाच्या जातीवर आधारित असलेल्या चळवळीला वर्गजाणीव देऊन तिचे वर्गलढ्यात रूपांतर करायचे होते. त्यासाठी त्यांना रक्तपाताची गरज भासत नाही. कारण ‘महात्मा गांधींच्या अहिंसावादी तत्त्वांमुळे कोणत्याही परिस्थितीत ‘सशस्त्र राज्यक्रांती’ अव्यवहार्य ठरत चालली असून, हिंदुस्थानापुरते तरी ‘अत्याचारी युद्धांचे दिवस भरत आले हे खास.’’

गांधींच्या ज्या मार्गाने स्वराज्य दृष्टीच्या टप्प्यात आले आहे. त्याच मार्गाने त्यानंतर आणखी वाटचाल केली असता, हेच स्वराज्य शेतकऱ्यांचे होईल अशी त्यांना आशा आहे.

काँग्रेसमध्ये अद्यापही भांडववाल्यांचे वर्चस्व आहे, हे न कळण्याइतके जवळकर भाबडे नव्हते. म्हणून ते वस्तुनिष्ठ इशारा देतात, ‘‘तरी जोपर्यंत काँग्रेसच्या शिरावर महात्मा गांधींचा वरदहस्त आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हित होवो न होवो, पण नुकसान खास होणार नाही, असा आम्हाला भरवसा वाटतो. यदाकदाचित सर्व हिंदी भांडवलवाले म. गांधींनाही फसविण्याचा - बनविण्याचा प्रयत्न करतील यासाठीच सर्व शेतकरी संघटित होऊन एक दिलाने महात्मा गांधींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत.’’

याच दरम्यान जवळकर ब्राह्मणेतर पक्षाच्या नेत्यांना पक्षाचे नाव बदलून ‘शेतकरी पक्ष’ हे नाव धारण करण्याचा सल्लाही देत होते.

जवळकर स्वतःच आपली एक एक मर्यादा ओलांडत कसे पुढे जात होते, याचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी ‘तेज’च्या (२३ मे १९२९) अंकातून कोल्हापूर संस्थानवर केलेली निर्भीड टीका. याच लेखात त्यांनी स्वतः निदर्शनास आणल्याप्रमाणे ‘‘ब्राह्मणी पत्रे ब्राह्मणेतर संस्थानिकांवर दातओठ खातातच, पण लोकलाजेने का होईना ब्राह्मणी संस्थानांवरही थोडी तरी टीका करतात. परंतु, ब्राह्मणेतर पत्रे ज्या उमेदीने किंवा निर्भीडपणे ब्राह्मणी संस्थानांवर तुटून पडतात, ती उमेद व तो निर्भीडपणा ब्राह्मणेतर संस्थानिकांच्या बाबतीत मात्र पूर्णपणे लटपटू लागतो.’’

स्वतः जवळकर मात्र अशा लटपटणाऱ्यांपैकी नव्हते. शाहू महाराजांचे कोल्हापूर संस्थान हे ब्राह्मणेतरांचे व त्यातही मराठ्यांचे आदराचे व स्फूर्तीचे स्थान ! छत्रपती शिवरायांचा वारसा या संस्थानाला होताच, पण हा झाला ऐतिहासिक मुद्दा. वर्तमानकाळात शाहू छत्रपतींनी दिलेल्या प्रेरणेमुळे आणि प्रत्यक्ष सहकार्यामुळेच ब्राह्मणेतर चळवळ उभी राहू शकली, खेड्यापाड्यांपर्यंत पोचू शकली. व्यक्तिशः जवळकरांच्या जडणघडणीतही कोल्हापूर संस्थानचा वाटा होताच. परंतु, महाराजांनंतर परिस्थितीने पालट झाला व संस्थान ब्राह्मणेतरांच्या अपेक्षांना उतरेना. जवळकर लिहितात - ‘‘कोल्हापूर संस्थानाबद्दल आम्हालाच काय; हिंदुस्थानातील प्रत्येक मराठ्याला अभिमान वाटतो व त्याचबरोबर कोल्हापूरचा राज्यकारभार प्रगतिशील व्हावा, अभिमानास्पद वाटावा. कोल्हापूर ही एक छोटीशी लोकशाही बनावी असे प्रत्येक ब्राह्मणेतराला वाटणे साहजिक आहे. पण सध्या तेथील राज्यकारभार ज्या चाकोरीतून हाकला जात आहे, ती चाकोरी पाहिली म्हणजे निराशाच वाटल्याशिवाय राहात नसे.’’

जवळकरांची टीका मोघम राहात नाही, ते तत्कालीन महाराजांवरही व्यक्तिशः घसरायला कचरत नाहीत. इतर संस्थानांमधील प्रजेप्रमाणे ‘‘कोल्हापूरच्या लोकांनीदेखील आपली प्रजा परिषद भरविली पाहिजे. यापुढे असक्त गोम्या संस्थानिक तमक्‍या सोम्याला शेमला बांधितो म्हणूनच त्यांच्यापुढे जी हुजूर म्हणून मुजरा केला पाहिजे, ही गुलामी वृत्ती शेतकऱ्यांतली गेली पाहिजे.’’

जातिभेदांचे रूपांतर वर्गभेदांत म्हणजे आर्थिक पायावर होऊन खरी लोकशाही प्रस्थापित व्हावी असे मनापासून वाटणाऱ्या विठ्ठलराव शिंद्यांचा वारसा जवळकर कसा चालवीत होते याचे उदाहरण त्यांच्या ‘तेज’ (११ जुलै १९३१) मधील ‘ब्राह्मणेतर चळवळ’ या लेखात सापडते.

कोल्हापूर संस्थानात प्रजापरिषद स्थापन व्हावी हे जवळकरांनी आधीच सूचित केले होते. आता ते असेही लिहितात, ‘‘ब्राह्मणेतर चळवळीत ही पेशवाई सुरू झाली आहे. आणि तिचा शेवटही जवळ आला आहे, हे कटू सत्य आज कोणाला बोलवत नसेल. पण प्रत्येक ‘‘ब्राह्मणेतर’’ हळूहळू ‘‘शेतकरी’’ होत चालला आहे. दक्षिणी संस्थानातील ब्राह्मणेतर प्रजामंडळ स्थापण्याची सूचना कोल्हापूरच्या सत्यवादी पत्राने केली होती. पण ‘‘ब्राह्मणेतर’’ नाव नको म्हणून दक्षिणी संस्थान शेतकरी मंडळ स्थापले अशा ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनीच सूचना केल्या आहेत. ब्राह्मणेतर प्रजामंडळ निघाले समजा, संस्थानिकही ब्राह्मणेतर असला तरी तो असणार मराठा आणि तिथे मराठेतरांची गळचेपी होत असणार. संस्थानिक म्हणणार, मीही ब्राह्मणेतर आहे. मग माझी ब्राह्मणेतर प्रजा मला का सताविते? ही अडचण उद्‌भवू नये म्हणून प्रथमपासून शेतकरी प्रजा-मंडळ नाव घेण्यात सदर संस्थानी पुढाऱ्यांनी दूरदर्शिला दाखविले याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.’’

थोडक्‍यात जवळकर जात आणि जातींवर आधारित वर्ग (ब्राह्मणेतर) - म्हणजे खरे तर महाजात या मर्यादा ओलांडीत शेतकरी या एक वर्गावर स्थिर झाले. त्यासाठी त्यांना ‘‘सत्यवादी सत्यशोधक’’ महात्म्या गांधींचा आधार मिळाला.

जवळकरांच्या या सर्व वैचारिक प्रवासाची परिसमाप्ती त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काही महिन्यांत लिहिलेल्या व त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या ‘क्रांतीचे रणशिंग’ शेतकऱ्यांच्या हिंदुस्थान आणि पुस्तिकांत झाली. या पुस्तिकेने त्यांच्या आंतरराष्ट्रीय जाणीव दिसून येतेच. शिवाय मार्क्‍सला वाट पुरवणारे जवळकर पोथीनिष्ठ मार्क्‍सवादी झाले नाहीत हेही लक्षात येते. मार्क्‍सच्या विचारांमध्ये पारंपरिक अभिजात भांडवली अर्थशास्त्रामधील मनुष्याच्या गरजा अपार असतात हे सूत्र गृहीतच आहे. येथे जवळकर गांधींकडे जातात. आणि गरज कमी करायचा सल्ला देतात. ते यासाठी इशारा देतात, की हिंदुस्थानच्या शेतीचे नुकसान होऊन जर औद्योगिक क्रांती होणार असेल तर ती देशाला घातक होईल. औद्योगिक उन्नती शेती हा प्रथम ‘‘राष्ट्रीय उद्योग’’ ठरवून झाली तर इतर देशांप्रमाणे मार्केटकरिता महायुद्धे करण्याचे महापाप हिंदुस्थानला केव्हाच करावे लागणार नाही.  शेती हा राष्ट्रीय धंदा आणि शेतकरी हा राजकारणातला मुख्य आणि स्वतंत्र घटक झाल्याशिवाय हिंदी स्वराज्य खरे स्वराज्य राहणार नाही.’’

जवळकर ‘शेतकरी स्वराज्या’ची कल्पना मांडतात. ‘‘स्वराज्य आणि शेतकरी किंवा शेतकरी स्वराज्य ही आता एकच गोष्ट, एकच कल्पना डोळ्यासमोर उभी राहाते.’’

‘शेतकऱ्यांचा हिंदुस्थान’चे भरतवाक्‍य फारच महत्त्वाचे आहे. ‘आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य’ या उपशीर्षकाखाली छापलेल्या तीन ओळींचे हे भरतवाक्‍य आवाहनात्मक आहे.

’’धर्म, जाती, पंथ यांना उकिरड्यावर सोडून आर्थिक समतेच्या पायावर शेतकऱ्यांचे व मजुरांचे स्वराज्य स्थापन करून नांगर चिन्ह असलेले राष्ट्रीय ‘निशाण’ उभारून ‘‘क्रांतीचे रणशिंग’’ फुकणार?’ 

संबंधित बातम्या