जवळकरांचे परिवर्तन

डॉ. सदानंद मोरे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

शेठजी, भटजी आणि लाटजी यांना बहुजन समाजाचे शोषक आणि शत्रू घोषित केलेल्या ब्राह्मणेतर चळवळीसाठी शेठजी आणि भटजी ही ‘सॉफ्ट’ म्हणता येतील अशी लक्ष्ये (टार्गेट) होती. लाटजी म्हणजे ब्रिटिश अंमलदाराच्या वाटेला चळवळीचे नेते फारसे गेले नव्हते. किंबहुना चळवळीतील एका मोठ्या गटाला ब्रिटिश सत्तेच्या संरक्षक छत्राखाली राहून ब्राह्मणांशी स्पर्धा करावी असे वाटत होते. या स्थितीवादी नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहाणे पसंत केले, यात आश्‍चर्य वाटायचे कारण नाही. 

ब्राह्मणेतर पक्षाच्या कार्यकारिणीच्या १९२६ मध्ये पुण्यात भरलेल्या परिषदेत तर कडेलोटच झाला. ब्राह्मणांना विरोध करण्यासाठी कोणत्याही जातीच्या वा धर्माच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यावा असे ठरले. 

वस्तुतः ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर ही विभागणी ही हिंदुधर्माच्या अंतर्गत असलेली विभागणी आहे. दुसऱ्याच्या धर्मात मुळात ब्राह्मणांनाच स्थान नसल्याने तेथे ब्राह्मणेतरांच्या अस्तित्वाचा प्रश्‍नच उद्‌भवत नव्हता. तथापि पारशी व मुसलमान या धर्माच्या अनुयायांनाही ब्राह्मणेतर पक्षात स्थान मिळणे शक्‍य आहे. जैन धर्म आणि हिंदू धर्म यांच्यातील सीमारेषा पुरेशा ठसठशीत नसल्याने अण्णासाहेब लवे, बा.रा. कोठारी यांच्यासारखे जैन मातब्बर नेते तर पहिल्यापासूनच ब्राह्मणेतर पक्षात प्रतिष्ठेने मिरवीत होते. आता पारशी कारखानदार धनजीशहा कूपर हेही पक्षात आहे, इतकेच नव्हे, तर ब्राह्मणेतर पक्षाचे पाठबळ मिळून राजकारणात मोठे झालेले हे कूपर लोकशाही स्वराज्य पक्षाच्या बरोबरीने मुंबई प्रांताचे पहिले सरकार बनवण्यात यशस्वी झाले. इतिहासाचा खरा परिहास तर पुढेच आहे. जमनालाल मेहतांच्या नेतृत्वाखालील लो. स्व. पक्ष म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गांधींच्या नेतृत्वाला विरोध करणाऱ्या न.चि. केळकरांच्या नेतृत्वाखालील वावरणारा सनातनी कंपू होता. केळकर-जमनादास प्रभूतींच्या आग्रहानेच कूपरांनी मंत्रिमंडळ बनवताना ब्रिटिश सरकारला रत्नागिरी येथे स्थानबद्ध असलेल्या स्वा. सावरकरांना मुक्त करून राजकीय चळवळीत भाग घेण्याची मुभा द्यावी अशी शर्त घातली. ही अट सरकारने मान्य केली. त्यानुसार सावरकर सुटले आणि त्यांनी हिंदू महासभेचे नेतृत्व हाती घेऊन देशात काँग्रेस विरोधात जणू रान उठवले. थोडक्‍यात ज्या हिंदुत्वाच्या विरोधाने ब्राह्मणेतर पक्षाने हिंदू नसलेली माणसेही पावन करून घेतली त्याच ब्राह्मणेतर पक्षाचा अप्रत्यक्षपणे हातभार लागून हिंदू महासभा उभी राहिली. इतिहासाच्या प्रवाहाने घेतलेले हे वळण आश्‍चर्यचकित करणारे आहे यात संशय नाही.

अर्थात ब्राह्मणेतर चळवळीत अहिंदूंना प्रवेश देण्याची मागणी सर्वच ब्राह्मणेतरांना रुचली होती असे मात्र नाही. पुण्याला सयाजीराव सिलम, बॅ. डोंगरे त्याचप्रमाणे मुंबईच्या दामोदर सावळाराम यंदे या मंडळींना हा प्रकार अजिबात मान्य नव्हता. डोंगरे, सिलम पुण्यात यांनी ‘ब्राह्मणेतर’ ऐवजी ‘रयत’ नावाची सूचना केली, तर यंदे यांनी ‘ब्राह्मणेतर हिंदू काँग्रेस’ या नावाचा आग्रह धरला. 

गांधीजींचे नेतृत्व १९२६ च्या परिषदेच्या सुमारास देशात पूर्णपणे प्रस्थापित झाले होते. तसेच त्यांना विरोध करणाऱ्या काही टिळक पक्षीय नेत्यांच्या मर्यादाही उघड्या पडत चालल्या होत्या. गांधींना टाळून राजकारण करणे दुरापास्त असल्याची जाणीव यात अधिवेशनात व्यक्त झाली. कोल्हापूर येथील ‘हंटर’ पत्राचे संपादक खंडेराव बागल तर असे म्हणाले, ‘राष्ट्रीय सभा ही आमची माता आहे. तिच्यात अद्याप अनेक दोष आहेत. परंतु तिच्याकडे पाठ फिरवून ब्राह्मणेतर पक्षाला यश येणे शक्‍य नाही. काँग्रेसच्या विचारांची दिशा उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे बदलत चालली आहे. आज सर्व पक्षाला एकत्र आणण्यास खादीसारखे दुसरे साधन नाही. साऱ्या ब्राह्मणेतर लोकांनीसुद्धा खादीच वापरावी. ब्राह्मणेतरांनी नोकरीची आशा टाकली पाहिजे. सरकारच्या कच्छपी जाणारा पक्ष केव्हाही लोकप्रिय होणार नाही.’

ब्राह्मणेतरांना आदरणीय असलेल्या विठ्ठल रामजी शिंदे यांचेही असेच मत होते. केशवराव जेधे, जवळकर, भाऊराव पाटील यांच्या डोक्‍यातील विचारचक्रही याच दिशेने फिरू लागले होते. आणि मुख्य म्हणजे स्वतः खंडेरावांचे चिरंजीव माधवराव यांनी वर्षभरातच हे विचार स्पष्टपणे व्यक्त करणारे पुस्तकच लिहिले. ‘नव्या पिढीचे राजकारण’ नावाच्या त्या पुस्तकाचा उल्लेख पूर्वी झालेलाच आहे. 

येथपर्यंत जे चालले होते त्याला सैद्धांतिक पातळीवरील चर्चा म्हणता येते. प्रत्यक्ष कृती करण्याचा कस अजून लागला नव्हता. पण ती वेळही आता फार लांब नव्हती. 

ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या मागण्यांना प्रतिसाद देताना सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या कमिशनने भारतात येऊन भारतीय मनाचा कानोसा घ्यावा व त्यानुसार सरकारला शिफारशी कराव्यात असे ठरले. सायमन कमिशनमध्ये भारतीय सदस्य नसल्यामुळे त्याच्यावर बहिष्कार घालून त्याचे स्वागत निदर्शनांनी करायचा निर्णय काँग्रेसने घेतला. 

त्यावर आपण काय करायचे हा प्रश्‍न ब्राह्मणेतर पक्षापुढे उभा राहिला. पुणे व अकोला येथे त्यासाठी स्वतंत्र परिषदा भरल्या. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकावा असे विठ्ठलराव शिंदे व त्यांना मानणाऱ्या जेधे बंधू, केशवराव बागडे वकील, भाऊराव पाटील, ‘विजयी मराठा’कार श्रीपतराव शिंदे या तरुणांचे मत होते. याउलट वऱ्हाडचे ब्राह्मणेतर नेते नानासाहेब अमृतर वकील आणि महत्त्वाचे म्हणजे बुजुर्ग नेते भास्करराव जाधव हे कमिशनशी सहकार्य करावयाच्या मताचे होते. सायमन कमिशनमुळे ब्राह्मणेतर पक्षातील फाटाफूट स्पष्ट झाली. 

या मतभेदांमध्ये सहकार्यवादी गटाचे प्रमुख अर्थातच भास्करराव जाधव व याच गटाचे पक्षात वर्चस्व होते. पक्षातील या स्थितीवादी गटाबद्दल आश्‍चर्य करायचे कारण नाही. परंतु केशवराव जेधे यांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या जवळकरांनी भास्कररावांची पाठराखण करावी याचे अनेकांना सखेद आश्‍चर्य वाटले. बडोद्याच्या ‘जागृती’कार भगवंतराव पालकरांनी जवळकरांना पुनर्विचार करायची विनंतीही केली. पण जवळकरांनी त्याला दाद दिली नाही. 

जवळकरांमधील या परिवर्तनाचे कारण म्हणजे भास्करराव जाधवांशी वाढलेली जवळीक होय. जवळकर हे हाडाचे पत्रकार होते व त्यासाठी आवश्‍यक असे अभिव्यक्तीचे साधन वृत्तपत्र आपल्याकडे असावे असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते. भास्कररावांनी त्यांना मुंबईत येऊन ‘कैवारी’ पत्र चालवावे, असे आवाहनही केले होते. त्यांचीही इच्छा होती. त्यासाठी त्यांना भास्कररावांची मदत होणार होती. खरे स्वतः बाहुराव जेधे या पत्राच्या सल्लागार मंडळावर होते. तथापि ‘कैवारी’ मधून सायमनवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्यांविरुद्ध खोडसाळ मजकूर येऊ लागला तेव्हा त्यांनी अस्वस्थ होऊन सल्लागार मंडळाचा राजीनामा देऊन पत्राशी असलेला संबंध तोडून टाकला. दरम्यान इकडे सायमन कमिशनबरोबर सहकार्य करायचा ठराव ब्राह्मणेतर पक्षात भास्कररावांनी मंजूर करून घेतला. 

भास्कररावांच्या या सहकार्यवादी धोरणाचा परिपाक म्हणून असेल किंवा अन्य कारणाने असेल भास्कररावांना सरकारने शेतकी व अबकारी या खात्यांचे मंत्रिपद ऊर्फ दिवाणगिरी दिली. त्यामुळे जवळकरांना मदत करायची भास्कररावांची क्षमता अधिकच वाढली. ‘कैवारी’ला जाहिराती मिळू लागल्या.

ब्रिटिश सरकारचा एक भाग म्हणून भास्कररावांवर आणखी एक जबाबदारी आपोआपच आली. ती म्हणजे मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये वाढत चाललेल्या कम्युनिस्टांच्या वर्चस्वाला शह देणे. या काळात गिरणी कामगारांच्या संघटना म्हणजेच युनियन्स कम्युनिस्ट पुढाऱ्यांच्या विशेषतः कॉ. श्रीपाद डांगे यांच्या वर्चस्वाखाली होत्या. डांग्यांनी नुकताच गिरणी कामगारांचा संप सलग सहा महिने यशस्वीरीत्या चालवून दाखवला होता. 

कामगारांची ही एकी मोडणे सरकारची गरजच होती. आणि भास्करराव या सरकारचा हिस्सा असल्यामुळे त्यांनीही या प्रक्रियेत हातभार लावला असेल तर त्यात अनपेक्षित वा अस्वाभाविक म्हणता येणार नाही. भास्कररावांनी यासाठी ‘कैवारी’चे म्हणजेच जवळकरांचे साहाय्य घेतले. 

मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये ब्राह्मणेतर जातींच्या कामगारांची संख्याच लक्षणीय होती. युनियनचे नेतृत्व ब्राह्मणी. या वस्तुस्थितीचे भांडवल करून त्यांच्यात फूट पाडणे हा एक शॉर्टकट म्हणावा लागतो. जवळकरांनी तो चोखाळला हे व्यावहारिक होते. या काळातील ‘कैवारी’मधील मथळे पुरेसे बोलके आहेत. ‘श्री. आळते यांना ब्राह्मणांनी कसे छळले?’, ‘युनियनचा फंड घेऊन डांगे पळणारं’, ‘कामगारांना भटांनी तोंडघशी कसे पाडले?’

अर्थात कामगारांनी आर्थिक प्रश्‍नांना महत्त्व देणाऱ्या ब्राह्मण कम्युनिस्टांच्या मागे जाणे पसंत केले व जातीय प्रचाराला थारा दिला नाही. याच दरम्यान केशवराव जेधे यांनी विठ्ठल रामजींच्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन चळवळ सुरू केली. सारावाढ व तुकडे बंदीला विरोध असे या चळवळीचे स्वरूप होते.

इकडे अशा प्रकारे वातावरणात खळबळ माजली असताना जवळकर दोन वेळा इंग्लंडला जाऊन आले. त्यातील दुसरा दौरा तर ब्रिटिश सत्ताधाऱ्यांपुढे ब्राह्मणेतरांची बाजू मांडायला जाणार असे सांगण्यात आले. त्यावर एकच चर्चा कल्लोळ झाला. जवळकरांच्या पात्रतेवर, आर्थिक स्थितीवर प्रश्‍नचिन्हे उपस्थित करण्यात येऊ लागली. ब्राह्मणेतरांमध्ये भास्करराव जाधवांचा गट व केशवराव जेध्यांचा गट परस्परविरोधी छावण्या समोरासमोर उभ्या ठाकल्या. त्या तपशिलात जायचे कारण नाही. तथापि त्यामुळे जेधे आणि जवळकर यांच्यात दुरावा निर्माण होऊन ते एकमेकांना कायमचे अंतरले हे मात्र खरे. 

सायमन कमिशनपुढे करायच्या मागण्यांच्या निमित्ताने ब्राह्मणेतरांमध्येही मराठे आणि मराठेतर अशी स्पर्धा सुरू झाली होती. मराठेतरांच्या दृष्टीने जेथे काय, जवळकर काय, भास्करराव जाधव काय, सर्व सारखेच!

तिकडे ब्राह्मणेतर पक्षातील सरकार धार्जिण्या गटाची बाजू मांडण्यासाठी विलायतेला गेलेल्या जवळकरांनी आपले काम जारी ठेवले असणार यात शंका नाही. त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांमधून तसे लेखही लिहिले. 

ते काहीही असले, तरी जवळकर हे मनाची सरळ आणि प्रामाणिक ठेवण असलेले गृहस्थ होते. त्यांचा स्वभाव बिनडावपेची व बिनलपंडावी असल्याचा निर्वाळा त्यांचे चाहते ‘संदेश’कार अच्युतराव कोल्हटकर यांनीच नव्हे तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले सनातन्यांचे प्रतिनिधी भास्करराव भोपटकर यांनीही दिला होता. मुंबईतील कामगार युनियन फोडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जवळकरांना इंग्लंडच्या वास्तव्यात साम्राज्यशाहीचे व कामगार चळवळीचे खरे स्वरूप प्रत्यक्ष पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन होऊन ते चक्क डाव्या विचारांचे बनले.

अर्थात कम्युनिझमचा व कार्ल मार्क्‍सच्या विचारांचा प्रभाव घेऊन भारतात परतलेले जवळकर सरळ कम्युनिस्ट पक्षात गेले नाहीत. त्यांची पार्श्‍वभूमी शेतकऱ्याची होती. तसेच त्यांच्यावर फुले-शाहूंचे संस्कारही झाले होते. त्याचप्रमाणे भारतीय जनमानसावरील महात्मा गांधींचा प्रभावही त्यांना ठाऊक होता. भारतातील कम्युनिस्टांना मात्र एखादा डांगे सोडला, तर या गोष्टींचे वावडे होते. त्यामुळे पठडीनिष्ठ कम्युनिझमचा स्वीकार करण्याऐवजी जवळकरांनी भांडवलशाहीचे अपत्य असणाऱ्या साम्राज्यशाहीला लक्ष करणे व ते करताना भारतीय परिस्थितीतील डाव्या चळवळीने कामगारांपेक्षा शेतकऱ्याला महत्त्व द्यायला हवे अशा स्वरूपाची मांडणी करायला सुरवात केली.

जवळकरांमधील या परिवर्तनावर भास्करराव जाधवांची काय प्रतिक्रिया होती हे समजायला मार्ग नाही. परंतु अनेकांसाठी तो सुखद धक्का होता हे मात्र निश्‍चित!  

संबंधित बातम्या