इतिहासाची परिहासिका
महाराष्ट्राची लोकयात्रा
महात्मा गांधी यांच्या राजकारणातील पदार्पणानंतर भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक गतिमान झाला याविषयी दुमत व्हायचे कारण नाही. गांधींचे वैशिष्ट्य म्हणजे राजकारण, समाजकारण आणि धर्म यांच्यामधील परस्परसंबंध त्यांनी अचूक हेरला व स्वातंत्र्याच्या चळवळीत सामाजिक सुधारणा आणि धर्म यांच्याशी जोडून घेतले. गांधींच्या काळातील मुख्य सामाजिक प्रश्न अर्थातच अस्पृश्यतेचा होता. या प्रश्नाचा हिंदू धर्माशी संबंध होता याचे कारण अस्पृश्यता हिंदू धर्माचेच अविभाज्य अंग असा त्यांचा समज केवळ रुढच नव्हे, तर दृढ झाला होता. या समजाला हिंदू धर्माच्या प्रमाण ग्रंथांचा पाठिंबा असल्याचे मानले जाई. तसेच या समजाला कायद्याचे स्वरुप द्यायचे काम धर्मशास्त्राने केले होते. आपल्या या कायद्याला प्रमाण ग्रंथांचा (जसे वेद, गीता) आधार असल्याचा धर्मशास्त्राचा दावा असे. मनुस्मृती हा धर्मशास्त्राचा मुख्य ग्रंथ होता.
गांधींनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले, त्याला काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या मर्यादा ओलांडीत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. अर्थात हा आरोप व्यावहारिक स्वरूपाचा होता. पण खरा मुद्दा धर्म शास्त्रावरील ग्रंथ आणि त्यांनाही आधारभूत असलेल्या वेदादि अपौरुषेय मानल्या गेलेल्या प्रमाण ग्रंथांचा होता. गांधींचा प्रयत्न मुळात या ग्रंथामध्येच अस्पृश्यतेला आधार नसल्याचे दाखवायचा होता. त्यासाठी त्यांना वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतील परिवर्तनवादी पंडितांच्या शास्त्रार्थाचा उपयोग झाला. पण हा अर्थ मान्य करणाऱ्यांचा वर्ग फार लहान होता हे विसरता कामा नये. सामान्य लोकांना अशा प्रकारच्या नव्या परिवर्तनवादी अन्वयार्थापेक्षा गांधींचे वचन अधिक महत्त्वाचे वाटत असे व त्याचा बऱ्यापैकी परिणामही दिसू लागला होता. मात्र हिंदू धर्माच्या अशा शास्त्रग्रंथाच्या चक्रव्यूहात सापडून त्यांच्या अर्थाची ओढाताण करीत बसण्यापेक्षा त्यांचा पूर्णतः त्याग करायला हवा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. हा त्याग शुद्ध विवेकवादाच्या आधारे करता येतो. त्यासाठी धर्माची गरज नाही, असे धर्मसंस्था अनावश्यक समजणाऱ्या बुद्धिवादी विद्वानांचे मत होते. मार्क्सवादी विचारवंत हा अशा विद्वानांमधील एक वर्ग. बाबासाहेबांना मात्र हिंदू धर्मात पर्यायी ठरू शकणारा दुसरा धर्म हवा होता. धर्म मुदलातच नको, या विचाराशी ते सहमत नव्हते. हा पर्याय त्यांना बौद्ध धर्मात सापडला. बौद्ध धर्म हाच मुळी विवेकावर आधारित धर्म आहे, पोथी प्रामाण्यावर नाही या निष्कर्षापर्यंत ते आले. या निष्कर्षाची अंतिम परिणती त्यांच्या धर्मांतरात म्हणजेच त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यात झाला हे आपण जाणतोच. परंतु, बाबासाहेबांचे धर्मांतर हा एक नुसती घटना इव्हेंट नसून दीर्घकाळ चाललेली प्रक्रिया होती, हे विसरता कामा नये या प्रक्रियेत अनेक टप्पे येतात. या प्रक्रियेची सुरूवात बाबासाहेबांच्या बालपणातच झाली असे दिसते. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची चर्चा कसोटी येथे आवश्यक ठरते.
बाबासाहेबांचे आजोबा मालोजीबाबा हे रामानंदी पंथाचे होते. वडील रामजीबाबांनी कबीर पंथाचा स्वीकार केला. वस्तुतः स्वतः कबीर हेच मुळी रामानंदांचे शिष्य असल्यामुळे या दोन पंथांमध्ये एक प्रकारची संगती होती. विशेष म्हणजे या दोन्ही पंथांनी आपापल्या परीने जाती जातीमधील उच्च नीच भावाला विरोध केला होता.
मुद्दा असा आहे, की बाबासाहेबांच्या घरातील वातावरण धार्मिक होते. स्वतः रामजीबाबाकडे अनेक धर्मग्रंथ होते. हे ग्रंथ लहान भीमरावाने वाचावेत अशी त्यांची इच्छा असे व स्वतः बाबासाहेबांनासुद्धा या वाचनात गोडी निर्माण झाली होती. पण भीमरावाचे वाचन पारंपरिक पोथी वाचणाऱ्या श्रद्धाळू भाविकासारखे नव्हते. ग्रंथ वाचताना ते त्यावर विचार करीत, त्यातून त्यांना काही प्रश्न पडत व या प्रश्नांची चर्चा ते वडिलांबरोबर करीत. प्रसंगी चर्चेला वादविवादाचे स्वरुप येत असे. रामायण-महाभारता सारख्याच प्राचीन ग्रंथाप्रमाणेच ज्ञानेश्वर, तुकाराम, श्रीधर अशा मराठी परंपरेतील ग्रंथांचा परिचयही बाबासाहेबांना याच वयात झाला. या ग्रंथांच्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या स्वतःच्या भाषेवर पडल्याचे आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो. त्यांच्या लेखनातून व भाषणांतून संतसाहित्याचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रांची ब्रीदवाक्ये अनुक्रमे तुकोबांच्या अभंगांच्या पंक्ती आणि ज्ञानेश्वरीमधील ओव्या होती. आपल्या संतसाहित्याच्या व्यासंगाचा खुद्द बाबासाहेबांनाही सार्थ अभिमान होता व हा अभिमान ते आव्हानात्मक भाषेतून व्यक्तही करीत असतं.
ते काहीही असो, त्यांचे हिंदू धर्मातील ग्रंथाबद्दलचे असमाधान हे अशा प्रकारे शालेय वयातच निर्माण झाले. मुख्य म्हणजे या असमाधानावरील उताराही त्यांना याच वयात सापडला. तो म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांनी लिहिलेले बुद्धचरित हा होय.
कृष्णाजी केळुसकर हे तेव्हाच्या विद्वान वर्तुळातील महत्त्वाचे नाव होते. बहुजन समाजातून आलेले केळुसकर हे गाढे विद्वान आणि लेखक होते. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्यावर सोपवलेले उपनिषदांचा अर्थ लावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले होते. भगवत्गीतेचा अर्थ सांगणारा त्यांचा ग्रंथही प्रसिद्ध होता. विशेष म्हणजे गुरुजी उत्तम चरित्रकारही होते. त्यांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांची चरित्रे विद्वानांच्या पसंतीस उतरली होती. या केळुसकरांनी भगवान बुद्धांचे चरित्र लिहिले होते. हे चरित्र इतके प्रभावी होते, की मुंबईच्या डॉ. नायरांनी ते वाचून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व एक बुद्ध विहारही बांधले.
केळुसकर आणि रामजीबाबा यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. भीमराव फायनलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चाळीतील रहिवाशांनी त्यांचा सत्कार करायचे ठरवले. हा सत्कार केळुसकरांच्या हस्ते झाला आणि सत्कार समारंभात त्यांनी आपले बुद्धचरित्र भीमरावास बक्षीस दिले.
हे पुस्तक बाबासाहेबांच्या जीवनात कलाटणी देणारे ठरले. पुस्तक वाचून बाबासाहेबांना बुद्धाच्या धर्माचे व तत्त्वज्ञानाचे वेगळेपण लक्षात आले व त्याचे पर्यवसान तौलनिक धर्माभ्यासात झाले. उल्लेख करायला हरकत नसावी, की बाबासाहेबांच्या जीवनातील दुसऱ्या कलाटणीलासुद्धा केळुसकरच निमित्त ठरले. बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली म्हणून केळुसकर आपले प्रकाशक स्नेही दामोदर सावळाराम यंदे यांच्या समवेत विद्यार्थी बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन गेले. केळुसकर व यंदे यांच्या मध्यस्थीचा यशस्वी उपयोग झाला, हे वेगळे सांगायला नको.
बुद्धचरित्राच्या वाचनाने बाबासाहेबांच्या मनात जागृत झालेल्या धर्म जिज्ञासेने त्यांची पाठ अखेरपर्यंत सोडली नाही. त्यांच्या तौलनिक धर्माभ्यासाच्या कक्षा रुंदावतच राहिल्या. धर्मभ्यासाला समाजशास्त्र, मानवशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, तत्वज्ञान या विविध विद्या शाखांच्या अभ्यासाची जोड मिळाली. कोलंबिया विद्यापीठातील प्रसिद्ध फलप्रामाण्यवादी (pragmatic) प्राध्यापक जॉन डुई तसेच मार्क्सवादाचे अभ्यासक अर्थतज्ज्ञ सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाचाही त्यांना लाभ मिळाला. स्वदेशी परत आल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक-राजकीय कारकिर्दीची सुरुवात साऊथबरो समिती पुढील साक्षीने केली. माँटेग्यू चेम्सफर्ड समितीच्या शिफारशीनुसार आता भारतात निवडणूक होऊन लोकप्रतिनिधींना मर्यादित प्रमाणात राज्यकारभार पाहण्याची संधी मिळणार होती. या निवडणुकांमधील जागांची प्रमाण-निश्चिती जातीप्रमाणे होणार होती. अस्पृश्य समाजातील प्रतिनिधी अस्पृश्यांच्याच मतदानातून करायची, की त्यांची सरकारने नियुक्ती करायची असाही एक मुद्दा होता. बाबासाहेबांनी अर्थातच निवडणुकांची मागणी केली. याच समितीपुढे विठ्ठल रामजी शिंदे यांचीही साक्ष झाली. शिंदे ज्या निराश्रित सहायकारी मंडळींच्या (depressed classed mission) वतीने बोलत होते, त्या संस्थेची भूमिका नियुक्तीची होती. शिंदे आणि आंबेडकर यांच्यातील संघर्षाची ठिणगी या साक्षीतूनच पडली. योगायोगाचा भाग असा, की या काळात अस्पृश्यांच्या प्रश्नांचे अभ्यासक आणि अस्पृश्यता निवारणाचे खंदे कार्यकर्ते म्हणून शिंद्यांचा भारतीय पातळीवर नावलौकिक झाला होता. स्वतः महात्मा गांधीसुद्धा या संदर्भात शिंद्यांचा शब्द प्रमाण मानीत.
दरम्यान बाबासाहेबांच्या या साक्षीमुळे समाजातील अनेक जबाबदार मंडळींचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज हे त्यातील महत्त्वाचे नाव होय. या काळात शाहू महाराज ब्राह्मणेतर चळवळीचे सर्वोच्च नेते बनले होते. त्यांच्या आणि लोकमान्य टिळकांचा वेदोक्ताच्या निमित्ताने झालेला वाद शिगेला पोचला होता. टिळक स्वराज्याची मागणी करणारी होमरुल चळवळ चालवीत होते. अस्पृश्यता निवारणाचे कार्य करणारे शिंदे राजकीय क्षेत्रात मात्र टिळकांची पाठराखण करीत होते. ब्राह्मणेतरांच्या आणि मराठ्यांचा पाठिंबा टिळकांच्या स्वराज्य चळवळीला मिळावा यासाठी ते प्रयत्नशील होते. शिंदे आणि शाहू यांच्यात मतभेद होणे साहजिकच होते. अशा प्रसंगी अस्पृश्य समाजातूनच पुढे आलेला बाबासाहेबांसारखा उच्चशिक्षित तरुण शिंद्यांच्या विरोधात उभा ठाकत असेल, तर ते महाराजांना हवेच होते.
या प्रकारातून उद्भवलेला शिंदे आंबेडकर यांच्यातील दुरावा इतिहासाची वक्रगती. खरे तर परिहासिका (irony) म्हणायला हवी. शिंदे केवळ अस्पृश्यांचे कैवारीच नव्हते, तर अस्पृश्यांच्या सेवेसाठी तनमनधन अर्पण करणारे सच्चे कार्यकर्ते होते. इतकेच नव्हे, तर ते बाबासाहेबांप्रमाणे तौलनिक धर्माभ्यासक होते. शिवाय बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक होते. खरे तर रा.ना. चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे ‘बाबासाहेबांच्या कार्याची पायाभरणी शिंद्यांनी करुन ठेवली होती असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही.’
बाबासाहेबांप्रमाणे शिंदे यांनी बौद्ध धर्माचा प्रत्यक्ष स्वीकार केला नसला, तरी त्यांना बौद्ध धर्मासंबंधी सहानुभूती आणि भगवान बुद्धांविषयी आदर होता. ते स्वतःला दीक्षा न घेतलेला बौद्धधर्मीय म्हणवत. बुद्ध आणि धर्म यांची शरणागती त्यांना मान्य होती. मात्र संघाला शरण जाण्याविषयी ते साशंक होते. विशेष म्हणजे स्वतः बाबासाहेबांनासुद्धा या शंकाकुल अवस्थेतून जावे लागले होते.
माँटेग्यू चेम्स्फर्ड योजनेनुसार होऊ घातलेल्या निवडणुकांच्या तोंडावर बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पत्र सुरू केले. ‘मूकनायक’साठी शाहू छत्रपतींनी पुरेसे आर्थिक साहाय्य केले. इतकेच नव्हे, तर बाबासाहेबांचे नेतृत्व उभे राहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही केले. आपल्या संस्थानातील माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरवून छत्रपतींनी अस्पृश्य समाजाला डॉ. आंबेडकरांसारखाच उच्चशिक्षित व कर्तबगार तरुणांचे नेतृत्व स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्याचीच पुनरावृत्ती नागपूर येथील परिषदेतही झाली. ‘मूकनायक’ मधून शिंद्यावर टीकाही झाली.
इकडे बाबासाहेबांनी सरकारकडे केलेली अस्पृश्य उमेदवाराच्या निवडणुकीची मागणी सरकारने मान्य केली नाहीच. दरम्यान, स्पृश्य उमेदवारांच्या निवडणुकीत शिंदे स्वतःच्या बहुजन पक्ष काढून उतरले होते. छत्रपतींनी शिंद्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत केली. शिंदे पराभूत झाले. या काळात आणि नंतरही छत्रपतींचा मृत्यू होईपर्यंत बाबासाहेबांच्या लेखनातून धर्मांतराचा विचार येत नाही. या वेळी अस्पृश्यांची चळवळ हा ब्राह्मणेतर चळवळीचाच एक भाग मानली जाई. छत्रपतींच्या पश्चात सर्वच समीकरणे बदलली व बाबासाहेबांच्या मनातही धर्मांतराच्या विचारांचे चक्र फिरू लागले.