जल व मंदिर प्रवेश सत्याग्रह

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 15 एप्रिल 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

टिळककालीन राजकारण व गांधीकालीन राजकारण यांच्यामधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे टिळकांच्या काळातील राजकारण सामाजिक मागण्यांची दखल घ्यायला तयार नव्हते. पण सामाजिक मागण्यांचा संबंध शेवटी धार्मिक मागण्यांशी पोचत असल्यामुळे धार्मिक मागण्यांचीही दखल घेतली न जाणे स्वाभाविकच होते. अस्पृश्‍यता आणि जातिभेद हे जसे सामाजिक प्रश्‍न होते, तसेच ते, त्यांना धर्मशास्त्राचे समर्थन असल्यामुळे धार्मिक प्रश्‍नही होते. राजकीय प्रश्‍नांचे सामाजिक व धार्मिक स्वरूप जाणणारे नेते तेव्हा नव्हते, अशातला भाग नाही. न्या. रानडे हे त्यांच्यातील अग्रगण्य नाव होय. पण रानडे यांच्यामागे जाणे आपल्या हितसंबंधांच्या विरुद्ध जाणारे असल्यामुळे उच्चवर्णीयांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, तर कनिष्ठ वर्णजातींच्या लोकांना त्यांचे धोरण मिळमिळीत; इतकेच नव्हे, तर संशयास्पद वाटल्यामुळे तेही त्यांच्यापासून चार हात दूरच राहिले.

परिस्थितीचा हा पेच लक्षात घेऊन टिळकांनी फक्त राजकीय कार्यक्रम म्हणजेच स्वराज्याचा लढा पुढे रेटण्याचे ठरवले. त्यामुळे महाराष्ट्रातील एक वर्ग त्यांना दुरावला. ते खरे असले तरी एक वर्ग मात्र ठामपणे व विश्‍वासाने त्यांच्या मागे उभा राहिला. त्याच्याच जोरावर टिळकांनी स्वातंत्र्यलढा बराच पुढे नेऊन ठेवला.

दरम्यान, कनिष्ठ वर्णजातींमध्ये अगोदर छत्रपती शाहू महाराज आणि नंतर डॉ. आंबेडकर यांच्यामध्ये जागृती होऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा जाग्या झाल्या. सामाजिक समतेची तहान तर त्यांना पूर्वीपासूनच होती, पण आता माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणांतून मिळू लागलेल्या राजकीय टक्‍क्‍यांचेही आकर्षण त्यांना वाटू लागणे स्वाभाविक होते. बदलत्या परिस्थितीत त्यांना सामाजिकदृष्ट्या खालच्या स्थानी ठेवून केवळ राजकीय हक्क देणे आणि तेही राखीव जागांच्या, मतदारसंघांच्या अथवा नियुक्तीच्या माध्यमातून, योग्य ठरले नसते. ही गोष्ट महात्मा गांधींच्या लक्षात आली व त्यांनी ब्राह्मणेतरांच्या आणि अस्पृश्‍यांच्या न्याय्य सामाजिक स्थानाला व हक्कांना पाठिंबा देऊ केला. गांधींची नेमकी हीच गोष्ट टिळकांच्या अनेक अनुयायांना पटली नाही व त्यांनी हे ना ते निमित्त करून गांधींच्या मार्गात अडथळे आणण्याचे डावपेच केले, पण हळूहळू त्यांचा आवाज क्षीण होत गेला व परिणामतः देशाच्या राजकारणावरील गांधींची पकड अधिकच मजबूत झाली.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास रानडे प्रभृतींच्या धर्मकारण, समाजकारण, राजकारणाविषयी असमाधान आणि संशय असल्यामुळे जोतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माचा म्हणजेच सत्यशोधक समाजाचा सवतासुभा उभा केला. रानडे-गोखले यांच्या राष्ट्रसभेचे मवाळ राजकारणसुद्धा त्यांना नको होते. कारण ते उच्चवर्णीयांच्या हितसंबंधांची जपणूक करणारे असल्याची त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाच्या मालककुणब्यांना, शूद्रातिशूद्रांना त्यांच्यापासून दूरच राहण्याचा सल्ला दिला.

बहुजनांच्या राजकारणाची सूत्रे शाहू छत्रपतींच्या हाती गेल्यानंतर अनेक समीकरणे बदलली. सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेत या चळवळीचा धार्मिक गाभा निष्प्रभ झाला. ब्राह्मणेतर चळवळीतील व्यक्ती सार्वजनिक सत्यधर्माचे पालन करणारी असो अथवा नसो, ती ब्राह्मण नाही हे पुरेसे ठरले. स्वतः शाहू महाराजांचा धार्मिक आचार पाहता त्यांना फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचे पाईक म्हणणे अवघड जाईल. महाराजांनी ‘निर्मिका’ची उपासना केल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्या धर्मनिष्ठेला आर्यसमाजिस्ट हिंदू असे नाव देणे उचित ठरेल. अब्राह्मण पुरोहिताकडून वैदिक कर्मकांड करून घेतल्यास त्यांची हरकत नव्हती. त्यांनी स्वतः नित्यनैमित्तिक पूजापाठापासून फारकत घेतली नव्हती. एकीकडे शाहू महाराज ब्राह्मणनिरपेक्ष वैदिक धर्माचा पुरस्कार करीत असताना, दुसरीकडे जोतिरावांना गुरुस्थानी आणि छत्रपतींना मित्रस्थानी मानणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनीही स्वतःची वेगळी वाट निर्माण केल्याचे दिसून येते. आपली आर्थिक गरज पुरवायला त्यांना सार्वजनिक सत्यधर्म अपुरा वाटला, त्याचप्रमाणे हिंदूधर्माच्या कोणत्याही प्रकारच्या पंथाचे वा उपपंथाचे आकर्षणही त्यांना वाटेनासे झाले. समाधान करू शकणारा धर्म त्यांना गौतम बुद्धांच्या धम्मात सापडला.

परत एकदा बाबासाहेबांच्या धर्मकारणाकडे व धर्मांतराकडे येताना बाबासाहेबांच्या मार्क्‍सवाद्यांशी असलेल्या मतभेदाचा उल्लेख करणे गरजेचे ठरते. खरे तर मार्क्‍सवादी जसे निरीश्‍वरवादी आहेत, तसेच बौद्ध धर्मही निरीश्‍वरवादीच आहे. पण मार्क्‍सवादी धर्म नावाची संस्थाच मानीत नाहीत. बुद्धाला आणि अर्थात आंबेडकरांना धर्माची आवश्‍यकता वाटते. दुसरे असे, की मार्क्‍सवादी विचार हा पूर्णतः जडवादी आहे. बौद्ध धर्म जडवाद नाकारतो. अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये तत्कालीन जडवादाचा म्हणजे चार्वाकाच्या विचाराचा गंभीरपणे प्रतिवाद करण्यात आलेला आहे.

मार्क्‍सवाद्यांनी अधोरेखित केलेल्या आर्थिक म्हणजे सोप्या भाषेत भाकरीच्या प्रश्‍नाचे महत्त्व न नाकारता बाबासाहेब त्यांना माणूस हा केवळ भाकरीवर जगत नाही, अशा अर्थाचे येशूचे वचन ऐकवतात. धर्माचे दुहेरी महत्त्व त्यांना मान्य नाही. उपनिषदांची भाषा वापरून सांगायचे झाल्यास मार्क्‍सवाद्यांसारखे जडवादी लोक केवळ भौतिकाच्या म्हणजे प्रेयसाच्या पातळीवर वापरतात. मानवी आयुष्य अर्थपूर्ण होण्यासाठी प्रेयाकडून श्रेयाकडे आणि त्याहीपुढे निःश्रेयसापर्यंत जायची गरज आहे. अर्थात असे म्हणताना बौद्धांना उपनिषदांप्रमाणे आत्म्याचे अस्तित्व मानण्याची गरज वाटत नाही. तसेच यात कोणत्याही प्रकारचा अतींद्रिय गूढवाद नसून, बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हे बुद्धीला व विज्ञानालाही धरूनच आहे.

पण हा झाला व्यक्तिगत मुद्दा. बाबासाहेब धर्माचा सामाजिक पातळीवरूनही विचार करतात. मार्क्‍सने समाजवादी वर्गविहीन समाजरचना अस्तित्वात आल्यानंतर राज्यसंस्थांचा आपोआपच लय (withering away) होईल, असे म्हटले होते. बाबासाहेब राजकारण करू लागले तेव्हा रशियात कम्युनिस्टांची क्रांती होऊन त्यांचेच सरकार राज्य चालवत होते. पण मग राज्याच्या विलयाचे काय? यावरील मार्क्‍सवादाच्याच चौकटीतील उत्तर म्हणजे जोपर्यंत प्रतिक्रांतीवादी शक्तींचा धोका संभवतो तोपर्यंत नव्या रचनेचे रक्षण करण्यासाठी राज्यसंस्थेची गरज आहे आणि या काळातील राज्यसंस्थेचे स्वरूप कामगारवर्गाची हुकूमशाही असे असेल. यावर बाबासाहेबांचा असा प्रश्‍न आहे, की मार्क्‍सवादी म्हणतात त्याप्रमाणे भविष्यात खरोखरच राजसंस्थेचा लय झाला, ती विरघळून गेली तर समाजाचे नियमन कोण करणार आणि कसे? त्यांच्या मते रशियासारख्या कम्युनिस्ट देशालाच या नियमनासाठी धम्माची आवश्‍यकता आहे.

प्रचलित हिंदू समाजरचनेच्या चौकटीत राहून अस्पृश्‍यांचे प्रश्‍न सुटत असतील तर बाबासाहेबांना ते नको होते अशातला भाग नाही. त्यांची विविध आंदोलने म्हणजे या प्रश्‍नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेले सांकेतिक प्रयत्न असे म्हणायला हरकत नाही. महाड येथील जलसत्याग्रह हा पहिला प्रयत्न होय. महाडच्या चवदार तळ्यातील पाणी पिण्यास अस्पृश्‍यांना बंदी होती. त्यांच्या स्पर्शाने जलाशयच बाटेल अशी विकृत धार्मिक समजूत होती. बाबासाहेबांनी जलसत्याग्रह केला. ही एक प्रकारे सवर्णांच्या मानसिकतेची परीक्षाच होती असे म्हणावे लागते. या परीक्षेला ते उतरले नाहीत असे असे इतिहास सांगतो. कायदा अस्पृश्‍यांच्या बाजूला होता, तरी कायद्यातून पळवाटा काढण्याचे प्रयत्न झालेच. बलप्रयोगही करण्यात आला.

बाबासाहेबांच्या या चळवळीविषयी ब्राह्मणेतर समूह फारसा उत्साही होता असे म्हणता येत नाही. स्वतः केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या ब्राह्मणेतर पक्षाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी बाबासाहेबांना पाठिंबा व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर सत्याग्रहात सामील होण्यासाठी ते महाडला निघालेसुद्धा होते; पण रस्त्यात त्यांच्या चारचाकीचे चाक पंक्‍चर झाल्यामुळे त्यांना उशीर झाला. या संदर्भात एका घटनेचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. जलसत्याग्रहाला पाठिंबा देताना जवळकरांनी सत्याग्रहात ब्राह्मणांना सामील करून घेऊ नये, अशी अट घातली होती. पण बाबासाहेबांनी जवळकरांच्या म्हणण्याला धूप घातला नाही. त्यांनी ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण्य’ या गोष्टींमध्ये भेद केला. आमचा विरोध ब्राह्मण व्यक्तींना नसून, ब्राह्मण या वृत्तीला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे, तर या चळवळीत ब्राह्मणांना सामीलही करून घेण्यात आले. सत्याग्रहाच्या दरम्यान जेव्हा अस्पृश्‍यतेचा धार्मिक आधार असलेल्या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाची होळी करण्याचा मुद्दा आला, तेव्हा प्रत्यक्ष कृती सहस्रबुद्धे या ब्राह्मण व्यक्तीच्या हस्तेच करण्यात आली. बाबासाहेबांच्या देवराव नाईक या ब्राह्मण सहकाऱ्याने तर अस्पृश्‍यांना जानवी देऊन द्विजाची प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्नही केला होता. या सर्व हकिगतीचे तपशील बाबासाहेबांनी तेव्हा चालविलेल्या ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रातून वाचायला मिळतात. या दरम्यान बाबासाहेब मुंबई कायदेमंडळाचे सभासदही होते, तसेच त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली समता संघ ही सर्व वर्णजातीय संस्था महाराष्ट्रात कार्यरत होती. विशेष म्हणजे स्वतः लोकमान्य टिळकांचे धाकटे चिरंजीव श्रीधरपंत हे या संघाचे वरिष्ठ पदाधिकारी होते. त्यांनी केशरीमराठा संस्थेच्या विश्‍वस्तांनी केलेल्या विरोधाला न जुमानता आपल्या राहत्या घरात म्हणजे गायकवाड वाड्यात समतासंघाची स्थापना केली होती. हा काळ म्हणजे जेधे-जवळकरांची ब्राह्मणेतर चळवळ, बाबासाहेब आणि टिळकपुत्र यांच्या एकत्रित कामाचे सहकार्य पर्व होते असे म्हटले तरी चालेल.

महाडचा सत्याग्रह झाला तेव्हा विनायकराव सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते. त्यांनी रत्नागिरी परिसरात अस्पृश्‍यता निवारणाचे व शुद्धीचे कार्य सुरू केले होते. या कार्याचा एक भाग म्हणजे नंतर साकार झालेले पतितपावन मंदिर. अशा प्रकारच्या अस्पृश्‍यांसाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याची कृती बाबासाहेबांना मान्य नव्हती. मात्र सावरकरांनी महाडचा सत्याग्रह व नंतर झालेले पर्वती, नाशिक येथील मंदिर प्रवेश सत्याग्रह यांना पाठिंबा दिला. आंबेडकरांनीही मुंबई कायदेमंडळात ठराव वगैरे करून सावरकरांची स्थानबद्धता संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले.

पुण्यातील पर्वती येथील देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी झालेल्या आंदोलनात केशवराव जेधे, काकासाहेब गाडगीळ, देशदास रानडे पां. ना. राजभोज असा अनेकांनी भाग घेतला. मंदिर प्रवेश विरोधक सनातन्यांनी त्यांचा रस्ता रोखून धरून त्यांना मारहाण केली, त्यांच्यावर दगडफेक केली.

असाच प्रकार नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाच्या संदर्भात घडला. विशेष म्हणजे करवीर मठ सोडून नाशिकमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंकराचार्य लिंगेश महाभागवत कुर्तकोटी यांनी या सत्याग्रहाला पाठिंबा दिला होता.

बाबासाहेबांमुळे अस्पृश्‍य समाजात होत असलेल्या जागृतीची दखल स्वतः गांधींना घ्यावी लागली. येरवड्याच्या तुरुंगात असताना त्यांनी आत्मशुद्धीसाठी उपोषण केले. हिंदूधर्माचे मोठमोठे जाणकार पंडित बोलावून शास्त्रार्थ केला. यावेळी त्यांना वाईच्या धर्मनिर्णयमंडळामधील केवलानंद सरस्वतींच्या तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी शिष्यांची चांगली मदत झाली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री दिवेकर, के. ल. दप्तरी अशी नावे या संदर्भात उल्लेखनीय आहेत.

अशावेळी सनातन्यांमधील शास्त्रार्थाची ऊर्मी उफाळून आली नसती तरच नवल. विशेष म्हणजे श्री श्रेत्र पंढरपूर येथील पंडित प्राण धारूरकर शास्त्री, काळभैरशास्त्री या मंडळींनी अस्पृश्‍यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध केला. रत्नागिरीकडील विद्याभूषण तांबेशास्त्री तर पहिल्यापासून गांधींचेच काय पण सावरकरांचेही टीकाकार होते. गांधींच्या पुढाकाराने व प्रभावाने भारतात अनेक मंदिरे अस्पृश्‍यांसाठी खुली झाली. अर्थात बाबासाहेबांच्या लेखी मंदिर प्रवेशाचा मुद्दा सांकेतिक होता. त्यामुळे यानंतर त्यांनी अशा प्रकारच्या चळवळीविषयी फारशी उत्सुकता दाखवली नाही, त्यांची झेप त्यापुढची होती.     
 

संबंधित बातम्या