बाबासाहेबांना काव्यात्म न्याय!

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 20 मे 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

डॉ. आंबेडकर यांनी चालविलेल्या अस्पृश्‍यता विरोधी चळवळीचे अंतिम पर्यवसान धर्मांतरात होणे, ही महाराष्ट्राच्या सामाजिक व धार्मिक इतिहासातील एक महत्त्वाची व परिणामकारक घटना मानावी लागते. खरे तर जोतिराव फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्मात अस्पृश्‍य वर्ग सामावून जायला काही हरकत नव्हती. (फुले यांचे एकूणच कार्य शूद्र आणि अतिशूद्र आणि अर्थात स्त्रियायांसाठी होते.) पण प्रत्यक्षात मात्र हा धर्म अस्पृश्‍यांपर्यंत पोचल्याचे दिसत नाही. अपवाद असतील, परंतु तुरळक. दुसरे असे, की फुल्यांच्या पश्‍चात सत्यशोधक चळवळीचे रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत झाले. या चळवळीत अस्पृश्‍यांच्या विषयी सहानुभूती होती, हे नाकारायचे काहीच कारण नाही. अस्पृश्‍य समाज हा ब्राह्मणेतरच असल्यामुळे या दोघांच्या चळवळींमध्ये सहकार्य असणे स्वाभाविक व अपेक्षित होते. करवीर छत्रपती शाहू महाराजांनी त्या प्रकारचे सहकार्य अस्पृश्‍यांच्या चळवळीला केले सुद्धा. पण याचा अर्थ ब्राह्मणेतरांनी या चळवळीला सामावून घेतले किंवा त्यांचे ऐक्‍य झाले, असा नाही. महाराजांनी घेतलेले त्या-त्या जातींचे पुढारपण त्या-त्या जातींच्याच नेत्यांनी केले पाहिजे, ही भूमिका डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व पुढे येण्यासाठी पूरक व सहाय्यक ठरली ही गोष्ट खरी आहे. पण या गोष्टीची दुसरी बाजू म्हणजे यापुढील चळवळी वर्गाच्या किंवा समूहाच्या होण्याऐवजी जातलक्ष्यी बनल्या, हे विसरता कामा नये. डॉ. आंबेडकरांची विद्वत्ता व कर्तृत्व पाहाता केवळ अस्पृश्‍य जातींचे नव्हे, तर एकूणच ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करण्याची त्यांची पात्रता होती, याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. पण ब्राह्मणेतर चळवळीला तेवढी व्यापकता येणे शक्‍य नव्हते. उलट ब्राह्मणेतर चळवळीतच मराठे आणि मराठेतर असा संघर्ष निर्माण झाला.

मात्र, प्रगल्भ ब्राह्मणेतरांना आंबेडकरांच्या मोठेपणाची जाणीव होती. विठ्ठल रामजी शिंद्यांच्या प्रेरणेने बडोदा येथून निघणाऱ्या ‘जागृति’ साप्ताहिकाचे संपादक भगवंतराव पालेकर हे असेच एक प्रगल्भ ब्राह्मणेतर म्हणावे लागतात. पालेकरांनी ‘जागृति’ साप्ताहिकाला अस्पृश्‍यांच्या प्रश्‍नांसाठी स्वतंत्र पुरवणी जोडण्याचा उपक्रम केला होता, हे कोणाला खरेही वाटणार नाही.

ब्राह्मणेतर चळवळीमधील अंतर्गत सुंदोपसुंदीने अस्वस्थ होऊन पालेकरांनी या चळवळीवर सकारात्मक टीका करण्याचे कर्तव्य चोखपणे निभावले. मुंबई प्रांतिक कौन्सिलमधील ब्राह्मणेतर सदस्य आणि आंबेडकर यांच्या कार्याची तुलना करून ब्राह्मणेतर सदस्यांनी आंबेडकरांपासून शिकण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे बजावले.

‘जागृति’ हे त्या काळातील प्रगल्भ व स्वतंत्र विचारांचे व्यासपीठ होते. ब्राह्मणांच्या दोषांचा पाढा वाचायचा आणि ब्राह्मणेतरांच्या दोषांवर पांघरूण घालायचे असा दुटप्पीपणा ‘जागृति’ने कधीच केला नाही. उलट ब्राह्मणेतरांनी आत्मपरीक्षण व आत्मटीका केली तरच त्यांची चळवळ पुढे जाईल, ही पालेकरांची भूमिका होती.

शिंद्यांच्या सहवासामुळे पालेकरांचा प्रार्थना समाजातील विचारवंतांशी संबंध आला. जयराम वैद्य हे त्यांच्यापैकी एक. ते ‘जयरामनाना’ या नावाने लेखन करीत. त्यांनी एकदा ‘सुबोध पत्रिका’ व ‘जागृति’मध्ये लेख लिहून अस्पृश्‍यांनी प्रार्थना समाजाचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. हा झाला वैद्यांच्या उदारमतवादाचा भाग. तथापि, हा अनाहूत सल्ला आंबेडकरांना मुळीच मानवला नाही. त्यांनी वैद्यांवर टीका केलीच, परंतु त्या अनुषंगाने प्रार्थना समाजाच्या मर्यादांवरही बोट ठेवले. वैद्य आणि आंबेडकर यांच्यामधील हा वाद त्या काळातील आंबेडकरांच्या धर्मचिंतनाची दिशा स्पष्ट करणारा म्हणून महत्त्वाचा आहे.

याच दरम्यान देशपातळीवर हिंदुमुसलमान संघर्षाला उधाण आले होते. देशात धार्मिक दंगली भडकल्या होत्या. एकीकडे कट्टरतावादी मुसलमान व दुसरीकडे आर्यसमाज, हिंदुमहासभा अशा हिंदूंच्या संघटना अशा छावण्या एकमेकांसमोर ठाकल्या होत्या. मुसलमान हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रयत्नात, तर हिंदू नेते मुसलमान धर्म स्वीकारलेल्या पूर्वाश्रमीच्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी - म्हणजेच त्यांच्या शुद्धीकरणासाठी सज्ज, अशी स्थिती निर्माण झाली होती. एवढ्यात तमिळनाडूमधील पाच हजार अस्पृश्‍य हिंदू धर्मांतर करून मुसलमान होणार असल्याची बातमी आली. या बातमीवर प्रतिक्रिया देताना बाबासाहेबांनी आपण वा आपले अनुयायी असे धर्मांतर करणार नसले, तरी कोणी करीत असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट केले. बाबासाहेबांची ही प्रतिक्रिया गर्भित अर्थाने भरलेली होती. पण तिच्याकडे हिंदू नेत्यांनी गंभीरपणे पाहिलेच नाही.

बाबासाहेबांचा कल इस्लामकडे नव्हता, हे या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होत असले तर अस्पृश्‍यतेच्या जाचातून सुटण्यासाठी अस्पृश्‍यांनी धर्मांतर हा पर्याय अवलंबण्यास त्यांची हरकत नव्हती, हेही त्यातून सूचित होते.

बाबासाहेबांनी १९२४ मध्ये बार्शी येथे भरलेल्या परिषदेमध्ये धर्मांतर हा अस्पृश्‍यांचा प्रश्‍न सोडविण्याचा व्यवहार्य पर्याय होऊ शकतो, असे प्रतिपादन केल्याचे याआधीच सांगितले आहे. यावेळी बाबासाहेबांनी नामांतर आणि देशांतर हे दोन पर्याय कुचकामी किंवा अव्यवहार्य असल्याच्या कारणाने नाकारले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान बाबासाहेबांचे प्रयत्न बहिष्कृतहितकारिणी सभा, समतासंघ अशा संस्थात्मक माध्यमांमधून सुरू होतेच. या संस्थांमध्ये सवर्ण हिंदूंचा समावेश होता. स्वतः लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत हे पुरोगामी विचारांचे असून, त्यांनी खुद्द गायकवाडवाड्यातच समतासंघाची शाखा उघडून टिळकांच्या प्रतिगामी अनुयायांची झोप उडवली होती. श्रीधरपंतांकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा होत्या. दुर्दैवाने त्यांनी केलेल्या अकाली आत्महत्येमुळे इतिहासातील एक शक्‍यता परस्परच अवरुद्ध झाली.

सेवादल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याप्रमाणे बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची उभारणी केल्याचाही उल्लेख याआधी झाला आहे. अशा प्रकारची संघटना शिस्त लावण्यासाठी व वेळ पडल्यास आत्मसंरक्षणासाठी आवश्‍यक असते, हे विसरता कामा नये.

दरम्यान, विशेषतः मुंबईत कामगार चळवळीने व कामगार संघटनांनीही बाळसे धरले होते. महात्मा फुलेंपासून प्रेरणा घेऊन नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत कामगार चळवळीची मुहूर्तमेढ एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या चरणातच रोवली होती. तिला सत्यशोधक ब्राह्मणेतरी विचारांची चौकट होतीच. बाबासाहेबांच्या उदयाच्या वेळी या चळवळीत रा. ब. बोले, भिकाजी नरे असे ब्राह्मणेतर नेटाने काम करीत होते. स्वतः बाबासाहेब बोले आणि आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. (नंतरच्या काळात बोले सावरकरवादी बनले, तरी या संबंधात बाधा आली नाही.)

विशेष म्हणजे मधल्या काळात कामगार चळवळीला व संघटनांना जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले होते. कार्ल मार्क्‍सने तर एकूणच भांडवलशाही नष्ट करून संपूर्ण जगात वर्गविरहित, राज्यविरहित समाजरचना आणण्याचे स्वप्न दाखविले होते. त्याचे हे स्वप्न कामगारांच्या क्रांतीतून साकार होणार होते. १९१७ मध्ये रशियात लेनिनने केलेल्या क्रांतीला कामगारांची क्रांती म्हणणे कठीण असले, तरी त्याने मार्क्‍सवादाचे व्यावहारिक प्रात्यक्षिकरण केले व साम्यवादी राजवट आणली याबाबत शंका घेण्याचे कारण नाही.

रशियन क्रांतीचे पडसाद जगभर उमटू लागले. प्रत्यक्ष साम्यवादी राजवटी स्थापना करणे दूरचे उद्दिष्ट असले, तरी कामगार संघटना काढून कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे, त्यांच्यात वर्गजाणीव निर्माण करून त्यांना उद्याच्या क्रांतीचे वाहक करणे या गोष्टी शक्‍य कोटीतील होत्या. स्वतः लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले असता, इंग्लंडमधील कामगार संघटना आणि मजूर पार्टी यांच्या अनुभवामुळे त्यांनाही जागतिक पातळीवरील या बदलत्या वाऱ्याची चाहूल लागली होती. त्यांनीही भारतात कामगार चळवळीला प्रोत्साहन देत कामगारांची शक्ती स्वातंत्र्यलढ्यात कशी वापरता येईल, याचा विचार सुरू केला. भारतात जी पहिली कामगार परिषद भरणार होती, तिचे उपाध्यक्षपद स्वीकारायचेही त्यांनी मान्य केले होते. (अध्यक्ष लाला लजपतराय) तथापि, १९२० मध्ये त्यांचा मृत्यू ओढवल्यामुळे तो योग येऊ शकला नाही.

अर्थात, दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांच्या एका तरुण व होतकरू अनुयायाला कामगार चळवळीशी संलग्न होण्याचा सल्ला दिला. या तरुणाचे नाव श्रीपाद अमृत डांगे. डांग्यांनी हा सल्ला शिरोधार्य मानला व त्यानुसार वाटचाल करीत मुंबईत कामगार संघटनांची उभारणी करता करता त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचीही स्थापना केली.

तपशिलात जायचे कारण नाही. मात्र, याच काळात तिकडे रशियात ताश्‍कंद येथे मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसह व साक्षात लेनिनच्या सौजन्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली.

बाबासाहेबांनी महाड येथे जलप्राशनाचा सत्याग्रह करेपर्यंत मुंबईत डांगे आणि सहकाऱ्यांच्या कम्युनिस्ट चळवळीने व कामगार संघटनांनी चांगलेच मूळ धरले होते. निमकर, घाटे, रणदिवे असे नव्या दमाचे तरुण या चळवळीत प्रविष्ट झाले. मुंबई हे विशेषतः कापडउद्योगाचे माहेरघर असल्यामुळे या चळवळीला गिरणीकामगारांकडून उत्तम प्रतिसाद मिळणे अपेक्षितच होते.

कामगार चळवळीचाच विचार करायचा झाला, तर या काळातील बोलेप्रभृतींच्या कामगार चळवळीला ब्राह्मेतरी वळण होते. कम्युनिस्टांच्या कामगार चळवळीचे स्वरूप खरे तर आंतरराष्ट्रीय व राजकीय होते. त्यामुळे त्यांच्या संघटनांना सरकारी रोषाला सामोरे जावे लागे. याच काळात अ-राजकीय आणि अ-जातीय पद्धतीने कामगारांसाठी कार्य करणारे न. म. जोशींसारखे नेते होते. त्यांचा कल कामगारांचे प्रश्‍न सरकारच्या सहकार्याने सोडविण्याकडे अधिक होता.

मुंबईमधील कामगारवर्गात अस्पृश्‍य जातींच्या कामगारांची संख्या लक्षणीय होती. इंग्लंड-अमेरिकेतील प्रगत भांडवलशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या बाबासाहेबांना कामगार चळवळीचे महत्त्व कोणी दुसऱ्याने पटवून द्यायची गरज नव्हती. त्यांनी या क्षेत्रात प्रवेश करून स्वतंत्र कामगार संघटना बांधल्या.

कामगारांना पायाभूत मानून राजकारण करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाला समांतर म्हणता येईल, असा पक्ष बाबासाहेबांच्या कामगारविषयक विचारांमधून पुढे आला. त्याचे नाव स्वतंत्र मजूर पक्ष. बाबासाहेबांच्या राजकीय पक्षाची संकल्पना व्यापक होती, तिला जातींच्या चौकटीचे बंधन नव्हते, हे आपण या पक्षाच्या जाहीरनाम्यावरून म्हणू शकतो. अस्पृश्‍य व्यक्ती ही जन्मतःच ‘प्रोलितिरिएत’ असते, असे त्यांचे म्हणणे होते. खरे तर एका दृष्टीने या पक्षाचे व कम्युनिस्ट पक्षाचे सहकार्य होण्यास आडकाठी नसावी, असे कोणालाही वाटेल. पण तसे झाले नाही. कम्युनिस्ट पक्षाने बाबासाहेबांकडे प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहिले, पण तो वेगळा मुद्दा.

पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा नव्या कायद्याप्रमाणे कारभार पाहणाऱ्या काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशावेळी सरकारला एक अस्थायी स्वरूपाचे युद्धकालीन मंत्रिमंडळ तयार करणे अपरिहार्य ठरले. या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना स्थान मिळाले. त्यांच्याकडे मजूर खात्याचा कारभार सोपवण्यात आला. हा एक काव्यात्म न्यायच (poetic justice) म्हणावा लागतो.

संबंधित बातम्या