नेतृत्वाच्या जडणघडणीचे दशक 

डॉ. सदानंद मोरे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

महाराष्ट्राच्या इतिहासातील १९२० ते १९३० हे दशक सर्वांत अधिक धामधुमीचे, अस्वस्थतेचे, गोंधळाचे, स्पर्धेचे व चाचपडण्याच्या काळाचे होते. या गोष्टीचा उल्लेख यापूर्वी वेगवेगळ्या संदर्भांत झालेला आहेच. अनेक उदयोन्मुख नेत्यांच्या, पुढे काय करायचे या विषयीच्या भूमिकांची जडणघडण याच काळात झालेली दिसते. टिळक आणि शाहू यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे सामर्थ्य असलेला नेता तेव्हा महाराष्ट्रात ना टिळकांच्या ना शाहू छत्रपतींच्या अनुयायांकडे होता. गांधींच्या नेतृत्वाच्या झंझावातात अशी झाडे टिकणे दुरापास्तच म्हणावे लागेल. 

पहिल्यांदा ज्यांना ज्येष्ठ म्हणता येईल अशा नेत्यांचा विचार करू. टिळकांच्या अनुयायांमध्ये तर गांधींना स्वीकारणारे व गांधींना नाकारणारे असे दोन गट पडले. गांधींकडे गेलेल्या खाडिलकर, परांजपे, वासुकाका, गंगाधरराव देशपांडे, वामनराव जोशी अशा ज्येष्ठ नेत्यांनी नेता म्हणून गांधींचा स्वीकार केला असला, तरी त्यांच्यापैकी कोणालाच आपण आपल्या पक्षातील क्रमांक दोनचे नेते ठरावे, अशी ईर्ष्या नव्हती, त्यामुळे या मंडळींमध्ये तशी स्पर्धाही नव्हती. साहजिकच या नेत्यांमधील कोणी महाराष्ट्राचे किंवा महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेतृत्व करू शकेल, अशी परिस्थितीच नव्हती. 

टिळकांच्या अनुयायांमधील उपरोक्त ज्येष्ठ व प्रभावी नेते गांधींकडे गेल्यानंतरचा एक परिणाम म्हणजे उरलेल्या कट्टरपंथीय टिळकवाद्यांमध्ये लढाऊ बाण्याचा म्हणता येईल, असे कोणी उरलेच नाही. त्यामुळे त्यांच्या नेत्याचे स्थान पटकवायला न. चिं. केळकरांना फारसे प्रयास करावे लागले नाहीत. धर्माने ख्रिश्‍चन असलेल्या बॅ. जोसेफ बॅप्टिस्टा यांचा प्रभाव पडणे शक्‍य नव्हते. शिवाय ''केशरी'', ''मराठा'' पत्रे हे मोठे पीठच केळकरांच्या हाती आलेले. या गटातील मंडळींची बुद्धी आणि शक्ती गांधींच्या नेतृत्वाला रोखण्यातच खर्ची पडली. पुढाकार घेऊन स्वयंप्रेरणेने त्यांनी स्वतःहून एखादी चळवळ उभारली, असे कधी झालेच नाही. गांधींच्या चळवळीमधील, कार्यक्रमांमधील व पद्धतींमधील त्रुटी व व्यंगे हुडकून त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध करण्यातच त्यांनी धन्यता मानली व ते हळूहळू निस्तेज होऊन अस्तंगत झाले. 

गांधींना विरोध करायचा तर गांधींवर केवळ टीका करून भागणार नाही, तर गांधींच्या मार्गाला तोडीस तोड असा पर्यायी मार्ग शोधून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे या टिळकवादी गांधीविरोधकांना कधी जमले नाही. गांधींच्या मार्गाची अव्यवहार्यता युक्तिवादांच्या आधारे सिद्ध करण्यात त्यांनी जेवढा वावदूकपणा दाखवला त्याच्या दशांश तरी प्रयत्न व्यवहार्य मार्ग शोधून काढण्याचे केले असते, तरी लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटला असता. पण ते घडायचे नव्हते. 

दुसरे असे, की गांधींकडे गेलेले टिळकानुयायी फार मोठे पुरोगामी सुधारक होते अशातला भाग नाही. पण त्यांनी काळाची पावले ओळखून आपल्या प्रतिगामित्वाला आपण होऊन मुरड घातली. गांधींच्या अस्पृश्‍यतानिवारणादि कार्यात उत्साहाने सहभागी होणे त्यांना जमणारे नसले, तरी त्याला विरोध वगैरे करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. 

याउलट कट्टर टिळकवादी म्हणवत केळकरांबरोबर राहिलेल्या लोकांना आपले सामाजिक प्रतिगामित्व लपवण्याचे काही कारण नव्हते. आपल्या राजकीय कारकिर्दीत उत्तरार्धांत यांच्यापैकी बहुतेक लोक त्या काळात सामाजिकदृष्ट्या प्रतिगामी मानल्या गेलेल्या हिंदू महासभेत गेली, हा काही साधा योगायोग नाही. 

वस्तुतः गांधींच्या प्रभावाला विरोध करणारे सर्व नेते निष्प्रभ होत असल्याचे लक्षात आल्यावर या मंडळींचे लक्ष आपल्या अखेरच्या हत्याराकडे गेले. 

या काळात स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असून, त्यांच्यावर जिल्ह्याबाहेर न जाणे, राजकीय कृती न करणे अशा स्वरूपाचे निर्बंध सरकारने घातले होते. परंतु, सावरकर हे गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते. ते वृत्तपत्र, नाटक इ. माध्यमांतून गांधी आणि कॉंग्रेसला विरोध करीत राहिले. तसेच हिंदुत्वाची मांडणीही करीत राहिले. १९३७ मध्ये केळकरांच्या प्रयत्नांतून सावरकरांची स्थानबद्धता संपुष्टात आली आणि केळकरांनी नेतृत्वाची माळा त्यांच्या गळ्यात घातली. 

केळकरांच्या मध्यस्थीने सावरकरांचे नेतृत्व स्वीकारणारे व स्वतःला टिळकवादी मानणारे जे होते, त्यांना सावरकरांची जातीविषयक व अस्पृश्यताविषयक पुरोगामी व उदार धोरणे मान्य होती असे म्हणता येत नाही. अनंत हरी गद्रे (समतानंद) किंवा पंढरपूरचे शंकरराव बडवे असे अपवाद असतीलही. पण ते अपवादच. 

साहजिकच हिंदुत्वाची आणि त्यातही परत संकुचित हिंदुत्वाची भूमिका घेणारा गट राजकारणात व समाजकारणात मागे पडणे ही एक अटळ निश्‍चिती होती. 

या संदर्भातील मुद्दा असा आहे, की सावरकरांच्या नेतृत्वाचा लाभ वीसच्या दशकात होऊ शकला नाही... आणि जेव्हा झाला तेव्हा असलेला राजकीय अनुशेष भरून काढणे सावरकरांच्याच काय पण कोणाच्याही आटोक्‍यातले नव्हते. 

कॉंग्रेसच्या अंतर्गत जहाल आणि मवाळ यांच्यातील वादाला नेतृत्वाच्या स्पर्धेचीही किनार होतीच. १९१५ मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले आणि फिरोजशहा मेहता या मवाळ नेत्यांचे निधन झाल्यामुळे जहालांचे नेते असलेल्या टिळकांना कोणी तोलामोलाचा स्पर्धक मिळाला नाही. महाराष्ट्रात मवाळ गटाचा मोठा नेता म्हणजे रॅंगलर र. पु. परांजपे. पण परांजपे राजकारणात टिळकांवर मात करणे शक्‍यच नव्हते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहाल गटाच्या व नेत्यांच्या वाताहतीमुळे निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या आयत्या पोकळीचा लाभ उठवण्याचे सामर्थ्य परांजपे, श्रीनिवास शास्त्री अशा मवाळांकडे नव्हते. इतकेच नव्हे, तर बदलत्या परिस्थितीत त्यांना टिळकवाद्यांच्या विरोधाऐवजी गांधींना विरोध करावा लागला. गांधींपुढे त्यांचा टिकाव लागणे शक्‍य नव्हते. नामदार गोखल्यांचे शिष्यत्व अभिमानाने मिरवणाऱ्या गांधींना गोखल्यांचेच महाराष्ट्रातील अनुयायी विरोध करत आहेत, हे चित्र पाहिल्यावर मुळातच गोखलेविरोधक टिळकांचे अनुयायी गांधींना विरोध करतात, याचा खेद वाटण्याचे कारण नाही. गांधी विरोध हा जणू महाराष्ट्राच्या वैचारिकतेचाच स्थायी भाव ठरतो! 

जहाल, मवाळ काय किंवा तेव्हाचे हिंदुत्ववादी काय, वर्गजातींचा विचार केला, तर प्रायः उच्चवर्णीयच होते. यच्चयावत उच्चवर्णीयांच्या नेतृत्वाला विरोध करण्यातूनच आधी सत्यशोधक समाज, नंतर ब्राह्मणेतर चळवळ यांचा उदय झाला. एकच भासणाऱ्या या जोडचळवळीचे नेतृत्व शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांनी आपली धाडस, धडाडी, करारीपणा व मुत्सद्देगिरी यांच्या बळावर प्रस्थापित नेतृत्वाला लक्षणीयरीत्या शह दिला असे म्हणता येते. परंतु, १९२२ मध्ये महाराजांचे निधन झाल्यावर त्यांची जागा घेईल असे नेतृत्व बहुजनांमध्ये नव्हतेच. वस्तुतः विठ्ठल रामजी शिंदे यांच्या रूपात एक प्रगल्भ, निःस्वार्थी आणि विचारी नेतृत्व बहुजनांना उपलब्ध होते. पण मधल्या काळात शिंद्यांनी टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीला बहुजनांचा पाठिंबा मिळवून देण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे ते महाराजांच्या नजरेतून उतरले होते. खरे तर एव्हाना शिंद्यांनी स्वतःच्या त्यागाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर अस्पृश्‍य समाजाचे प्रवक्तेपण व नेतृत्व संपादन केले होते. महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयोन्मुख नेतृत्वाची पाठराखण केल्यामुळे अस्पृश्‍य समाजालाही बाबासाहेबांच्या रूपाने आपल्या स्वतःचा समर्थ पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्याचे नेतृत्व शिंद्यांच्या हातून सुटले ते सुटलेच. आपण स्वतःच स्थापन केलेल्या निराश्रित सहायकारी मंडळातून शिंद्यांना बाहेर पडावे लागले. 

दुसरीकडे मुंबई कायदे मंडळासाठी झालेल्या निवडणुकीतही शाहू महाराजांच्या पाठिंब्याच्या अभावी शिंद्यांना पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे दशकाच्या राजकारणातून शिंद्यांची जणू हद्दपारीच झाली. नेमक्‍या याच निर्वाणीच्या निर्णायक वेळी शिंद्यांसारख्या मोहऱ्याची गरज बहुजन समाजाला होती. शिंदे मुंबई प्रांतिक कायदेमंडळात गेले असते, तर बहुजनांच्या व ब्राह्मणेतरांच्या चळवळीची दिशाच बदलली असती असे म्हणण्याला वाव आहे. 

ते काहीही असो, मुद्दा महाराष्ट्राला सक्षम व समर्थ नेतृत्व मिळण्याचा आहे, मग हे नेतृत्व कोणत्याही गटातून वा जातीतून आलेले असो... आणि ते न मिळाल्यामुळे महाराष्ट्र देशाच्या राजकारणात मागे पडला हे नाकारता येत नाही. 

अर्थात ऐतिहासिक प्रक्रियेत ज्या शिंद्यांची ब्राह्मणेतरांकडूनच उपेक्षा झाली, त्याच शिंद्यांच्या हातून ब्राह्मणेतर चळवळीचे भरतवाक्य लिहिले जाऊन तिचे केशवराव जेधे व इतर मातब्बर नेते कॉंग्रेसमध्ये गेले हा एक प्रकारचा काव्यगत न्याय म्हणावा लागेल. केशवरावांच्या नेतृत्वाची जडणघडणही याच दशकात झाली याची नोंद घेणे जरुरी आहे. याही बाबीचा उल्लेख करायला हवा, की अशा नव्या नेतृत्वाची जडणघडण पारंपरिक टिळकवाद्यांच्या म्हणजे केळकरांच्या गटात होऊ शकली नाही. त्यामुळेच नंतर त्यांना रत्नागिरीच्या सरहद्दीत बंदिस्त झालेल्या सावरकरांकडे धाव घ्यावी लागली. 

ब्राह्मणेतर चळवळीतून पुढे आलेल्या केशवराव जेधे यांनी विठ्ठल रामजींचा सल्ला घेऊनच कॉंग्रेस प्रवेशाचे राजकारण केले. स्वतः केशवरावांचा राजकीय प्रवास नेहमीच कोणाच्या तरी सहकार्याने झाला असल्याचे दिसून येते. ब्राह्मणेतर चळवळीत असताना जेधे-जवळकर ही जोडगोळी प्रसिद्ध होती. कॉंग्रेस प्रवेशानंतर जेधे-गाडगीळ (काकासाहेब) ही जोडी गाजली. कॉंग्रेसमधून बाहेर पडून शेतकरी कामगार पक्षाचे राजकारण करताना जेधे-मोरे (शंकरराव) जोडी आघाडीवर होती. शे. क. पक्षातील गटबाजीला कंटाळून हे दोघे संस्थापकच पक्षातून बाहेर पडले व परत कॉंग्रेसमध्ये गेले. पण या पर्वात त्यांची युती होऊ शकली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या ऐन भरातही जेध्यांचे नेतृत्व मागे पडले व ती पोकळी यशवंतराव चव्हाणांनी भरून काढली. 

परत एकदा वीसच्या दशकात प्रवेश करायचा झाला, तर असे म्हणता येते, की या दशकात नेतृत्वाची उभारणी करण्याच्या संधीचे चीज करणारे दोन नेते म्हणजे अर्थातच डॉ. आंबेडकर आणि कॉ. श्रीपाद अमृत डांगे. 

आंबेडकरांच्या प्रारंभिक काळात त्यांना शाहू छत्रपतींनी मोलाची साथ आणि सहकार्य दिले, हे खरे असले, तरी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र बाबासाहेबांच्या मागे उभा राहून त्यांना अशी मदत करणारा शाहूंसारखा माणूस आढळून येत नाही. त्यामुळे त्यानंतर त्यांचा जो प्रवास झाला ते स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवर असेच म्हणावे लागते. या प्रवासात त्यांना खुद्द गांधींशी संघर्ष करावा लागला हे लक्षात घेता त्यांच्या प्रवासाचे महत्त्व अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. 

असेच काहीसे डांगे यांच्याबाबतही म्हणता येते. विद्यार्थिदशेत डांगे सार्वजनिक जीवनात व राजकारणात पडले ते टिळकांच्या प्रेरणेतून. पुढे कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केल्यानंतर राजकारण करताना डांग्यांना नेहमीच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भान ठेवावे लागत असे. पण त्यामुळे त्यांनी कधी स्वात्मता सोडली होती असे दिसत नाही.

संबंधित बातम्या