ताराबाई, मालतीबाई, दुर्गाबाई

डॉ. सदानंद मोरे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

महाराष्ट्राची लोकयात्रा
 

सावरकरांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दिलेल्या लष्करीकरणाच्या संदर्भात एकूण साहित्य संमेलन नावाच्या गोष्टीची थोडी चर्चा करायची आवश्‍यकता आहे. गेल्या शेसव्वाशे वर्षांमध्ये महाराष्ट्रातील लोकांच्या संस्कृतीला जी काही वैशिष्ट्ये लाभली त्यांच्यात संगीत नाटक, दिवाळी अंक आणि साहित्य संमेलन यांचा समावेश करावा लागतो. ग्रंथकारांचे संमेलन ही न्या. रानडे यांची कल्पना साहित्य संमेलनाच्या परंपरेला बीजभूत ठरली हे आपण जाणतोच. रानडे यांच्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद न देता जोतिराव फुले यांनी शूद्रातिशूद्रांच्या वेगळ्या साहित्याचे सूतोवाच केले होते. फुले यांनी कल्पना लगेचच वास्तवात उतरली, असे झाल्याचे मात्र दिसत नाही. दरम्यान रानड्यांनी सुरू केलेली मुख्य प्रवाहातील साहित्य संमेलनाची परंपरा मात्र अबाधितपणे सुरू राहिली व महाराष्ट्रातील स्थित्यंतरांचे पडसाद तिच्यात उमटत राहिले. विशेषतः मध्यमवर्गाच्या इच्छाआकांक्षांनी ती निगडीत राहिली, अभिरुचीचे प्रतिनिधित्व करीत राहिली. मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याचा ठरावसुद्धा साहित्य संमेलनातच झाला होता.

सावरकरांना संमेलनाध्यक्षांचा मान दिला गेला, तेव्हा ते हिंदुत्ववादी विचारांचा आक्रमकपणे पाठपुरावा करणारे विचारवंत व लेखक म्हणून प्रसिद्ध झाले होतेच. आता तर हिंदुमहासभा या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची मालासुद्धा त्यांच्या गळ्यात पडली होती. मात्र, आपल्या भाषणात त्यांनी हिंदुमुसलमान प्रश्‍नाचा ऊहापोह केलेला दिसत नाही. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे असल्यामुळे त्यांनी तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. राष्ट्राच्या जीवनात युद्धाचे प्रसंग नेहमीच येत नसतात. मात्र येतात तेव्हा साहित्य, कला इ. गोष्टी दुय्यम ठरतात. सर्वसाधारण परिस्थितीत त्यांची जोपासना करायला भरपूर वाव असतो. मात्र अशा प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी या गोष्टी बाजूला ठेवून राष्ट्राच्या रक्षणार्थ सैनिक बनावे असे सांगण्याकडे त्यांचा रोख होता. या संदर्भात आणखी एका गोष्टीचाही खुलासा करायला हवा. काँग्रेसने युद्धात भाग घ्यायचे नाकारले असले, तरी मुस्लिम लीगचा मात्र ब्रिटिश सरकारला व युद्धप्रयत्नांना पूर्ण पाठिंबा होता. या समाजात सैन्यात जायचे प्रमाणही लक्षणीय होते. लष्करीकरणाच्या या प्रक्रियेत हिंदूंनी मागे पडता कामा नये असाही सावरकरांचा उद्देश होता. अर्थात ही गोष्ट त्यांनी अध्यक्षीय भाषणात आणली नाही. 

 सावरकरांच्या या ऐतिहासिक भाषणानंतर मराठी साहित्याचा जो प्रवास झाला, त्यात हिंदुत्ववादी विचारसरणीचा थेट पुरस्कार करणारा आणि साहित्याचाही दर्जा जपणारा लेखक म्हणून पु. भा. भावे यांचे नाव घ्यावे लागते. पुणे येथे १९७७-७८ मध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भाव्यांची निवड झाली. भावे आक्रमक पद्धतीचा सावरकरी हिंदुत्ववादाचा पुरस्कार करीत असत. त्यांनी डॉ. अनिल अवचट यांना दिलेल्या मुलाखतीत काही वादग्रस्त विधाने केली. त्यांच्या विरुद्ध पुरोगामी, समाजवादी, दलित अशा गटांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. संमेलनात अभूतपूर्व गोंधळ झाला. 

 मुख्य प्रवाहातील हे साहित्य संमेलन आबासाहेब गरवारे कॉलेजच्या प्रांगणात भरले असताना समोरच्याच विमलाबाई गरवारे प्रशालेच्या प्रांगणात पहिले ग्रामीण साहित्य संमेलन भरले होते. डॉ. आनंद यादव यांनी अशा प्रकारच्या साहित्याचा स्वतंत्र सुभा मांडला होता. 

 दरम्यान दलित साहित्याचा एक प्रवाह जोरकसपणे उसळून वर आला होता. भाव्यांसारख्या मुख्य प्रवाहातील मुख्य साहित्यकार दलित साहित्यावर श्‍लीलअश्‍लीलतेच्या अंगाने आक्षेप घेत दलित साहित्यालाही स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

 या वेगळ्या प्रवाहाच्या पुरस्कार्थ्यांनी प्रस्थापित संमेलनांमध्ये येऊन विरोध व्यक्त करणे, वादग्रस्त ठराव मांडणे अशा गोष्टी घडू लागल्या. साहित्यात सरळसरळ फूट पडली. ती सांधण्यासाठी सर्वांना मान्य असलेल्या प्रा. गं. बा. सरदार त्यांना अध्यक्षपद देण्यात आले. शंकरराव खरातांसारख्या दलित साहित्यिकालाच अध्यक्ष करणे हा आणखी पुढचा प्रयत्न.

 अर्थात 'भंगलिक चित्ता! नये कशाने सांधीता!!' या तुकोक्तीप्रमाणे मुख्य प्रवाहापासून तुटलेल्यांची संमेलने नुसती सुरूच राहिली असे नसून त्यात भरही पडत गेली. स्त्रिया, आदिवासी, मुस्लिम असे उपेक्षित व वंचित घटक आपापले प्रश्न घेऊन, स्वतंत्र व्यासपीठांची निर्मिती करू लागले. विद्रोही साहित्य नावाच्या प्रवाहाने तर जिला 'रॅडिकल' म्हणता येईल अशी भूमिका घेऊन समांतर व्यासपीठ निर्माण केले. दरम्यान दलित, ग्रामीण व आदिवासी या तीन प्रवाहांना एकत्र करण्याचा प्रयत्नही झाला.

 साहित्य संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांमधील सर्वांत गाजलेले भाषण म्हणजे अर्थातच कराड येथील संमेलनातील दुर्गा भागवत यांचे. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीचे सावट या संमेलनावर पडले होते. आणीबाणीच्या काळात लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आले होते. विरोधीपक्षांच्या अनेक नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. अनेक लेखक कलावंतांच्या मनाची घुसमट होत होती. ती दुर्गाबाईंनी जाहीरपणे व्यक्त केली. विशेष म्हणजे कराड साहित्य संमेलनाचे यजमान दस्तुरखुद्द यशवंतराव चव्हाण होते. साहित्याचे जाणकार रसिक म्हणून चव्हाणांची ख्याती होती. साहित्य वर्तुळातील अनेकांशी त्यांचे व्यक्तिगत पातळीवर स्नेहसंबंध होते. यशवंतराव कॉंग्रेसपक्षाचे असून आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रीही होते. त्यांनी तसेच कॉंग्रेसमधील त्यांच्यासारख्या अनेकांनी आणीबाणीचे समर्थन करीत इंदिराजींच्या नेतृत्वाची पाठराखणही केली होती. 

 आणीबाणीविरोधाचे जणू प्रतीक बनलेले ज्येष्ठ सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांना या वेळी तुरुंगात टाकण्यात आले असून त्यांची प्रकृती बरी नसल्याच्या बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर दुर्गाबाईंनी वक्तव्य तर केलेच, परंतु जयप्रकाशांना आराम पडावा म्हणून प्रार्थना करायचे आवाहनही केले. खुद्द यशवंतरावांनाही या आवाहनाला प्रतिसाद देणे भाग पडले.

 दुर्गाबाईंच्या या कृतीमुळे मराठी साहित्यविश्वात एकच खळबळ उडाली. एका लेखिकेने हे धाडस करावे याचे सर्वांनाच अप्रूप वाटले. अनेक साहित्यिकांच्या मर्यादाही उघड झाल्या. आणीबाणी उठल्यानंतर सार्वत्रिक निवडणुका लागल्या. या निवडणुकांत दुर्गाबाईंनी विरोधीपक्षाचा घणाघाती प्रचार केला. पु. ल. देशपांडे यांच्यासारखे लोकप्रिय लेखकही आणीबाणीतील दडपशाहीचा निषेध करीत इंदिराविरोधी प्रचारासाठी बाहेर पडले. निवडणुकांत कॉंग्रेसचा पराभव होऊन जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. महाराष्ट्राच्या लोकयात्रेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर लेखक विचारवंत पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून लोकभावनांचे प्रतिनिधित्व करीत होते. 

 सत्तांतरानंतर पु. ल. प्रचारकाची झूल उतरवून साहित्यिकाच्या मूळ भूमिकेत शिरले. दुर्गाबाई मात्र नंतर काही काळ तरी जनता पक्षाशी बांधील राहून निवडणुकांत प्रचार वगैरे करीत राहिल्या. अन्य कोणत्याही नागरिकाप्रमाणे त्यांना तो अधिकार होता, यात संशय नाही. तथापि, त्यांनी पक्षीय बांधीलकी न स्वीकारता स्वतंत्रपणे वावरावे किंवा पु. लं.प्रमाणे तटस्थ राहावे अशी त्यांना मानणाऱ्या अनेकांची अपेक्षा होती. 

 दुर्गाबाई या एक मनस्वी अभ्यासक होत्या, यात शंका नाही. तडजोडवादी मध्यमवर्गीय मराठी लेखकांना त्यांची एक प्रकारची दहशतच होती, असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती नाही. एकूणच साहित्यवर्तुळात त्यांचे एक स्थान व दबदबा होता. भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर अश्‍लीलतेचा शिक्का मारून चौफेर हल्ला चढवणाऱ्या आचार्य अत्रे यांचा प्रतिवाद करायला दुर्गाबाईच पुढे आल्या होत्या. 

 अर्थात त्यांच्याशीही दोन हात करायला सरसावणारे लेखक मराठीत होऊन गेले. दलित चळवळीतील मानदंड म्हणून ओळखले जाणारे नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांची नावे या संदर्भात उल्लेखायलाच हवीत. बाबासाहेबांच्या पश्‍चात कुंठित झालेल्या दलितांच्या राजकारणात ढाले-ढसाळांमुळे नवचैतन्य आले, हे तथ्य कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांनी दलित पँथर संघटना काढून भल्याभल्यांची झोप उडवली. ‘साधना’ साप्ताहिकातील एका लेखात राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे लेखन केल्याबद्दल राजा ढाले यांना दुर्गाबाईंनी जाब विचारला, तेव्हा ढाले आणि पँथर्स यांनी दुर्गाबाईंचा दबाव झुगारून देत त्यांना कडक उत्तर दिल्याचे तेव्हाच्या पिढीला स्मरत असेलच. 

 योगायोग म्हणा किंवा आणखी काही, इंदिराजी आणीबाणी लागू करीत असताना आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जागतिक पातळीवर साजरे होत होते. इंदिरा गांधींचा उल्लेख तेव्हा ‘पार्लमेंटमधील एकमेव पुरुष’ असा केला गेला, तेव्हा आणि नंतर दुर्गाबाईंचे उल्लेख मराठी साहित्यिकांच्या पार्श्‍वभूमीवर अशाच तऱ्हेने होत राहिला. समाजात तेव्हा स्त्रीची सर्वसाधारण प्रतिमा ‘अबला’ अशीच असल्याचे लक्षात येते. दुसरीकडे पुरुष मात्र बलवान, कर्तृत्ववान असे समीकरणही होतेच. पुरुषांना बांगड्या भरायला सांगणे किंवा त्याला स्त्रियांनीच बांगड्यांचा आहेर वगैरे करणे या सांकेतिक कृतींमधून समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेचे दर्शन होते. आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त झालेल्या विचारमंथनातून व कार्यक्रमांमधून स्त्रीप्रश्‍नांचे एक वेगळे भान यायला सुरुवात झाली. वस्तुतः स्त्रीप्रश्‍नाची चर्चा एकोणिसाव्या शतकाच्या अंतिम चरणात सत्यशोधक ताराबाई शिंदे यांनी केवढ्या तरी उंचीवर नेऊन ठेवली होती. ताराबाईंनी लिहिलेल्या ‘स्त्रीपुरुष तुलने’शी तुलना करता येईल असे पुस्तक मराठीत आजतागायत लिहिले गेले नाही, यात सर्व काही येते. 

 ताराबाईंनंतर घेण्यासारखे नाव म्हणजे, अर्थातच विभावरी शिरूरकर या टोपणनावाने लिहिणाऱ्या मालतीबाई बेडेकर होय. ‘कळ्यांचे निःश्‍वास’ या त्यांच्या पुस्तकामुळे सारे साहित्यविश्व हादरून गेले होते. पारंपरिक चौकटीत वावरणाऱ्या मध्यमवर्गीय स्त्रियांच्या कोंडीला बाईंनी जी वाचा फोडली, तिची इतिहासाने दखल घेतली आहे. त्या काळात ज्याच्या त्याच्या तोंडी विभावरी शिरूरकर नेमक्या कोण याचीच चर्चा असे. अनेकांना हा कोणीतरी टोपणनावाने लिहिणारा पुरुषच असला पाहिजे असे वाटले. आचार्य अत्रे यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘म. भा. भू. (महाराष्ट्र भाषाभूषण ज. रा. आजगावकर) पासून भा. भा. भो. (‘भाला’कार भास्करराव भोपटकर) पर्यंत सर्वांवर तुम्हीच विभावरी असल्याचा आरोप झाला. पुण्यातील मंडईतील रंगोबा लडकत हे बटाट्याचे व्यापारीच तेवढे राहिले होते.’ आता ही झाली अत्रेशैलीतील अतिशयोक्ती; पण वातावरण समजून घ्यायला ती मदत करते हे नक्की. विभावरी असल्याच्या वहिमातून मामा वरेरकर व स्वतः अत्रेही सुटले नव्हते. ‘गतभर्तृक’ नामक कादंबरी ‘विधवाकुमारी’ यांनी लिहिली होती. पुढे मामाच या कादंबरीचे लेखक असल्याचे समोर आले. तेव्हा अत्र्यांनीच ती विधवाही किंवा कुमारीही नसून तो एक मिशाळ बाप्या होता, अशी टवाळी केली होती. 

थोडक्यात, मालतीबाईंनंतर गाजल्या त्या दुर्गाबाईच!

संबंधित बातम्या