व्हिसलजी 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 8 मार्च 2018

मनावनातल्या गोष्टी 

वस्तुस्थिती आणि कल्पना यांच्या सीमारेषा तपासणाऱ्या विज्ञान ललित कथा... 

लखूनं व्हॉट्‌स ॲपवर आलेला तो व्हिडिओ पाहिला. पुन्हा पुन्हा पाहिला. त्याला झपाटल्यासारखंच झालं. शीळ वाजवणारं गाव! दूर कुठंतरी तुर्कस्तानात काळ्या समुद्रापाशी डोंगरात एक गाव आहे म्हणे. असं मजेशीर गाव की तिथं फक्त शीळ घालून एकमेकांशी संवाद साधतात. शब्दबिब्द काही नाहीच, फक्त आवाज. बोटं आणि ओठ वापरून मजेशीर आणि मंजुळ ध्वनी निर्माण करायचे. फिऽऽऽकुऽऽऽफि म्हणजे काय, तर म्हणे चहा थंड होतोय, लगेच या. की पलीकडून साद आलीच, कुऽऽऽफिक! म्हणजे आलोच! किती छान. सुंदर पर्वतीय प्रदेश. तिथले ते रंगरंगीले डोंगरउतार. त्यावरची चिमुकली घरं. कुठं तरी शेतात काम करणारे अहो किंवा अगं. तो वाट बघणारा वाफाळता चहा (तो काही व्हिडिओमध्ये नव्हता. पण लखूनं तो कल्पनेनं डोळ्यासमोर आणला) ती डोक्‍याभोवती काश्‍मीरीसुंदरीप्रमाणं रुमाल गुंडाळलेली शिट्टीसुंदरी आणि शेतातला भाग्यवान तो. क्‍लोजअपमधे दोघंही जरा बुढेच दिसले. अरे, पण त्यानं काय फरक पडतो. किती रोमॅंटिक आहे यार. असा बुढापासुद्धा बेष्टच आहे. सगळं कशाला सारखं तरुण आणि दिलखेचक हवं!? 

व्हिडीओमध्ये बऱ्याच शिट्ट्या ऐकू येत होत्या. ‘उद्या माझ्याकडचा मका काढायचाय रे’ ऽऽऽइक! की तिकडून आवाज, ‘कुऽऽ’ म्हणजे ‘ओक्के.’ वाह! काम झालंसुद्धा. व्हिडिओ सांगत होता, एकतर या दुर्गम भागात रेंज नाही. म्हणजे फोनचं काम अवघडच. दुसऱ्या एक आजीबाई पुढचं वाक्‍य म्हणाल्या, ‘दुसरं असं की शीळ वाजवायला काही पैसे पडत नाहीत. एकदम फुकट मामला.’.. आणि इतक्‍या मिस्कील हसल्या. ‘प्रेमाच्या गोष्टी तेवढ्या शिट्टीनं सांगता येत नाहीत. त्या जवळ बसवूनच सांगाव्या लागतात. नाहीतर सगळ्यांना ऐकू जातील ना.’ एवढं बोलून आजीबाई चक्क लाजल्या. लखू हर्षभरित झाला. कित्ती सोप्पंय सारं. किती निर्व्याज. किती मधुर. मनानंच तो त्या व्हॅलीत जायची तयारी करू लागला. 

लखू शिट्टी मारत होता आणि ती ज्याची त्याला कळत होती. उगा राँगनंबर नाही. लाल्लालाला! लखूला ते गाव आणि तिथली माणसं भयंकर आवडू लागली. आपण कधीतरी गेलो तर इकडंच जायचं असं त्यानं मनाशी पक्कं करून टाकलं. त्या आनंदातच तो शिट्टी वाजवू लागला.. फूऽऽऽऽऽ वेट अ मिनीट! आपलीच शिट्टी आपण परत ऐकू बरं! हे काय म्हणतोय आपण? आपण असं म्हणतोय की आपण खूप आनंदात आहोत. शिट्टी वाजवण्याला आपल्यात फार वेगळे अर्थ नाहीत या विचाराची सूक्ष्म छाया त्याच्या मनात डोकावून गेली. शिट्टी वाजवण्यावरून बोलणी खाऊ घालणारा हा समाज! यांना काय कळावं शिट्टीतील नादमाधुर्य! पक्षीसुद्धा याच भाषेत बोलतात. व्हिडिओमध्ये म्हटलंय सुद्धा, की इथल्या लोकांनी ही भाषा पक्ष्यांकडूनच घेतली. घ्या! आमच्या इथं एकतरी पक्षी नाहीत. आहेत ते कावळे, घारी भीषण आवाज करतात. ज्याचा एकमेव अर्थ, गिळायला कुठं चांगलं आहे असाच होतो. पोपटांना आपण आपलीच भाषा शिकवण्याचा चंग बांधला आहे आणि पोपट ती भाषा आत्मसात करताहेत किंवा नाही यावर शतकानुशतकं एकवाक्‍यता नाही. लखूचे जन्मदाते तर पोपटावर आणि त्याला लाडावून ठेवणाऱ्या मनुष्यमात्रांवर चांगलाच खार खाऊन होते. ते काढत असत तसा पोपटाच्या नकलीचा किर्र आवाज खुद्द पोपटसुद्धा ऐकत राहील असा असायचा. पण ती गोष्ट आता जुनी झाली. पक्षी बोलतात, खूप सारं बोलतात, आपल्याला कळो अथवा न. असं आताचं विज्ञान सांगतं. लखू विज्ञानवादी होता असं त्याचं पूर्वापार मत होतंच. विज्ञानाच्या नवनव्या शाखांचा त्याला उपयोगच होत होता. त्यानं जेव्हा पक्षीविज्ञान असं काही ऐकलं तेव्हा त्याला अस्मान ठेंगणं झालं. अगदी असंच हलकंफुलकं विज्ञान त्याला शिकायचं होतं. त्या भौतिक आणि रसायनमध्ये ठेवलंच काय होतं! नुसतं समोरच्याला गारद करण्याची सोय. पण पक्षी विज्ञानात तसं नव्हतं. तासनतास पक्षी बघण्याची मुभा होती (हे वाक्‍य त्याला हेटाळणीच्या सुरात अनेकदा ऐकावं लागलं, चालले पक्षी बघायला! पण लखूनं दाद दिली नाही.) किंबहुना तासनतास पक्षी बघण्याची तंबीच होती. लखूला ती चांगलीच मानवली. हातात ॲप आणि कॅमेऱ्यानं सुसज्ज फोन घेऊन तो कधी पक्षी निरीक्षकांच्या जथ्याबरोबर तर कधी एखाद्या एकांड्या पक्ष्याप्रमाणं लवकर उठून जंगलात जाऊ लागला. आवाज रेकॉर्ड करू लागला. फोटो काढून अपलोड करू लागला. कामातसुद्धा त्याचं लक्ष पक्ष्याकडं असायचं. एखादी ओळखीची शीळ आली की तो स्वतःशीच म्हणायचा, ‘चाय पिओ चाय..’ अरे हा तर आयोरा! समोर कुणी असेल तर त्यांना जरा चमत्कारिक वाटायचं. आयोरा? म्हणजे कोण? पक्षी? तो चहा पिऊ असं म्हणतोय? लखूचं काही खरं नाही.. लखू मात्र मजेत शीळ घालत चहा प्यायचा. 

ही गंमत छान होती. स्वतःचंच गंमतजग! त्याला पक्ष्यांची शीळ इतकी चांगली जमू लागली होती, की तो बागेत पक्ष्यांची नक्कल करून त्यांच्याशी पण गंमतखेळ करू शकू लागला. आपण आवाज दिल्यावर त्याला मानवेतर विश्‍वातून प्रत्युत्तर येतं ही किती विलक्षण गोष्ट. कुत्री मांजरी ‘बोलतात’ म्हणे! त्या पाळीव भूत्कारात लखूला काही स्वारस्य नव्हतं. निसर्गात आपल्या मर्जीनं उडणारे जीव.. त्यांच्याशी बोलण्यात जी मजा आहे ती या तुकडे टाकल्यावर गोळा होणारांत आहे की काय! अर्थात लखूच्या या कौशल्यालाही मर्यादा होत्या. सगळे पक्षी काही आपल्याला दाद देत नाहीत हे लखूला लवकरच कळून चुकलं. तो त्यांच्याशी बोलतोय आणि त्यांनी मात्र त्याची दखलही घेऊ नये हे वास्तव त्याला टोचलं. पक्षीच ते. त्यांनी कदाचित थोडावेळ कौतुक केलं असेल, आपली भाषा शिकणाराचं. पण त्यानं काय तो त्यांच्यातला होतो काय! ते पुढं पुढं लखूची दखल घेईनासे झाले. निदान लखूला तरी तसंच वाटू लागलं. एक प्रकारची पोकळी त्याच्या मनात निर्माण होऊ लागली. 

या पार्श्‍वभूमीवर जेव्हा त्यानं शीळ घालणाऱ्या गावाची गोष्ट ऐकली (म्हणजे पाहिली) तेव्हा तो हर्षभरित झाला यात नवल ते काय! त्याला असं वाटलं आपल्याला हवं होतं ते हेच. स्वप्नातला गाव. खास आपल्यासारख्यांचा गाव. जालीम जमाना जो सगळं फक्त शब्दबंबाळ करून ठेवतो तो एका बाजूला आणि गोड शीळ घालून एकमेकांच्या हृदयाच्या तारा छेडणारे दुसऱ्या बाजूला. आपण मानसिकदृष्ट्या अशा एका गोड जगाचे रहिवासी आहोत हे लखूनं मनाशी पक्कं केलं.  

आता हे आपल्या मनातलं गुपित कधीतरी दुसऱ्याशी बोललं तर गेलं पाहिजे ना. त्यानं इतर पक्षीमित्रांना साद घातली. व्हिडिओ शेअर केला. त्यावर अंगठे आले. वॉव आलं. पण तेवढंच. लखूची जशी तार छेडली गेली होती तसं इतरांचं होईना. ते अजूनही वेगळेच प्लॅन्स करत बसले होते, या जंगलात जाऊ, त्या टेकडीवर जाऊ इत्यादी. ते पक्षी बघायला जे कधीच आपली साद ऐकून आपल्याला खराखुराचा प्रतिसाद देणार नाहीत. लखूचं त्यातून मन उठल्यासारखं झालं. आपल्या तथाकथित पक्षीनिरीक्षणामागं माणसाशी संवादाची एवढी भूक आहे हे कळून त्याला आश्‍चर्य वाटलं. पण आहे ते आहे. लखूच्या मनात शीळ वाजत होती. त्या गावातली माणसं पण हेच नव्हती का सांगत, की ते त्यांची शिट्ट्यांची भाषा पक्ष्यांकडून शिकले म्हणून? पण शेवटी ते पक्ष्यांशी नाही, एकमेकांशी बोलू लागले. 

आपण त्या गावाला जायला काय हरकत आहे? लखूच्या डोक्‍यात विचार चमकला. आपण बघूनच येऊ. याची डोळा, (खरंतर याचे काने) शिट्टी ऐकून येऊ. लखूला ही कल्पना आवडली. त्यानं त्या गावाची माहिती गोळा करायला सुरवात केली. कसं बरं जाता येईल तिथं? तुर्कस्तान, टर्की. अभ्यास करता करता लखूच्या लक्षात आलं, की इथं पर्यटनाची काही कमी नाही. पण मधूनच त्या दहशतीच्या बातम्या का डोकं वर काढतायत? हा काही शांतताप्रिय देश नाही नक्की. टर्किश डिलाईट इथं आपल्यापाशी दुकानात मिळालं तर साजरं. त्यासाठी सुखाचा जीव दुःखात घालावा का? धाडसी काही करणं आणि करण्याची कल्पना करणं यातला फरक होता लखू. शिवाय, त्यानं विचार केला, शिवाय मी एवढं धाडस करून तिकडं गेलोच, ते गाव शोधून काढलंच, तरी पुढं काय? ते गावातले लोक आणि पक्षी यात काय फरक असणार आहे? माझी शीळ त्यांना काय समजणार आहे? आणि समजली तरी ते किती प्रतिसाद देणार आहेत? लखूचं मन डळमळलं. मनातली शीळ बारीक झाली. शब्द उमटत नाहीत, आणि शीळ ऐकू जात नाही.. अशी स्थिती! काय करावं.. लखू खिन्न झाला.. 

बराच वेळ असा गेल्यावर लखूच्या डोक्‍यात अचानक एक ब्रेनवेव्ह आली. त्याला असं वाटलं, आपण त्या गावी नुकतेच जाऊन आलोत. इथून इस्तंबूल, मग तिथून काळ्या समुद्राजवळचं डोंगरातलं गाव. ते हिरवे उतार, इथली थंडी. ती छोटी छोटी शेतं आणि शेतात काम करणारे सुंदर तुर्की (का कुर्दी?) स्त्री-पुरुष.. आणि एक शीळ! ती कानावर आलीच. तिचा अर्थही लखूला ठाऊकच होता. आलोच! तो ओरडला, चहा तयार आहे ना? फीऽऽऽइक! फार मस्त झाली ट्रीप. तिथून परत आल्यापासून आपल्या मनात एक कल्पना घोळते आहे असंही लखूला वाटू लागलं. व्हॉट्‌स ॲपवर जसे इमोजी असतात, तसे व्हिसलजी का असू नयेत? असले तर कोणते असतील? 

या भन्नाट विचारासरशी लखूनं एक शीळ स्वतःशीच घातली आणि तो चहा प्यायला उठला. त्यानं स्वतःलाच जशी काही साद घातली होती. त्याचं पुढचं मिशन ठरलं होतं. मिशन व्हिसलजी!  एकच अडचण होती. काम (!) आणि धंदा दोन्ही गोष्टी व्हॉट्‌स ॲपवर चालतात त्या बिन आवाजी. तिथं शिट्टीचं काय काम? लखूला उत्तर सापडलं, की व्हिसलजी आलेच म्हणून समजा.. 
तोवर... फीऽऽऽऽइक!!

संबंधित बातम्या