वेड्याचं कुरण 

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 9 मार्च 2018

मनावनातल्या गोष्टी 
 

संध्याकाळी टेकडीवर गवतात बुडून बसलेले असताना बरंच काही दिसू-ऐकू-स्पर्शू येतं... त्यात गंधही मिसळलेला असतोच. थोडा जोरात सुटलेला वारा कानाच्या पाळीभोवती फुंकर घालतो, झाडावरून छोट्या छोट्या वाळक्‍या पानांचा पाऊस पडू लागतो, गवताच्या काडीवर बसलेला वेडा राघू एक मजेदार गिरकी घेऊन शेजारच्या काडीवर बसतो. या राघूला जर यात मजा वाटत असेल तर या ‘वेड्या’ला सगळं कुरण आंदण मिळालंय.. माझ्या मनात विचार येतो. याच्या मजेची काय गणती? हवेत गिरकी घेऊन एकेका काडीवर बसणाऱ्याला कुरण आंदण! कुणी पक्षी उन्हाळ्याला हिमालयातच जायचा हट्ट धरून बसला तर..? तर कुरण काही तेवढं मजेचं नाही. राघू कधी कंटाळून बसलाय असं अजून पाहण्यात नाही. त्याचं समाधान आणि त्याचा कंटाळा या दोन्ही गोष्टी मला कधीच कळणार नाहीत. या दोन्ही गोष्टी माझ्यापाशी आहेत एवढं नक्की कळेल. 
‘एवढ्याच गवतात अजून किती मेलं मन रमवायचं आम्ही..’ असं राघूचं झालं की त्यालाही कुरण छोटं पडेलच. उगाच नाही त्याला वेडा राघू म्हणत, त्याला हिमालयाची स्वप्नं पडली की तो शहाणा होईल. आमच्या टेकडीवर लोक हिमालयाची प्रॅक्‍टिस करायला येतात. चालताना कुणी भेटलं तर टेकडीवर ‘चला’ म्हणायची पद्धत आहे. चला म्हणजे हॅलो! सहसा हे ‘चला’ टेकडीवर नेहमीच्या लोकांत घडतं. कधीमधी येणाऱ्यांना विचारलं, की अरे वा, आज इकडं कुठं? तर ‘हिमालयाची प्रॅक्‍टिस’ असं उत्तर अनेकदा मिळतं. महिन्याभरानं हिमालय गाठायचा असला, की गावची टेकडी पाठीवर ओझी घेऊन जवळ करायची. असा उद्योग करणारे (त्यात अनेकदा सीनियर सिटिझन्स असतात) बरेचदा भेटतात. त्यांच्याकडं बघून वाटतं, की एरवी आम्ही सारे एका काडीवरून दुसऱ्या काडीवर बसणारे वेडे राघूच असतो. पण आता मात्र आमच्यातीलच एक शहाणा राघू व्हायला निघालेला आहे. वेड्या राघूचं मन क्षणभर दोलायमान होतं.. पुढचं गवतानं सळसळणारं कुरण धुंदलं होतं. दूरस्थ पर्वताच्या साजरेपणाची मनाला मोहिनी पडते. यंत्रवत पाय उचलताना पुढून हाक ऐकू येते, ‘चला.’ चला! चरैवेति! चालत राहा!! ‘हॅलो’ऐवजी ‘चला’ हे अर्थांच्या शक्‍यतांच्या बाबतीत उजवं आहे. शब्द वापरायचा तर त्याच्याकडून नीट काम करून घेता आलं पाहिजे. शब्दानं एकापेक्षा दोन अर्थ पुरवल्यास कष्ट वसूल! त्यातून दुप्पट अनर्थ ओढवू शकतो हे ही ध्यानी ठेवावं लागतंच. चला! 
बरं का रे वेड्या (हे राघूला उद्देशून आहे), आम्ही माणसं तुला चालताना दिसलो ना तरी नेहमी एका अदृश्‍य घोड्याच्या पाठीवर मांड घालून बसलेले असतो. खोगीराला नेहमी दोन बाजू. समाधान आणि कंटाळा, मालकी आणि मुक्ती, आता आणि नेहमी, इथं आणि सर्वत्र या आणि अशा! आम्हाला या अदृश्‍य घोड्यावर आधीच चढवून दिलं आहे. त्यावर बसून ‘जशी दिशा तसा जातो कोणत्याही गावा’ अशी आमची चाल. मोठा मजेशीर मामला आहे. तुम्हाला दिसतात का आमच्यातील काही बेधुंद दौडत जाताना? काही निर्जीवपणे चालताना? काही उलटे बसलेले तर काही झोकांड्या खाणारे. घोड्यावरून पायउतार एकदाच होता येतं. इकडं तिकडं बघत, सावधपणे; पण रमतगमत जाणारे फार थोडे. आमच्यात हे सारे प्रकार आहेत. आज सावकाश जाणारे अचानक टाच मारू शकतात आणि आज भरधाव घोडा सोडणारे अचानक सावकाश पावलं टाकू लागतात. काहीही होऊ शकतं. 
काहीही होऊ शकतं हे माहीत असेल तर घोडा ताब्यात आलाच म्हणून समजा, बरं का रे वेड्या, एक गोष्ट आहे, खूप खूप जुनी. भिंतीवर चित्र काढणाऱ्या आदिवासींची. फार सुंदर चित्रं काढत. अशाच एका चित्रात एक घोडा होता. दिव्य घोडा. त्याला स्वर्गीय पंख होते. मोकळ्या रानात मोकळा उभा असलेला जादुई घोडा. हे चित्र ज्यानं काढलं तो अगदी खूष झाला होता. स्वतःवर आणि घोड्यावर. घोड्याला चित्रात उभा करून तो समाधानानं झोपला. रात्री घोडा चित्रातून बाहेर पडला. हवा तिथं हिंडला. परत चित्रात येऊन उभा राहिला. असं बरेच दिवस चाललं. दुसरीकडं एक शेतकरी चिंतेत पडला. रोज रात्री त्याचं शेत कुणीतरी फस्त करून जात होतं. कोण होतं? कुंपण तर कुठंच तोडलेलं दिसत नव्हतं. एक दिवस त्यानं जागं राहून पाहिलं. शेजाऱ्याच्या चित्रातला घोडा त्यानं लगेच ओळखला. पण तो त्याच्या हाती येईल तेव्हा ना! शेतकऱ्यानं शेजाऱ्याकडं जाऊन तक्रार केली, तुझा घोडा माझ्या शेतात येऊन शेत फस्त करतो, त्याला आवर. चित्रकार बुचकळ्यात पडला. असं करतो हा घोडा? त्याला आवर घालावा तरी कसा? विचार करताना त्याला शेवटी कल्पना सुचली. त्यानं चक्क त्या चित्रातल्या घोड्याला चित्रातच एका साखळदंडानं खांबाला बांधून टाकलं. असं म्हणतात, की त्यानंतर काही तो घोडा कुठं बाहेर गेला नाही. सगळे सुखी झाले. 
या घोड्याला केवळ चित्रात बांधून ठेवता येतं नाही वेड्या? प्रत्यक्षात तोच आम्हाला घेऊन हिंडवतो. खाली फेकून देतो तो फक्त एकदाच, कायमचं. एकदा कुणीतरी या घोड्याला जेरबंद करून ठेवायला हवंय, मग कळेल. कुणाच्या चित्रातला घोडा आहे हा? आणि कुणाचं शेत खातोय? 
तर टेकडीवरच्या गवतात बुडून असे सगळे विचार मनात येतात. आपण बसलोय त्या घोड्याला चुचकारण्याचेच हे प्रकार. पण एवढंच नाही बरं का वेड्या, आम्ही घोड्यावर बसलोय हे तर खरंच. पण एवढं लक्षात आल्यावर आम्ही काय करतो माहितीये? आम्हीपण आता घोडे बनवतोय. अगदी हुबेहूब आमच्या घोड्यासारखेच पण अतिजलद आणि अतिबुद्धिमान घोडे. आपण बसलोय तो घोडा आहे तरी कसा, जन्माला आला तरी कसा याची चौकशी करता करता आम्ही आमच्याही नकळत नवीन घोडे बनवायला सुरवात केली. आता या नवीन घोड्यांचा वेग आम्हाला झेपेल की नाही!? प्रश्‍न प्रश्‍न मनात येतात. नवीन वारू जास्त चलाख आहे, आम्हीच बनवलं असलं तरी आम्ही त्याच्याकडं भयभीत होऊन पाहावं अशी स्थिती. आम्हाला तो सुखरूप वाहून नेईल की आमची फरफट होईल? फरफट होतेय हे कळेल तरी का? हे घोडे फार निर्मम आहेत म्हणे, त्यांच्याशी जुळवून घ्यायला जमलं नाही तर ते चक्क तुम्हाला फेकून देऊ शकतात. 
तुला या घोड्यांच्या टापा ऐकू येतात वेड्या? इतका आत्ममग्न राहू नकोस. एका काडीवर स्थिर बैस आणि कानोसा घे. ऐकू येतीलच तुला त्यांच्या टापा. त्यांनी उडवलेला धुरळा इथवर पोचायच्या आधी इथून ऊठ कसा! आपल्या भाईबंदांनाही सांग. पण तुझीही गोष्टच वेगळी. ज्या गवताच्या काडीवर तू झुले घेतलेस ते गवत भुरूभुरू जळत असताना तू त्यात तुझं अन्न शोधतोस. या नवीन वादळाला तू कसा तोंड देशील? मला उत्सुकता आहे. 
मला माझ्याबद्दलही उत्सुकता आहे. नव्या वारूचा वेग मलाही खुणावतो आहे. त्याच्या दिमाखदार पाठीवर बसून दूर उडत जाण्याचं स्वप्न मलाही पडतं. त्यानं मला दूर भिरकावून दिलं तर? ही भीती माझ्याही मनात डोकावते. दिमाखात दौडत जाण्याच्या धुंदीत जर पाठीवर असताना वेग सोसत नाहीये असं लक्षात आलं तर? तर पायउतार होण्याची संधी असेल? जत्रेत मुलांना अशाच गाणाऱ्या, वेगानं गोल गोल चक्कर मारणाऱ्या, खोट्या घोड्यांवर बसवलेलं मी पाहिलं आहे. मेरी गो राउंड. मुलं त्या घोड्यावर बसायला सुरवातीला उत्सुक असतात. पण दुसऱ्या - तिसऱ्या चकरेनंतर भोवळ येऊ लागते, आजूबाजूची दृश्‍यं फिरू लागतात आणि मूल केविलवाणं होऊन आईबाबाचा चेहरा शोधतं, आपल्याला इथून उतरवण्यासाठी विनवतं. आई पटकन पुढं होऊन बाळाला उचलते. बाळाचं रडं शांत होतं. एका अनामिक भयानं ते घोड्याकडं बघतं. त्याच्या मनातल्या मजेच्या रपेटीचा खुर्दा झालेला असतो. आईबाबा त्याला ढीग समजावतात, ‘अरे बाबा, खेळणं आहे. मजा येते. घाबरू नकोस.’ पण बाळाला काही त्यावर पुन्हा बसायचं नसतं. लगेच तर नाहीच नाही. पुन्हा कधीतरी बघू. त्याची समजूत घालत आई त्याला खाऊ देते. 
आमच्यासाठी हे आईच्या मायेनं कोण करणार आहे वेड्या? आमचं आम्हालाच करायचं आहे. तू उत्तर देणार नाहीस, पण तुला ठाऊक असेल का? आमच्या या घोड्याला साखळदंडानं बांधून ठेवणारं कुणी आहे का? त्याला जाऊन तू आमचा निरोप का नाही सांगत? आमचं शेत फस्त होतंय म्हणावं, आवर तुझा घोडा! 
अंधार भरत आलाय, तुझं कुरण आज तरी सुरक्षित आहे. उद्याची फिकीर नसल्याप्रमाणं तू शेपटी हलवत बसलाहेस. वेडा म्हणजे काय हे तुला माहीत नाही आणि राघूही! आजच्या संध्याकाळचं या कुरणाचं चित्र आपण दोघांनी मिळून पूर्ण केलं आहे इतकंच.

संबंधित बातम्या