कृष्णायस 

मृणालिनी वनारसे 
गुरुवार, 17 मे 2018

मनावनातल्या गोष्टी

तीन हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. मगधात चंद्रकेतू नावाचा राजा राज्य करीत होता. राजा होता, राज्य होते पण राज्य करण्यासारखे होतेच काय? त्याची छोटीशी नगरी, त्यात शेणामातीच्या घरात राहणारे, अंगावर फारशी वस्त्रे न घालणारे, मातीची भांडीकुंडी वापरणारे साधेसे लोक. नगराबाहेर अरण्य आणि पार करायला दुष्कर अशी गंगा! कुणावर राज्य करायचे? या नगरात येणार कोण आणि जाणार कोण? 

तरी राजाचे राज्य होते, लहानसा राजवाडा होता. राजवाड्याला लाकडी खांब होते. त्यावर स्थानिक कारागिरांनी त्यांना आवडेलसे कोरीव काम केले होते. चंद्र सूर्य रेखाटले होते. मोर काढले होते. पानाफुलांच्या वेली कोरल्या होत्या. मगधाच्या आसपासच्या जंगलात उत्तम लाकडे भरपूर. पण ती महाकाय आकाराची झाडे जमीनदोस्त करणे आणि वाहून आणणे मुश्‍कील. दगडी हत्यारांनी काय काय साधावे? 

अयस! आपल्या राज्यात तांबं भरपूर आहे, अशी राजाला खबर होती. तो लागेल तसे काढूनही आणत होता. त्यात राजस्त्रियांची हौसच जास्त होत होती. अतिशय मऊ धातू तो! थोडी आच दिली, की वाकवायला सोपा. त्याचे दागिने, केसांची आभूषणे अशा नाजूक गोष्टीच बनायच्या. राणीची आवड म्हणून तांबं घासून चकचकीत करून त्याचे आरसे पण बनवले होते तिच्यासाठी. अशा खास हौशीसाठी कलिंगाहून आणवलेल्या शंखाच्या, मोत्यांच्या माळा कारागिरांना देऊन टाकायला कमी करायची नाही राणी! 

पण राजा समाधानी नव्हता. या विस्तीर्ण पसरलेल्या पूरमैदानांच्या पार, हिमालयाच्या, हिंदुकुश पर्वताच्याही पार काय आहे, कोण आहे, तिथं माणसं राहतात कशी हे जाणून घेण्यात त्याला कोण दिलचस्पी वाटे. दक्षिणेकडं खाली जावं, तर नर्मदापार जंगलांनी जमीन व्यापून टाकली आहे असं त्याच्या कानावर होतं. तिथं माणसं काही नवनिर्मिती करत असतील याची शक्‍यता खूपच कमी होती. आणि जंगलं इथं, मगधात काय कमी होती म्हणून अरण्याचा माग काढत नर्मदेपार जायचं होतं? त्यात काहीच आकर्षक नव्हतं. ती अरण्यं आणि त्यात राहणाऱ्यांना त्रास द्यायचा नाही असंच धोरण होतं त्याचं आणि आजूबाजूच्या इतर छोट्या राज्यांचं! हे अरण्यवासी दूर राहून राज्यासाठी फार मोठी कामगिरी बजावतात हे ठाऊक होतं सर्वांना. राज्यावर बाहेरून आक्रमण होत असेल, तर त्याचा पहिला वार अरण्यवासी झेलत. तिथून खबर राजवाड्यापर्यंत पोचत असे. आपली कुमक गोळा करायला, हल्ल्याची तयारी करायला मग थोडा अवधी मिळे. 

या खेरीज जंगलात उत्तम लाकडाची झाडं कोणती आणि कुठं, ती दगडी अणकुचीदार हत्यारानं पोखरून आडवी कशी पाडायची, वाहून कशी आणायची याचं ज्ञान त्यांनाच तर होतं. त्यांनाच माहीत होतं मध, डिंक, लाख अशा गोष्टी कशा गोळा करायच्या, फुलं पानांचे रंग कसे बनवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं - उत्तम शिकारीच्या जागा कोणत्या. या सर्वांसाठी राजाचं अटवीवासीयांसाठी उरलेल्या प्रजेपेक्षा वेगळं धोरण होतं. राजा त्यांच्याकडून कोणताही कर घेत नव्हता. फक्त त्यांनी शिरजोर होऊ नये एवढी खबरदारी त्याला घ्यावी लागे. अर्थात त्या आघाडीवर आजपर्यंत तरी फारशी चिंता नव्हती. हे अरण्यवासी लोक फारसे उपद्रवी नव्हतेच. त्यांना त्यांचं रान सोडून बाहेर यायचंच कुठं होतं? एखादी पारध मनासारखी झाली, नगरातून थोडंसं मीठ आणि अशाच काही गोष्टी मिळाल्या, की मंडळी खूष! त्यांचे देवही नगरवासीयांपेक्षा वेगळे. पूजापद्धती वेगळी. दूर रानात त्यांच्या गोष्टी चालताहेत याचा नगरजनांना त्रास नव्हता आणि रान हवं ते सारं पुरवत असल्यामुळं अरण्यवासी कशाला बाहेर यायचं नाव काढताहेत! क्वचित राजा एखाद्याचं कसब, कारागिरी बघून बक्षीस देई, त्यांचं कौतुक करी. ते आमिष मात्र मोठं असे. हिरू आज अशाच आमिषाच्या दिशेनं राजनगरीकडे निघाला होता. त्याच्या हातात बाणाचं टोक होतं. साधासुधा बाण नव्हता तो. एक खास वस्तू होती. इतर बाणांपेक्षा वेगळी, अधिक अणकुचीदार, अधिक ताकदवान. तो ती वस्तू महाराजांना दाखवणार होता आणि कौतुक झेलणार होता. 

‘खूष होतील...’ हिरू मनात विचार करत होता. ‘कदाचित एखादी शिंपल्यांची माळ देतील किंवा एखादा मोत्यांचा हार! पण मी म्हणेन मला नको काही! आमच्या रानातून जाताना आमच्याकडं पायधूळ झाडा म्हणजे झालं. बायको रागावेल. तिला वाटतं आहे मी आज नगरातली काही मेवामिठाई घरी घेऊन जाणार आहे. पण मी तसं काही करणार नाही. मुलांना मग हट्ट करायला चांगलं खेळणं मिळतं. रान आपल्याला देतंय ते काय कमी आहे? महाराजांना नव्या गोष्टी आवडतात म्हणून मी चाललो आहे फक्त. मागं ते रानात आले होते तेव्हा आमचा वीस पुरुष उंच पुराण वृक्ष बघायला किती लांब चालत आले होते. तो वृक्ष बघून अचंबित झाले होते. त्याच्याच सान्निध्यात बसून मग आम्ही गुजगोष्टी केल्या होत्या. महाराजांना दूरदेशीच्या गोष्टी जाणून घेण्यात कोण रस! आमच्यातले फिरस्ते हेरून ते म्हणाले, ‘नजर असू द्या! कुठं काय वेगळं दृष्टीस पडतं ते जाणून घ्या आणि आम्हाला कळवत राहा. मगधाचा अंगरखा आहात तुम्ही. तुमच्या संरक्षणाखाली राजनगरी सुरक्षित आहे.’ महाराजांनी आमच्याबरोबर एवढ्या गप्पागोष्टी केल्या एवढ्यानंच आम्ही खूष होतो. हाच विषय पुरला आम्हाला नंतरचे कितीतरी दिवस, रात्री. मी तर मनाशी खूणगाठ बांधली होती. आता असं काहीतरी महाराजांना करून दाखवायचं, की त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे.’ 

आज ती संधी मिळाली होती. या नव्या वस्तूची मजा हिरुलाच इतकी वाटत होती! 

त्यानं असे घडल्याचं आजवर ना कधी पाहिलं होतं - ना ऐकलं होतं. एक दिवस शिकारीला काहीच मिळालं नाही म्हणून हिरू अगदी कातावून गेला होता. खूप वेळानं एक घूस दिसली तर तो तिच्याच मागं लागला. खूप वेळ हुलकावणी दिल्यावर घुशीनं एका भल्या मोठ्या वारुळात आश्रय घेतला. साल वृक्षाच्या फांद्या आणि वरचं खोड छाटल्यानंतर जे खोड जमिनीत उरतं, ते पांढऱ्या मुंग्या घर म्हणून निवडतात. तसं हे वारूळ होतं. हे वारूळ आडवं पोखरलं होतं आणि आत पोकळ होतं. घुशीनं त्यात आसरा शोधला. तिच्या मागावर असलेल्या हिरूनं वारुळाच्या निमुळत्या होत गेलेल्या उंच तोंडावर एक लाल दगड ठेवून दिला. वारुळात तळाशी आडवं छिद्र करून मग काडीकचरा भरून त्यानं तो पेटवून दिला. 

हेतू हा, की घूस बाहेर यावी. पण ती कोण जाणे कुठं नाहीशी झाली. खट्टू होऊन हिरू परत आला. काही दिवसांनी त्याच ठिकाणी फिरताना त्याला तिथंच एक घट्ट दगडासारखा पण दगड नसलेला गोळा मिळाला. त्या गोळ्याची हिरुला गंमत वाटली. गोळा घेऊन हिरू घरी आला आणि गोळ्याकडं बघून विचार करू लागला की याचं काय करता येईल? बराच वेळ विचार करून हिरुनं मोठं चुलाणं करून त्यात गोळा गरम केला. इतकं सरपण त्यानं एकाच दिवशी जाळलं, की त्याची बायको विचारू लागली - हा प्रकार काय आहे? काय चाललंय? चुलाण्याच्या ज्वाळा अस्मानाला भिडल्या होत्या. लांबपर्यंत त्याची धग जाणवत होती. हिरू लाकडं घालतच होता, किती वेळ त्यानं चुलाणं धगधगतं ठेवलं होतं त्यालाही अंदाज नव्हता. त्याचं हे झपाटलेलं ध्यान बघून बायकोही चिंतेत पडली. याला झालं आहे तरी काय? नीरुला - तिच्या मुलाला जवळ घेऊन ती एका कोपऱ्यात बसून पुढं काय होणार हे बघत बसली. 

बऱ्याच काळानं हिरुनं तो तापलेला लालसर दिसणारा गोळा बाहेर काढला. त्यावर दगडी हातकु-हाडीनं घण घातले. काही ठिकऱ्या उडून लांब पडल्या; पण काही भाग चेपला. या चेपलेल्या भागाकडं बघून हिरू उल्हसित झाला. त्यानं मग ठोकून ठोकून त्या भागाला आकार दिला. बाणाचं एक सुबक टोक बनवलं. 

हिरू मग खूप वेळ त्याचं निरीक्षण करून समाधानानं झोपला. 

साठवलेलं सगळं सरपण संपवल्याच्या बायकोच्या ओरड्यानंच सकाळी त्याला जाग आली. घाईघाईनं त्यानं उशाशेजारची वस्तू चाचपली आणि आज राजनगरीला जाऊन येण्याचा मनोदय पत्नीला सांगितला. बाणाचं टोक बघून तिलाही त्याचं वेगळेपण जाणवलं. उडून पडलेला एक कड असलेला तुकडा तिनं करवतीसारखा एका भोपळ्यावर चालवून पाहिला. ती खूष झाली. महाराज काय देतील ते देवोत, पण ही कड वापरून काय काय करता येईल असे विचार त्या गृहिणीच्या मनात सुरू झाले. हिरुनं राजनगरीचा रस्ता धरला. 

तो राजवाड्यात पोचला तेव्हा माध्यान्ह होऊन गेली होती. राजवाड्यात कुणी खास पाहुणे आलेले दिसत होते. गर्दी होती. त्या गर्दीतच पाय उंचावून हिरुनं समोर काय चालू आहे ते बघण्याचा प्रयत्न केला. आलेल्या पाहुण्यानं महाराजांना एक अपूर्व भेट अर्पण केली होती. महाराज एक तांब्यानं बनविलेल्या रथाची एक सुंदर प्रतिकृती हाती घेऊन उभे होते. रथ तांब्याच्या चकाकीनं झळझळत होता, त्याला दोन बैल जोडलेले दाखवले होते आणि भरीव चाकं, पुढं कठडा आणि त्याला धरून उभा असलेला माणूससुद्धा कलाकारानं दाखवला होता. माणसाच्या हातात चाबकाचं एक दांडकं दाखवलं होतं. ही कलाकृती पाहून महाराजांसह जमलेले सर्वच प्रशंसोद्‌गार काढत होते. एवढं सुंदर काम कुणाचं? 

‘शुतुद्रीच्या पलीकडून आलो महाराज. तिथं असले कलावंत म्हणाल तेवढे. तुम्ही म्हणाल तर तुमच्यासमोर उपस्थित करेन. त्यांची अवस्था सध्या फार चांगली नाही महाराज! निसर्गाच्या कोपानं त्यांच्या वस्त्या धुळीला मिळाल्या आहेत..’ आलेला पाहुणा सांगत होता. 

‘ही कारागिरी?’ महाराजांनी प्रश्‍नार्थक चेहरा केला.  ‘पोट भरायला पाहिजे ना महाराज. कसब खूप आहे. पण आता व्यापार उदीम चांगला नाही. सगळं थंडावलं आहे. एकेकाळी बाबिलोनपर्यंत वस्तू जायच्या आणि तिथून इकडं यायच्या. नुसत्या वस्तू नाहीत. वस्तूंबरोबर तिथल्या अद्‌भुत कहाण्याही..’ 

‘ऐकायच्या आहेत आम्हाला त्या अद्‌भुत कहाण्या, सुसर्तु. सप्तसिंधूच्या पलीकडच्या अभेद्य पर्वतांच्या पार काय जग आहे आम्हाला जाणून घ्यायचं आहे,’ अधीरतेनं महाराज म्हणाले. 

‘एकही माणूस असा नाही की जो बाबिलोनपर्यंत पोचला आहे महाराज; निदान माझ्या माहितीत तरी नाही. कहाण्या कानावर येतात ते वस्तू पुढच्या मुक्कामापाशी पोचवताना आणि तिथून दुसरी वस्तू घेताना. वर्षानुवर्षं असंच चालू आहे महाराज. हातातून किती वस्तू पुढं जातात याला मोजदाद नाही आणि तरीही मी खात्रीनं सांगू शकतो की तिथल्या गोष्टी कल्पनेतल्या नाहीत. गगनाला भिडतील एवढ्या इमारती बांधल्या आहेत म्हणे तिकडं. विटांच्या, त्रिकोणी आकाराच्या इमारती.. आणि राजाला मृत्यूनंतर तिथं आत ठेवलं जातं.

राजाचं शव मग कोणतेही जीवजंतू कुजवू शकत नाहीत.’ 
सुसर्तुने सांगितलेली ही कथा ऐकून जमलेल्यांच्या अंगावर काटा आला. खरंच, आत शवाला काही स्पर्श करू शकत नाही? 

‘पण हे धर्माच्या विरुद्ध आहे महाराज. शव असं ठेवायचं हा धर्म नव्हे,’ राजपुरोहित मधेच म्हणाले. चुकीच्या प्रथा आपल्या इथं रूढ होऊ नयेत याची खबरदारी घेणं त्यांना गरजेचं वाटे. 

‘शक्‍य आहे. पण त्याची चिंता आपण करण्याचं कारण नाही. आपण तर कथा ऐकतो आहोत. अशा इमारतींचं चित्रच आम्हाला मनोरंजक वाटतं. कशा केल्या असतील त्यांनी अशा इमारती? कशा घडविल्या असतील एवढ्या विटा? याचा विचार करा राजपुरोहित. पुढं सांगा सुसर्तु..’ राजपुरोहितांना टोकत महाराज म्हणाले. 

‘त्यांची शस्त्रं महाराज. ऐकून आहे की त्यांनी अशी शस्त्रं बनवली आहेत, की जी भेदणं अवघड आहे. असे परशू, असे बाण.. अयसापेक्षा कितीतरी कठीण..’ 

सुसर्तुचं हे बोलणं चालू असताना हिरुनं आपल्या बाणाचं टोक चाचपलं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, गर्दीतून वाट काढत महाराजांच्या दिशेनं जात तो मोठ्यानं म्हणाला, ‘काही दाखवायचं आहे महाराज..’ 

एका अरण्यवासीयाचं एवढं धैर्य बघून सैनिक त्याला आवरायला पुढं धावले. या कोलाहलामुळं महाराजांचं लक्ष तिकडं गेलं. त्यांना ओळखायला क्षणभर वेळ लागला, पण मग ते म्हणाले, ‘हिरू, इकडं कसा आलास? सोडा रे त्याला. येऊ द्या इथपर्यंत..’ 

स्वतःची सोडवणूक करून हिरू महाराजांपर्यंत पोचला. सालाच्या पानात बांधून आणलेलं बाणाचं टोक त्यानं भीत भीत महाराजांसमोर धरलं. ती वस्तू हाती धरून महाराज काही काळ गोंधळात पडले. हे काय आणलंय हिरुनं. एवढंसं दाखवायला केवढा हा खटाटोप. ते त्याची चाचपणी करू लागले. 

‘खूप टणक आहे महाराज आणि दगडापेक्षा धारदार..’ हिरू धीर गोळा करून बोलत होता. 

बघणाऱ्या सगळ्यांचे चेहरे आश्‍चर्यचकित झाले होते. केवढा हा उद्धटपणा! थेट महाराजांपर्यंत जायचं म्हणजे काय? आणि काय आणलं आहे एवढं? 

हा सगळा गोंधळ चालू असताना सुसर्तु त्या बाणाग्राकडं बघून एकदम म्हणाला, 

‘हे तर कृष्णायस!’

कृष्णायस? 

(क्रमशः)

संबंधित बातम्या