बुद्धी दे रघुनायका

मकरंद केतकर
सोमवार, 18 मे 2020

मैत्री भोवतालाशी
घरबसल्या खूप काही करण्यासारखं असतं. नुसत्या निरीक्षणामधून तुम्ही स्वतःची करमणूक करू शकता... कशी? तुमच्या घरामधल्या, बागेमधल्या जीवसृष्टीच्या निरीक्षणातून! ते कसं करायचं...? तेच तर या सदरामधून जाणून घ्यायचं आहे.

कोरोना उद्‍भवण्याच्या कारणांमध्ये वटवाघळाचं मांस ही एक शक्यता असल्याचं मानलं जातं आणि यामुळंच वटवाघळं अचानक विनाकारण बदनाम झाली व त्यांच्याकडं रागानं पाहिलं जाऊ लागलं. एवढंच नाही तर अनेकांनी त्यांच्या हत्याही करायला सुरुवात केली. तसं म्हटलं तर जगातल्या प्रत्येक प्राण्याच्या शरीरात कुठले तरी मानवाला घातक असे बॅक्टेरिया, व्हायरस असू शकतात. पण म्हणून आपण जगातले सगळेच प्राणी संपवणार का? आणि गाढवाच्या मागे स्वतःहून जाऊन लाथ खायला उभं राहिलं, तर अधिक गाढव कोण? असो. यानिमित्तानं या जिवाची तुम्हाला ओळख करून देण्याची संधी मिळाली हे कमी नाही. 

मुख्यत्वे निशाचर असलेला, निसर्गाच्या चक्रात महत्त्वाची कामगिरी बजावणारा आणि अनाकर्षक असल्यानं दुर्लक्षलेला प्राणी म्हणजे वटवाघूळ. ज्यांच्या घराच्या आसपास वडापिंपळासारखी झाडं आहेत, त्यांना संध्याकाळपासून फळं खायला येणारी मोठमोठी वटवाघळं ठाऊक असतीलच. तसंच रात्री दिव्यांच्या आसपास भिरभिरणारी अगदी छोटी वटवाघळंही अनेकांनी पाहिली असतील. जगभरात हजारापेक्षा अधिक प्रजाती असलेले आणि भारतात सव्वाशेच्या आसपास प्रजाती असलेले हे अद्‍भुत जीव आहेत. पक्ष्यांप्रमाणं उडू शकणाऱ्या या एकमेव सस्तन प्राण्याचं मेगाकायरोप्टेरा/Megachiroptera (अर्थ: मेगा= मोठे + कायरो= हात + टेरॉन= पंख) म्हणजेच ‘हातांना मोठे पंख असलेले’ आणि मायक्रोकायरोप्टेरा (हातांना छोटे पंख असलेले) अशा दोन प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. इन शॉर्ट, ‘मेगा बॅट्स’ आणि ‘मायक्रो बॅट्स’. अर्थ कळला की शास्त्रीय नावं अशी लक्षात राहतात.

मेगाकायरोप्टेरा वर्गातली वटवाघळं फळं, तसंच मध खातात. त्यांची दृष्टी चांगली असते व कान लहान असल्यानं ते ध्वनीलहरींचा फार उपयोग करत नाहीत. विविध वृक्षांची फळं खाऊन त्या वनस्पतींचं परागीभवन तसंच बीजप्रसार करण्याचं मोलाचं कार्य ही वटवाघळं पार पाडत असतात. मायक्रोकायरोप्टेरा वर्गातली वटवाघळं मुख्यत्वे कीटकभक्षी असतात. ही वटवाघळं शेतीतील कीटक, तसंच आपल्याला छळणाऱ्या डासांना खातात. त्यांची दृष्टी तुलनेनं अधू असते व कीटकांना शोधण्यासाठी ते ध्वनीलहरींचा उपयोग करतात. ही बॅट्स उडता उडता तोंडावाटे ध्वनीलहरी सोडतात आणि समोर असलेल्या वस्तूवर आदळून परत आलेल्या लहरी ते त्यांच्या मोठ्या कानांद्वारे ग्रहण करून समोर नक्की काय आहे याचा अंदाज घेतात व कीटक असेल तर त्याची शिकार करतात. निसर्गानं करोडो वर्षांच्या उत्क्रांतीतून साध्य केलेल्या या कलेची कॉपी माणसानं आपल्या फायद्यासाठी ‘सोनार’ या तंत्रज्ञानात केलेली आहे. नौदलामध्ये खोल पाण्यातील गोष्टींचा शोध घेण्यासाठी याचा मुख्यत्वे वापर होतो.

मोठी बॅट्स जशी झाडावर उलटी लटकून राहतात, तशीच छोटी बॅट्स पडके वाडे, डोंगरातल्या कडेकपाऱ्या, जुन्या गुहा, लेणी यात राहतात. वटवाघूळ सस्तन प्राणी असल्यानं त्यांची पिल्लं आईचं दूध पितात. मोठ्या वटवाघळांमध्ये अनेकदा आई पिल्लाला पोटाशी घेऊनच उडते. छोट्या वटवाघळांची पिल्लं कपाऱ्यांमध्ये लपून बसतात व आई आली की तिला चिकटतात. काही काही गुहांमध्ये लक्षावधी वटवाघळं एकत्र राहतात. पण इतक्या मोठ्या संख्येतसुद्धा आईला आपल्या पिल्लाचा आवाज बरोबर कळतो व ती त्याच्याजवळ पोचते.

बहुतांश वटवाघळं मानवी वस्तीपासून लांब राहत असल्यानं त्यांच्या शरीरातील व्हायरस आपल्यापर्यंत पोचत नाहीत. अर्थात प्रत्येक वटवाघळाच्या प्रजातीत मानवाला घातक व्हायरस असेलच असं नाही. परंतु, समजा त्यांच्या शरीरात व्हायरस असलाच तरी आपल्याच उपद्व्यापामुळं जर तो आपल्या शरीरात आला, तर त्याचा दोष या जीवांच्या माथी कसा जातो?  असो. आता पुन्हा थोडं निरीक्षण. लॉकडाऊनमध्ये मी गेले काही आठवडे पाहतोय, की संध्याकाळी ७.१० ते ७.१५ च्या सुमारास पुणे शहरातून येणारे फ्लाइंग फॉक्सचे थवे एनडीएच्या टेकडीवरील जंगलाच्या दिशेनं उदरभरणासाठी जाऊ लागतात. पण मध्यंतरी जेव्हा जेव्हा संध्याकाळी पाऊस पडला, तेव्हा वटवाघळं टेकडीकडं जाताना दिसली नाहीत. खूप वाऱ्यात किंवा पावसात ‘जाऊ दे ना कशाला झिगझिग करायची? आज उपास करू,’ असं त्यांचं काही होत असेल का? किंवा त्यांनी रूट बदलला असेल का?

हे प्रश्न मी माझ्यापुरते सध्या राखून ठेवलेत. लॉकडाऊननंतरचा बुद्धीला खुराक म्हणून. 

संबंधित बातम्या