पक्षी मरताना कुठं जातात?

मकरंद केतकर
सोमवार, 1 जून 2020

मैत्री भोवतालाशी
घरबसल्या खूप काही करण्यासारखं असतं. नुसत्या निरीक्षणामधून तुम्ही स्वतःची करमणूक करू शकता... कशी? तुमच्या घरामधल्या, बागेमधल्या जीवसृष्टीच्या निरीक्षणातून! ते कसं करायचं...? तेच तर या सदरामधून जाणून घ्यायचं आहे.

‘पक्षी मरण्यासाठी खरंच आकाशात जातात का?’
नरेश साधवानी यांची ‘पक्षी मरताना कुठं जातात?’ ही अनुवादीत पोस्ट सोशल मीडियात अधूनमधून ‘खोकल्याची उबळ यावी’ तशी येत असते.

ज्यांना ही पोस्ट ठाऊक नाही त्यांना थोडक्यात सांगायचं, तर ‘आपल्याला मेलेले पक्षी का दिसत नाहीत, तर म्हणे मृत्यूची जाणीव झाल्यावर ते उंच उडून हवेत जातात आणि तिकडेच विरघळून नष्ट होतात,’ अशा अर्थाची ती पोस्ट होती. आता चांगलं म्हणा की वाईट म्हणा, पण या बाबतीत माझी इमेज ही ‘अब तक छप्पन’ पिक्चरमधल्या साधू आगाशेसारखी असल्यानं (तुम सोसायटी का कचरा हो और मै जमादार। काम अच्छा नही लेकीन करना पडता है।) अशा पोस्ट्सचं पोस्ट मॉर्टेम करण्याची विनंती करणारे अनेक मेसेजेस येतात. त्यामुळं लॉकडाउनमध्ये घरबसल्या माझं हे उत्तर.

मला कळायला लागल्यापासून आजच्या तारखेपर्यंत अनेकदा मेलेले पक्षी मी पाहिले आहेत, ज्यात चिमणी, मुनिया असे छोटे पक्षी आणि बुलबुल, मैना, भारद्वाज, कावळा, कबुतर, पोपट हे लहान ते मध्यम आकाराचे पक्षी आहेत. तसाच एकदा रोहिडा किल्ल्यावर मेलेला सर्पगरुडही पाहिला होता. साधवानींच्या अनुवादीत पोस्टमधला नियम जर सरसकट सगळ्या पक्ष्यांना लावायचा, तर मोर, कोंबडी किंवा शहामृगासारखा पक्षी, जो फार उडू शकत नाही किंवा उडूच शकत नाही तो काय पाठीला रॉकेट लावून आकाशात जाऊन मरणार आहे का?

मला अनेकांनी या पोस्टची सत्यता विचारली. म्हणून या पोस्टचं खंडन करताना काही मुद्दे मांडतोय ते असे :
 पक्षी हे अनेक सस्तन प्राणी, तसेच इतर पक्ष्यांचे अन्न आहेत. जो पक्षी निसर्गात स्वतःचं रक्षण करू शकत नाही, तो आपोआपच शिकार होऊन मरण पावतो. प्रत्येक आकाराच्या पक्ष्यासाठी एक शिकारी पक्षी आहे. माझ्या डोळ्यासमोर बाल्कनीत लपलेल्या चिमणीला कावळ्यानं उचलून नेलं होतं. माझ्या सोसायटीत मी एका ट्रिंकेट सापाला मैनेला गिळताना पाहिलंय. त्यामुळं मृत पक्षी सहजासहजी न दिसण्याचं हे एक कारण आहे.
 दुसरं असं, मेलेला जीव नष्ट करण्याची निसर्गात क्लिन-अप सिस्टीम आहे. बहुतांश पक्षी आकारानं लहान असतात. त्यांचे मृतदेह आपल्या नजरेस पडणं किंवा त्यांची दुर्गंधी नाकाला जाणवणं शक्य होत नाही. तसंच लहान आकारामुळं त्यांच्या मृतदेहांचं चटकन विघटन होतं. कावळे तसंच मांजर-कुत्र्यांसारखे प्राणी त्यांना उचलून घेऊन जातात. त्यांच्या नजरेतून सुटलेली कलेवरं मुंग्या खाऊन टाकतात.
 अजून एक कारण असंही असू शकेल, की कदाचित काही जातींचे पक्षी आजारपणात एकांतात जात असतील जिथं त्यांना सेफ वाटेल (जसं साप कातीवर आल्यावर एकांत शोधतात), त्यामुळंही त्यांची मृत शरीरं नजरेस पडत नसतील.
 जगभरात लोकं हौसेनं पिंजऱ्यात पक्षी पाळतात. पिंजऱ्यातले पक्षी त्यांच्या या नैसर्गिक प्रवृत्तीनं मरण्यापूर्वी पिंजऱ्यातून आकाशात जाण्याची धडपड करताना कोणी पाहिलंय का? मी लहानपणी हौसेनं पोपट पाळले होते. मरण्यापूर्वी त्यांना आकाशाकडं बघून उडण्याचा प्रयत्न करताना मी तरी कधी पाहिलं नाही. त्यामुळं जरा विस्तारानं अवलोकन केलं तर पक्षी आकाशात जाऊन मरतील हे अतार्किक वाटतं.

अजून थोडा वेगळा विचार केला, तर अगदी घराच्या आसपास दिसणारे प्राणी म्हणजे मांजर, मुंगूस, खार हे प्राणी तरी आपल्याला सहजासहजी मेलेले दिसतात का? याचा अर्थ ते असे काहीतरी भन्नाट प्रयोग करून मरतात असा काढायचा का?

तुमच्या सारासार विवेकबुद्धीला जे पटेल तेच तुमचं उत्तर!

संबंधित बातम्या