सत्याला थापेचा दंश

मकरंद केतकर
रविवार, 7 जून 2020

मैत्री भोवतालाशी
घरबसल्या खूप काही करण्यासारखं असतं. नुसत्या निरीक्षणामधून तुम्ही स्वतःची करमणूक करू शकता... कशी? तुमच्या घरामधल्या, बागेमधल्या जीवसृष्टीच्या निरीक्षणातून! ते कसं करायचं...? तेच तर या सदरामधून जाणून घ्यायचं आहे.

लॉकडाउनच्या रिकामटेकड्या काळात वन्यजीवांवर तसंच निसर्गातील विविध घटकांवर भाकडकथा रचून सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या अनेक जुन्या पोस्ट्सचं पेव फुटलंय. यातल्या काही काही पोस्ट्स तर बऱ्याच जुन्या आहेत आणि त्या त्या वेळेला मी सोशल मीडियावरच माझ्यापरीनं त्यांचं निरसनही केलं आहे. पण आता हे सगळं जेव्हा परत ‘सरफेस’ होतंय, तेव्हा सोशल मीडियाच्याच जोडीनं ‘सकाळ साप्ताहिक’च्या वाचकांपर्यंतही सत्य पोचवण्याची ही संधी आहे असं मला वाटतं. नुकतीच विंचवाच्या मादीबद्दल व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली एक पोस्ट मित्रानं शेअर केली. त्याचा सारांश असा, की विंचवाची मादी तिच्या नवजात उपाशी पिल्लांचं पोट भरावं म्हणून स्वतःला त्यांना समर्पित करते आणि तिची पिल्लं तिचे जिवंतपणीच लचके तोडून खातात. याच पोस्टमध्ये असंही म्हटलंय, की कासवाची मादी केवळ पिल्लांशी नजरानजर करून त्यांचं पोट भरते. 
थोडक्यात काय तर आई किती महान असते हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. पण आईचं महत्त्व अधोरेखीत करण्यासाठी वाटेल ते ठोकून द्यायची गरज नव्हती. असो. यावर माझं स्पष्टीकरण असं; पिल्लांनी आईला खाणं याला विज्ञानाच्या भाषेत ‘मॅट्रीफॅगी’ (मॅट्री - आईशी संबंधित, फॅगी - गिळणे) म्हणतात. विंचवांची पिल्लं त्यांचं एग्झोस्केलेटन म्हणजे बाह्यकवच कठीण होईपर्यंत संरक्षणासाठी आईच्या पाठीवर राहतात (जाती प्रजातीनुसार दहा ते वीस दिवस) आणि नंतर आपापल्या वाटेनं निघून जातात. आईच्या पाठीवर असताना ती स्वत:च्या शरीरातील फॅट रिझर्व्ह्स तसंच आईच्या पाठीतून पाझरणारी द्रव्यं याच्या साहाय्याने जिवंत राहतात. याच्या उलट पिल्लांना जन्म दिल्यावर जर आईला अन्न मिळालं नाही तर तीच पिल्लांना खाते. कारण त्यांच्यात स्वजातीबद्दल फार रेकग्निशन नसतं. अगदी नरालासुद्धा मीलनकाळात प्रणयाराधन करताना स्वतःची शिकार होऊ नये म्हणून मादीपासून सावध राहावं लागतं. त्यामुळं माझ्या माहितीत तरी विचवांच्या पिल्लांनी आईला जिवंत खाल्ल्याचं उदाहरण नाही. असल्यास मलाही जाणून घ्यायला आवडेल. पण बिळं करून राहणाऱ्या काही कोळ्यांच्या जातीमध्ये, जसं की वुल्फ स्पायडर्स किंवा टॅरेंट्युला वगैरे, मादी कोळी तिची अफलित अंडी पिल्लांना खायला देते आणि ती खाता खाता पिल्लं आईलाही खाताना आढळली आहेत.

आता कासवांबद्दल थोडंसं. समुद्री कासवं अंड्यांची काळजी घेत नाहीत. वाळूत खड्डा खणून त्यात अंडी घालून निघून जातात. जमिनीवरची काही कासवं अंड्यांचं रक्षण करतात पण पिल्लं सांभाळत नाहीत. बाकी नजरानजर होऊन पोट भरणं वगैरे बाद कल्पना आहेत.

याच निमित्ताने कासवांच्या अंड्यांबाबत थोडी अपरिचीत माहिती सांगतो.

सरीसृपांच्या अनेक जातींप्रमाणं कासवांच्याही अंड्यातील जिवाची लिंगनिश्‍चिती अंड्याभवतालच्या तापमानानुसार होते. म्हणजे, अंड्याभवतालचं तापमान साधारण तीस ते पस्तीस अंश सेल्सिअस असेल, तर बहुतांश अंड्यांमधून माद्या जन्म घेतात. पण हेच तापमान जर वीस ते तीसच्या अंश सेल्सिअस दरम्यान असेल तर अधिकतम नर जन्माला येतात. निसर्गात लिंगनिश्‍चिती करता जिनोटायपीक सेक्स डिटरमिनेशन (GSD) आणि टेंपरेचर-डिपेंडंट सेक्स डिटरमिनेशन (TSD) असे दोन प्रकार असतात. सस्तन प्राणी, पक्षी आणि साप हे GSD मध्ये येतात, कारण आपले क्रोमोझोम्स भ्रूणाची लिंगनिश्‍चिती करतात. मगर, कासव आणि पालीच्या अनेक जातींमध्ये अंड्याच्या बाहेरचं तापमान हा लिंग निश्‍चितीमध्ये महत्त्वाचा फॅक्टर असतो. अंड्यातील जिवाची वाढ होण्याच्या विशिष्ट पिरियडमध्ये विशिष्ट काळाकरता अंड्याबाहेरचं तापमान काय आहे यावर आतल्या द्रव्यातील कुठले हार्मोन्स (नर तयार करणारे किंवा मादी तयार करणारे) ॲक्टिव्हेट होणार हे ठरलेलं असतं आणि त्यानुसार पिलांमधे नर अधिक की माद्या अधिक की दोन्ही समसमान हे ठरतं.

तर अशी आहे ही विंचवीच्या बलिदानाची भाकड कथा. पुढच्या आठवड्यात परत भेटू अशाच एखाद्या थापेचं पितळ उघडं पाडायला.

संबंधित बातम्या