अफवांची विषबाधा

मकरंद केतकर
सोमवार, 15 जून 2020

मैत्री भोवतालाशी
घरबसल्या खूप काही करण्यासारखं असतं. नुसत्या निरीक्षणामधून तुम्ही स्वतःची करमणूक करू शकता... कशी? तुमच्या घरामधल्या, बागेमधल्या जीवसृष्टीच्या निरीक्षणातून! ते कसं करायचं...? तेच तर या सदरामधून जाणून घ्यायचं आहे.

माझ्या गेल्या चौदा-पंधरा वर्षांतल्या सोशल मीडियावरच्या वावरातून मला एक गोष्ट चांगलीच कळलीय, ती म्हणजे ‘फुकट ज्ञान’. मग ते खरं आहे की खोटं याची शहानिशा न करता, कुठंही न जाता केलेल्या समाजसेवेच्या निव्वळ मानसिक समाधानासाठी फॉरवर्ड्स पाठवत राहणं हा सोशल मीडियावरच्या अनेक गोमागणेशांचा आवडता उद्योग आहे. पण खरं सांगू का? स्पायडरमॅन मुव्हीमधलं वाक्य सोशल मीडियासारख्या व्हर्च्युअल जगालाही तंतोतंत लागू होतं.

‘विथ ग्रेट पॉवर कम्स गेट रिसपॉन्सिबिलीटी.’ त्यामुळंच की काय, या सोशल मीडियाचा एक जबाबदार उपभोक्ता म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन करणं हा मी माझा जन्मसिद्ध अधिकार समजतो. आजचा विषय आहे ‘नाजा २००’ हे सर्पदंशावरील होमिओपॅथी औषध. आता सुदैव हे, की दरवेळी काही जागरूक मित्र अशा पोस्ट्सची सत्यता विचारतात आणि त्यावर मी माझं सत्यशोधनाचं कर्तव्य पार पाडतो.

मुळात या विषयाचा उगम कुठं आहे हे पाहू. राजीव दीक्षित नामक कुण्या ‘सत्पुरुषाने’ (ज्याला आमचे फॅमिली डॉक्टर नेहमी खास ठेवणीतल्या कोकणी शिव्या घालतात) त्याच्या कुठल्या तरी एका भाषणात सर्पदंश, विंचू दंश आणि असेच अनेक आजार चुटकीत बऱ्या करणाऱ्या, केवळ पाच रुपयांत मिळणाऱ्या पृथ्वीवरील या अमृताचा साक्षात्कार लोकांना घडवला. तो व्हिडिओ यूट्युबवर आला आणि मग काय विचारता हो! परमानंदाने उत्तेजित होऊन ही बातमी पसरवण्याच्या नादात ‘कोणी कोणाच्या गळ्यात, कोणी कोणाच्या पायाशी, कोणी मांडीवर’ अशा अलौकिक अवस्थेत अनेक मंडळी येऊन पोचली. एकानं तर मला हेही विचारलं, ‘समजा आपण सापालाच हे औषध पाजलं तर सापाचंच विष गायब नाही का होणार?’ याला म्हणतात डायरेक्ट मुळावर घाव!

यातला विनोदाचा भाग सोडला, तर मग नेमकं काय आहे हे प्रकरण? नागाचं शास्त्रीय नाव आहे ‘नाजा नाजा’. म्हणून ‘नाजा २००’. होमिओपॅथिक डॉक्टरांशी चर्चा केल्यावर मला कळलं, की सदर औषध हे खरंच नागाच्या विषापासून तयार केलेलं आहे. पण ते थेट सर्पदंशावर इलाज म्हणून काम करत नाही, तर सर्पदंशामध्ये जी लक्षणं दिसतात त्यातली काही लक्षणं जुळत असतील तर त्यावर काम करतं. ही लक्षणं व्यक्तीसापेक्ष वेगळी दिसू शकतात. अनेकदा निव्वळ सर्पदंशाच्या आणि विषबाधेच्या भीतीपोटी काही प्राथमिक लक्षणं रुग्णात दिसतात. त्यामुळं विषबाधा झालीय का? याची खात्री डॉक्टरांना करावी लागते. तसंच हे औषध सर्पदंशच नाही तर इतरही काही आजारांवर काम करतं. त्यामुळं त्याचा वापर विचारपूर्वक करावा लागतो.

पण सापाचं विष उपचार करायला खरंच इतकं सोपं आहे का? अजिबात नाही. सर्पविष अनेक प्रकारच्या प्रथिनांनी मिळून तयार झालेलं विषारी द्रव्य असून ती अतिशय किचकट केमिस्ट्री आहे. एकाच जातीच्या सापांमध्येही विषाची तीव्रता कमीजास्त असते. रोम्युलस व्हिटेकर यांच्या २०१२ मधील शोधनिबंधानुसार उत्तर भारतातील नाग दक्षिणेतील नागांपेक्षा जास्त विषारी आहेत. यामुळंच कुठलंही प्रतिविष देताना अतिशय सावधतेनं द्यावं लागतं. नाहीतर प्रतिविषाचीच रिअ‍ॅक्शन येऊन गुंतागुंत वाढू शकते. म्हणून नाजा २०० हे औषधसुद्धा डॉक्टरांनीच अधिकृतरीत्या दिलं पाहिजे, नाहीतर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

मित्रांनो एक लक्षात घ्या, सर्पदंश म्हणजे काही पावसात भिजून येणारा ताप नाही, की घेतली क्रोसीन आणि झाला बरा. कुठलंही जैविक विष हे करोडो वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झालेलं अतिशय प्रगत आणि घातक शस्त्र आहे. त्यातल्या सापाच्या विषावर तूर्तास तरी सापाच्याच विषापासून तयार केलेलं अँटीव्हेनीनचं इंजेक्शन हाच खात्रीलायक उपाय आहे. त्यामुळंच विषारी सापाचा दंश झाल्यास पेशंटला जवळच्या सरकारी रुग्णालयात वा जिथे सर्पदंशावर उपचार होतात अशा हॉस्पिटलमध्ये नेणं अनिवार्य आहे. माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, की असे कुठलेही फॉरवर्ड्स नेहमी जाणकारांकडून व्हेरीफाय करून घ्या आणि स्वत:बरोबरच सोशल मीडियाच्या भाबड्या उपभोक्त्यांनाही अफवांच्या विषबाधेपासून सुरक्षित ठेवा.

संबंधित बातम्या