कैरीचा भात

साहित्यलक्ष्मी देशपांडे, मुंबई
सोमवार, 6 मे 2019

आंबा विशेष

कैरी किंवा आंबा या फळाचं नाव निघालं, तरी तोंडाला पाणी सुटतं. मनसोक्त आंबे खाऊन झाल्यानंतर करता येतील अशा या कैरी आणि आंब्यापासून तयार केलेल्या चटकदार पदार्थांच्या काही रेसिपीज...

कैरीचा भात
कै रीचा भात अतिशय सोपा पदार्थ आहे. वेळही फार कमी लागतो. या दिवसात हा थंडच खायचा. कमी मसाल्याचा; पण तिखट, मीठ, आंबटगोड चवीचा भात छान वाटतो. 

साहित्य : एक वाटी जुना तांदूळ, १ कैरी, २ टेबलस्पून तेल, ४ लाल मिरच्या, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंगपूड, पाव चमचा हळद, १ चमचा मीठ, कढीलिंबाची १०-१२ पाने, २ चमचे चणाडाळ, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा पिठीसाखर. 

कृती : एक वाटी तांदूळ (आंबेमोहोर असेल तर चांगला) धुऊन पावणेदोन वाट्या पाणी व एक चमचा मीठ घालून कुकरमध्ये मोकळा भात शिजवून घ्यावा. कुकरची वाफ गेल्याबरोबर भात परातीत पसरून काट्याने मोकळा करून थंड होऊ द्यावा. 
कैरी धुऊन सालासकटच किसून घ्यावी. त्यात एक चमचा पिठीसाखर मिसळावी (पिठीसाखर ऐच्छिक). 
यातील दोन टेबलस्पून किसलेली कैरी थंड झालेल्या भातावर घालून काट्याने भाताची शिते मोडणार नाहीत व गच्च गोळा होणार नाही याची काळजी घेत छान एकत्र कालवावे. 
एका कढईत दोन टेबलस्पून तेल घालून ते गरम करावे. गरम झाल्यावर त्यात मोहोरी, चणा डाळ व उडीद डाळ घालून परतावे. डाळींचा खमंग वास सुटला, की मग हिंग, लाल मिरच्या, कढीलिंबाची पाने घालून फोडणी करावी व गॅस बंद केल्यावर पाव चमचा हळद घालून भातावर टाकावी. आता अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात घालून हलक्‍या हाताने सर्व मिसळून घ्यावे. भात जास्त तिखट हवा असल्यास दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून भातात मिसळाव्या. यात आंबट-गोडाच्या स्वतःच्या आवडीसाठी चव घेऊन हवे तर मीठ, साखर, कैरी किंवा मिरची आणखी जास्त किंवा कमी घालावी.


आंब्याची (कैरीची) कढी
साहित्य : एक कैरी, २ चहाचे चमचे तेल, २ चमचे चणाडाळ, (१२-१५ शेंगदाणे + सुक्‍या खोबऱ्याचे १०-१२ काप - ऐच्छिक), १ टेबलस्पून चण्याचे पीठ, गुळाचा मोठ्या लिंबाएवढा खडा, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा हिंगपावडर व अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, २-४ सुक्‍या मिरच्या, एक ते दीड चमचा मीठ, १ टेबलस्पून बेसन, कोथिंबीर. 

कृती : कैरी धुऊन कुकरमध्ये उकडून घ्यावी. वाफ गेल्यावर कुकर उघडून कैरी बाहेर काढून थंड होऊ द्यावी. कैरीचा गर हाताने पिळून काढून घ्यावा. साले व कोय दोन वाट्या पाण्यात घालून कुस्करून पिळून त्यातला आंबट रस घ्यावा. साले टाकून द्यावी. खोबऱ्याचे पातळ काप करून घ्यावे. शेंगदाणे व डाळ पाण्यात भिजवून ठेवावी. आता गॅसवर कढईत दोन चमचे तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात मेथीदाणे व मोहोरी घालावी. मेथीदाणे लालसर होऊन त्यांचा खमंग सुगंध सुटला व मोहोरी तडतडली, की त्यात हिंगाची पूड (खडा हिंगाची ताजी पूड असेल तर उत्तम), भिजवलेले शेंगदाणे, चणाडाळ, खोबऱ्याचे काप, लाल मिरच्या, हळद, तिखट व कढीलिंबाची पाने घालून परतावे. त्यानंतर त्यात कोयी व साले पिळून काढलेले कैरीचे दोन वाट्या पाणी व काढलेल्या गरातील दोन-तीन चमचे गर घालावा. गुळाचा खडा फोडून त्यात घालावा. एक सव्वा चमचा मीठ घालावे. आता एक वाटी पाण्यात एक टेबलस्पून बेसन चांगले मिसळून ते कढईत घालावे. आणखी एक वाटी पाणी कढईत घालावे व कढी पाच-सात मिनिटे उकळावी. कैरीचा आंबटपणा वेगवेगळा असल्याने चव घेऊन प्रमाणात आवडीनुसार हवे तसे बदल करावे. वाढतेवेळी कढीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कढी खालपासून ढवळून वाढावी.


पिकलेल्या आंब्याचा मुरांबा
साहित्य : दोन (हापूस) आंबे, दीड वाटी साखर, एका लिंबाचा रस (हवे असल्यास केशर, दालचिनी किंवा वेलदोडापूड.) 

कृती : दोन पिकलेले आंबे धुऊन साले काढून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. साधारण दोन वाट्या तुकडे होतील. 
    आता एका नॉनस्टिक कढईत दीड वाटी साखर, एका लिंबाचा रस व पाऊण वाटी पाणी घेऊन तीन तारी पाक करावा. आता पाकात आंब्याचे तुकडे टाकून ढवळावेत. आंब्याला पाणी सुटल्याने पाक पातळ होईल तो पुन्हा घट्ट होईपर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्यास उत्तम. रसातील पाण्याचा अंश व्यवस्थित आटला असेल तर बाहेरही मुरांबा वर्षभर टिकतो. आवडत असल्यास यात केशराच्या १०-१२ काड्या चमचाभर गरम पाण्यात दहा मिनिटे भिजवून मुरांबा शिजताना शेवटीशेवटी टाकाव्या. त्याऐवजी हवी असल्यास वेलदोडापूड अथवा थोडी दालचिनी पूड बदल म्हणून टाकावी किंवा पाक करताना एक-दोन दालचिनीचे तुकडे उकळू द्यावे. खरे तर आंब्याचा रंग व वासच इतका सुरेख असतो, की त्यात दुसऱ्या कोणत्याही सुवासाची आवश्‍यकता नसते.


आंब्याचा भात 
साहित्य : एक वाटी तांदूळ, २ वाट्या आंब्याचा रस, अर्धी वाटी साखर, २ टेबलस्पून तूप, ५-६ लवंगा, १ दालचिनीचा तुकडा, 
५ -७ काजू, २-४ बदाम, २-४ पिस्ते, चिमूटभर मीठ. 

कृती : तांदूळ धुऊन तासभर निथळत ठेवावेत. तासाभराने एका कढईत दोन टेबलस्पून तूप घालावे. तुपात काजू बदामाचे काप परतून वाटीत काढून घ्यावे. आता तुपात लवंगा व दालचिनी घालावी, निथळलेले तांदूळ घालावे व तांदूळ छान ३-४ मिनिटे परतून घ्यावे. बाजूच्या गॅसवर दोन वाट्या पाणी गरम करत ठेवावे. पाणी उकळले, की ते तांदुळावर घालावे व मंद गॅस करून झाकण ठेवून भात मोकळा शिजवावा. भात शिजत आला, की त्यात आंब्याचा रस, साखर व किंचित मीठ घालून परतावे. रस आटत आला, की झाकण ठेवून वाफ आणावी. 
आंब्याचा रस आणि साखर आधी घातली तर भात शिजत नाही म्हणून शेवटीच रस घालावा. काजू, बदाम, पिस्त्याचे काप पेरून सजावट करावी. यात काही लोक वेलदोडापूड घालतात. पण त्याने आंब्याची मूळ चव मारली जाते.


आंब्याची रसभाजी
साहित्य : दोन अर्धवट पिकलेले आंबटगोड आंबे, अर्धी वाटी आंब्याचा रस, २ टेबलस्पून तेल, २-३ लाल मिरच्या, २ -४ लसणाच्या पाकळ्या, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाऊण चमचा मीठ, अर्धा चमचा मेथीचे दाणे, कढीलिंबाची १०-१२ पाने, २ चमचे चिंचेचा कोळ, कोथिंबीर. 

कृती : आंबे स्वच्छ धुऊन चिरून त्याच्या मोठ्या फोडी करून घ्याव्या. कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यात मेथीदाणे व मोहोरी घालावी. मोहोरी तडतडली व मेथी लाल झाली, की त्यात चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या, हिंगाची पूड, लाल मिरच्या, हळद, तिखट, कढीलिंबाची पाने घालून परतावे व आंब्याच्या फोडी घालाव्या. त्यातच आंब्याचा रस, चिंचेचा कोळ व बारीक केलेला गुळाचा खडा व मीठ घालून झाकण ठेवून शिजवावे. ५ मिनिटात भाजी तयार होईल. अप्रतिम लागते.


आंब्याची पॅकेट्‌स
साहित्य : पारीसाठी : एक वाटी मैदा, २ टेबलस्पून तेल, छोटा अर्धा चमचा मीठ. 
सारणासाठी : एक वाटी आंब्याचा गर, अर्धा चमचा मीठ, अर्धा ते १ चमचा चिलीफ्लेक्‍स, अर्धा चमचा जाडसर मिरेपूड, पाव चमचा दालचिनीपूड, पाव वाटी रवा, चार-पाच काजू व चार-पाच बदामाचे काप अथवा तुकडे. 

कृती : पारीची : मैदा चाळून घेऊन त्यात चवीला मीठ व दोन टेबलस्पून तेल घालावे. पाणी घालून घट्ट गोळा करावा. गोळ्याला तेलाचा हात लावून झाकण ठेवून अर्धा तास मुरू द्यावा. 
सारणाची : कढईत एक वाटी आंब्याचा गर घ्यावा. त्यात रवा, मिरेपूड, मीठ, चिलीफ्लेक्‍स, दालचिनीपूड व ड्रायफ्रूटचे काप आणि एक चमचा तेल घालून गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे. गोळा थंड झाला, की त्याचे लहान, लांबट, सारख्या आकाराचे आठ गोळे करावेत. 
पॅकेट्‌सची : मैद्याचा गोळा आता पुन्हा चांगला मळून त्याचे दोन गोळे करावे व झाकून ठेवावेत. पोळपाटावर किंचित मैदा अथवा तेल लावून एका गोळ्याची पोळी लाटावी. ती कडेने कापून चौकोन करून घ्यावा. हा चौकोन मधून उभा आणि आडवा कापून त्याचे चार तुकडे करावेत. आता एका चौकोनी तुकड्याच्या कडांना पाण्याचे बोट लावून त्यावर सारणाचा एक लांबट गोळा ठेवून रोल करावे. साईडनासुद्धा कडा बंद कराव्यात आणि खायच्या काट्याने दाबावे म्हणजे छान नक्षी दिसेल. याप्रमाणे सगळी पॅकेट्‌स तयार करून घ्यावीत आणि कढईत तेलात मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत तळावी. खुसखुशीत आंबट-गोड-तिखट पॅकेट्‌स तयार!

संबंधित बातम्या