आंबा जाती आणि ओळख

डॉ. महेश मनमोहन कुळकर्णी
सोमवार, 2 मे 2022

कव्हर स्टोरी

आंब्याच्या विविध जाती कशा ओळखायच्या हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी आंब्याची नैसर्गिक पक्वताही वाढत जाते व चवदेखील निर्माण होते. त्यामुळेच जागरूक ग्राहकाने खात्रीशीर शेतकऱ्याकडून थेट माल घेतला पाहिजे. तसेच फळ तपासूनच पेटी घेतली पाहिजे. तसेच फसवणूक होऊ नये अशी इच्छा असेल, तर आपण जीआय मानांकित आंबा बागायतदारांकडूनच आंबा खरेदी केली पाहिजे. 

संपूर्ण भारतात आंब्याचा सीझन सुरू झाला की महोत्सव सुरू झाल्याचा फील येतो. आंबा हे आबालवृद्धांचे सर्वात आवडते फळ तर आहेच, आणि इतर कुठल्याही फळांशी तुलना केल्यास वाणानुसार मागणी असलेले हे एकमेव फळ आहे. आंब्याचे उगमस्थान भारत असल्याने संपूर्ण भारतात आंब्याची नैसर्गिक पद्धतीने वाढलेली झाडे आढळतात. स्थानिक जागांवरून (बैंगनपल्ली, गोवा मानकुर, तैवान, रत्ना, सिंधू), आकारावरून (जरदाळू, वनराज, बदाईगोल, बजरंग, लंगडा), रंगावरून (केसर, सुवर्णा, सोनपरी), पदार्थावरून (दूधपेढा, सोरा, रसपूरी, पायरी, खोबरी), पशुपक्षांच्या नावावरून (तोतापुरी, पावशा), प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावरून (अल्फान्सो, जहांगीर, फर्नांडिस, हिमायुद्दीन, मल्लिका, आम्रपाली), खाण्याच्या पद्धतीवरून (चौसा), मोहोर येण्यावरून (बारामसी, दो- फसली) आंब्यांची नाव ठेवली गेली आहेत. स्थानिक बाजारपेठेतील मागणीनुसार त्यांची लागवड वाढत गेली. त्यांच्यातील काही वाईट दोष काढण्यासाठी तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी संकरित जातींची निर्मिती केली आहे. उदा. ‘हापूस’मधील साक्याचा दोष काढण्यासाठी ‘निलम’ आणि ‘हापूस’चा संकर असलेली ‘रत्ना’ ही जात, ‘दशहरी’मधील वर्षाआड उत्पन्न देण्याच्या दोषावर मात करण्यासाठी ‘निलम’ आणि ‘दशहरी’मधील संकर असलेली व अधिक उत्पादन देणारी ‘आम्रपाली’ ही जात; अशा २५हून अधिक संकरित आंब्यांच्या जाती भारतात विकसित करण्यात आल्या आहेत आणि या सर्वांचा आस्वाद घेण्याचा कालावधी आता आला आहे. त्यामुळे आता आंबा विकत घेताना ग्राहकाने जागरूक राहणे गरजेचे आहे.

आंब्याच्या विविध जाती कशा ओळखायच्या हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. वर्षानुवर्षे हापूस खाणारी मंडळी हा नेमका कोकणातला की बाहेरचा याबाबत खात्री देऊ शकत नाहीत. कित्येकदा आंब्याच्या रत्ना किंवा सिंधू ह्या जाती, ज्या हापूसपासूनच तयार केलेल्या संकरित जाती आहेत, त्या हापूस म्हणूनच बाजारात विक्रीला उपलब्ध असतात आणि त्यातील सारखेपणामुळे आपण हापूस म्हणून त्या घेतोही. पूर्वी गुढी पाडव्याला किंवा अक्षय्य तृतीयेला हापूस विकत घेण्याची पद्धत होती. पावसाळ्यानंतर पडलेल्या थंडीमुळे कोकणातील खाडीलगतच्या आंबाबागेत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आलेला मोहोर ९० ते ११० दिवसात पक्व फळे देत होता. ह्याला निसर्गाबरोबरच शेतकऱ्याची प्रचंड मेहनतही कारणीभूत होती. परंतु आता स्पर्धा वाढलेली आढळते. जानेवारी महिन्यापासूनच बाजारात हापूस आंब्याला चढा दर उपलब्ध होतो व त्यामुळे अनेक आंबा बागायतदार अपरिपक्व आंबा काढून रसायनाच्या साहाय्याने तो पक्व करून बाजारात पाठवतात, त्यामुळे त्या आंब्याला रंग येतो पण पिकल्याप्रमाणे चव येत नाही. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी नैसर्गिक पक्वता वाढत जाते व चवदेखील निर्माण होते. त्यामुळेच जागरूक ग्राहकाने खात्रीशीर शेतकऱ्याकडून थेट माल घेतला पाहिजे. तसेच फळ तपासूनच पेटी घेतली पाहिजे.

आंब्याच्या व्यवसायात आंब्याच्या तोडणीला विशेष महत्त्व आहे. ती एक कला असून त्यासाठी अनुभवी मजूरच लागतात. हापूस आंब्याची मोहोरची प्रक्रिया दोन ते तीन महिने चालू असते. त्यामुळे लक्ष देऊन कमीतकमी चार ते पाच वेळा तोडणी करावी लागते. हापूस आंब्याची फळे आंबा बागायतदार आणे पद्धतीने काढतो. १० आण्यापासून फळे काढायला सुरुवात करतात. परंतु शास्त्रीयदृष्ट्या उत्तम स्वाद, रंग, टिकाऊपणा व चव निर्माण होण्यासाठी १२ आणे तयार आंबा काढणे आवश्यक आहे. या टप्प्याला आंबा गोलाकार रूप घेतो, देठाजवळ हलकासा खोलगट होऊन दोन्ही बाजूचे खांदे तयार होतात. १६ आणे स्टेजला आंबा झाडावर पूर्ण तयार होतो,  

त्याची आंबटगोड चव अवर्णनीय असते. त्याला झाडपिका किंवा पाडाचा आंबा असेही म्हटले जाते. तसेच हापूस आंबा जसा तयार होत जातो, तसा फळाच्या बाहेरील त्वचेवर असलेले लेंटिसेल्स रुंदवतात. आंब्याची बाहेर आलेली चोच बोथट होते. रत्ना जातीचा आंबा पिवळट हिरवा असताना पिकलेला असतो व त्याची साल जाड असते. तसेच सिंधू जातीच्या आंब्याची कोय अतिशय पातळ असते. पायरी जातीचा आंबा रसासाठी वापरला जातो, त्याची चोच ठळकरीत्या बाहेर आलेली असते आणि आंबा पिकला की फळ उतरते, मऊ पडते. आंब्याच्या नानाविध जाती आपल्याला आंबा प्रदर्शनात पाहायला मिळू शकतात. असेच एक प्रदर्शन, ‘सुवर्ण पालवी’, १३ ते १८ मे दरम्यान कोकण कृषी विद्यापीठाला ५० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने दापोली येथे भरणार आहे, त्याला अवश्य भेट द्या.

आपल्याला सर्वांना हे माहीतच असेल की कोकणातील हापूस आंब्याला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. आंबा खरेदीत फसवणूक होऊ नये अशी जर आपली  इच्छा असेल, तर आपण ‘जीआय’ मानांकित आंबा बागायतदारांकडूनच आंबे खरेदी करा. सर्वांनीच तसा आग्रह धरला तर मोठ्या प्रमाणावर आंबा बागायतदार ‘जीआय’ मानांकन करून घेतील आणि ग्राहकांची फसवणूक थांबेल. या व्यतिरिक्त आपल्याला वर्षानुवर्षे आंबा देणाऱ्या आंबा बागायतदाराकडूनच आंबे घ्या आणि शक्य असल्यास त्याच्या बागेला सीझनमध्ये भेट द्या, त्यालाही बरे वाटेल. प्रत्यक्षात आपल्यालाही आंबा ओळखणे शिकता येईल आणि शेवटी स्वतःच्या हाताने काढलेल्या आंब्याची गोडी काही औरच लागेल नाही का?

(लेखक उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथे साहाय्यक प्राध्यापक आहेत.)

संबंधित बातम्या