वाचवूया गावरान आंब्याचा ठेवा

अमित गद्रे 
सोमवार, 2 मे 2022

कव्हर स्टोरी

सह्याद्री डोंगररांगांच्या पट्ट्यातून बिटकी, साखदोडी, साखऱ्या, खोबरी, रायवळ अशा विविध आकार आणि चवींच्या आंबाजाती दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कोणतेही वाण असे नष्ट झाल्याने त्यांची चव, गुण वैशिष्ट्ये असलेला जनुकीय ठेवा कायमचा नष्ट होतो.

सह्याद्रीपट्ट्यातील वनस्पती, पशू- पक्ष्यांतील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ग्रामीण भागातील शाळांच्या बरोबरीने पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्र कार्यरत आहे. या भागात काम करताना आंब्याच्या स्थानिक गावरान जातींचे संवर्धन आणि जनुकीय विविधतेची नोंद हा विषय संस्थेतील तज्ज्ञांच्या समोर आला. त्यादृष्टीने शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने परिसरातील गावरान आंबाजातींची त्यांच्या वैशिष्ट्यांसह माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली. या उपक्रमाबाबत माहिती देताना पर्यावरण शिक्षण केंद्राचे समन्वयक सतीश आवटे म्हणाले, ‘सह्याद्रीमधील अनेक बहुपयोगी वनस्पती, फळझाडे आणि त्यांच्या जाती दुर्मीळ होत चालल्या आहेत. हे लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात अभ्यासकांच्या मदतीने गावरान आंबाजाती आणि त्यांच्या जनुकीय विविधतेचा अभ्यास सुरू केला. ग्रामीण भागातील शिक्षक, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांच्या परिसरातील गावरान आंबाजातींची त्यांच्या वैशिष्ट्यांसह माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पर्यावरण शिक्षण केंद्राने २०११ ते २०१५ या काळात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्यावतीने ‘पश्चिम घाट स्पेशल इको क्लब योजना’ विकसित करून अंमलबजावणीस सुरुवात केली. ही योजना सह्याद्री पट्ट्यात असणाऱ्या तेरा जिल्ह्यांतील ६३ तालुक्यांमधील २३९ शाळांमध्ये राबविण्यात आली. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्गातील शाळांनी उपक्रमशील सहभाग नोंदविला.’

संस्थेने गावरान आंबाजातींच्या नोंदीसाठी एक विशिष्ट फॉर्म तयार केला. यामध्ये आंबाजातीचे स्थानिक नाव, गावाचे नाव, झाडाचे ठिकाण (जीपीएस नोंद), मालकाचे नाव, फळाच्या जातीचे वैशिष्ट्ये, झाडाचा आकार, फळ आणि पानांचा आकार, सालीची जाडी, फळातील केसरांचे प्रमाण, कच्च्या फळाचा आणि ते पक्के झाल्यानंतरचा त्याचा रंग, वजन, चव, सुगंध अशी विविध निरीक्षणे नोंदविण्यात आली. काही गावांच्यामध्ये एक तर काही गाव शिवारांमध्ये वीसहून अधिक गावरान आंबाजाती मिळाल्या. संस्थेने सह्याद्री पट्ट्यातील गावरान आंब्याच्या २०५ जातींची नोंद आणि अभ्यास केला आहे. तज्ज्ञांनी आंबा जातींचे फोटो आणि माहितीचे संकलन केले आहे.

जपा गावरान ठेवा
आंबाजातीतील जनुकीय विविधता पश्चिम घाटात दिसून आल्यामुळे या पट्ट्यातही आंब्याचे मूळ आहे का? हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्याकडे पूर्वापार या जातींची शास्त्रीय नोंद नाही, त्यावर अभ्यासही झालेला नाही. शेतकऱ्यांच्या निरीक्षणानुसार गेल्या ३० वर्षांत पन्नास टक्के गावरान आंबाजाती आणि झाडांची संख्या कमी झाली. पर्यावरण शिक्षण केंद्राने कृषी विभाग, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांसमोर २०५ गावरान आंबाजातींची नोंद सादर केली. राज्यात गेल्या काही वर्षांत हापूस, केसर, पायरी या सारख्या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बिटकी, साखदोडी, साखऱ्या, खोबरी, रायवळ अशा विविध चवीच्या आंबाजाती दुर्लक्ष झाल्यामुळे सह्याद्री पट्ट्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आंबाजाती नष्ट झाल्याने त्यांची चव, गुण वैशिष्ट्ये असलेला जनुकीय ठेवा कायमचा नष्ट होतो. रायवळ आंब्याची मोठी झाडे ऑर्किड, फुलपाखरांसाठी ‘होस्ट प्लान्ट’ आहेत. गावरान आंबा हा अनेक पक्षी, माकडांचा अन्नाचा स्रोत आहे. येत्या काळात हापूस, पायरी, केसर या आंबाजातींच्या बागेत किमान दहा टक्के प्रमाणात गावरान जातींची लागवड वाढवण्याची गरज आहे. यामुळे परागीकरणाला फायदा होईल, फळ उत्पादनात वाढ मिळेल. महत्त्वाचे म्हणजे दुर्लक्षित जातींचे संवर्धनही होईल. आंब्याच्या बरोबरीने पर्यावरण शिक्षण केंद्राने शाळांच्या सहकार्याने सह्याद्रीपट्ट्यातील जांभूळ, फणस, करवंदाच्या स्थानिक जातींची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यातील ‘आयसर’ या संशोधन-शिक्षण संस्थेमध्ये सध्या त्रेचाळीस आंब्याच्या गावरान जातींचा वेगळेपणा ओळखण्यासाठी त्यांच्या जनुकांचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्या माध्यमातून या गावरान जातींचे जनुकीय पातळीवरील साम्य आणि वेगळेपण अत्याधुनिक पद्धतीने सर्वांच्यासमोर येईल. आंब्याच्या गावरान जातींचा अभ्यास झाल्यानंतर या जातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने पर्यावरण शिक्षण केंद्राने यातील निवडक जातींची कलमे तयार करण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना आंबा कलमीकरणाचे प्रशिक्षण दिले आहे. 

वेंगुर्ल्यात २७४ आंबा जातींचे संग्रहालय...

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रामध्ये आंबा पिकाच्या विविध जातींचे संशोधनाच्यादृष्टीने संवर्धन करण्यात आले आहे. या केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.एस.सावंत म्हणाले की, आमच्या संशोधन प्रक्षेत्रावर आंबा पिकाच्या २७४ जातींचा संग्रह आहे. यामध्ये राज्य, देश आणि विदेशातील काही जातींचा समावेश आहे. या संग्रहालयात नष्ट होणाऱ्या दुर्लक्षित जाती देखील पहावयास मिळतात. आंबा संग्रहालयात हापूस, केसर, पायरी, रायवळमधील विविध प्रकार, दशहरी, दूधपेढा, गोवा मानकूर तसेच ‘सुवर्णरेखा’, ‘सुवर्णा’, ‘कोकण राजा’,‘रत्ना’, ‘कोकण रुची’ या जाती आहेत. याचबरोबरीने परदेशातील ‘केंट’, ‘टॉमी ॲटकीन’, ‘माया’, ‘पामर’, ‘ऑस्टिन’ या जाती देखील पहावयास मिळतात. हवामान बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, देश विदेशातील बाजारपेठ लक्षात घेता नवीन जातींच्या विकासासाठी प्रक्षेत्रावरील आंब्याचा जनुकीय ठेवा महत्त्वाचा ठरतो आहे. संशोधनाच्या बरोबरीने दुर्मीळ होत चाललेल्या आंब्यांच्या गावरान जातींच्या संवर्धनावर देखील आमच्या संशोधन केंद्राने भर दिला आहे.

  • रंग, आकार आणि परंपरेने मिळाली नावे
  • गराला शेपूसारखा वास असेल तर ‘शेप्या ’आंबा.
  • परळेनिनाई (जि.कोल्हापूर)या गावातील निनाईदेवीच्या जत्रेसाठी घरातून नैवेद्य ‘पोस्त’ पाठविला जातो. गावात ज्या आंबा झाडाखाली नैवेद्य वाटून खाल्ला जातो, त्या झाडाला गावकऱ्यांनी ‘पोस्ताचा आंबा` असे नाव दिले आहे.
  • सालीच्या रंगानुसार ‘पिवळ्या’, ‘सफेदा’, ‘काळा’, ‘पांढरा’ आणि आकारानुसार ‘राघू’, ‘कोयती’, ‘केळी’, ‘वाकडा’, ‘गोटी’, ‘भोपळी’, ‘नारळी’, ‘मोग्या’ अशी नावे.
  • आंबा तोडताना त्यातून येणारा चीक ही फळातील नैसर्गिक संरक्षण प्रणाली असते, त्यामुळे जसजसे आपण जंगली प्रदेशाच्या आत जाऊ तसतसे आंब्यातील चिकाचे प्रमाण वाढते. त्यावरून जास्त चिकाचा ‘चिक्काळ्या’, ‘रॉकेल’, ‘फुंगशी’, ‘चिकाला’ अशी नावे जातींना मिळाली.
  • झाडाच्या स्थळानुसार आंब्याला दिलेले नावः उदाहरणार्थ, पन्हाळा गावातील तहसीलदारांच्या सरकारी घराच्या आवारातील आंब्याच्या झाडाला ‘तहसीलदाराचा आंबा’ हे नाव.
  • सावंतवाडी (ता.भुदरगड,जि. कोल्हापूर) गावात दर वर्षी भरपूर आंबा फळे देणारे झाड आहे. गावातील प्रत्येक घरातील लोक टोपली भरभरून या झाडाचे आंबे घेऊन जातात. सगळ्यांना पुरूनही झाडाला आंबा फळे शिल्लक राहतात म्हणून या जातीचे नाव ‘वताचा आंबा’.

संबंधित बातम्या