मराठवाड्याचा केसर

डॉ. संजय पाटील
सोमवार, 2 मे 2022

कव्हर स्टोरी

भारताचे राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याचा उल्लेख रामायण आणि महाभारत या ग्रंथातही आढळतो. आपल्या देशात आंब्यांची लागवड चार हजार वर्षांपासून होत आहे. आंबा या फळाची पद्धतशीर लागवड मुघल राजांच्या काळात सुरू झाली. अकबर बादशहाने बिहारमधील दरभंगा येथे लाखीबागेत एक लाख आंबा झाडांची लागवड केली. ऐन-ए-अकबरी या ग्रंथात आंबा जातींची वैशिष्ट्यांसह लागवडीची माहिती दिली आहे. जगातील १११ देशांमध्ये आंबा लागवड केली जाते आणि जगाच्या एकूण उत्पादनांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन भारतात होते. भारतातील बहुतेक राज्यांत आंबा लागवड केली जाते. देशात आंब्याच्या १३०० जातींची नोंद झालेली आहे. यापैकी आपल्या राज्यात ‘हापूस’, ‘केसर’, ‘रत्ना’, ‘तोतापुरी’, ‘लंगडा’, ‘दशेरी’, ‘सिंधू’ इत्यादी जातींची लागवड प्रामुख्याने केली जाते. 

केसर ही जात मूळची गुजरातमधील सौराष्ट्रीतील आहे. या जातीच्या फळांना आपल्या राज्यात, विशेषतः मराठवाड्यात, केसरासारखा विशिष्ट सुवास असतो आणि फळांवर एक ठरावीक प्रकारची लालसर झाक असते. उन्हाळ्याच्या दिवसात खवय्यांसाठी हा केसर आंबा खाणे म्हणजे एक पर्वणीच असते. 

केसर जातीची गुणवैशिष्ट्ये:

  • वजन - २७५-४०० ग्रॅम
  • आकारमान - ११ सेमी लांब, ५.४ सेमी व्यास, ६.४ सेमी उंची
  • घटकांचे प्रमाण - गर ः ७२ टक्के, साल ः १५ टक्के, कोय- १३ टक्के
  • रंग- पिवळ्या रंगाची साल, लालसर झाक, केशरी रंगाचा रस
  • विद्राव्य क्षार- २०-२२ टक्के ब्रिक्स, ग्लुकोज- ४.८ टक्के, पूर्ण साखर- १२ टक्के
  • आम्लता- ०.२५ टक्के
  • पीएच- ४.२ टक्के, घनता- ७०-७५ टक्के

आंबा निर्यात
सध्या जागतिकीकरणाचे युग सुरू आहे, त्यामुळे आपणास निर्यातीची चांगली संधी आहे. परदेशात फळांची प्रत आणि आरोग्याबाबत अनन्यसाधारण जागरूकता आहे. केसर आंब्यास अमेरिका, चीन, ब्रिटन, हाँगकाँग, जपान, ऑस्ट्रेलियासह आणि युरोप, आखाती देशांमध्ये मागणी वाढत आहे. यंदा निर्यातदार कंपन्यांचे सारे लक्ष केसर आंबा निर्यातीवर लागून राहिलेले आहे. कोकणातील हापूस आंबा उत्पादनावर वादळ, पाऊस यांमुळे विपरीत परिणाम झाला असल्याने निर्यातदारांनी केसरवर लक्ष केंद्रित केले आहे. निर्यातीसाठी विमानाने जास्त खर्च येत असल्याने कृषी पणन मंडळ समुद्रमार्गे निर्यातीसाठी प्रयत्नशील आहे. निर्यातीसाठी ‘पणन’च्या अनेक योजना असून शेतकऱ्यांना राज्यभरातील कृषी विद्यापीठांसह मंडळाचे मार्गदर्शनदेखील मिळत आहे. मराठवाड्यातील केसर आंब्यास ‘मँगो ग्रोअर असोसिएशन संस्थे’मार्फत भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. तसेच ५६ शेतकऱ्यांनी वैयक्तिक मानांकनासाठी अर्जदेखील दाखल केलेले असल्याने निर्यातीसाठी प्रचंड वाव आहे. 

आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाने करमाड (ता. औरंगाबाद), जालना, बारामती इत्यादी ठिकाणी प्रीकुलिंग, कोल्ड स्टोअरेज, पॅकहाऊस इत्यादी सुविधा असलेले विविध क्षमतेची सुविधा केंद्र तयार केलेली आहेत. या सुविधा केंद्रांतून २००६-०७ ते २०१५-१६पर्यंत १९३.३१ मेट्रिक टन जीआय प्राप्त केसर आंब्याची निर्यात झालेली आहे. मागील तीन वर्षांपासून पाऊसमान चांगले झाल्याने लागवडक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केसर आंबा उत्पादन, गुणवत्ता वाढीस लागावी या उद्देशाने औरंगाबादेत हिमायतबाग आणि दापोली येथे भारत-इस्राईल करारांतर्गत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना (२०१६-१७) करण्यात आलेली आहे. 

शेतमाल निर्यातीत गुणवत्ता हा महत्त्वाचा निकष असल्याने युरोपियन देशांनी ‘युरेपगॅप’ प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे. केवळ फळे कीडनाशक अंशमुक्त असून चालत नाही, तर लागवड, प्रक्रिया, पॅकिंग, एकात्मिक कीड-रोग नियंत्रण, कामगारांची सुरक्षा, पर्यावरण प्रदूषण इत्यादी बाबी निर्यात संबंधाने महत्त्वाच्या ठरतात. थोडक्यात ‘युरेपगॅप’ प्रमाणपत्र तुमच्या अन्नाच्या/पदार्थांच्या सुरक्षित प्रणालीची हमी देते. त्यासाठी बागेतील प्रत्येक कामाच्या नोंदी ठेवणे निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. 

मराठवाड्यातील केसर आंब्याने नुकतेच भारतीय पोस्ट तिकिटावरही स्थान मिळविले आहे.

(लेखक बदनापूर (जालना) येथील मोसंबी संशोधन केंद्रात प्रमुख शास्त्रज्ञ आहेत.)

संबंधित बातम्या