वऱ्हाडात आंब्यांमध्ये लोकशाही नांदते

जी. बी. देशमुख
सोमवार, 2 मे 2022

कव्हर स्टोरी

वऱ्हाडातल्या सगळ्या आंब्यांमध्ये मधासारखा गोड, चविष्ट आणि घट्ट केशरी रस असलेला ‘सह्यद्या’ हा वऱ्हाडातील आंब्यांमधील सर्वश्रेष्ठ आंबा आहे असे म्हणता येईल, पण अशी अधिकृत सर्वमान्यता नाही. तीव्र उन्हाळ्याची काहिली कमी करणाऱ्या ह्या सगळ्या चविष्ट चवदार आंब्यांमध्ये राजा म्हणून कुणाचा अभिषेक झालेला नाही. त्यामुळे वऱ्हाडातील आंब्यांमध्ये राजेशाही नव्हे तर अवीट गोडीची लोकशाही नांदते आहे, असे म्हणायला हरकत नाही.

‘आंब्याची कोय, पैशाची सोय’ हे ब्रीद घेऊन काही वर्षांपूर्वी एक कंपनी वऱ्हाडात पुढे आली होती. आंब्याच्या कोयीतून तेल काढून ते साबणाच्या निर्मितीत वापरण्याची योजना, त्या घोषणेमागे होती. ‘शोले’ सिनेमातील बडबड्या बसंतीच्या ‘आम तो आम, गुठलियोंके भी दाम’ ह्या प्रसिद्ध संवादाचे हे मूर्त रूप होते.  परंतु, मुळात वऱ्हाडी माणसांना कुणी असा मोल-भावरूपी कस लावलेला आवडत नाही. मला आठवते, सत्तरच्या दशकात जेव्हा आम्ही शाळकरी हुडदंग्यात मश्गूल होतो, तेव्हा वडिलांसोबत सायकलच्या दांड्यावर बसून मे महिन्यातील खतरनाक वैदर्भीय उन्हात बाजारात आंबे घ्यायला जात असू, त्यावेळी आंबे विकणारा मनुष्य आधीच माचून (चोळून) तयार असलेल्या आंब्याचा रस भस्सकन बाबांच्या हातावर पिळत असे. हातावरून होणाऱ्या रसाच्या ओव्हरफ्लोची  त्याला पर्वा नसे. तीर्थाप्रमाणे रस ग्रहण करून झाल्यावरही गिऱ्हाइकाच्या मनात शंका आहे असे जाणवल्यास, “तुमच्या मतानं कोन्चाई उचलून घ्या, अन मंग सांगा... साखरेसारखा गोड नसन त सारं दुकान तुमचं.” एक दोन आंबे केवळ चवीसाठी ग्राहकास फुकट खाऊ घालणे ही साधारण गोष्ट होती. शिवाय पंधरा आंबे विकत घेतल्यास वीस मिळायचे. वीस घेतल्यास पंचवीस, पंचवीस घेतल्यास तीस, पन्नास घेतल्यास सत्तर आणि शंभर घेतल्यास एकशे तीस. तो नियमच होता. ‘इतक्यावर इतके फ्री’ अशी आजच्या जमान्यातील जाहिरात नव्हती, पण सवलत खरीखुरी होती. थोडक्यात आंब्याचा संबंध व्यवहारातील दिलेरीशी होता. बाजारात आंब्यांच्या विक्रीच्या नावाने अशी ऐसपैस धूळधाण, तर खेडे विभागात घराघरात आंब्यांच्या राशी लागलेल्या.  

आंब्याचे एक झाड असू द्या की जंगी आमराईचे मालक असू द्या, खेड्यातील घरात वरच्या माळ्यावर आंब्यांचा ‘माच’ लागलेला असे. झाडावरून उतरवून आणलेले, पिकण्याच्या बेतात असलेले शेकडो आंबे वाळल्या गवतात पिकण्यासाठी म्हणून ठेवले जात. त्या खोलीत पाय ठेवताच कच्चे आंबे, पिकलेले आंबे, पिकण्याच्या बेतात असलेले आंबे, फुटलेल्या आंब्यातील रस, आणि आंबे पिकविण्यासाठी आणलेले वाळके गवत ह्या सगळ्यांचा एकत्रित सुगंध वेडावून टाकत असे. त्या खोलीत गेल्यासरशी तो सुगंध लांब श्वास घेऊन छातीत भरून घ्यायचा आणि नंतर पिकलेले आंबे निवडून घ्यायचे. त्यानंतर पितळीची एक लहान बादली अर्ध्यापर्यंत पाण्याने भरून घ्यायची. मावतील इतके आंबे बादलीत सोडले की मग दिवसभर बैठकीत आलेल्या आगंतुकासमोर ती बादली मांडायची. उन्हात घामाजोकळं होऊन आलेला पाहुणा आंब्याचा मधुर रस चाखत वऱ्हाडी गप्पांचे दळण दळण्यास मोकळा. जेवणासाठी मोठ्या वाटीत अर्धा रस आणि त्यावर तरंगणारे अर्धी वाटी गावरान म्हशीचे तूप. साजूक तुपासारखे नाजूक संबोधन वऱ्हाडात चालणार नाही. तुपाशिवाय रस खाणे म्हणजे विना साज संगीताचे गायन ऐकणे. आणि हो... रसात पाणी अथवा साखर मिसळणे म्हणजे खानदानीच्या अस्सलपणावर शंका घेण्यास वाव निर्माण करण्यासारखे होते. ह्या जेवणात कुरडया, पापड, शेवया, सरगुंडे ही अतिरिक्त धमाल असायचीच. रसाचे जेवण करून पोट तठ्ठ झाल्यानंतर येणारी गुंगी आणि ब्रह्मानंदी टाळी ह्यात ‘ब्रह्मानंदी टाळी’ उन्नीस ठरली नाही तरच नवल. 

गर्द आमरायांमध्ये थंडगार सावलीत साधे जाऊन बसणे हेसुद्धा वऱ्हाडातील तीव्र उन्हात स्वर्गीय आनंद देणार असे, तशात झाडाला आंबेमोहोर अथवा प्रत्यक्ष आंबेच लागलेले असल्यास तो माहौल केवळ अनुभवून घ्यावा.  

विदर्भात आंब्यांचा राजा म्हणविला जाईल असला कुठला ब्रँड नाही. कोकणातला हापूस हा जसा ‘राजा’, तसे इथे काही नाही. इथे प्रत्येक गावचा आपापला ब्रँड आहे आणि गावातल्या प्रत्येक आमराईच्या मालकाचा पुन्हा एक ब्रँड आहे. प्रत्येक ब्रँड हा ‘ह्याच्यासमोर हापूस अन फापूस पानी भरते’ किंवा ‘हापूस अन केसर भुलून जान, एकदा आपला ‘साखऱ्या’ घेऊन जा,’ अशी नैसर्गिक दर्पोक्ती आहे. ह्या सर्व ब्रँडना एक सामान्य नाव आहे ते म्हणजे ‘गावराणी’ आंबा.  गावाराणीतला ‘ण’ जर लहान असला, म्हणजेच उच्चार ‘गावरानी’ असा असला तर तो अधिक जवळचा.  

बसका आकार असलेल्या आंब्यासाठी ‘बैठक्या’ हा शब्द, तर उन्हाळ्याच्या शेवटी पाऊस सुरू होण्याच्या बेतात असताना ज्या झाडाला फळे येतात असा वऱ्हाडी माणसाच्या ‘लेट लतीफी’ स्वभावाच्या जवळचा असणारा ‘बरसाद्या’. आता ह्याचे नाव दुरुस्त करून त्याला तुम्ही ‘बरसात्या’ म्हणण्याचा प्रयत्न करू नका. त्याला ‘बर्साद्या’ असे वऱ्हाडी हेल काढत म्हणाल तरच त्याच्या गोडीचा आनंद घेता येईल. शेपूच्या भाजीसारखा खमंग वास ज्याला असतो, त्या आंब्याला आम्ही प्रेमाने ‘शेप्या’ म्हणतो. आंब्याचे एक वाण थोडे वेडवाकडे असते. चव जरी सरळ, सोपी, गोड असली तरी आकारावरून ह्याला नाव पडले ‘वाकड्या’. जिभेला आम्ही जास्त वाक देत नाही, कारण शुद्ध बोलण्याचा नाद धरला आणि भर बाजारात शिष्ठ म्हणून संभावना झाली तर काय? रसाच्या गोडीइतकीच उच्चारातील निरागसतेची गोडी आम्ही अशी अनुभवतो. कवठाच्या फळासारखे आकाराने गोलसर आणि मोठा असलेल्या आंब्याच्या एका वाणाचे साल थोडे जाड असते. सहाजिकच ह्या आंब्याचे नाव आम्ही ठेवले ‘कवठ्या’ आंबा. नाव काहीही असो आमच्याकडचे प्रत्येक वाण हे आमच्यासाठी ‘बाहुबली’ आणि तिकडचा ‘हापूस’ म्हणजे ‘भल्लालदेव’. षड्‍यंत्र करून योजनाबद्ध पद्धतीने मोठेपणा प्राप्त करून घेणारा तो ‘भल्लालदेव’.  आम्ही मात्र साधेभोळे सिंहासनाचे वारसदार असूनही त्याला मुकलेले, असा काहीसा ‘अन्यायाचा’ भाव गोंजारणारे.  

गुजरातच्या ‘केसरी’ला टक्कर देतो तो आमचा ‘शेंदऱ्या’. अत्यंत आकर्षक अशा पिवळ्या रंगावर शेंदरी झाग असलेल्या ‘शेंदरी’ आंब्याचा स्वाद लय चिवट. दिवसभर भोवती रुंजी घालणारा. वऱ्हाडात अगदीच लहान म्हणजे मोठ्या लिम्बूच्या आकाराचा आंबा आहे. सत्तर टक्के भाग कोयीने व्यापलेला, वीस टक्के सालीने आणि उर्वरित दहा टक्क्यांत अंग चोरून बसलेला रस मात्र गोड. अशा चिटुकल्या वाणाला आम्ही ‘काळी गोटी’ म्हणतो. आणि हो, कोय वगैरे शब्द आम्हाला कळत नाही. गुठली म्हणा, आठोळी म्हणा, पण कोय आमच्या तोंडात येत नाही. लाडूसारखा गोलगुटूक आकाराचा आंब्याचा एक प्रकार असतो, त्याला नाव आहे ‘लड्डू’ आंबा. 

विशेष म्हणजे आंबा हा शब्द विविध अर्थाने वापरला जाते. आंब्याच्या झाडाला आम्ही ‘आंबा’च म्हणतो. जसे आंब्याची किती झाड आहेत तुमच्याकडे? असे विचारायचे झाल्यास ‘कीतीक आंबे आहेत तुमच्या इकडे?’ असे विचारले जाते. आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो असे सांगायचे झाल्यास, ‘आंब्याखाली बसलो होतो’ असे आम्ही म्हणतो. कैरी हा शब्द आमच्याकडे फारसा वापरात नाही. ‘लोणच्याचे आंबे’ किंवा ‘कच्चे आंबे’ म्हणजे कैरी. आंबा हा शब्द पाहिजे तसा वाकवून संवाद सुरू असतो. 

आंब्यांच्या नावातील विविधता अशी की एक वाण अक्षरशः ‘मिरची’ आंबा म्हणून ओळखले जाते. आकार किंवा चव ह्यात साम्य नसूनही त्यास मिरची का म्हणावे त्याचा बोध होत नाही. खट्टा-मिठा अशी आंबटसर चव असलेला ‘आंबट्या’, माचता-माचता (चोळताना) धोका देऊन फुटेल असा कागदासारख्या पातळ सालीचा ‘कागद्या’, गाडग्यासारखा मोठ्या आकाराचा ‘गाडग्या’ आंबा ह्याशिवाय ‘नाकाड्या’, ‘कुयरी’ असली आंब्यांची विविध नावे आहेत. पण ह्या सर्वात मधासारखा गोड, चविष्ट आणि घट्ट केशरी रस असलेला ‘सह्यद्या’ हा वऱ्हाडातील आंब्यांमधील सर्वश्रेष्ठ आंबा आहे असे म्हणता येईल, पण अशी अधिकृत सर्वमान्यता नाही. तीव्र उन्हाळ्याची काहिली कमी करणाऱ्या ह्या सगळ्या चविष्ट चवदार आंब्यांमध्ये राजा म्हणून कुणाचा अभिषेक झालेला नाही.  त्यामुळे वऱ्हाडातील आंब्यांमध्ये राजेशाही नव्हे तर अवीट गोडीची लोकशाही नांदते आहे, असे म्हणायला हरकत नाही. हापूस आंब्याला राजा ठरविताक्षणीच तो सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा होऊन बसला, त्यामुळे ही सामान्यांच्या आवाक्यातील लोकशाही बरी.

संबंधित बातम्या